(मागच्या भागात आपण पाहिले की दूर्वा आणि राघव एकत्र काम करत असतात. दूर्वा आणि राघवच्य नात्यात दुरावा आलेला असुनही राघव तिची पूर्ण काळजी घ्यायचा. ऑफिस सुटल्यावर राघव दूर्वाला घरी सोडून स्वतःच्या घराच्या दिशेने जातो. आता पुढे....) राघव ओठांनी शीळ वाजवत आणि बोटावर बाईकची चावी फिरवत घराच्या दारापाशी येतो. घरात जाणार इतक्यात त्याची आई दारातच त्याची वाट बघत असते. आईला असे उभे बघून राघव क्षणभर विचारात पडतो आणि विचारतो, "आई! काय गं काय झालं? इथे या वेळी? तू फिरायला नाही गेलीस?" "राघव मी तुला थोड्या वेळापूर्वी चौकाकडे पाहिलं. तुझ्या पाठीमागे दूर्वा बसली होती ना बाईकवर? तुम्ही एकत्र कसे?" राघवची आई स्तब्धपणे उभी राहून त्याला विचारते. काय बोलू हेच राघवला कळत नाही. "अगं आई! तिच्या कंपनीचं contract आम्ही घेतलं आहे आणि ती फक्त काही महिने आमच्या ऑफिसमध्ये येऊन काम करणार आहे. बाकी काही नाही आणि तू कधीपासून Orthodox आणि narrow minded झालीस..? " असे म्हणून तो घरात जातो. त्याला पाठमोरं जाताना आई आवंढा गिळून बोलते,"मला काही हरकत नाही तू तिच्याशी बोलतोस यांचं. फक्त तू पुन्हा तिच्यात गुंतलास आणि ती पुन्हा तुला सोडून गेली तर? माझ्या लेकराला पुन्हा तसं नाही बघवणार मला. ..! "आई प्लीज! नको तो विषय! " पाय आपटतच राघव त्याच्या खोलीत जातो. दिवसामागे दिवस जात होते. राघव आणि दूर्वा त्यांचे काम चोखपणे पार पाडत होते. काही दिवस का होईना आपले प्राॅब्लेम बाजूला सारून एक टिम म्हणून काम करत होते. यामुळे राघवला त्याची पहिली दूर्वा परत आली याचाच आनंद झाला होता. अशाच एके दिवशी रविवारी दूर्वा घरातले काम आवरून ऑफिसचे काम घेऊन बसते. ऑफिसचे काम आटोपल्यानंतर तिला हवी असलेली रेड फाईल सापडतच नव्हती. अर्धा तास झाला तरी फाईल सापडत नव्हती. इतक्यात तिचा फोन खणखणला. "आता कोण बोर करत आहे???" असे वैतागून बोलत ती फोन ठेवलेल्या टेबलपाशी जाते तर राघवचा फोन आला होता. दूर्वा (फोन उचलून) : हा राघव! मी सध्या महत्त्वाची गोष्ट शोधत आहे. मी नंतर काॅल करते तुला! बाय! फोन कट करून ती पुन्हा फाईल शोधू लागते तर पुन्हा तिला फोन खणखणल्याचा आवाज येतो. दूर्वा : अरे राघव! राघव (पलीकडून) : दूर्गा माते! आपण आपली रेड फाईल शोधत असाल तर ती माझ्याकडे आहे आणि तुम्ही माझी फाईल चोरून स्वतःकडे ठेवलीत. ती मला हवी आत्ताच आहे. मी काय करू बोल?? दूर्वा :- Ohhhh! I am extremely sorry Raghav! ऐक ना असं कर , माझ्या घरी येऊ शकतोस का तू ? माझी फाईल घेऊन ये आणि तुझी फाईल घेऊन जा. माझी स्कुटी गॅरेजमध्ये आहे. ती उद्या येईल. प्लीज ये ना. उद्या सकाळी दहा वाजता रिपोर्ट सबमिट करायचा आहे. राघव :- अगं हो ! श्वास घे जरा! येतोय मी पंधरा मिनिटात ! तू माझी फाईल काढून ठेव. फाईल घेण्यासाठी राघव येणार म्हणून बेडवरचा पसारा तसाच टाकून त्याची फाईल घेऊन ती हाॅलमध्ये येते. सगळं घर तिने चकाचक केलेलं असतं! तिची बेडरूम सोडून. राघव येईपर्यंत विरंगुळा म्हणून ती टिव्हीवर गाणे लावून बघत असते. पंधरा -वीस मिनिटांनी डोअरबेल वाजते तशी ती टिव्ही बंद करते. गळ्यातली ओढणी सावरत दार उघडते तोच हसरा चेहरा करून राघव बाहेर उभा असतो. ऐटीत एका खांद्यावर हात ठेवत दुसर्या हातात फाईल घेऊन तो बोलतो,"एक हात ले और एक हात दे." त्यात त्याचा तोल जातो आणि घराच्या दारावर आपटतो. हे बघून दूर्वा खळखळून हसू लागली. इतक्या दिवसांनी दूर्वाला दिलखुलास हसताना बघून राघवही जाम खूश झाला. दूर्वा :- बाहेर कय थांबलास..? घरात तरी ये. काॅफी बनवते पटकन की चहा करू ? सांग. राघव (घरात पाऊल टाकत) :- काहीही चालेल मला. तू विष दिलेस तरी चालेल. मी हसत हसत घेईल. दूर्वा ( त्रासिक होऊन प्यायला पाणी देत) :- राघवऽऽऽ ! राघव :- ओके! साॅरी बाबा. चहा कर मस्त. फक्त वेलची नको टाकूस. पाच मिनिटांत दूर्वा ट्रेमध्ये चहाचे दोन कप आणि बिस्किटे घेऊन येते. चहा पिऊन राघव त्याची फाईल घेतो आणि बाहेर निघणार तोच त्याला समोर झाकलेली हार्मोनियम दिसते. राघव :- रियाज सुरू आहे की नाही....? आणि विशारदाचं काय? दूर्वा :- नाही आता विशारद करणार मी. सोडलं मी गाणं..! हो पण रोज रियाज करत असते. राघव :- प्लीज दूर्वा आधीसारखी हो! मला पुन्हा तुझ्या आयुष्यात आणलं नाहीस तरी चालेल. पण ही बदललेली दूर्वा!!! नाही बघवत गं...! राघव निघून जातो. कितीतरी वेळ शांतपणे ती त्याला बघत असते. तो निघून गेल्यावर ती चहाचे कप सिंकमध्ये ठेऊन खोली आवरण्यासाठी जाते. खोली जवळपास आवरून झाली असता तिच्या हातात एक गुलाबी रंगाची डायरी येते. डायरी बघून आपसूकच तिच्या डोळ्यात पाणी आले. ती डायरी बाजूला ठेवून बाकी सगळं आवरते आणि बेडवर ती डायरी घेऊन बसते आणि डोक्यात राघवचं ते एकच वाक्य तिला राहून राहून ऐकू येते, "प्लीज दूर्वा आधीसारखी हो!" विचार करता करता तिला आठ वर्षांपूर्वीचा भुतकाळ आठवला. *************************************** दूर्वा :- बाबा तुम्हाला आता मी कसं सांगू? मी top rank holder आहे CET ची. मला पुण्यात नाही शिकायचं. मला मुंबईतल्या एखाद्या चांगल्या काॅलेजला जाऊन शिकायचं आहे. प्लीज बाबा....! सार्थक दादाला कसं पाठवलं तुम्ही ? आज बघा तो किती छान सेटल्ड आहे पुण्याला. त्याच्यापेक्षा तर मला कितीतरी पण जास्त मार्क्स मिळाले आहेत. दूर्वाचे बाबा :- असं कसं मी एकटं ठेवू तुला मुंबईत? लहान आहेस असून. अठराची पण नाहीस अजून. दादा पुण्यात आहे. तुला तो शिकवेल ना. दूर्वा (नाक उडवत) :- दोन महिन्यांनी होणार आहे. दादासाठी तुम्ही पुणे गाठता पण माझ्यासाठी निदान चार वर्ष नाही थांबू शकत मुंबईत..? आई तू सांग ना गं बाबांना. मला हाॅस्टेल लाईफचा एक्स्पिरियन्स हवा आहे दूर्वाची आई :- दूर्वा बाळ! बाबा बरोबर बोलत आहेत. तुझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. उद्या लग्न होऊन सासरी गेलीस तर म्हणून तुला ते स्वतःपासून दूर करत नाहीत. दूर्वा रागारागात तिच्या खोलीत एकटी जाऊन बसते. थोड्या वेळाने मागून दोन जण येऊन तिला मिठी मारतात. रागातच ती मागे बघते तर तिची लाडकी माई आत्या आणि दिपक काका असतात. ती त्या दोघांना कडकडून मिठी मारते ; नंतर पुन्हा रागारागात तिच्या खुर्चीवर बसते. दिपक काका :- बापरे! काय झालं? कोण आहे ते माझ्या परीला ओरडलं. एकतर तिने CET मध्ये इतका छान स्कोऽर केला तरी. येऊदेत जरा. बदडूनच काढतो. माईआत्या :- तुम्ही काय हो! मीच लाटण्याने पाठ शेकते की नाही. सांग बेटा कोणाला देऊ फटके?? दूर्वा :- तुझ्या लाडक्या मोठ्या भावाला...! माईआत्या :- बाळा असे बोलू नये. बाबा आहे ना तुझा तो...! नीट सांग काय झालंय? दूर्वा सगळं काही सविस्तर माईआत्या आणि काकांना सांगते. काका :- अरे बापरे! एवढंच ना..! मी बोलतो दादांशी. ते माझं ऐकतील. दूर्वा, आत्त्या आणि काकांसोबत दिवाणखान्यात येते आणि आत्याजवळ सोफ्यावर बसते. बाबा तिला बघून गालातल्या गालात हसत असतात. माईने तिला नीट समजावून सांगितले असेल म्हणून ते मनोमन खूश झाले होते. दूर्वाचे बाबा :- अगं शोभना ! आलं कोकरू बाहेर. मग काय आता कोणीतरी माझ्यासोबत पुण्याला येणार...! दूर्वा :- कोण बोललं मी पुण्याला येत आहे..? मी इथेच शिकणार आहे. मुंबईतच...! दूर्वाच्या आवाजातील रोख ऐकून आई तणतणतच स्वयंपाकघरातून बाहेर येते. तिला दूर्वाचा प्रचंड राग येतो. दूर्वाची आई :- दूर्वा..! अती होतंय. बाबांशी बोलतेय याचं भान राख. पुन्हा असं बोलताना दिसलीस तर मुस्काटात देईल. माई आत्या :- वहिनी! अगं थांब. मी तिला बोलली म्हणून ती असं बोलली. ती मुंबईतच शिकेल. एवढी गुणाची लेक आहे. तिचं कधीतरी ऐकून घे ना...! दूर्वाचे बाबा :- म्हणजे ही हाॅस्टेलवर राहील? छे! छे! मला नाही पटणार हे..! काका :- कोण बोललं ती हाॅस्टेलवर राहील. ती तिच्या हक्काच्या, स्वतःच्या घरी राहील. दूर्वाचे बाबा :- अहो दाजी ! एकटं कसं इथे ठेवणार हिला? काका :- ती आमच्या घरी राहील. आमचं घर आता तिचंही घर आहे. इंजिनिअरिंगचं काॅलेज आमच्या इथे चांगले आहेत. स्टेशनजवळ घर आहे आणि दोन स्टेशन सोडले की काॅलेज..! खूप मुलं जातात. आपली दूर्वा पण तिथेच जाईल. दूर्वाची आई :- अहो दादा! पण हिच्या एकटीमुळे आता तुम्हाला आणि वन्स यांना का त्रास ? त्यात Science चा अभ्यास करून गाण्याचा रियाज कसा काय सांभाळेल ती? माझ्या जीवाला घोर लागलाय आधीच..! काका :- अहो वहिनी! मला दोन्ही मुलगे! तेपण एक बंगळूरला आणि दुसरा परदेशात...! आम्ही दोघे कंटाळून गेलो आहोत एकमेकांना बघून ! हे लेकरू घरात आलं तर घर कसं भरलेलं वाटेल मला. (असे म्हणून मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवतात.) शोभना :- अहो दादा...! काही झालं तर.. एकतर दूर्वा.. दूर्वाचे बाबा :- बास..! शोभना. तू जरा आवरतं घेत जा... जरा विचार करू आणि बघूया.. खूप वेळ विचार करून दूर्वाचे आई बाबा तिला मुंबईत राहण्याची अनुमती देतात. पण तिला तिच्या घरी न राहता आत्याकडे रहावे लागेल या अटीवर...! आणखी खूप काही सुचना देतात. तिच्या काॅलेजचे अॅडमिशन झाल्यावर आई बाबा पुण्याला जायला निघतात. दूर्वाच्या आई बाबांचे डोळे भरून आले होते, तरी काळजावर दगड ठेवून ते पुण्याला जायला निघाले. मुलीच्या आनंदासाठी ते पहिल्यांदा तिला स्वतःपासून दूर करत होते. इकडे दूर्वाची परिस्थिती काही वेगळी नव्हती. तिला पण खूप रडू येत होते. आई बाबांची गाडी दूर जाईपर्यंत ती बघत होती. मागून तिचे आत्या आणि काका येतात. आत्या :- दूर्वा! चल बाळ! उद्यापासून काॅलेज सुरू होईल. तुझ्यासाठी काही गरजेच्या वस्तू घ्यायच्या आहेत. आईने सांगितले मला. काका ड्रायव्हर सीटवर बसले आणि आत्या त्यांच्या बाजूला. आई बाबांशिवाय तिला अजिबात आवडत नव्हते. ती एकटक बाहेर बघत होती. काकांनी बळेच तिला आवडते म्हणून पानीपुरी खाऊ घातली. घरी आल्यावर जेवण करून झोपायला जाणार इतक्यात आत्या बोलते, "दूर्वा बाळ! उद्यापासून काॅलेज सुरू होईल. पटकन झोप. मी सकाळी लवकर उठवेल तुला..! ती हसतच दोघांना गुड नाईट बोलून खोलीत जाते. आत्या आणि काकांनी त्यांच्या मोठ्या मुलाची खोली हौसेने तिला आवडेल अशा पद्धतीने सजवली होती. पहाटे पाचचा गजर लावून दूर्वा झोपी जाते. क्रमशः