Login

म्हणून जग फसतं! -7

वरवर दिसणाऱ्या गोष्टी बघून आपण त्याबद्दल एक मत बनवतो पण बऱ्याचदा ते चुकीचे ठरते म्हणून तर म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.. हा संदेश देणारी एक हलकी फुलकी मनोरंजक कथा.. म्हणून जग फसतं!

म्हणून जग फसतं! -7
©®राधिका कुलकर्णी.



“ हाय कॉलेज सुंदरी ! कुठे आहेस ? ”

शरदचा वॉट्सॲप मेसेज बघून मालाला वयाचा विसर पडून चक्क लाजायला झाले.


“ ह्या वयातही फ्लर्टीग करायची सवय जात नाही ना तुझी? ”

" हे बघ,असेय तुझे.. जरा कुठे थोडेसे फ्रेंडली टॉक करू म्हणले की लगेच तू फ्लर्टीगचा स्टॅम्प मारते.. आणि मी काय चुकीचे बोललो, तू कॉलेज क्विन नव्हतीस का आपल्या कॉलेजची ! ”

“ शऱ्या त्याला आता किती काळ लोटला. कशाला त्या जुन्या आठवणी उगाच, त्यातले काय शिल्लक राहिलेय आता ! ”

“ हे तू नाही आम्ही सांगणार आणि मला विचारशील तर तू तुझ्या वयाच्या सर्व स्त्रियांपेक्षा तरूण आणि सुंदर दिसतेस हे काही खोटेय का? ”

“ इश्श शऱ्या ! काहीतरीच काय! बरं एवढ्या साऱ्या मस्काबाजीचे कारण कळेल का?
नाही म्हणजे इतक्या दिवसांनी आज अशी *दिल खोल के* तारीफ करायला काय कारण आहे कळेल का? ”

“ काही विशेष नाही. सहज… वाटलं, आज मैत्रिणीची थोडी मस्करी करावी पण तुला तर सगळ्यात मस्काबाजीच दिसते तर दे सोडून, जाऊदे…! ”

“ अरे एऽऽ काय लगेच रूसतोस रे लहान मुलांसारखा! तू करू शकतोस तर मी नाही करू शकत का तुझी मस्करी, हे बरेय हं तुझे! ”

" बरं बरं…ठीक आहे. लिव्ह दॅट टॉपिक नाऊ. पण मला हे सांग, तू आजच्या सोसायटी बोर्डवरची बातमी वाचलीस का? ”

" कालपासून गुडघे फार त्रास देत होते म्हणून आज खाली उतरलेच नाही रे.. काय बातमी आहे तूच सांग
नाऽऽऽ? ”

“ अगं विसरलीस का उद्या आपला सोसायटी ट्रेक टूर नाहीये का! आज सकाळीच बोललो होतो ना तुला, विसरलीस होय गं! "

" अरे विसरले नव्हते पण उद्या येणे जमेल असे वाटत नाही रे. गुडघ्यांनी अचानक डोकं वर काढलंय बघ. "

" अगं थोड्या वेळापूर्वी इतकी तारीफ केली मी तुझी आणि लगेच तू मलाच चूकीचे सिद्ध करायला लागलीस होय गं!
ते काही नाही. तुला उद्या यायचेय म्हणजे यायचेय. मला कुठलेही बहाणे नकोएत, कळलं का? आणि मालेऽऽ उद्या ना तुझ्यासाठी एक भारी सरप्राईज आहे. ॲम शुअर यू आर रीअली गोइंग टू गेट अ ग्रेट शॉक टुमॉरो. अफकोर्स इट विल क्रिएट हॅपीनेस.. "

“ बापरे ! सरप्राईज ! ते कसले रे ?
ह्या वयात मस्करी करतोस ना माझी, पण मी तुझ्या कुठल्याच भूल थापांना मुळीच भुलणार नाहीये. आधी काय सरप्राईज ते सांग मग ठरवेल यायचे की नाही."

“ अगं वेडे, सरप्राईज आहे नाऽ, मग ते आधीच सांगितले तर त्यात काय मज्जा ! पण एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की तुला हे सरप्राईज नक्की आवडेल, आता ठरव काय करायचे ते! ”

“ बरं बाबा येते. तू त्या बोर्डवरील माहीतीचा फोटो वॉट्सॲप कर. म्हणजे ते वाचून त्याप्रमाणे तयारी करता येईल. "

“ ये हुई ना बात! मी मगाशीच मेसेज केलाय. वाच आणि सकाळी बरोबर आठ वाजता सोसायटी हॉलवर हजर रहा. चल बाय. भेटू उद्या. शुभ रात्री! ”

" शुभ रात्री! "

मनातल्या मनात मालाला शरदच्या बोलण्याने सर्वांगी गुलाब फूलल्यागत वाटत होते. त्याने केलेल्या स्तुतीने नकळत ती मोहोरली होती. वयाच्या ह्या टप्प्यावरही तिला लाजायला झाले. स्तुती,कौतूक कोणत्या स्त्रीला नकोसे असते त्यात ह्या वयात जर आपलाच एखादा कॉलेज मित्र ती करत असेल तर नकळत पुन्हा २०व्या वर्षात मन जाऊन न पोहोचले तर नवल ते काय!
ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मालाच्या अंगी अचानक तारूण्य फुलून आले.मगापर्यतची गुडघादूखी आकस्मिकपणे गायब होऊन वॉट्सॲप मेसेज मधील रीक्वायरमेंटनुसार ती एक एक वस्तुंची जमवाजमव करायला लगबगीने ह्या खोलीतून त्या खोलीत फुदकायला लागली. वॉटर-बॉटल, नॅपकिन, हॅंडसॅनिटायझर, मेडिसिन्स, थोडेफार स्नॅक्स, ट्रेक-शूज इत्यादी यादीनूसार वस्तू जमवण्यात माला गुंगून गेली.

इकडे रहायला आल्यानंतर पहिल्यांदाच अशा कुठल्यातरी सहलीला ती जात होती. अगदी लहानपणीच्या शाळेच्या सहलीची तीच आठवण ताजी होऊन नकळत ती एक्साईट झालेली.

नाष्टा, दूपारचे जेवण तिकडेच दिले जाणार होते. झालेच तर दोन वेळा वाटेत चहा कॉफी स्नॅक्स वगैरे पण दिले जाणार होते. प्रत्येक सिनियर सिटीझन्सच्या टीम बरोबर एक तरूण व्यक्ती पण सोबत राहणार होती. एकंदर सगळी व्यवस्था इतकी चोख होती की मालाचा दुखरा पाय घेऊनही जाण्यासाठी ती उत्साहाने तयार झाली.

उद्याची पहाट कधी उजाडतेय आणि कधी आठ वाजतात असे तिला झालेले.
त्या विचारांच्या लहरींवर मन असे काही नाचायला लागले की 70रीतली माला कधी शोडषा झाली तिचे तिलाच कळले नाही. उद्या सहलीत काय काय करायचे ह्याचा विचार करता करता झोपेने कधी तिला मिठीत घेतले तिलाही कळले नाही.

सकाळी साडेपाचच्या नेहमीच्या गझरने माला दचकून जागी झाली. झोपेतून जागे होईपर्यंत तिला आपण जागेच आहोत असेच वाटत होते. अचानक बझरच्या आवाजाने तिची तंद्री भंगली आणि ती पुन्हा सत्यात आली.
साडेपाचला उठल्यावर नेहमीप्रमाणेच तिचा योगा, प्राणायाम इत्यादी उरकून आपला आवडता वाफाळता चहा घेत ती जरावेळ गॅलरीत रेंगाळली. आजची सकाळ नेहमीपेक्षा जरा जास्तच टवटवीत फ्रेश वाटत होती. चहाचे नादवत भुरके घेत तो संपवत ती घाईघाईने स्नानादी उरकायला गेली. होऽ, उशीर व्हायला नको ना !
सगळे आवरून बॅग रेडी करून घड्याळात बघितले तर अजून फक्त सातच वाजले होते. म्हणजे इतके सगळे करुन अजून फक्त सातच वाजलेले ???
आज घड्याळाचे काटे जणू संप असहकार पुकारल्यागत पूढे सरकता सरकत नव्हते.


ती अतिशय बेचैन झाली. घरातल्या घरात तिचे ह्या खोलीतून त्या खोलीत घिरट्या मारणे सुरु. मधूनच घड्याळावर नजर पडत होती. अजूनही फक्त सव्वा सातच. तिची अस्वस्थता आता आईच्याही नजरेतून सुटली नाही….

“ अगंऽऽ वेऽळ आहे अजूऽन. जरा एकाजागी शांत बैस, नाहीतर फेऱ्या मारून मारून इथेच पाय दुखायला लागला तर ट्रेकिंग कसे गं करशील तिकडे ? ”
इति मालाज् मातोश्री.

आईच्या गालातल्या गालात हसत मारलेल्या ह्या कोपरखळीवर तर मालाला मेल्याहून मेल्यागत झाले.

“ आपला अतिउत्साह आईच्याही नजरेने हेरला.
आईचा काही गैरसमज तर नसेल ना झाला !
ह्या वयात मला इतकी कसली एन्क्झायटी? आईला काही संशयऽऽऽ.???
माझ्या आणि शऱ्याच्या वाढणाऱ्या भेटी, वॉट्सॲपवर गप्पा ह्या सगळ्याचा आईने काही विपरीत अर्थ तर नसेल ना लावला !
पण तो अर्थ खरंच विपरीत आहे ????? ”

शेवटच्या प्रश्नावर माला स्वतःच दचकली. तिने चोरट्या नजरेने आईकडे बघत अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. आई शांतपणे बिछान्यावर पहुडलेल्या अवस्थेत कुठलेसे स्तोत्र गुणगूणत होती.

म्हणजे हे सगळे आपल्याच मनाचे खेळ आहेत?
पण मन असे सतत का भरकटतेय?
काय हवेय ह्या मनाला?
मी कुणाची साथ मिस करतेय का?
पण ह्या वयात, आत्ता हा विचार?? किती बरोबर आहे? मी चुकतेय का?
मला नेमके काय हवेय?
शऱ्या बोलत नाही पण खरंच तो त्याच्या बायकोबरोबर खूष असेल का?
आणि जर नसेल तर मग?
तर मगऽऽ….. काय हरकत आहे जर दोन तहानले जीव एकाच इच्छेने एकत्र आले तर!
ती तहान जर मानसिक/भावनिक स्वरूपाची असेल तर अडचण काय आहे??
त्यालाही एका चांगल्या सोबतीची गरज असेल तर काय हरकत आहे आम्ही भेटलो, बोललो तर!
प्रेम कुठल्याही वयात होऊ शकते. मान्य आहे त्याची जोडीदार अजून जीवंत आहे, त्याच्या सोबत आहे पण काय उपयोग अशा जोडीदाराचा जो आपल्या जोडीदाराची पूरक साथ देऊ शकत नाही.
मग अशावेळी सापडली अशी एखादी व्यक्ती जी तुमच्या आवडीनिवडीनुसार त्या त्या विषयात योग्य चर्चात्मक साथसंगत करेल, तुम्हाला ते तुमच्या वयापेक्षा अधिक तरूण बनवेल, तुमच्या मनाची मरगळ झटकून त्याला तारूण्य प्राप्त करून देईल तर मग अशा नात्यात गैर काय आहे!
इट्स हार्मलेस देन व्हाय नॉट?
मी जरा जास्तच टोकाचा विचार करतेय का?
शऱ्या खरंच माझ्यात त्याची उर्वरित अपूर्ण जोडीदार बघत असेल का?
आज मला काहीतरी भारी सरप्राईज मिळणार म्हणालाय. ते सरप्राईज हेच तर नसेल! आज तो कदाचित त्याचे मन माझ्यापूढे उघड तर करणार नसेल नाऽऽ!
बाऽऽऽपरे!! असे झाले तर?
मी काय उत्तर देऊ?
जे मनात आहे तेऽऽ, की जे योग्य आहे ते???


“ अगं मालेऽऽ, फोन वाजतोय बघ पर्समध्ये. ऐकू येईना का? ”

आईच्या बोलण्याने विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत मालाने फोन उचलला. अर्थात शऱ्याचाच होता.
विचारांच्या लहरीत असताना घंटी वाजली, हा नक्की कसला संकेत आहे?

" अगं एऽऽऽ, सगळे जमा झालेत फक्त तूच यायची बाकी राहिलीस. येतेस नाऽ, लवकर ये. "

“ होऽऽ होऽऽ, हे काय, लिफ्ट मध्येच आहे, दोन मिनिटात पोहोचतेय. ”

“ यस कम फास्ट. ए ग्रेट सरप्राईज इज वेटींग फॉर यू! ”

—---------------------------------------------------------------------------
क्रमशः -7

मालाच्या मनात अनेक विचारांनी घिरट्या घालणे सुरू केलेय. ह्यातला कोणता विचार सत्यात उतरणार?
काय असेल ते सरप्राईज?
हे सगळे जाणून घ्यायला वाचत रहा

*म्हणून जग फसतं!*
कथा आवडत असेल तर अभिप्राय नक्की नोंदवा. धन्यवाद
@राधिका.

🎭 Series Post

View all