( कसे आहात सगळे?? मजेत ना.. मजेतच रहा आणि स्वतःची काळजी घ्या.. आता कोरोना वाढतोय.. शक्यतो घराबाहेर जाऊ नका...
आता दुर्वा तिच्या आई बाबांची मुलगी नाही हे ऐकल्यावर तुमच्या डोक्यावर कोणी फ्लाॅवरपाॅट फेकून मारला अशीच फिलींग आली असेल ना.. ठाऊक आहे मला.. आता तुम्हाला असे वाटत असेल की दुर्वा त्यांची नाही तर कुणाची मुलगी आहे...? आता ती एकवीस वर्षांची झाली होती. आताच का हा विषय उघडकीस आला. कळतीलच सगळ्या प्रश्नांची उत्तरे... जरा धीर धरा.. आता पुढे...)
दुर्वाची आई :- आता तुला आम्ही तुझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करायची असेल तर बोहल्यावर चढावेच लागेल.. नाहीतर आपलं नातं कायमचं तुटलंच समज....
दुर्वा :- आई पण कशावरून हे रिपोर्ट चुकले नसतील.. काहीतरी गैरसमज झाला असेल..
गोविंद काका :- काही गैरसमज वगैरे नाही झाला. मला तर आधीपासूनच शंका येत होती. पण हे रिपोर्ट आल्यावर मला खात्री पटली की तू आमची मुलगी नाहीस. आमचं रक्त नाहीस. माहीत नाही कुणाचं पाप आमच्या माथी मारलं...!
सुजल :- बस्स झालं बाबा.. सारखं तुम्ही पाप, पाप बोलत आहात तिला..
आता शांत व्हा. खूप बोललात तुम्ही.. आपण पुन्हा शहानिशा करूया तुम्हाला हवं तर.. कदाचित रिपोर्ट चुकीचे असू शकतात.. आणि तुमचा कसा काय गैरसमज झाला आहे..
गोविंद काका :- सुजल मी सारासार विचार करूनच बोलतोय.. आठ ऑगस्टच्या रात्री साडेसात वाजता आपल्या शोभनाने माहेरी कणकवलीला एका मुलीला जन्म दिला होता. ती मुलगी, ते बाळ अतिशय नाजुक होते. त्या बाळाच्या दोन भुवयांच्या मध्ये एक छोटासा लालसर तिळ होता. मी स्वतः बाळाला हातात घेतले होते. गजू रात्री उशिरा येणार म्हणून मी दवाखान्यात थांबलो होतो. तेव्हा तुला खूप ताप भरला होता. रक्ताची कमतरता होती तुझ्यात.. माझं रक्त चढवावं लागेल म्हणून मी देवगडला परत निघून आलो. शोभनाला सोबत म्हणून तिची धाकटी बहीण होती म्हणून तसाच परतलो. खूप पाऊस होता त्या दिवशी.. मी मध्येच वैभववाडीला थांबलो होतो मित्राकडे. तेव्हा माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता. तब्बल दोन तासांनी मी देवगडला परतलो. जेव्हा शोभनाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली तेव्हा बाळाला बघितलं तर वेगळे बाळ होते. तेव्हा मला ही गोष्ट उघडकीस आणणं योग्य वाटले नाही...
मैथिली काकू :- अहो दवाखान्यात असे एका वेळी किती बायका मुलांना जन्म देतात. बाळ बदललं जाऊ शकतं. कशावरून दुर्वाचे खरे आई बाबा वाईट घरातली असू शकतात. ती कदाचित आपल्यासारख्या घरातली पण असेल ना..
गोविंद काका :- ते ठाऊक नाही मला.. पण ही आपली कोणीच नाही... आता हिच्यासाठी मी चांगलं स्थळ आणले आहे. त्याच्याशी लग्न लावतोय ना धुमधडाक्यात.. गुपचुप तिने आपला मान राखून हे लग्न करायला हवे...
आणि सगळे खोलीबाहेर निघून जातात. बिचारी दुर्वा, तिला हे सगळे ऐकून काहीच उमगत नव्हतं... ती आपली बेडवर पडून निपचितपणे आसवे गाळत होती. एव्हाना सकाळ झालीच होती. कालच्या प्रकाराने सगळे जण निरूत्साही पण जोमाने काम करत होते. सुप्रियाला गृहीत धरून तिला आणि कृपाला लग्नघराच्या बाहेर काढले होते. दुर्वाचे लग्न म्हणून सुप्रियाचे आई बाबा देखिल आले होते. त्यांना मुलीचा झालेला अपमान सहन झाला नाही. त्यांनी दुर्वाच्या लग्नात न थांबता त्या घरातून निघून जाणं पसंत केलं..
इकडे नाईलाजास्तव दुर्वा तयारी करत होती. नवरी असूनही तिचा चेहरा खुलून दिसत नव्हता. तपकीरी शालू तिच्या पिवळसर गोरा रंगावर जास्तच खुलून दिसत होता. साडी नेसताना तिने पोटावर दिसणारा वळ लपवण्यासाठी खटाटोप केला होता. तिच्या बाबांनी तिला जेव्हा कानाखाली मारले त्याचेही व्रण स्पष्टपणे तिच्या गालावर दिसत होते. ब्युटी पार्लरवाली तिचा तो व्रण लपवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा गोरा रंग त्या व्रणाला आणखीनच अधोरेखित करत होता. इतक्यात तिची शितल मावशी म्हणजे तिच्या आईची धाकटी बहीण आणि तिची लेक प्रितीका आली होती. प्रितिका जवळपास दुर्वापेक्षा तीन वर्षे तरी मोठी होती. शितल मावशी पहिल्यापासून तिचा तिरस्कार करत होती. तिची आर्थिक परिस्थिती दुर्वाच्या आईबाबांच्या तुलनेत अतिशय कमी होती. तिला आधीच दोन मुली आणि एक मुलगा.. दुर्वाच्या आईला लग्नानंतर जवळपास दहा वर्षं मुल होतच नव्हतं. शितल मावशीचा हट्ट होता की दुर्वाच्या आईने तिच्या मधल्या लेकीला किंवा लेकाला दत्तक घ्यावं म्हणजे त्यांच्या संपत्तीवर ते मुलच वारसदार असेल. शितल मावशीने शोभना मावशीच तिची आई होईल हे प्रितीकाच्या मनावर बिंबविले होते. पण दुर्वाच्या बाबांना पहिल्यापासून त्यांचं पहिलं मुल स्वतःचं मूल हवं होतं. त्यांच्या स्वतःच्या रक्ताचं... ते मुलगा असो वा मुलगी... नंतर हवं तर घेऊ एखादं मुल दत्तक असे म्हणून ते विषय टाळत होते. दुर्वाच्या आईला पण प्रितीकाला मुलगी म्हणून दत्तक घ्यायचे होते पण सासरचा विरोध होता. नंतर दुर्वाचा जन्म झाला आणि दुर्वाच्या जन्मानंतर त्या दोघांनी दत्तक बाळाचा विचार मनातून काढून टाकला. त्यांचा दुर्वातच जीव गुंतला. म्हणून शितल मावशीचा तिळपापड झाला होता. पण दुर्वा त्यांची मुलगी नाही ही गोष्ट आदल्या रात्रीच हवेसारखी पूर्ण वाडाभर पसरली होती.
शितल मावशी ( तिचा चेहरा पकडत) :- जास्तच भाव खात होती ना ही.. मेकअप करणार नाही.. मी नॅचरल ब्युटीवर विश्वास ठेवते.. बघ आता मेकअप लावावा लागतोय ना तुला... तुझी आई बघ तुला सोडून दुसरीकडे लक्ष देतेय.. बिचारी...
प्रितीका :- कम ऑन आई.. शोभना मावशी हिची आई नाहीच आहे.. काल कळलं नाही का तुला..
तिकडे सुजल दाराच्या आडून मावशीचे एक एक वाक्य ऐकत होता. गुश्यातच तो दुर्वाच्या खोलीत आला आणि त्याच्या हातातला दागिन्यांचा बाॅक्स दुर्वा च्या हाती ठेवला... तो खोलून बघता त्यात एक सुंदर कलाकुसर असलेला डायमंड आणि गोल्ड combination असलेला नेकलेस होता. शितल मावशी आणि प्रितीका डोळे फाडून एकटक बघत होत्या नेकलेसकडे...!
सुजल :- परी.. हा घे नेकलेस.. तुझ्या शालूवर एकदम सुट होईल.. मी कधीचा घेऊन ठेवलाय तुझ्यासाठी.. बघ तुझी वहिनी सोबत नसली तरी मी छान वस्तू घेऊ शकतो..
दुर्वा :- वहिनी कुठे आहे...? मला भेटायचं आहे तिला...
सुजल :- तिला जरा बरं नाहीये.. बाहेर रूखवताचं सामान सजवतेय.. बोलवून आणतो तिला थोड्या वेळाने...!
चैताली( धावत येत) :- दादा.. मुलाकडची मंडळी आली आहेत. चल बाहेर स्वागतासाठी.. शितल मावशी तुम्ही आणि प्रितू ताई तुला पण काकू बोलवतेय या पटकन..
चैतालीचे ऐकून सुजल खोलीबाहेर जातो. चैताली पण त्याच्या मागोमाग बाहेर पडते तोच शितल मावशी तिला अडवते..
शितल मावशी :- अगं थांब, जरा बघ तर चैतू इकडे.. तुझ्या भावाने दुर्वासाठी किती महागडा नेकलेस घेतला आहे.. तो तिच्यासाठी इतका खर्च करतो तर तुझ्यासाठी किती करत असेल ना.. तुला घेतलेला नेकलेस दाखव बरं मला...
चैताली :- नाही मावशी दादाने माझ्यासाठी नाही घेतलं काही.. हा तर माझ्या आईचा नेकलेस आहे...
शितल मावशी :- बघ बाई.. कसा आहे भाऊ तुझा.. सख्खी बहीण असताना हिला डोक्यावर चढवली आहे. तुझी वहिनी पण सारखी दुर्वाताई, दुर्वाताई करतेय...
चैताली रागात दुर्वाकडे बघत खोलीबाहेर जाते. तिच्या मागोमाग प्रितीका आणि शितल मावशी दुर्वाकडे तुच्छ नजरेने पाहत खोलीबाहेर जातात. एकतर चैताली पहिल्यापासून हलक्या कानाची होती. कोणीही काही बोलले यावर ती पटकन विश्वास ठेवत होती. एव्हाना शितल मावशी काही बोलायची तेव्हा दुर्वा तिला खडसावून उत्तर देत असे, पण काही दिवसांपासून परिस्थिती बदलली होती आणि कालच्या प्रकाराने दुर्वा अतिशय खचली होती. तिला कसं रिअॅक्ट व्हावं हेच सुचत नव्हते. ती आपली गुपचुप तयार होऊन खुर्चीवर बसली होती. इतक्यात अवनी तिच्या खोलीत आली. त्या बाईने खोलीत येऊन पटकन दार लावले आणि दुर्वाच्या कानात कुजबुजली, "Duru, Raghav is safe..! सोन्या काकांनी त्याला सेफली घरी पोचवले... तू फक्त आता इथून निसटण्याचा प्रयत्न कर.. कृपाचे बाबा आले आहेत. मागे ते केळशीकर आहेत ना त्यांच्या घरात थांबले आहेत. तुला बाहेर पडण्यासाठी ते मदत करतील. तो मुलगा मला पण आवडला नाही तुझ्यासाठी.." हे सगळे बोलत असताना नेमकी दुर्वाची आई खोलीत येते आणि बोलते,"सुनबाई.. जरा जास्तच बोलत आहेस तू..! मान्य आहे की कमलाकररावांचं हे दुसरं लग्न आहे पण ते वाईट नाहीत. भाऊजींनी सारासार विचार करून निर्णय घेतला आहे.. तू लवकर दुर्वाला मांडवात घेऊन ये.." आणि आई दुर्वाकडे एक नजरही न बघता खोलीबाहेर निघून गेली.
नाईलाजास्तव दुर्वा वहिनीसोबत मांडवात येते तोच तिला समोर कमलाकर दिसत होता. तिच्याकडे तो त्या दिवशी बघत होता त्याच नजरेने बघत होता. पण आज त्याची नजर जरा जास्तच वाईट दिसत होती तिला.. म्हणतात ना बाईचं एक सहावं इंद्रिय तिला नेहमी संकेत देत असतं. तिलाही ते संकेत येत होते. तिला त्याचं बघणं असह्य होते. तिला पळून जावेसे वाटत होते. पण पळायला मार्ग नव्हता. सगळ्यांसमोर ती जरा भितच कमलाकरच्या शेजारी बसली पण तिला एक अनामिक भिती वाटत होती. एकीकडे गुरूजी गौरीहराची पुजा सांगत होते आणि दुसरीकडे तिच्या शेजारी कमलाकर बसला होता. त्याने कुणाच्याही नकळत दुर्वा च्या गालाला स्पर्श केला आणि तिच्या गालावरच्या व्रणाला धक्का लागल्याने ती किंचित कळवळली. तिच्या डोळ्यात झालेली वेदना बघून कमलाकर गालातल्या गालात हसत होता. त्याचे हसणे तिला जास्तच असुरी वाटत होते. आईला सांगावे तर आई ना काकू कोणीच पाठीशी उभे नव्हते.. तिने सभोवार पाहिले तर फक्त सुजल दादा तिच्या पाठीमागे तिला दिसला. तिने इशारा करतच त्याला तिच्यापाशी बोलवले. सगळ्यांसमोर ती काही बोलूही शकत नव्हती. तिने एकवार त्याच्याकडे पाहिले आणि दुसरीकडे कमलाकरकडे..! तो अजुनही असाच हसत होता. तिचा भाऊ पटकन तिथून निघून गेला आणि परत येऊन दुर्वाच्या हातात कंगणाचा एक खोका दिला आणि बोलला, "परी किती गं वेंधळी तू..! काकूने दिलेले कंगण का नाही घातलेस.. " आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून निघून गेला.
तिने खोका उघडला तर त्यात एक चिठ्ठी होती.
"परी मला माफ कर.. मी माझ्या बहिणीची मदत करू शकत नाही. मला शपथ देऊन संकटात पाडलं आहे. हा करंटा भाऊ तुझा तुला वाचवू शकत नाही. तू तुला वाचव. जमल्यास नको करूस हे लग्न.."
सुजू दादा...
चिठ्ठी वाचून दुर्वाच्या डोळ्यात पाणी आले. इकडे सगळ्या बायका हे बघून दुर्वा च्या आईचे कौतुक करू लागल्या,"किती नशीबवान आहेस गं शोभने.. तुझी लेक बघ गौरीहराची पुजा करताना किती गुंतली आहे. डोळ्यात पाणी आले आहे तिच्या... वैधव्य कधीच येणार नाही बघ पोरीला.." हे ऐकून तिची आई पण भावूक झाली आणि क्षणभर का होईना सारे काही विसरून दुर्वापाशी आली आणि मागून दुर्वाला घट्ट मिठी मारली. तशी दुर्वाचा कितीतरी वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला.
दुर्वा (जोरात ओरडत) :- आई प्लीज.. मला या माणसाशी लग्न नाही करायचं. प्लीज आई.. नको ना...
कालिंदी(कमलाकरची आई) :- काय हो, विहीणबाई.. ही तुमची पोर काय बडबडत आहे..
दुर्वा :- हेच की मला तुमच्या मुलाशी लग्न करायचे नाही. मला या माणसासोबत कधीच लग्न करायचे नव्हते. खूप वाईट आहे हा माणूस...
दुर्वाची आई :- अहो.. कालिंदीताई माफ करा.. पोर जास्त भांबावली आहे. तिला मुळी काहीच सुचत नाहीये. तिच्या वतीने मी तुमची माफी मागते.
कालिंदी :- ते ठीक आहे. पण तुम्ही काहीतरी लपवत नाही आहात ना आमच्यापासून.. तुमची मुलगी जरा वेडसरच वाटतेय मला.. इलाज तर चालू नाही ना तिचा कोणता...
एव्हाना हा गलका ऐकून सगळे लोक गोळा झाले होते. ते एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. हे दुर्वाच्या बाबांना असह्य झाले. ते जातीने पुढे आले आणि दुर्वाच्या शेजारी उभे राहीले.
दुर्वाचे बाबा :- आहो ताई.. माफ करा.. पोर भांबावली आहे. पण ती काही वेडसर नाही... चला मुहूर्त टळेल. माझ्या मुलीचा काही कोणताही प्रकारचा उपचार सुरू नाहीये. ती शारिरीक आणि मानसिकरित्या एकदम ठणठणीत आहे..
तोच मागून एक आवाज येतो, "हो पण हा कमलाकरची तर ट्रिटमेंट सुरू आहे ना.. त्याला येत असतात असे वेड्याचे झटके.. माझ्याकडेच आणता होता ना त्याला तुम्ही चेकअपसाठी दोन वर्षांपूर्वी..." सगळ्यांनी मागे वळून पाहिलं तर रत्नागिरीतले प्रख्यात मनोचिकित्सक डाॅ. कृष्णकांत पेडणेकर आणि त्यांच्या पत्नी म्हणजे एक Gynecologist डाॅ. कृतिका जोगळेकर-पेडणेकर होत्या. त्या फक्त डाॅक्टर नसून माईआत्याची नणंद पण होती. गोविंद काकांचे त्या दोघांशी पहिल्यापासून कधीच पटत नव्हते. ते पुढे आले आणि त्या दोघांना बोलले, "आले का आमच्या घरात वाटोळं करायला.. तुमची हिंमत कशी झाली आमच्या होणार्या जावायला काहीही बोलण्याची... माहीत आहे की तुम्ही जावईबापूंचा उपचार करत होतात. पण यांच्या हाताला गूणच नाही ओ.. म्हणून तर व्याह्यांनी डाॅक्टर बदलला."
डाॅ. कृष्णकांत :- हे बघा.. गजाननभाऊ. आपल्या दुर्वाला आत्ता कुठे एकविसावं लागलं. मोडा हे लग्न.. तिच्यासाठी ह्यापेक्षा खूप सरस छप्पन पोरं उभी करू... कोणीही हिच्याशी लग्न करायला तयार होतील..
हे कितीतरी वेळ शांत बसून ऐकणारे सारंगराव मोने खूर्चीवरून उठून उभे राहीले आणि मोठ्याने बोलले, "हो का.. पण एका अनावरस मुलीला कोणीच स्वतःची बायको करून घेणार नाही हो डाॅक्टर साहेब..."
डाॅ. कृतिका :- काय बोलत आहात तुम्ही मोने साहेब...
सारंगराव :- हेच की ही दुर्वा अनावरस आहे.. तिच्या सख्या आईबापाचा पत्ता नाही. अहो शोभनाताई आणि गजाननरावांना ठाऊकच नव्हतं आजवर की दुर्वा अनावरस आहे. त्यांचं लेकरू जन्मतःच गेलं.. आणि ही आम्ही मनात मांडलेली कहाणी नाही तर सत्य आहे. हवं तर गोविंदरावांना विचारा. त्यांनीच हे सगळे सांगितले आम्हाला.. तरी आम्ही मोठ्या मनाने दुर्वाला घरची सून करायला तयार झालो आहोत.
आता लोकांची कुजबुज जास्तच वाढली होती. सगळे जण सारखे गजाननराव आणि दुर्वाकडे बघत होते. त्या लोकांच्या नजरेला नजर देणं हे गजाननरावांना असह्य होत होते. इतकी वर्षे कमवलेली इभ्रत अशी धुळीत मिसळली जाते की काय याची चिंता त्यांना लागून होती.
दुर्वाचे बाबा :- झालं गेलं विसरून जा.. मुहूर्त टळेल.. लवकर लग्न लावून दिलं की आपण मोकळे.. नंतर ह्या दोघांना तर संसार करायचा आहे. आणि दोघांचा एकमेकांना होकार आहे तर आपण कोण बोलणारे...?
कालिंदी :- थांबा भाऊजी.. पण तुमची लेक माझ्या मुलाला नकार देतेय, त्याचं काय..?
दुर्वाचे बाबा :- नाही हो.. तिला कमलाकररावांशीच लग्न करायचं आहे.
दुर्वा (बाबांना अडवत ) :- थांबा बाबा मी नाही करणार हे लग्न.. मला मान्य नाही.
सारंगराव :- हे काय आहे गोविंदराव..! आमच्या मुलासाठी इतकी स्थळं येत होती आणि आम्ही तुमच्या अनावरस पुतणीला सून करून घ्यायचा विचार केला. मागणी घालायला तुम्हीच आमच्या दारी आला होतात.. आता झाला तितका अपमान पुरे.. आम्ही हिच्याशी आमच्या लेकराचं लग्न नाही होऊ देणार..
आणि सगळी मुलाकडची मंडळी मांडवातून बाहेर पडली.. इकडे दुर्वाचे काका डोळ्यातून आग ओकत होते.. तर दुसरीकडे दुर्वाचे बाबा त्या मंडळींसमोर पाया पडून थांबवण्याची विनवणी करत होते. पण काहीही न ऐकता ती मंडळी निघून जाते. हळूहळू सगळे पाहूणे वाड्यातून बाहेर निघून जातात. घरात मोजकी घरातली माणसं थांबली होती. दुर्वाचे बाबा हताश होऊन खाली बसले होते तर तिची आई डोक्याला हात लावून रडायला लागली. दुर्वा भेदरलेल्या अवस्थेत आई बाबांकडे बघत होती....
शितल मावशी :- बघ शोभने..तेव्हा तू माझं ऐकायला हवं होतंस.. माझ्या प्रितीला किंवा शुभमला जर दत्तक घेतलं असतं तर ही वेळ आलीच नसती, पण काय करणार भाऊजींच्या हट्टापुढे तू पण काहीच बोलू शकत नव्हतीस.. आज हिच्याजागी माझी प्रिती असती तर निमूटपणे मान्य करून कमलाकरशी लग्न करून गेली असती आणि संसाराला लागली असती. म्हणतात ना संस्कार कितीही चांगले दिले तरी रक्त त्याचे गुण उधळल्याशिवाय राहत नाही.
नेमके हेच शेवटचे वाक्य ऐकून दुर्वाचे बाबा दुर्वापाशी जातात. तिच्या बखोट्याला पकडून तिला उभं करतात. तिच्या हातात तिचे सामान, मुलाकडील मंडळींना दाखवण्यासाठी म्हणून आणलेल्या मार्कशीट आणि काही पैसे तिच्या हातावर ठेवतात. दुर्वाला काहीच समजत नव्हते. ती प्रश्नार्थक नजरेने बाबांना न्याहाळत होती.
दुर्वाचे बाबा :- नीघ माझ्या घरातून.. चालती हो आत्ताच्या आत्ता...! पुन्हा तोंड दाखवू नकोस आम्हाला तुझं.. हे बघ आता पुन्हा जर तू माझ्यासमोर आलीस तर समजून जा तो माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण आहे...
दुर्वा (रडतच) :- बाबा...
दुर्वाचे बाबा :- नको बोलूस बाबा मला... तेही तुझ्या तोंडून... चालती हो इथून...
दुर्वा काहीच न बोलता कायमची त्या घरातून बाहेर पडली.. तेही कधीच न परतण्यासाठी....
*************************
(वर्तमानकाळात )
दिपक काका :- हे सगळं झालं तेव्हा राघव.. सुप्रिया तुला हे सगळं सांगू शकत होती पण तिला दुर्वाने तिची शपथ दिली आणि इकडे तू तिला तुझी शपथ दिली. म्हणून तिने मला बोलवले. मी भारतात असतो तर कदाचित हे घडलं नसतं..
राघव निःशब्द होऊन दिपक काकांचे बोलणे ऐकत होता.
दिपक काका :- राघव बेटा.. बोल ना.. काय वाटतंय तुला...
राघव :- आता मी काही बोलूच शकत नाही काका...
दिपक काका :- पण बेटा.,, झाल्या प्रकारात माझ्या पोरीची काहीच चुक नाहीये रे... तिला माफ करशील ना तू... सांग ना बेटा... बोल ना..
राघव :- काका आता ही बोलण्याची काहीच गरज नाहीये. संपलंय की सगळं
दिपक काका :- जरा मला समजेल अशा भाषेत बोलशील का आता...
राघव :- काका रात्रीचे दोन वाजले आहेत. मला वाटतं आपण आता झोपूया.. तुम्ही जा गेस्ट रूममध्ये.. मी इथेच गच्चीवर कंफरटेबल आहे..
काकांना राघवचा अचानक बदललेला नूर बघून असह्य झाले. त्यांनी गच्चीवरून खोलीकडे जाताना एकवार पोठमोरं उभा असलेल्या राघवकडे पाहिले आणि डोळ्यात आलेले पाणी पुसत खोलीत निघून गेले. इकडे राघव फोन ऑन करून दुर्वाचा फोटो बघत उभा होता. जो त्याने तिच्या नकळत ऑफिसमध्ये काढला होता. त्याच्या डोळ्यात एकही प्रकारची भावना दिसत नव्हती...
क्रमशः
(तुम्हाला काय वाटते मंडळी, राघव आता काय करेल.. सांगा पटापट आपल्या कमेंट बाॅक्समध्ये बरं... )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा