मेरे लिए तुम काफी हो...(भाग-१९)

This story based on the guy who wants to know about the girl who avoid him....

( कसं काय मंडळी.. राम राम...! आता बघा कोरोनाचे रूग् कमी होत आहेत. अनलाॅक व्हायला सुरुवात झाली आहे, तरीही तुम्ही सगळे स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या...  आणि मी तुमची मनापासून माफी मागते की मी कथेचा भाग खूप उशिरा टाकते. रोजचे ऑनलाईन लेक्चर आणि नंतर रिवीजन करून फावल्या वेळात मी लिहीते, पण सध्या त्यात भर म्हणून माझ्या हाताला दुखापत झाली. म्हणून इच्छा असुनही हवा तसा फोन हातात घेता येत नव्हता. पण आज वाचूया की आपली गोष्ट...!

तर आपण कुठे होतो..? हो बरोबर.. मागल्या भागात आपण पाहिले की दुर्वाने आईबाबांच्या हट्टाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. यावर संताप म्हणून दुर्वाच्या बाबांनी तिला घराबाहेर पडले. त्यांनी दुर्वाचा अजिबात विचार न करता तिला झिडकारले. आता तुम्हाला गोष्टीत काही चुकल्यासारखे वाटत आहे, हो ना..? ठाऊकच आहे मला. वयाची एकवीस वर्षे ज्या आई वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं त्यांनीच तिचं अस्तित्व नाकारलं हे कोणालाच रूचलं नसावं. अहो पण जर माणूस त्याच्यावर झालेल्या संस्कार आणि चालीरितींचा पडदा बाजूला सारत नाही तोवर हे शक्यच होत नाही. पहिल्यापासून दुर्वाच्या  बाबांना अर्थातच गजाननरावांना स्वतःचं रक्ताचं मूल हवं होतं तर तिच्या आईला जी म्हणायला गेलं तर तिची आई नव्हतीच तिला स्वतःच्या धाकट्या बहिणीचं मूल दत्तक घ्यायचं होतं. पण दुर्वा त्यांच्या आयुष्यात आली आणि त्या दोघांनी तिच्यातच गुंतले. आणि दुसरीकडे राघव.. जो आजवर दुर्वासाठी रडत होता त्याचा स्वर दिपक काकांना कोरडा जाणवला. आता सगळ्यांच्या मनात आले असेल की राघव असा काय वागतोय..? तो तर दुर्वावर प्रेम करत होता. दुर्वाची काळजी म्हणून किती घाव आणि विरहाच्या वेदना सोसल्या होत्या त्याने... ) आता पुढे...

 

  सकाळी सहा वाजताच सूर्याची कोवळी किरणे राघवला जागं करण्यासाठी त्याच्या डोळ्यावर विसावली, तरीही राघव गाढ झोपेत होता. अचानक त्याच्या तोंडावर पाण्याचे काही तुषार आले. तो "ख्याती मार खायचाय का..? जा गुपचूप झोप जाऊन." असे बोलत आणि कुशीवर वळतो. तोच पुन्हा त्याच्या कानात पाणी गेल्याचे त्याला जाणवते. तो उठून बसला आणि काही ओरडणार इतक्यात सुप्रियाची छोटीशी हृदू तिच्याकडील लहान मुलांच्या दुधाच्या बाटलीतले दुध त्याच्या अंगावर टाकत होती आणि खट्याळपणे हसत होती. एव्हाना तिने दूध टाकून राघवचा पूर्ण शर्ट खराब केला होता. त्याला किंचित राग आला पण तिचे ते नुकतेच आलेले छोटेसे दोन दात आणि ते मोहक, पाणीदार असे घारे डोळे बघून त्याचा राग लगेच मावळला. काल रात्री गप्पा मारल्यानंतर तो कितीतरी वेळ गच्चीवरच बसला होता. त्याच्यासाठी गेस्ट रूममध्ये सोय केली होती तरीही ओपन टेरेस म्हणजे गच्चीवरच्या झोक्यावरच पहुडणे त्याने पसंत केले. त्याने लगेचच हृदूला जवळ घेतले आणि तिच्या गालाचा पापा घेणार इतक्यात ती मागे झाली आणि त्याच्या शर्टकडे बोट दाखवत बोलत होती, "मामा..मामा.. छी..छी... मामा..!"

राघव :- वाह..! आईवरच गेली आहेस एकदम..! स्वतः शर्ट खराब केला आणि मामाला छी बोलते... बदमाश...!

आणि कितीतरी वेळ तो हृदूसोबत पकडापकडी खेळत होता. इतक्यात सुप्रिया त्यांच्यापाशी येते.

सुप्रिया :- अरे देवा..! साॅरी हं राघव.. मी हिला प्यायला म्हणून दूध दिले तर हिने तुझा अख्खा शर्ट खराब केला. हिला आता बदडायलाच हवं. हृदू मामाला साॅरी बोल...

पण हृदूने नकारार्थी मान हलवली आणि खोलीतून बाहेर येत असलेल्या सुहृदला जाऊन बिलगली तसं त्याने तिला कडेवर घेतले. तिने पुन्हा राघवकडे बोट करून दाखवलं आणि पुन्हा बोलली, "मामा ... छी...छी...!"

सुहृद :- काय ले राघव मामा..! काय झालं तुला..! तुला आमची हृदू अशं का बोलतेय..(तो पण बोबड्या भाषेत बोलू लागला..)

सुप्रिया :- सुहृद बघ ना रे.. राघव झोपला होता आणि हिने बाटलीतले दुध राघवच्या शर्टवर टाकले. इतका सुंदर शर्ट तुझ्या पोरीने खराब केला. तुझा एखादा शर्ट असेल तर दे त्याला आता..!

सुहृद :- हो देतो ना.. थांब हं राघव लगेच आणतो...

राघव :- hey guys chill.. don't worry about that.. माझ्या गाडीत माझा एक्स्ट्रा ड्रेस आहे. तो मी चेंज करेल.(हृदूकडे बघत) मम्मा मी माझ्या मामाला त्लाश दिला तुला नाही. तू मला काही बोलायचं नाही हं..

हे ऐकून हृदू खळखळून हसली. राघव लगबगीने पार्कींगमध्ये जाऊन त्याच्या कारमध्ये असलेला ड्रेस घेऊन येतो. पटकन फ्रेश होऊन तो ऑफिसला जायची तयारी करतो. त्याने न विसरता घरी फोन केला आणि तो परस्पर कार घेऊन ऑफिसला जातोय हे आधीच घरी कळवले होते. त्याने सगळ्यांना गुड बाय बोलून बाहेर जायला निघाला. इतक्यात सुप्रियाच्या सासूबाईंनी त्याला अडवले.

सु. सासूबाई :- अरे राघव...! थांब जरा सॅण्डविच खाऊन घे. गरमागरम करून आणतेय कमला( कामवाली बाई..)

राघव :- नको. नाही काकू..!

सुहृद :- अरे थांब की... सोबतच निघूयात.. तुझ्या कारने मला ऑफिसला सोडशील ना...? मला आज ड्रायव्हिंगचा कंटाळा आला आहे.

राघव :- हो चालेल ना.. नक्कीच..

तोही डायनिंग टेबलावर येऊन बसतो. त्याच्या समोरच दिपक काका बसले होते. ते दोघेही एकमेकांसमोर बसले होते तरीही काहीच बोलत नव्हते. सुप्रियाच्या आणि तिच्या सासूबाईंच्या हे लगेच लक्षात आले. त्या काही बोलणार इतक्यात सुप्रियाच्या फोनची रिंग वाजली. "अय्या आई..  बाबांचा फोन आहे.. घ्या.. घ्या.. he missing you alot...!" सुप्रिया मिष्किलपणे बोलली. "चल वात्रट कुठली...! आजकाल जास्तच आगाऊपणा करत आहेस तू..! " असे बोलून सासूबाई फोन घेऊन गॅलरीत निघून गेल्या...

दिपक काका :- हे बघ... राघव बेटा.. दुर्वाची खरंच काही चूक नाही. विनाकारण तिने तुझ्याशी नातं नाही तोडलं. तू प्लीज डुख नको धरूस तिच्यावर... ती पूर्णपणे निर्दोष आहे. अरे ते दोघं तिचे सख्खे आईवडील नाहीत तर काय होते..? तुझं तर तिच्यावर खूप प्रेम होतं ना...? ते विसरलास का तू..?

राघव :- एक मिनिट काका..! कोण बोललं की माझं दुर्वावर प्रेम होतं..? माझं अजुनही दुर्वावर खूप प्रेम आहे. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दुर्वा माझं पहिलं प्रेम राहील. पण मला वेगळीच शंका येत आहे. तुम्ही सगळे काही सविस्तर सांगितले मला या काही वर्षात घडले ते..पण  कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे असे वाटतेय मला राहून राहून... हो ना..?

दिपक काका :- अं ..  ते .... छे.. छे .... मी कोठे काय लपवतोय.. सगळं काही सविस्तर सांगितले तर आहे...! दुर्वा लग्न मोडल्यावर एकटीनेच राहतेय. कोणाशी संपर्क साधत नाही.

राघव :- हो का..? जर तुम्ही काल कोकणातून आलात तर आधी पुण्याहून आलात का बोललात...?

दिपक काका :- तुला कोणी सांगितले की मी कोकणातून आलोय..!

राघव :- तुम्ही सकाळी काकूंना सांगत होता ना की मी खोडद्याहून परस्पर आलोय.. ऐकले मी.. या उपर तुम्ही बोललात की भावनेच्या भरात राघवला सगळे सांगितले नाही हे नशीब.. जाऊद्या माझा काही हट्ट नाहीये. Afterall it's your own choice. मी हस्तक्षेप करणार नाही. पण तुम्हाला जर तिला भेटावसं वाटत असेल तर एकदा प्लीज भेटून घ्या. तिच्यासाठी नाही, तुमच्यासाठी म्हणून बोलतोय.. काल तिचं जेव्हा जेव्हा तुम्ही नाव घेत होता तेव्हा तुमचे डोळे भरून येतहोते.

दिपक काका :- खरंच भेट घडवून देशील बेटा माझी..?

सुहृद :- प्लीज राघव ..! तिची काकांशी भेट घडवून दे.. आणि माझ्याशी पण....! जवळपास पाच वर्षे तरी झाली असतील आम्ही दोघीही एकमेकींना भेटलो नाहीत. मी दुर्वाला किती मिस करते हे मी सांगू शकत नाही...

राघव :- हो नक्कीच.. पण मला जरा वेळ द्या.. कारण दुर्वा वरकरणी जरी मस्त वाटत असली तरी आतून खूप खचली आहे. पहिले जशी अल्लड आणि बिनधास्त होती तशी अजिबात राहीली नाही. स्वतःला खूप कोषात ओढून घेतलं आहे तिने...! परवाकडे ती फाईल शोधत असताना जोरात लागले. हातातून भळाभळा रक्त येत होते तरी तिने बघूनही दुर्लक्ष केले. शेवटी एका स्टाफ मेंबरने तिला first aid केले .

दिपक काका :- थॅन्क यू सो मच बेटा...! तू आहेस तिच्या सोबत म्हणून माझी अर्धी चिंता मिटली.

राघव :- थॅन्क यू काका...! तुम्ही मला सगळं  सांगितलं म्हणून...! नाहीतर दुर्वाच्या बाबतीत राग नाही पण अढी मनात कायम असती. पण तुमच्यामुळे ती अढी दूर झाली.. सुहृद निघूया का आपण...? नाहीतर उशिर होईल.....

सुहृद :- हो चल निघूयात..

राघव आणि सुहृद दोघेही सगळ्यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडतात.

सुहृद :- थॅन्क यू सो मच राघव..! तुला ऑड नाही वाटलं ना की मी तुझ्याकडे लिफ्ट मागितली. अरे आज मला तुमच्याच इकडे यायचं आहे.

राघव :- सायंकाळी कसा जाशील मग? माझा कलिग घोडबंदरकडेच राहतो. हवं तर तो सोडेल तुला घरापर्यंत... माझा जिवलग मित्र आहे.

सुहृद :- नाही रे.. नको.. सायंकाळी मी ट्रेनने जाणार आहे. मी असा कधीकधी ट्रेनने प्रवास करतो. मला खूप मजा येते.   पहिले काॅलेजला पण ट्रेनने जायचो खूप मजा यायची. एकदा तर गंमतच झाली. हृदू पाच महिन्यांची होती. तेव्हा हृदूला पण मी टिटवाळ्याला घेऊन गेलो होतो मंदिरात...  तेही स्लोऽ ट्रेनने...! आधी मजा आली पण नंतर घरी आल्यावर तिला तापच आला. बाबा तर जामच चिडले होते माझ्यावर...

राघव :- दुर्वा पण पूर्णपणे गणपती बाप्पाला मानते. मी आणि दुर्वा पण टिटवाळ्याला जाणार होतो पण राहुनच गेलं...

राघवच्या ह्या वाक्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहत गप्प बसतात. वातावरण हलकं करण्यासाठी सुहृद बोलायला सुरूवात करतो.

सुहृद :- If you don't mind...! मी म्युझिक चालू करू का...?

राघव :- कर की.. शेवटी तुम्ही माझ्या बहिणीचे अहो.. तू चिडलास तर माझ्या बहिणीला बिचारीला त्रास उगाचच....

सुहृद हसतच मराठी गाण्याचं एफ. एम. चॅनेल सुरू होतं...

रेडीओवर :-
  आता मी तुमच्या समोर एक सुमधूर गाणं घेऊन येत आहे...
 

सूर्य डोईवर जळणारा
चांदराती झगमगणारा
दिशा दिशा तरी कशा
उदास रे गमल्या तुझ्याविना......सखया, तुझ्याविना

पश्चिमवेलीवरती फुलल्या रंगफुलांच्या माळा
पौर्णिमेतूनी पहा पसरल्या
शीतल मोहक ज्वाला
सार्‍यातूनी विरघळताना
आत आत मोहरताना
दिशा दिशा तरी कशा
उदास रे गमल्या तुझ्याविना....... सखया, तुझ्याविना....

गाणं संपताच सुहृदने एफ. एम. बंद केला.

राघव :- अरे दुसरं गाणं लागेल ना ....! ऐक की .... मला येतं गाणं ऐकता ऐकता ड्राईव्ह करता...

सुहृद :- अरे नाही.. खूप गोड गाणं आहे.. नवीनच आहे वाटतं. आवाज प्राजक्ता रानडेचा (मराठीतील एक फेमस गायिका) वाटतोय. तेच गुगल करून बघतो.

राघव :- नाही.. हे गाणं हृदयामधील गाणी या अल्बमचं आहे. हे गाणं संदीप खरे यांनी लिहीलंय.. डाॅ. सलील कुलकर्णी यांनी compose केलंय.. आणि गायिका आहे बेला शेंडे.... आणि गाणं नवं नाहीये. साधारण 2007/2008 सालातलं असावं कदाचित.. लक्षात नाही.. ही रेअर गाणी आहेत. सध्याच्या काळात इतकी गोड गाणी कमीच ऐकायला मिळतात...

सुहृद :- बापरे इतकी सखोल माहिती कशी काय तुला...? गाणं शिकतोय किंवा गाणं शिकला आहेस का कुठे...?

राघव :- छे.. मी आपला कानसेन आहे.. दुर्वाने पहिल्यांदा


काॅलेजमध्ये हे गाणं म्हटलं होतं.

सुहृद :- ओहहह..

राघवने सुहृदला त्याच्या कामाच्या ठिकाणी सोडले आणि स्वतः ऑफिसला निघून गेला.

************************

असेच दिवस जात होते. राघवने त्यांच्या आई बाबांना दुर्वाबद्दल सारे काही सांगितले होते. त्याच्या आई वडिलांनी काहीही आढेवेढे न घेता त्याला सांगितले की जर अजुनही तो आणि दुर्वा एकमेकांवर प्रेम करत असतील तर ता दोघेही तिला स्विकारायला तयार आहेत. दुर्वाचा स्वभाव पहिल्यापासून लाघवी असल्याने विशेषकरून राघवच्या आईला त्यांच्या नात्यावर कधीच आक्षेप नव्हता. राघवची आई फक्त नावापुरतीच स्त्री सबलीकरणाची प्रणेती नव्हती तर तिला पहिल्यापासूनच मोकळ्या विचारांची होती.  ख्यातीचा तर प्रश्नच नव्हता. तिला लाड करणारी दुरू तिची वहिनी व्हायला हवी हे तिला पहिल्या दिवसापासून वाटत होते.   दुर्वा अजुनही खूप शांत वाटत होती. राघवला तिच्या आयुष्यातलं सत्य की ती अनाथ आहे हे समजल्यावर देखिल तो तिच्यावर प्रेम करत होता. पण त्याने ही गोष्ट तिला जाणवू दिली नाही. की दुर्वाने काहीच सांगितले नाही. एक दिवस दुर्वा कॅफेटेरियात एकटी बसून काॅफी घेत होती. नंतर समृध्दी पण तिला जाॅईन झाली.  राघव शक्यतो ती ऑफिसमध्ये असताना तिची पाठ सोडत नव्हता पण याचा अर्थ असा नाही की ऑफिसमध्ये सगळ्यांना त्यांच्या वागण्यातून संशय यावा... तर दुसरीकडे कृतार्थ सारखा दुर्वाशी मैत्री करू पाहत होता.  राघव आणि कृतार्थ दोघेही कॅफेटेरियात जाऊन त्या दोघींना जाॅईन होतात..

कृतार्थ :- hey senorita .... मी असताना तुम्ही दोघी एकट्या काॅफी कशा पिऊ शकता...

दुर्वा :- मि. पाटील... आम्ही दोघी एकमेकींसोबत आहोत तर आम्ही एकट्या कशा....?

तिच्या या बोलण्याने राघवने चमकून तिच्याकडे पाहिले. पहिल्यांदा त्याला त्याच्या हरवलेल्या दुर्वाची पुसटशी सावली जाणवली होती.

समृध्दी :- Durva... You are awesome...! तुझ्यासारखा sense of humour आमच्या इथे कोणाचाच नाही. राघवचा सोडून..! By the way तुमचं प्रोजेक्ट कुठवर आलंय...तीनच महिने उरलेत ना ...

दुर्वा :- हो... पण मला वाटते दोन महिन्यात पूर्ण होईल.. आणि मी माझ्या ऑफिसला खूप मिस करतेय. महिन्याकाठी एक दिवस जाऊन रिपोर्ट करून येते फक्त मी... कधी एकदा हे काम संपेल आणि मी माझ्या ऑफिसला जाते असं झालंय मला....

काॅफी संपवून सगळे कामासाठी आपापल्या जागी जायला निघाले तोच राघवने दुर्वाला अडवले.

राघव :- दुरू... आज सॅटर्डे आहे... जास्त काम नाहीये.. माझ्यासोबत माॅलमध्ये येशिल...?

दुर्वा :- राघव...!

राघव :- मी काही तुला मुवी बघायला नेत नाहीये. शाॅपिंगसाठी म्हणून बोललो. ख्यातीचा वाढदिवस आहे. तिला गिफ्ट पाहिजे चांगले काहीतरी.. फर्मान सोडलं आहे तिने... सारखं कॅश आणि बुक्स घेऊन वैतागल्या आहेत मॅडम....!

दुर्वा :- पण आज दहा तारीख आहे. तिचा वाढदिवस सतरा तारखेला आहे. इतक्या लवकर का गिफ्ट घेतोय....?

राघव :- अं... तुला अजुनही तिचा वाढदिवस कधी आहे हे लक्षात आहे...?

दुर्वा :- तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस.. ? 

राघव :- अरे आज तिथीनुसार आहे...

दुर्वा :- ओके... येते मी पण आपण ऑटो करूया किंवा तू बाईक वरून ये मी ऑटोने येते.

राघव :- मी बाईक आणलीच नाही आज... जाऊया ऑटोने.. by the way खूप दिवसांपासून विचारायचे राहीले. तुझं फोर बीएचके घर असुनही तू समोरच्या टू बीएचके फ्लॅट मध्ये पी. जी. म्हणून का राहते.. ? मागल्या वेळी तुझ्याकडे आलो तेव्हाच विचारणार होतो पण राहीलं...

दुर्वा :- राघव.. काही प्रश्न अनुत्तरीत राहीलेलीच बरी... मी ऑफिस सुटल्यावर खाली येऊन थांबेल तू डायरेक्ट खाली भेट मला..

दुर्वा आणि राघव दोघेही माॅलमध्ये येतात. दुर्वा तिच्या आवडीने ख्यातीसाठी ड्रेस निवडते. त्याला मॅच होईल अशी ज्वेलरी निवडून राघवकडे देते. नंतर एक पर्स निवडते आणि स्वतःजवळच ठेवते. तिची कपडे आणि रंगाच्या बाबतीत समज खूप चांगली होती. राघव बिल पे करत असताना दुर्वा त्याला अडवते.

दुर्वा :- थांब राघव.. पर्सचं वेगळं बील बनव...

राघव :- अगं काय हरकत आहे...?

दुर्वा :- प्लीज राघव...

 

दोघेही बिल पे करून शाॅपबाहेर निघतात.. दुर्वा तिच्या हातातली पॅक केलेली क्लच असलेली नवी पर्स राघवच्या हातात देते आणि बोलते, "हे माझ्याकडून राणूसाठी... पण प्लीज तिला सांगू नकोस की ही पर्स मी घेतली तिच्यासाठी..." लगेच राघव बोलला, "का गं... तिला उलट आवडेल की तू तिच्यासाठी गिफ्ट घेतलं." हे ऐकून तत्क्षणी दुर्वा उत्तरली, "हेच तर मला नकोय..."

राघव :- काय...?

दुर्वा :- काही नाही.. माझं डोकं दुखतंय जरा मला खायला प्यायला देशील का आता...?

राघव :- ओके... चल जाऊया...

राघव आणि दुर्वा mcdonald शाॅपमध्ये येतात. राघव खाण्याच्या पदार्थाची ऑर्डर करायला म्हणून काऊन्टर वर जातो. शाॅप मध्ये गर्दी असल्याने बसण्याची जागाही नव्हती.  दुर्वाने तिथे ताटकळत उभे राहण्याऐवजी बाहेर येऊन उभी राहते. तोच एक जण तिच्यासमोर दोन जण येतात तशी तिच्या अंगाची थोडी थोडी  थरथर व्हायला सुरूवात झाली.

राघव :- दुरू...! यार इथे खूप गर्दी आहे. यापेक्षा आपण एखाद्या restaurant मध्ये जाऊयात की...

दुर्वा काहीच बोलत नाही. ती फक्त समोर बघत उभी होती. नंतर राघवही समोर बघून अचंबित होतो... आणि दुर्वाच्या खांद्याला थोपटून तिला सावरण्याचा प्रयत्न करतो...

क्रमशः

( काय मग मंडळी,,, तुम्हाला काय वाटते... कोण आलं असेल बरं दुर्वाच्या समोर...? ज्यामुळे दुर्वाची अशी अवस्या झाली आणि राघव आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत होता... फक्त वाचताय काय...? पटापट कमेंट करून सांगा....)

🎭 Series Post

View all