मागल्या भागात आपण पाहिले की राघव स्वतःचे दुःख बाजूला सारून त्याच्या लाडक्या बहिणीच्या वाढदिवसाची तयारी करत असतो. आता यावर काही जण बोलले की ख्याती तिच्या दादाला तिची दुरू म्हणजे दुर्वा तिची वहिनी व्हायला हवी हे गिफ्ट मागेल.. अहो पण हे गिफ्ट बिचारी ख्याती कधीपासून मागत आहे. आता हिर आणि रांझा, रोमिओ ज्युलिअट कुठे एकत्र आले होते...? मान्य आहे आपले राघव आणि दुर्वा वेगळे आहेत...
चला तर बघूया आता पुढे काय होते...?
राघवची आई :- ख्याती...! अगं दादा तुझी वाट बघतोय माॅल मध्ये... जा बरं तू पण बाबांना घेऊन..!
ख्याती :- अगं आई माझा वाढदिवस तर पुढल्या शनिवारी आहे... आजच काय शाॅपिंग करतोय दादा... त्याला सांग जरा निवांत घे...
राघवचे बाबा :- अगं हो... पण पुढचे तीन दिवस तर तुझं सबमिशन आहे ना प्रोजेक्टचं ते काय प्रेझेंटेशन की डाॅक्युमेंटेशन... मला राघव बोलला.. नंतर तुझी लाडके मामा मामी आल्यावर तर तू आमच्या तावडीत पण नसशील... चल आवर पटकन... कावेरी तू पण चल ना..
राघवची आई :- नको हो... आज एक con call अटेन्ड करायचा आहे मला... महत्वाचा... वहिनी आल्यावर मी आणि ती करू आमची शाॅपिंग... ख्याती जा बरं आतमध्ये.. आवरून ये..
ख्याती खोलीत गेल्याची खात्री करून घेण्यासाठी आई बघत असते.
राघवचे बाबा :- बोल. काय बोलायचं आहे...?
राघवची आई :- अहो.. तो कोण मुलगा ज्याने मारहाण केली त्याला पकडलं का पोलिसांनी...?
राघवचे बाबा :- तू का घाबरत आहेस..? अगं आपल्या पोराला कल्पना नव्हती त्याच्या स्वभावाची.. म्हणून इजा झाली. आपला राघव अंगकाठीने त्याच्यापेक्षा तगडा आहे... एका बुक्कीत हाणून पाडेल त्याला..
राघवची आई :- अहो पण दुर्वाचं काय..? ती लाख कराटे नाचवायची पण काल तिला पण लागलंच ना तिला.. ती नाहीये आपल्या राघवसारखी धष्टपुष्ट... पंचवीस एक वयाची असेल आता पण बघितलं तर ख्यातीपेक्षा फक्त वर्षभरच मोठी असेल अशी दिसते. त्यात आई बापाविना लेकरू... कशी सावरेल स्वतःला...
राघवचे बाबा :- अगं हो... मी पोलिसांशी बोललो... ते माझे मित्र आहेत ना, सातपुते... त्यांचाच मोठा चुलत भाऊ पोलिस आहे. त्याने टाकला त्याला जेलमध्ये... आधी त्याने खूप त्रास दिला. पुरावा नाही तरी अटक करता असा...? पण सिसिटीवी फुटेज बघून त्यांनी त्यांचं काम चोख पार पाडलंय. आता त्याच्या सोमवार उजाडल्याशिवाय तरी त्याला जामिनावर सुटका मिळणार नाही. आणि काय गं... काल रात्री तर तू दुर्वाला असं बोललीस की निघून जा म्हणून... आणि आज तुला काय तिचा पुळका आलाय..
राघवची आई :- आहेच ती पोर लोभस आणि गुणी... मी काल रात्री फक्त माझ्या मुलाचा विचार करून बोलले होते. एक आई म्हणून मुलाचं भवितव्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला मी... कोणतीही आई तेच म्हणेल.. पण मला विशेष वाटतंय की तिचे आई बाप असे का वागले..? तिच्या चुलत भावंडांवर इतका जीव होता त्यांचा... ती आपल्या घरी यायची तेव्हा कधीकधी फोन व्हायचा त्यांचाच आईला.. तिची आई सारखा त्याचा उल्लेख करायची. पण काहीही म्हणा पोटची नसली तरी पोरच ना ती.... कसे असतील ते लोक...
राघवचे बाबा :- अगं आपण त्यांना कधी भेटलोच नाही. ते काळे की गोरे हे पण ठाऊक नाही. एकदा कधीतरी मी राघव आणि दुर्वा काॅलेजात होती तिच्या आत्याला भेटलो होतो. काॅलेजला आली होती तिच्या मिटींगसाठी... तेव्हा तिथे आत्याचे मिस्टर होते दुर्वाच्या... त्यांच्या बोलण्यातून मला असे वाटत होते की दुर्वाचे वडिल हेच आहेत... त्यांनी सांगितले तेव्हा समजले मला... आता आपण न भेटता त्यांच्याविषयी मत कसे मांडणार तूच सांग बरं... एक मिनिट थांब... फोन वाजतोय.
राघव (फोनवरून) :- बाबा... राणीला सांगा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून... मी तिला उद्या परवा नेईल शाॅपिंगला... तसंही पुढल्या शनिवारी वाढदिवस आहे तिचा... तिला माझ्याकडून साॅरी बोला... मी जरा काॅलेजच्या मित्राला भेटायला चाललोय... प्रियांशूला... इतक्या वर्षांनी आला आहे भारतात... आईला सांगा जेवणासाठी वाट बघू नकोस... डिनर करायला येईल हवं तर मी घरी...
राघवचे बाबा ( फोनवर) :- ते ठिक आहे रे... पण लागलं आहे डोक्याला... असाच जातोय.. गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना तुला...? हे घे. आईशी बोल आधी..
राघव(फोनवर) :- बाबा प्लीज... आईला नका देऊ फोन. लवकर येईल हवं तर.. जाऊद्या ना. दुपारी लगेच येईल ना. प्लीज बाबा...
राघवचे बाबा (फोनवर ) :- ठिक आहे.. लवकर ये पण.. बाय...
राघवची आई :- काय अहो... काय बोलला तो..?
राघवचे बाबा :- अगं तो मित्राकडे जातोय. शाॅपिंग उद्या करेल असे बोलतोय.. आता तू फोन करून त्याला लेक्चर नको देऊ.. जाऊदे त्याला मित्राकडे...कालपासून जरा उदास होता. आत्ता मित्राच्या निमित्ताने का होईना जरा मन रमेल...
राघवची आई :- मी कुठे नाही बोलते... जाऊदे त्याला..
इतक्यात ख्याती खोलीतून बाहेर आली.
ख्याती :- बाबा मी तयार झाले. चला जाऊया.. दादा वाट बघत असेल..
राघवचे बाबा :- अगं बाळा.. दादाचा प्लॅन जरा बदलला आहे. आपण दोघेच जाऊ शाॅपिंगला.. त्याला काही हवं असेल तर तो घेईल त्याच्यासाठी नंतर... तुझ्यासाठी काय आणायचं ते लिस्ट कर. आपण जाऊया..
ख्याती :- बाबा खरं सांगू तर माझी काहीच शाॅपिंग नाहीये... दादाने आधीच ड्रेस आणला आहे. आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी आणि हिल्स पण आणलेत तेही नवे करकरीत... आईने तिच्यासाठी साडी आणि तुमच्यासाठी आधीच कपडे घेतले आहेत. दादा त्याच्या चाॅईसने कपडे घेणार आहे त्याच्यासाठी... आता फक्त तुमचं काम बाकी आहे डेकोरेशन वगैरे...
राघवची आई :- मग आधी सांगायचं ना की तुझ्यासाठी ड्रेस आणलाय म्हणून... आणि इतकी तयारी का केलीस...?
ख्याती :- अगं काही नाही आई.. दादा सकाळी चिडला होता ना नंतर फोन केलेला त्याने मला.. मला आईसक्रीम घेऊन देणार होता तो.. आणि फोनवर पण तयार हो म्हणून सांगितले म्हणून तयार झाले.. मी जाऊ का सायकल चालवायला....
राघवची आई :- जा... पण लवकर घरी ये..
ख्याती :- हो आई... बाय...
इकडे दुर्वा धापा टाकतच घरात पाऊल ठेवते आणि सोफ्यावर अंग टाकते...
कस्तुरी :- अहो राणीसरकार... काय झालं आज मग...?
दुर्वा :- काहीच नाही... मी अनाउन्स केलं.. की मी पुन्हा JCLC मध्ये जाणार आहे.. इथलं काम शौर्य दमाणे करेल म्हणून... सध्या तरी सगळ्यांना हेच ठाऊक आहे. खास करून राघवला...!
कस्तुरी :- हम्म... माझं म्हणणं इतकंच आहे की तू रिजाईन करू नये.. कुठे ते फ्रिलान्स करतेय... आणि हो तो राघव.. त्याने काही प्रतिक्रिया दिली की नाही ..?
दुर्वा :- चिडला होता जरासा पण मी टाळलं त्याला...
कस्तुरी :- बरं ऐक ना... माझ्यासोबत शाॅपिंगला चल ना.. मला जरा महत्वाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत..
दुर्वा :- अगं मला खूप कंटाळा आला आहे.. तू जा ना एकटी.. एकतर तो माॅल.. कालचा प्रसंग डोळ्यासमोर तरळून येतंय सगळं काही... साॅरी गं... पण...
कस्तुरी :- ठिक आहे... मी जाऊन येईल.. तुला काही हवंय का..?
दुर्वा :- नाही नको...तू जा. आणि प्लीज मनाची तयारी कर. घरी आल्यावर स्वयंपाक करण्याची.. मला लागलंय हाताला.. काहीच उचलता येत नाहीये...
कस्तुरी :- काळजी नको करूस... मी स्वयंपाकाची पूर्वतयारी केली आहे... बाय निघते मी..
दुर्वा :- बाय..
दरवाजा बंद करून कस्तुरी बाहेर निघून गेली. कितीतरी वेळ दुर्वा सोफ्यावर पडली होती. फ्रेश होण्यासाठी उठली तोच दारावरची बेल वाजली. दाराला कि होल नसल्याने दुर्वाने पटकन दार उघडले तर समोर दिपक काका उभे होते आणि बाजूला घरमालक हेगडे काका...! काही क्षण काय बोलावे तिला समजलेच नाही. ती एकटक काकांना न्याहाळत उभी होती.
हेगडे काका :- बेटा.. हे तुमचे अंकल.. तुमचा रूम समजून माझं दार वाजवले. मग त्यांना घर दाखवायला आलो. ऐका ना लाईटचे बिल असेल तर द्या ना मला.. फाईलमध्ये जपून ठेवतो मी you know that.. देताय ना...
दुर्वा :- हो काका देते. (आणि मागे वळाली)
हेगडे काका :- बेटा.. आधी तुमचे अंकलना घरात तर घ्या तुम्ही...
दुर्वा :- अ.. हो काका... या ना आता.. हेगडे काका तुम्ही पण या ना.. मस्त चहा करते तुमच्यासाठी.... अदरक पुदीना स्पेशल... (आणि लाईटचे बिल त्यांच्या हातात सोपवते.)
हेगडे काका :- नको.. आता नको. नाहीतर तुझी आन्टी ओरडेल... मला पण तुम्हाला पण... येतो मी..
आणि हेगडे काका निघून गेले. घरात फक्त दिपक काका आणि दुर्वा दोघेच उरले होते. कितीतरी वेळ घरात शांतता होती.
दिपक काका :- हात कसा आहे बेटा तुझा...? आणि राघव कसा आहे..? काही हालहवाल कळला का ?
दुर्वा :- आता ठिक आहे राघव आणि माझा हातही ठीक आहे... तुम्हाला माझा पत्ता कसा कळला..? राघवने सांगितला का..?
दिपक काका :- अं.. हो... म्हणजे तुला बरं वाटतंय ना की नाही म्हणून विचारला..? तुला आवडलं नसेल तर साॅरी बेटा..!
दुर्वा :- त्यात काय साॅरी काका..? आणि खरं सांगू तर खूप बरं वाटलं तुम्ही माझी विचारपूस केली ते..! एरवी मला थोडंसं खरचटलं तरी पूर्ण घर माझ्या दिमतीला हजर व्हायचे.. आणि त्यात बाबा तर...
दिपक काका :- बाबांचं काय दुर्वा...?
दुर्वा :- काय.. कुठे काय..? काहीच नाही.. तुम्ही टिवी बघत बसा. तोवर मी चहा आणते तुमच्यासाठी..
दिपक काका :- बाळ! चहा नको मला. मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. एका महत्त्वाच्या विषयावर...
दुर्वा :- कोणता विषय..?
दिपक काका :- तुझे आई बाबा... त्यांना तुझी गरज आहे..
दुर्वा :- काका पुन्हा तेच.. आई बाबा... आई बाबा...! मला नाही बोलायचं ह्या विषयावर... ज्या लोकांनी मला जन्मताच स्वतःपासून वेगळं केलं त्या लोकांबद्दल जाणून घेण्यात मला काडीमात्रही इंटरेस्ट नाही.. आणि आई बाबांबद्दलही नाही.. त्यांच्यापासून दूर राहणे हे त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या हिताचे आहे. आई तरी वागण्यातून बोलण्यातून कडक स्वभावाची होती. पण बाबा...! ते पण कसे वागले माझ्याशी..? त्या कमलाकरशी माझं लग्न लावून देत होते. तो दारूडा आहे ठाऊक असतानाही.. असे तर बाबा एकदम पुढारलेल्या विचारांचे दाखवत होते. त्यांच्याच ऑफिस मधल्या एका कलिगने स्वतःच्या मुलीचं लग्न एका बिजवराशी ठरवलं तेव्हा बाबांनी स्वतः पुढाकार घेऊन हे लग्न थांबवलं होतं... मगं माझ्याशी अशी वागणूक का..?
दिपक काका :- परी तुझे रागावणे रास्त आहे पण सध्या गजानन कोणत्या परिस्थितीत आहे हे ठाऊक आहे का तुला..? पैश्यांची गरज नाहीये त्याला.. माणसांची गरज आहे.. मागच्या काही महिन्यांपूर्वी त्याचं बिपी इतकं वाढलं होतं की त्याचा डोक्याला त्रास झाला... कदाचित वेगळे कारणही असू शकते. त्या मेडिकल टर्मस् माझ्या समजण्यापलिकडे आहेत. तू एकदा जाऊन भेट त्याला..!
दुर्वा :- काका मी जरी आई बाबांपासून दूर असले तरी मला त्यांच्याबद्दल सगळं काही ठाऊक आहे.. त्यांना बिपी मुळे नाही ट्युमरचा त्रास झाला होता.. डाॅ. सेबस्टियन माझ्या काॅलेज फ्रेन्डचे काका आहेत. न्युरोसर्जन... ते त्या वेळी पुण्यात होते.. मी त्यांच्याशी संपर्कात होते. त्यांनी सहजच बाबांना विचारले की तुमच्या मुलाला किंवा मुलीला बोलवून घ्या तेव्हा त्यांनी सांगितले की ते निपुत्रिक आहेत.. त्यांना दोघांना मुलबाळ नाही म्हणून... आणि हे ऐकीव नाहीये. त्या दिवशी बाबा जिथे अॅडमिट होते तिथे दवाखान्यात गेले होते मी... मी वाॅर्डबाहेर उभी होती. आत जाण्याचं धाडसच होत नव्हतं. हिम्मत करून दाराच्या कडीला हात लावला तेव्हा त्यांचे बोलणे माझ्या कानावर पडले. उरलीसुरली हिम्मत सरली माझी.. तशीच माघारी वळले मी.. त्या दोघांना माझा त्रास होऊ नये म्हणून मी पुणे सोडले.. माझं करिअर सोडले.. गाणंही सुटलं माझं... काका मी इतकी वाईट आहे का हो...? की माझ्यामुळे त्यांना मान खाली घालायला लागली होती.. मला फक्त त्या व्यसनी मुलाशी लग्न करायचे नव्हते. हीच माझी चुक होती की मी त्यांची मुलगी नाही तरी त्यांचं जुमानत नाही ही चुक आहे माझी... बोला ना काका... मी वारंवार बाबांना फोन करून विचारपूस करण्याचा प्रयत्न करायचे ते काहीच न बोलता फोन कट करायचे. बाबा तर बाबा आईसुद्धा..! मान्य आहे की मी तिच्या पोटी जन्म घेतला नव्हता.. पण आधी ती माझ्यावर किती प्रेम करत होती.. ते असं कसं विसरू शकतात... मी मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला पण सगळं फोल ठरलं. मी माझ्या मनाची समजूत काढली आहे काका... समजलंय मला की मी एक अनावरस आहे.
( इतके बोलून ती हुंदके देऊन रडू लागली. काका एकटक तिच्याकडे बघत होते. सगळ्या घटनेनंतर तिने पहिल्यांदा मन मोकळं केलं होतं. काकांच्याही डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्या होत्या. तिच्या लक्षात येऊ नये म्हणून नकळत त्यांनी डोळे पुसले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. थोडं शांत झाल्यानंतर दुर्वा काकांकडे बघू लागली.)
दुर्वा :- साॅरी काका..! मला राहवलं नाही. म्हणून बोलून मोकळे झाले.
दिपक काका :- बरं झालं बोलून मोकळी झाली. पण तुझा बाबा आहे ना त्याला तर रडताही येत नाही. हुंदका तर गळ्याबाहेर पडत नाही त्याच्या..! बरं ते जाऊ दे. तू चल माझ्यासोबत. आपल्या घरी. तुला इथे राहण्याची गरज नाही.
दुर्वा :- नको काका. तुम्ही आणि माईआत्याने माझ्यासाठी आजवर खूप काही केले आहे. मी तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या घरात सतत माईआत्याचा चेहरा मला आठवेल. Indirectly मला सगळं काही आठवेल. मी नाही रमत आता जुन्या आठवणीत..! प्लीज काका समजून घ्या माझं म्हणणं..!
दिपक काका :- ठिक आहे बेटा.. तुझ्या म्हणण्याचा मी आदर करतो पण एक गोष्ट लक्षात ठेव. जगात कितीही काही प्राॅब्लेम आले तरी तुझा दिपक काका तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे.. आणि दुसरी गोष्ट म्हणजे........
दुर्वा :- काय..?
दिपक काका :- जमल्यास तुझ्या बाबांना भेटून घे.. तुला त्यांच्या पैशाअअंचा, वैभवाचा मोह नाही तुला.. लहानपणापासून तू स्वतः समजदार आहेस... तसं तू कोणाकडून ही त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेत असशील. माहिती आहे मला.. बाकी काळजी घे स्वतःची.. मी निघतो. बाय..!
दुर्वा :- काका..! थॅन्क यू सो मच की तुम्ही माझा इतका विचार करत आहात म्हणून...! आणि साॅरी मी तुमच्याशी ह्या भाषेत बोलले. पण मला राहवलंच नाही. आणि प्राॅमिस करते की तुम्हाला फोन करत जाईल आता..! चालेल ना तुम्हाला..?
दिपक काका :- चालेल काय ?? पळेल.. बाकी स्वतःची काळजी घे. मी निघतो. चल बाय..
दुर्वा :- बाय काका...
*************
ट्रॅऽफिक मुळे राघव जरा उशिराच कॅफेत पोचला तोच प्रियांशूला बघून धावतच त्याला मिठी मारतो..
राघव :- काय रे..? कसा आहेस..? किती वर्षांनी भेटलो आपण..?
प्रियांशू :- हो ना रे.. जवळपास पाच वर्ष तरी ना... बरोबर. बाकी तू कसा आहेस..? आणि डोक्याला हा दागिना कसला..?
राघव :- हे होय... बड़ी लंबी कहाणी.. सवडीने सांगेल..
प्रियांशू :- अरे यार सांग ना.. काय होतंय..? कसं काय लागलं...?
राघव :- सोड ना.. तू सांग आधी असा अचानक भारतात आलास आणि मला एकट्याला भेटायला..? बाकी मंडळी पण येतीलच.. येणार आहेत की नाहीत..? की तू मला एकट्यालाच भेटायला बोलवलं..?
प्रियांशू :- अरे येत असेल..! हे बघ आला बघ.. कौस्तुभ..!
राघवने मागे वळून पाहिलं तर दुसरा कोणी नसून खुद्द कौस्तुभ समुद्रे होता... राघवने जरा गुस्यातच त्याच्याकडे पाहिले पण उगाच बाहेर तमाशा नको.. म्हणून शांत बसणंच पसंत केले. कौस्तुभने दोघांशी हस्तांदोलन केले. त्यालाही राघवच्या वागण्यात कोरडेपणा जाणवला तरी तो प्रियांशूला काय वाटेल म्हणून गप्प राहिला.. तिघेही तब्बल अर्धा तास एकमेकांशी गप्पा मारत होते. तोच प्रियांशूच्या फोन ची रिंग वाजली.
प्रियांशू :- हो आई.. काय.. मामा पण आलाय..? येतो मी लगेचच... साॅरी गाईज्... माझा मामा आणि त्याची मुलगी पण आलेत मला भेटायला म्हणून... मला जावेच लागेल.. नाहीतर ती नाराज होईल.. सो साॅरी..
कौस्तुभ :- मामा लेकीला घेऊन आला म्हणजे ठरतंय की काय मग..?
प्रियांशू :- ए बाबा.. असं काही बोलू नकोस..
कौस्तुभ :- मामा लेकीला घेऊन आला म्हणून तू इतका काय खुश झालास..? ठरतंय की काय मग..?
प्रियांशू :- शट अप.. माझ्या मामाची मुलगी आत्ता सातवीत आहे फक्त.. आमच्या घरातलं शेंडेफळ आहे ते म्हणून लाडकी आहे ती.. बाकी काही नाही.. चल बाय..
प्रियांशू पटकन निघून गेला. तो निघून गेल्यावर राघवला काही बोलता येत नव्हतं. त्याने एकवार कौस्तुभकडे आणि नंतर घड्याळात पाहिलं.
राघव :- आपण बील मागवूया का..? मलाही उशीर होतोय..
कौस्तुभ :- थांब ना रे.. इतकी वर्षे झाली भेटलो.. एक गोष्ट सांगायची होती तुला.. थॅन्क यू सो मच.. तेव्हा फ्रेशर्स पार्टीनंतर मी इतका राडा घातला तेव्हा तू आणि दुर्वाने मला मोठ्या मनाने माफ केले. मला रस्टिगेट होण्यापासून वाचवलं.. पण काहीही म्हणा दुर्वाला तू दुर्गा म्हणायचा तेच बरोबर आहे. किती जोरजोरात मारत होती ती मला.. तेही तुमच्या समोर...
राघव :- म्हणूनच वाटतं तू सुड म्हणून तिच्या घरच्यांना माझ्या विषयी वाईट सांगितले.. आणि आमचं नातं तुटलंय..
कौस्तुभ :- एक मिनिट राघव.. मी असं का करू..? मी का तिच्या घरच्यांना तुझ्याविषयी वाईट सांगू..? ती मला आवडत होती अश्यातला ही भाग नाही.
राघव :- मग तू आणि तुझ्या बाबांनी माझ्या विषयी खोटं का सांगितलं तिच्या काकांना..? आता खोटेपणाचा आव आणू नकोस.. मला सुप्रियाकडून सगळं काही समजलं आहे..
कौस्तुभ :- तू गोविंद काकांबद्दल बोलतोय का..? गोविंदराव जोशी..?
राघव :- हो तेच.. ते तपास करायला आले होते ना तुझ्या घरी..!
कौस्तुभ :- हो पण तेव्हा मी असं काहीच बोललो नाही. ते बाबांचे जुने मित्र आहेत. त्यांचा बिझनेस तेव्हा डबघाईला आला होता, इतकेच ठाऊक आहे मला.. आणि बाबा पण असे काही बोलले नाहीत. ज्यामुळे तुमचं नातं तुटेल.. मी आईची शपथ घेऊन सांगतो. हो बाबा भरभरून बोलत होते आपल्या आगाऊपणाचे किस्से सांगत होते. पण तेव्हा बाबा असं काहि बोलले नाहीत की त्यामुळे तुमचं नातं तुटेल.. पण हो त्यांच्या बोलण्यातून असे जाणवत होते की त्यांना दुर्वाच्या लग्नाची घाई होती. त्यावर बाबा बोलले की ती लहान आहे अजून. त्यावर ते बोलले की त्यांच्या मुलीचं लग्न पण तीन महिन्यात करायचं आहे त्यांना.. मग मोठीचं आधी करणं भागच होते.. आणि त्यांच्या मुलीबद्दल बोलताना जरा चिडचिड करत होते.
राघव :- साॅरी कौस्तुभ मी तुला वाईट समजत होतो...
कौस्तुभ :- राघव आपलं मैत्रीच्या नात्यातला गोडवा जरी कमी झालाय तरी नातं तुटलं नाहीये. मी जर चुकत असेल तर माफ कर मला.. पण माझ्या विषयी अढी ठेऊ नकोस मनात.. कारण आपली आवडती व्यक्ती स्वतःपासून दूर गेली की दुःख होतं ठाऊक आहे मला...(आणि डोळ्यातले अश्रू पुसले)
राघव :- कौस्तुभ..! काय झालं सांग मला नीट..
कौस्तुभ :- छोड दे रे यार.. जाने दे.. रात गई बात गई...
राघव :- साल्या सांगतोय की कानाखाली जाळ काढू..?
कौस्तुभ :- अरे.. मी इंजिनियरिंग झाल्यावर लगेच बाबांच्या बिझनेसमध्ये लक्ष घातलं.. तिथेच बाबांची एक पि. ए. होती सोयरा... खूप आवडू लागली होती.. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. मी तिला प्रपोज करायचं म्हणून इथेच घेऊन येणार कॅफेत.. मी माझ्या धुंदीत चालत होतो. समोरून गाडी आली आणि तिने मला बाजूला ढकलून स्वतःचा जीव गमावला...
राघव :- साॅरी कौस्तुभ... मला याबद्दल ठाऊक नव्हतं.. त्यात मी माझं टेन्शन.. खरंच साॅरी...
कौस्तुभ :- अरे कुछ नही.. पण एक सांगतो दुर्वा इझ् बेस्ट गर्ल फाॅर यू... माझ्या बहिणीच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे ती.. म्हणजे ते ताईचे सासरे आहेत... तिला कामाचा कधीच कंटाळा नसतो...
राघव :- पण तिने कधीच मला सांगितले नाही...
कौस्तुभ :- अरे तिला पण ठाऊक नाही याबद्दल... मी तर ताईला आणि जिजूना ला निक्षून सांगितले की तिला माझ्याबद्दल सांगू नका.. तसा वरचेवर जात असतो तिथे ऑफिसमध्ये.. पण तिने कधीच ओळख दाखवली नाही, म्हणून मी पण शांतच राहीलो.
थोडं जुजबी बोलणं झाल्यावर कौस्तुभ आणि राघव आपापल्या घरी निघून गेले. असेच काही दिवस सरत होते. दुर्वा आणि राघवची त्यानंतर भेटच झाली नाही. आजचा दिवस राघवसाठी खूप महत्त्वाचा होता... ख्यातीचा वाढदिवस.... वाढदिवस म्हणून असंच काही जुजबी वस्तू घ्यायला म्हणून राघव मार्केटमध्ये जायला निघतो तोच सकाळी सकाळी त्याचे मामा मामी गावाहून आलेले होते. तेही खास ख्यातीचा वाढदिवस म्हणून... राघववर त्या दोघांचा जीव होता. राघवलाही मामापेक्षा मामीचाच जास्त लळा होता.
राघव :- मामी.. this is not fare... तुम्ही दोघे दोन दिवसांपूर्वी येणार होता ना.. आज येताय तुम्ही...? वाढदिवसाच्याच दिवशी...!
राघवचे मामा :- अरे आम्ही येणारच होतो पण आम्ही काल ...
राघवची मामी :- अरे बेटा आम्ही काल माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा साखरपुडा होता. तिथे गेलो होतो. अरे तू असा बसून का आहेस..? जा केकची ऑर्डर देऊन ये.. मार्केटमध्ये जाऊन ये.. आपल्या उत्सवमुर्तींच्या नाकावर खूप राग असतो. तू आधी सगळे सुरळीत कर. नाही तर 18th birthday चांगला नाही झाला तर रागवतील...
राघवचे मामा :- आपल्या उत्सवमुर्ती की आजच्या उत्सवमुर्ती..
राघवची मामी :- एकूण एकच ना हो.. अरे राघव जा बरे तू आधी.. आणि ख्याती कुठे गेली आहे...? आत्ताच तर इथे होती...
राघव :- खोलीत गेली आहे... चला बाय मी निघतो...
राघव निघून गेल्यावर तो गेल्याची खात्री करून राघवची आई मामीजवळ येऊन बसते...
राघवचे मामा :- तू मला बोलताना का अडवलंस गं.. त्याला सांगायचं ह्या वेळी काहीही करून.. ठरलं होतं ना आपलं..
राघवची आई :- अरे भाऊ, राघवला मूड बघून सांगावे लागेल. आता नको आज वाढदिवस आहे ख्यातीचा.. उद्या सकाळी सांगूया की.. तसा तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये..
राघवचे मामा :- अगं पण...
राघवची मामी :- तुम्ही थांबा हो.. आम्हाला आमच्या पातळीवर प्रयत्न करू द्या... काही अडलं तर विचारू तुम्हाला.. मग तर झालं...
राघवचे मामा :- जशी तुमची मर्जी.. तुम्ही दोघींनी ठरवलंच आहे तर पुढे मी काय बोलणार...?
सायंकाळी ख्यातीचा वाढदिवस खूप आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो.. सिण्ड्रेलासारखा निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ख्यातीचा सावळा पण जरा गोरा रंग खूप खुलून दिसत होता.. राघव तर बहिणीचा वाढदिवस स्वतःचा वाढदिवस असल्याप्रमाणे साजरा करत होता... त्याच्या उत्साहाचे तर सगळे जण कौतुक करत होते.. पण त्याचा तो आनंदी चेहरा मनात किती दुःख दडवून आहे हे त्याच्या घरच्य॔ना आणि त्याच्या मित्राच्या म्हणजे कृतार्थच्या नजरेतून सुटले नव्हते....
पुढल्या दिवशी सकाळी रविवार असल्याने आणि आदल्या दिवशी झालेली दगदग यामुळे राघवला सकाळी लवकर उठायला अंमळ उशिरच झाला. फ्रेश होऊन जांभया देतच राघव डायनिंग टेबलावर जाऊन बसला तर आई आणि मामी दोघी त्याला बघत होत्या.. थोडंसं ओशाळवाणं वाटल्याने राघवने स्वतःला सावरत खुर्चीवर सरळ बसला...
राघव :- गुड माॅर्निंग मामी.. आणि आई गुड माॅर्निअअंग...
दोघी :- गुड माॅर्गिंग...
राघवची आई ( राघवला काॅफी देत) :- राघव जरा महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे मला आणि मामीला तुझ्याशी..
राघव :- बोला ना मग.. काय झालं..?
राघवची मामी :- हा फोटो बघ...
राघव :- आई प्लीज.. मामीला सांग..
राघवची आई :- मुलगी इतकी हुशार नाही पण चार चौघात वावरणारी आहे.. तुझ्यासाठी तर परफेक्ट मॅच... मामीच्या जावेच्या चुलत बहिणीचीच मुलगी आहे.. एकदा फोटो बघून घे..
राघव :- आई..! मी तयार नाही अजून या गोष्टीसाठी... प्लीज फोर्स करू नकोस..
राघवची आई (रडतच) :- माहीत नाही का मला..! त्या दुर्वाची आठवण येतेय तुला अजून... तिने कधी केलाय रे तुझा विचार.. तूच आपला करतोय.. काल ख्यातीचा वाढदिवस म्हणून बोलवण्यासाठी गेला तेव्हा घरी नव्हती.. मी इथून फोन करतेय तरी लागत नाही. आई आहे तुझी मी.. तुझ्याच भल्याचा विचार करतेय मी.. आता प्रत्येकावा आयुष्यात त्याचं प्रेम भेटतंच असं काहीच नाही ना.. आम्ही पण थकलो.. तुला मार्गी लावलं तर पुढे ख्यातीचाच प्रश्न राहील. अठ्ठावीस वर्षांचा झालास ना आता.. आई बाबांच्या मनाचा तरी विचार कर...
राघवची मामी :- राघव बाळ.. माझ्यापासून थोडीच ही परिस्थिती लपून आहे.. ठाऊक आहे सगळं मला.. तरी तुझी आई स्विकारणार होती त्या मुलीला.. आता तिलाच नकोय हे नातं तर आत्ता आपण काय करू शकतो.. आणि आम्ही लग्न कर हिच्याशी इतकंच थोडी बोलतोय.. फक्त एकदा भेटून बघ...
राघव :- ठिक आहे मामी.. भेटतो मी या मुलीला.. पण हिची माहिती...?
राघवची मामी :- अरे मुलीचं नाव श्रुतिका आहे.. मोठी एक बहिण आहे. आत्ताच लग्न झालं. वर्ष झालं असावं. भाऊ लहान आहे. घरची परिस्थिती जेमतेमच आहे; पण तिच्या मावशीचा तिच्यावर खूप जीव आहे..
राघव :- कधी भेटायचं आहे मुलीला..?
राघवची मामी :- अरे आता पुढल्या महिन्यात संक्रांतीच्या दिवशी मुलगी मुंबईत येणार आहे.. तिच्या मावशीसोबत.. तिची मावशी घर मुंबईचीच आहे..
राघव :- ठिक आहे.. पण प्लीज माझ्यावर आणखी दडपण आणू नका.. मी माझ्या कलाने घेईन..
राघवची आई :- चालेल ना बेटा.. काही हरकत नाही...
इतके बोलून राघव त्याच्या खोलीत आला आणि बेडवर बसला.. आणि समोर ठेवलेल्या दुर्वा च्या फोटोकडे एकटक बघत होता...
~ऋचा निलिमा
क्रमश:
प्रश्नावली
१) कौस्तुभ खरंच खरं बोलतोय की खोटं..?
२) राघवची मामी घेऊन आलेल्या स्थळाला राघव होकार देईल की नकार..?