आईचा निरोप अंतीम भाग

कुंतीचा मुलांना निरोप

रस्त्यावरून चालताना कुंतीच्या डोळ्यासमोर अनेक प्रसंग जिवंत होत होते. स्वयंवरात पांडूची राणी बनून याच हस्तीनापुरच्या रस्त्यावरून वाजत गाजत, मोठ्या मानाने, आनंदाने, उत्साहाने, करु कुलवधू म्हणून तिथे आली होती. पांडूच्या दिग्विजय ची पताका याच रस्त्यावरून  आसमंतात फडकली होती. किंदम ऋषीचा श्राप  शिरोधार्य मानून पांडूसह तिनेही वानप्रस्थ स्वीकारला, तेव्हा माद्री, दासी-धात्री, ती आणि पांडू असे याच रस्त्यावरून गेले होते. पांडूच्या देहावसाना नंतर माद्रीने सहगमन केले आणि कुंती मुलांना घेऊन, पती आणि सवतीच्या अस्थि घेऊन ऋषीं बरोबर याच रस्त्यावरून हस्तीनापुरला आली होती. लाक्षागृह दाह,  मुलांची द्यूतातील हार, सुनेचा अपमान, वनवास, सार-सार कुंतीला आठवत होतं.





 खरं तर कुंती एक विचारी स्त्री होती. ती एक क्षत्रीय राणी होती. स्वतःच्या स्थानाबद्दल, हक्काबद्दल अत्यंत जागृत, क्षत्रियत्वाचा अति अभिमान असलेली अशी ती बाई होती. जीवन हे तिच्यासाठी लढाई होतं. लढायच्या वेळी ती विचलित होत नसे.





 द्यूतात राज्य घालवून धर्माने अविचार केला होता. थोरला आणि बाकीचे त्याचे आज्ञाधारक भाऊ तह करू पाहत होते. तो तह क्षत्रिय वृत्तीला न शोभणारा व अपमानकारक होईल अशी तिला भीती होती, म्हणून तिने कृष्णा बरोबर निरोप पाठविला.





 कुंती -"भीमा, अर्जुना अपमान विसरू नका." "कृष्णा, राजा युधिष्ठिर धर्मात्मा आहे. त्याला म्हणावे, तुझा धर्म नष्ट होतो आहे. मंद, अविद्वान, ब्राह्मणांसारखा शब्द जंजाळात गुंतून राहणाऱ्या तुझ्या बुद्धीला एक धर्म दिसतो आहे. अरे राजा जर धर्म विसरला तर तो नरकात जातोच; पण सर्व प्रजेलाही नरकात लोटतो. बापाकडून आलेला भाग बुडाला आहे. तो बाहेर ओढून काढ. आपलासा कर. तुला जन्माला घालून मी दुसऱ्याच्या अंन्नावर जगावे यापेक्षा मोठे दुःख नाही रे! राजधर्माने वाग. स्वतःला व धाकट्या भावांना नरकात पाठवू नकोस." एवढ्यावरच ती थांबली नाही तर एक जुना इतिहास तिने मुलाला एकविला, "विदुला-पुत्र" संवाद म्हणून तो प्रसिद्ध आहे.





विदुला यशस्विनी, उत्तम कुळात जन्मलेली, क्षेत्र धर्माचे पालन करणारी, दूरदर्शीता, बहुश्रुत वाक्य, बहुश्रुता अशी होती. तिचा मुलगा कसा होता? त्याला सिंधू राजाने जिंकलेले होते. पराजयाने तो निजून राहिलेला होता. दुबळ्या मनाचा, निरानंद धर्म माहीत नसलेला, शत्रूंना आनंद देणारा, अशा पुत्राची विदुलेने निर्भस्नाच केली ती कुंतीने धर्मराजाला ऐकवली.





विदुला तिच्या मुलाला म्हणते, "तू प्रेतासारखा नीजला आहेस का? अरे शुद्रा पराजित स्थितीत निजू नकोस! उठ वीर्याचा प्रभाव दाखव, नाहीतर सद्गतीला जा. अरे क्लिबा, ऐहिक कीर्ती व पारलौकिक पुण्य सगळेच तू घालवले आहेस. पुत्राच्या नावाने माझ्या पोटी कलीच आला आहे. कोणाही राजाच्या घरात वाचावीर, पण कृतीत निर्बल असा पुरुष जन्माला येऊ नये. तुझे नाव संजय ठेवले आहे, ते सार्थक कर. तुझी बायको आणि मी लोकांनी ज्यांचा आश्रय घ्यावा अशा आहोत. तू आम्हाला आश्रित का बनवणार आहेस?" 





त्यावर विदुलेचा पुत्र म्हणाला -"सर्व लोखंड गोळा करून तुझे क्रोधाविष्ठ, अकरूण, वैरमय हृदय केले आहे का? तू आपल्या एकुलत्या एका पुत्राला असे कसे बोलू शकतेस? मी मेलो तर? तुझ्या दृष्टी आड झालो तर, पृथ्वीचे राज्य वा अलंकार वा भोग वा जीव तुला हवासा वाटेल का?"





 तेव्हा विदुला म्हणाली -"बाबा हीच वेळ आहे तुला बोलायची, डिवचायची. ज्या वत्सल्ल्यात सामर्थ्य नाही, जे सहेतूक नाही, ते गाढवीच्या प्रेमासारखेच. तू क्षत्रिय आहेस जिंक तरी किंवा मर तरी."





 मुलगा अगदी शेवटचा उपाय म्हणून म्हणाला -"अगं माझ्याजवळ काही द्रव्य नाही. मी लढू कशाच्या जोरावर? सैन्य कसे गोळा करू?"





 तेव्हा विदुला म्हणाली -"असे काही बोल. माझ्याजवळ गुप्तधन आहे. तू जर लढायला तयार असशील तर मी तुला ते देते."





 विदुलेचा मुलगा लढला आणि स्वतःचे राज्य त्याने परत मिळवले.





 



 पुढे कुंती असाही निरोप देते की, "क्षत्रिय स्त्री ज्या आशेने मुलाला जन्म देते, ती फलप्रद करण्याचा काळ आला आहे. सर्वजण लढा व थोरल्या भावाला राजा करा." द्रोपदीला म्हणावं, "बाई मोठ्या कुळातली आहेस. क्षत्रिय स्त्री कधीच अपमानित जीवन जगत नाही." भीमाला, अर्जुनाला, नकुल-सहदेवांना, सुनेला कुंतीने जे निरोप दिले ते म्हणजे "धर्मराजाला शरणागती पत्करू देऊ नका," अशा सूचनाच होत्या. चाबकाने घोड्याला फटकारावे तसे कुंतीने मुलांना लढायला उद्युक्त केले. 





वनात गेल्यावर मात्र कुंती, गांधारी-ध्रुवराष्ट्र यांची सेवा करीत होती. वनात गेल्यानंतर सर्वात आधी विदूर गेला. एकंदर तीन वर्षे लोटल्यावर वनात वणवा लागला असताना, ध्रुतराष्ट्र, गांधारी, कुंतीने जमिनीवर बसून श्वास रोधुन प्राणायाम केला व अशा अवस्थेत संजय पाहत असताना ती अग्निसात झाली.






 



©® राखी भावसार भांडेकर.





*********************************************





संदर्भ





युगांत - इरावती कर्वे.





व्यासपर्व - दुर्गाबाई भागवत.





 



 मृत्युंजय - शिवाजी सावंत.





 


🎭 Series Post

View all