Login

मग का पसंत केलीस

Ka Pasant Kelis
मग का पसंत केलीस

वधू आवडली!! वधू आवडली !! म्हणत सुरेश ची आई सुलभा सगळ्यांना सांगत बाहेर आली ,आनंद तर इतका की जणू महाराष्ट्र राज्य लॉटरी लागली होती तिच्या मुलाला..

काय कमाल आहे बघ !!! राजश्री सुलभाची जाव प्रभाला सांगत होती...

प्रभा राजश्रीला म्हणाली, मला तर काही तरी घोळ वाटत आहे ताई ह्यात...इतकी सावळी मुलगी कशी पसंत होऊ शकते ह्या गोऱ्या सुरेशला ??

राजेश्री लगेच नाक मुरडत म्हणाली ,इतक्या मुली आल्या होत्या ,गोऱ्या गोऱ्या ,सुंदर दिसायला लाख पटीने देखण्या सगळ्या हिच्यापेक्षा तरी ह्या सुरेशने हिला पसंती दिली...!!!

अग तुझी जाव भारी आतल्या गाठीची आहे ,नक्कीच काहीतरी स्वार्थ साधला असेल त्यांचा ह्या मुलीकडून म्हणून इतकी लगेच तयार झाली लग्नाला...नाहीतर काय आहे ह्या मुलींमध्ये..!

राजेश्री लगेच उठली आणि तोंड गोड करायला सुलभा च्या जवळ गेली...तिला गळाभेट करत शुभेच्छा दिल्या आणि सुरेशला ही जाऊन अभिनंदन केले...हसून हसून म्हणाली, नशीब काढले हो इतकी गुणी मुलगी मिळाली आपल्या सुरेशला...

सुलभा लगेच तिला जवळ जाऊन म्हणाली, अग आठवते का तुला ,तू तुझ्या प्रतिकसाठी हिला नकार दिला होता..ती हीच आहे बघ...पण माझ्या लेखी मी खऱ्या अर्थाने नशीबवान आहे...एक गुणी मुलगी आमच्या घरात सून म्हणून येत आहे...दोघे खुश राहोत हीच इच्छा आहे..

राजश्रीला आपल्या जावेचा टोमणा कळला आणि ती जशी जोमात अभिनंदन करायला पुढे सरसावली तशीच झटका देऊन आपल्या जागेवर जाऊन बसली..

तिक्यात सुलभा ताई आत गेल्या ,त्यांच्या बहिणीने त्यांना आत बोलवले ,आणि दोघी मध्ये काही तरी कुजबुज चालू झाली ,ती कुजबुज बघून आता राजेश्री ही हैराण झाली होती...नेमके काय चालू आहे हे तिला कळत नव्हते...

ती काही तरी बहाणा करून त्यांच्या नकळत तिथे बाजूला जाऊन उभी राहिली..

सुलभाची बहीण रुसली होती ,आणि ती मोठयमोठ्याने म्हणू लागली होती की ताई तू हे बरोबर नाही केले, ही असली काळी सावळी मुलगी तू आपल्या गोऱ्या सुरेशच्या गळ्यात बांधायची नव्हती...कुठे आपला सुरेश कुठे ही...पण आता जोडा कसा विजोड दिसेल बघत रहा...

तितक्यात सुलभाने आपल्या बहिणीचे हात पकडले ,आणि तिला शांत केले आणि म्हणाली की, राणो तू असा उगाच माझ्या हेतुवर संशय घेऊ नकोस बरं... मी काही उगाच हिला आपल्या सुरेशच्या गळ्यात नाही मारली ग....ती सावळी जरी असली तरी ती नौकरी करणारी मुलगी आहे....ती ह्या शहरात अधिकारी म्हणून आली आहे....सुरेशपेक्षा 3 पट जास्त कमावते....तिला सरकारी घर आहे....आणि रंग म्हणशील तर एकदा लग्न होऊ दे....तिच्याच पैश्यात तिला ह्या सावळ्या रंगासाठी उपचार घ्यायला लावेल माझा मुलगा...निदान थोडी जरी उजळली तरी माझ्या मुलाला शोभून दिसेल...हा माझा हेतू आहे..

आता राजश्रीला ह्या लग्नामागचा हेतू कळला होता...खरे तर तिला वाईट वाटले होतेच , आपण सरळ नकार दिला होता पण तिचा वापर करून घेण्याचा दुष्ट हेतू ठेवला नव्हता...पण ह्यांनी तर कहरच केला...

राजश्री तिच्या जागेवर येऊन बसली पण मन शांत नव्हते...तिला वाटले जाऊन वधू मुलीला सांगावे...पण तिला हे पटत नव्हते..

राजेश्री बाहेर आली ,तेव्हा तिला समोर सुरेश ने पसंत केलेली ती मुलगी दिसली...कमालीची अस्वस्थ होती ,रडत होती..

राजेश्री तिच्याकडे गेली ,तिला मागून जाऊन आवाज दिला...आणि म्हणाली , तू आमच्या सुरेशची होणारी बायको ना ??

ती रडत ,डोळे पुसत म्हणाली, होणारी बायको ?? नाही मी बायको होणार होते आता काही मिनिटांपूर्वी पण आता होणार नाही...मी हे लग्न मोडले ,आता इतक्यात ,जेव्हा मला कळले तुमच्या सुरेशला मी नाही माझे पद ,पैसा प्रिय आहे...नाहीतर त्याने का अश्या सावळ्या मुलीशी लग्न केले असते..?

राजश्रीला हे ऐकून धक्का बसला, जे त्यांना मनापासून नाही पटले ते हिच्या पर्यंत कसे गेले...?

राजश्री म्हणाली ,तुला हे कोणी सांगितले..?

ती मुलगी म्हणाली, मी सुरेशच्या आईचे बोलणे ऐकले होते आणि मी नेमकी तिथेच उभी होते...तेव्हा न राहून मी हे लग्न मोडते असे सांगून बसले... पण मला खूप मोकळे वाटत आहे, जरा ही दुःख नाही...ह्या लोकांचा खरा रंग पाहून मला माझ्या रंगाचे काहीच वाटत नाही..

...

मुलींना कळायला हवे की तुमची खरी किंमत नेमकी कशावरुन ठरवली जात आहे, समोरचा खऱ्या अर्थाने तुम्ही जश्या आहात तश्या स्वीकारत आहे की त्याला काही प्रलोभन हवे आहे का ??

©®अनुराधा आंधळे पालवे