मेरे लिए तुम काफी हो...(भाग-१७)

That day has come when Durva knows the truth of her life ...

(  कसे आहात सगळे... मजेत ना.. मजेतच रहा.. बाहेर विनाकारण पडू नका. जावयाचे असल्यास दोन मास्क वापरा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या.   सगळ्या सगळ्यांना माझ्याकडून खूप म्हणजे खूपच म्हणजे खूपच साॅरी... मी जाणू शकते की तुम्ही दुर्वा आणि राघवला खूप मिस करता आणि मी त्यांची आणि तुमची भेटच घडवून देत नाहीये. रूसणारच ना कोणीही.. पण बघा ना कोरोनाचा वाढता कहर, हे वातावरण... मन कुठे स्थिर होते. आणि कंटाळवाणे, उदास  वाटत असल्यास पुढील लिखाणासाठी विचार कसे सुचणार..???   म्हणून हा भाग उशिरा मी जरा जास्तच प्रकाशित करत आहे..    मागल्या भागात आपण पाहिले की दुर्वाला कमलाकरशी अजिबात लग्न करायचे नव्हते. पण बाबांच्या आणि आईच्या आनंदासाठी ती बोहल्यावर चढायला आणि कमलाकरशी लग्नगाठ बांधण्यासाठी होकार देते. पण आता तिच्या मैत्रिणीची मावस बहीण कृपा तिला कमलाकरविषयी  सगळे  सत्य सांगते.. आता पुढे....)

कृपाने कमलाकरविषयीचे जे सत्य दुर्वाला सांगितले ते दुर्वाला पटले होते. त्याचे वरवर वागणे, बघण्यातले वेगळेपण आणि दिसणे यावरून तिला सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवणे सहाजिकच होते. पण एकदातरी आपण या गोष्टीचा पडताळा घ्यावा असे तिला वाटले. जेव्हा चैताली आणि सुप्रिया दुर्वा आणि चैतालीसाठी असलेल्या खोलीत आली तेव्हा दुर्वाने  चैतालीला काकूकडे झोपण्यासाठी म्हणून खोलीतून पिटाळले आणि सुप्रियाला कृपाने जे काही तिला सांगितले ते सविस्तर सांगितले.

सुप्रिया :- कृपा.. तू जर मस्करी करत असशील तर तुझा मी जीव घेईन.. मावशी काका मला कधीच बोलत नाहीत. तुझा वात्रटपणा मला ठाऊक आहे..

कृपा :- दिदी.. ठाऊक आहे माझीच पापं इतकी आहेत ना की माझ्यावर विश्वास ठेवणं तुला अवघडच जाणार आहे.. पण मी खोटं का बोलेल..? तेही या बाबतीत.. शेवटी हा आपल्या दुर्वाताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

दुर्वा :- ऐका दोघी.. खास करून तू कृपा.. चैतालीला याबद्दल काही सांगू नकोस सध्या.. ती एकतर स्वतःच्या पोटात एकही गोष्ट ठेवू शकत नाही. आता बघू काय करायचं ते.....

कृपा :- ताई.. आपला प्लॅन दिदीला सांगू का..?

सुप्रिया :- कसला प्लॅन गं...?

दुर्वा :- अगं..! कृपा जे बोलत आहे त्या गोष्टीचा पडताळा घेण्यासाठी मी आणि कृपा कमलाकरच्या ऑफिसमध्ये जाणार आहोत, जिथे तो आधी काम करत होता.. तू फक्त घरात सांभाळून घे..

सुप्रिया :- भारी आहे गं प्लॅन.. पण दुरू तुझ्या आईसाहेब तुला पाठवतील का गं..? तुझ्यावर cctv सारखी नजर ठेवून आहेत त्या.. तुला कुठेही जाऊदे तुझ्या बहीणीला, चैतालीला तुझ्या सोबत पाठवतात. आणि ती तुझ्या सोबत झालेलं सारं काही इत्यंभूत माहिती काकूंना येऊन सांगते...

दुर्वा :- ते ठाऊक आहे गं... म्हणून तिला खोलीतून पिटाळले ना मी... ऐक उद्या तू नाही कृपा माझ्यासोबत येईल.. तू चैतूला अडवून ठेव..

सुप्रिया :- अगं बाई.. तू काय कारण सांगणार आहेस पण.. कुठे चालली आहेस.. कशासाठी.. तेव्हा काय बोलशील.. तुला साधं खोटं बोलता येत नाही.. जरी बोललीस तरी डोळ्यात ठसठशीत दिसून येतं..

कृपा :- आम्ही दोघी दुरूताईच्या फेशियलसाठी जाणार आहोत.. नलिनीझ् ड्युटी पार्लर मध्ये.. तिची appointmentपण ठरवली आहे मी.. पण आम्ही तिथे जाणारच नाहीत.. थेट काम असेल त्याच ठिकाणी..

सुप्रिया :- बावळट आहात तुम्ही दोघी.. अख्ख्या पंचक्रोशीत ठाऊक आहे की दुर्वाला मेकअप वगैरेचा तिटकारा आहे. जेव्हा मी आणि चैतालीने जबरदस्तीने सुजल दादाच्या लग्नात हिला किंचितसा मेकअप केला तेव्हा पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं हिने.. तेव्हा गजू काकांनी हळूहळू बर्फ लावून तिचा मेकअप उतरवला, आईस्क्रीम चारलं  तेव्हा कुठे मॅडम गप्प बसल्यात.. काही आठवतं का..

दुर्वा :- हो ना.  किती छान होतं सगळं.. सगळे मला ओरडायचे तेव्हा आई बाबा बोलायचे की आमची नवसाची लेक आहे. लग्नानंतर दहा वर्षांनी झाली ती.. किती काळजी करायचे गं ते माझी.. पण आता त्यांच्या वागण्यात खूप कोरडेपणा वाटतोय. नेहमी माझ्या मुडनुसार वागणारे बाबा एकाएकी माझ्याशी अलिप्त वागू लागले आहेत. माईआत्याशी बोलत होते तेव्हा पण जोरात खेकसले माझ्यावर.. आई पण.. नेहमी माझ्या केसांना तीच मालिश करून द्यायची. वहिनी काय मैथिली काकूलापण माझ्या केसांना हात लावू द्यायची नाही. काल सहाजिक मी तिला केसांना तेल लावून दे बोलली तर ती बोलली की मी नाही लावणार.. हात चिकट होतात माझे.. एका व्यक्तीवर प्रेम केले की आधीपासून आपण निस्सिम प्रेम करतो तीच व्यक्ती का दुरावते गं.. तरी मी राघवला विसरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या सांगण्यावरून कमलाकरला होकारही दिला. पण आई बाबांचा हा कोरडेपणा असह्य होत आहे गं.. काय करू समजत नाही.

सुप्रिया :- आवर दुर्वा... सगळं ठिक होईल.. तू उद्या काय कारण सांगणार याचा विचार कर.. मी चैतूचं बघते..

कृपा :- दिदी.. पुन्हा तेच.. अगं आम्ही फक्त फेशियल करण्यासाठी म्हणून जाणार आहोत.. तू टेन्शन घेऊ नकोस.. सकाळी काय सांगायचं हे माझ्यावर सोड.. तू फक्त चैतूला हॅण्डल कर..

इतक्यात सुप्रियाच्या फोनची मेसेज टोन वाचली.. तिने एक भुवई उंचावून मेसेज वाचला.

सुप्रिया :- ओके. काय हवं ते करा. पण विचार करूनच. ऐक दुर्वा.. चल ना  गच्चीवर गप्पा मारायला जाऊ.. पुन्हा अशी वेळ येईल की नाही ठाऊक नाही आणि तसंही एक मुंबईकर म्हणून  इथली शांतता  थोडी असह्य होतेय मला.. आज रात्री फुलं ऑन मजा करूया..

दुर्वा :- अगं पण मला झोपायचं आहे..

सुप्रिया :- अगं आत्ता कुठे साडे आठ वाजलेत. सगळे जण जेवण करून पहुडले आहेत..  हळू आवाजात बोलूया.. मग तर झालं..

दुर्वा :- चल ठीक आहे..

दुर्वा :- ओके.. येते  माझे आई.. 

दुर्वा आणि सुप्रिया दोघीही खोलीबाहेर पडल्यावर कृपा त्यांच्या मागोमाग बाहेर पडली.

सुप्रिया :- कृपा तू जा चैतूजवळ...

कृपा :- का दिदी मला पण तुमच्यासोबत यायचे आहे.. मला इतक्या लवकर झोप येत नाही.

सुप्रिया :- (हळूच तिच्या कानात) अगं वेडाबाई.. उद्याच्या प्लॅनबद्दल डिस्कस करणार आहोत आम्ही.. काय कारण द्यायचं इतकंच.. कोणालाही शंका नको म्हणून.. तू चैतालीजवळ जा.. नाहीतर ती मागोमाग येईल.. शहाणी ना तू..

कृपा :- ओके ताई... पण माझ्याकडे साधाच फोन आहे सध्या.. तुझा फोन दे ना आत्ता मला गेम खेळायला. चैताली जास्त गप्पा मारत नाही.

सुप्रिया :- अगं माझ्या फोनवर काम आहे मला.. हा घे दुर्वा दिदीचा फोन.. यावर तो टेम्पल रन गेम आहे.. तुझा आवडीचा..

दुर्वाचा फोन कृपाच्या हाती देऊन दोघीही गच्चीवर जायला निघतात..

दुर्वा :- आली असती ना कृपा आपल्या सोबत.. काय हरकत आहे.. बिचारीला यायचे होते..

सुप्रिया :- असू दे गं.. तिला रात्रीचं जागरण झेपत नाही. सकाळी सर्दी झाली असती तर मावशी मलाच रागे भरली असती..

तेवढ्यात दुर्वाचे बाबा समोर येतात..

दुर्वाचे बाबा :- काय गं पोरींनो.. इतक्या रात्री बाहेर पडायला  काय झालं.. कुठेही जाऊ नका.. जाऊन झोपा गुपचूप.. भुक लागली असेल तर स्वयंपाकघरात जाऊन खा काहीतरी..

सुप्रिया :- काहीतरीच काय काका.. आम्ही बाहेर म्हणजे बाहेर नाही. बाहेरच्या जिन्यानेच टेरेसवर जात आहोत.. आम्ही दोघी आज मनसोक्त गप्पा मारणार आहोत. नंतर जिजू हिला पाठवतील की नाही हे ठाऊक नाही ना आपल्याला..

दुर्वाचे बाबा :- बेटा.. आपल्या ह्या घराला टेरेसचा जिना बाहेरूनच आहे.. जा दोघी मनसोक्त गप्पा मारा. पण जरा हळू आवाजात. गाव आहे हे.. लोकं मनसोक्त झोपली आहेत. त्यांची झोप मोडू नका म्हणजे झालं..

सुप्रिया :- हो काका...

  दुर्वा आणि सुप्रिया अलगद पाऊले टाकत गच्चीवर आल्या.. गच्चीवर येऊन बघितले तर कोणीच नव्हते म्हणून सुप्रियाने सुटकेचा निश्वास टाकला. तिचा हा नूर दुर्वाच्या नजरेतून सुटला नाही.

दुर्वा :- सुप्रिया.. असं काय झालंय... काही सांगू इच्छित आहे का तू.. प्लीज सांग...

सुप्रिया :- अगं काही नाही.. इथे कोणी नाही. मनसोक्त गप्पा मारता येईल.. बाकी काही नाही..

  कितीतरी वेळ सुप्रिया दुर्वाला गप्पांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत होती. दुर्वाला कोणीतरी आपल्या मागे आहे असे राहून राहून वाटत होतं. ती सारखी मागे वळून बघत होती.

सुप्रिया :- अगं दुर्वा मी तुझ्याशी बोलतेय आणि तू.. माझ्याशी बोलायचं नव्हतं तर आलीसच का वर..

दुर्वा :- अगं.. मला असं वाटतंय की कोणीतरी आहे गं मागे..

सुप्रिया :- हो भुतं असू शकतील.. तसंही कोकणात आहेस तू..

दुर्वा :- Don't be silly suppy...

सुप्रिया :- Okk.. Chill.. By the way तू शालू घालणार आहेस की घागरा.. आणि हिल्स की फ्लॅट सॅण्डल..

दुर्वा तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होती पण मनात काहीतरी तिला असह्य होत होते. ती तडक उभी राहून मागे वळली.

दुर्वा :- (थरथरत्या आवाजात) राघव.. मला ठाऊक आहे.. तू इथेच आहेस.. ठाऊक आहे मला.. तू इथे समोर ये आधी..

तिच्या या बोलण्याने सुप्रिया पण उठून उभी राहीली.. आणि कितीतरी वेळ शांत लपून बसून दुर्वाला बघणारा राघव तिच्यासमोर उभा राहिला. दुर्वा राघवपाशी धावतच जाऊन त्याला मिठी मारून ढसाढसा रडायला लागली. कितीतरी वेळ दुर्वा राघवच्या मिठीत रडत होती. राघव आणि सुप्रिया दोघांनी तिला अजिबात अडवले नाही... ती हुंदके देत फक्त "साॅरी राघव.. साॅरी राघव.." असेच बोलत होती. राघवच्या अनपेक्षित येण्याने ती जरा बावरलीच होती. पण मनाच्या कोनाड्यात कुठेतरी तिला दिलासा वाटत होता. इतके दिवस मनात ठाण मांडून बसलेले दुःख आणि शल्य तिने राघवसमोर मोकळे केले.

राघव :- Duruu... Chill baby.. Don't be sorry.. I can understand your situation... (आणि तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या माथ्याचे चुंबन घेतो..) मी तुला इथून न्यायला आलो आहे...

दुर्वा :- साॅरी.. इतके दिवस मी तुला avoid करत होती. पण तुझी खूप आठवण येत होती रे... बाबांना वचन दिले ते पाळण्यासाठी मी असे केले. मला चुकीचं समजू नकोस... पण मला एक कळत नाहीये की तू इथे का आलास..?

राघव :- माझं प्रेम संकटात आहे ते वाचवण्यासाठी मी  आलो आहे.. मी तुझं त्या मुलाशी लग्न होऊच देणार नाही....

दुर्वा :- पुन्हा तेच राघव... बाबा ऐकणार नाहीत रे.. आणि ठरलंय माझं लग्न.. परवावर आलंय.. हळद लागली मला.. कमलाकरच्या नावाची मेहंदी माझ्या हातावर लावली गेली. फक्त मंगळसुत्र घालायचं बाकी आहे.. तेही काही तासांत घालतील.. आजच लग्न आहे रे माझं... दुपारी साडेतीनचा मुहूर्त आहे.. (घड्याळात बाराचे टोल वाजले होते..) खूप उशिर झाला रे..  हे लग्न जर मोडलं तर बाबांचं पूर्ण पंचक्रोशीत नाक कापलं जाईल.. बाबांना आधीच बिपीचा त्रास होतोय... माझ्यामुळे आणखी काही नको व्हायला त्यांना....


राघव (चिडूनच) :- काय सारखं बाबा बाबा.. त्या घाणेरड्या माणसासोबत लग्न करायला चालली आहेस. तो बेवडा कमलाकर... उद्या तुला त्याने काही इजा केलीच तर.. तेव्हा तुझ्या बाबांना कसं वाटेल याचा विचार कर.. तेव्हा त्यांच्या लेकीला झालेला त्रास त्यांना बघवेल का...?

दुर्वा (त्याला अडवतच) :- एक मिनिट.. तुला कोणी सांगितले असे.. तुला कसे काय ठाऊक आहे कमलाकर विषयी..

सुप्रिया :- मी सांगितले राघवला... परवा मी सकाळी देवगडला पोचले. तेव्हा आल्या आल्या कमलाकरचा फोटो पाहिला. त्याच्याविषयी सगळी इत्यंभूत माहिती मला ठाऊक आहे, कारण तो आधी माझ्या काकांच्या म्हणजे कृपाच्या बाबांच्या क्लासेसमध्ये स्टुडंट होता.... काॅलेज सुटल्यावर टवाळगिरी करणे, सिगरेट पिणार आणि दारूचं तर वेडच आहे त्याला.. आणि तो थोडासा आजारी आहे. त्याला राहून राहून वेड्याचे झटके येतात.. त्याच्याचमुळे त्याच्या बायकोने लग्न झाल्यावर त्याच्या छळाला कंटाळून दोन महिन्यांतच आत्महत्या केली आहे.. मी थोडी लहान असताना म्हणजे नववी की दहावीच्या  दरम्यान मी सुट्टीत मावशीकडे आले तेव्हा रोज हौस म्हणून मी आणि कृपा काकांच्या क्लासमध्ये जायचे. पण जेव्हा त्याने मला वेगळ्या नजरेने पाहिले तेव्हापासून काकांनी मला आणि कृपाला क्लासमध्ये येण्यास पुर्णपणे बंदी घातली. ते आम्हा दोघींना कुठेही बाहेर जाताना एकटं सोडत नसत. तू जेव्हा बोललीस की काकांनी त्यांच्या ओळखीचे स्थळ आणले आहे तेव्हा त्याचे नावही सांगितले. नंतर ते तुला बघून गेले तेव्हा   तू त्याच्या घरच्यांची माहिती दिलीस आणि त्याचे वर्णनही केलेस. तेव्हाच मला तो मुलगा हाच कमलाकर असल्याची खात्री पटली. आणि ही गोष्ट मी तुझ्या आई बाबांना आल्यापासून सांगण्याचा प्रयत्न केला.... पण ते मला त्यांना सांगताच आले नाही. काकू म्हणजे तुझ्या आईला सांगितले तर ती म्हणत होती की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे.. मला वाटते तुझ्या गोविंद काकांचा गैरसमज झाला आहे.. afterall त्यांनी स्थळ आणले आहे. माझं कोणीच ऐकून घेत नाहीये... म्हणून मी वैतागले होते. आणि आपसूकच राघवचा फोन आला.. तेव्हा भावनेच्या भरात मी सारे काही सांगितले त्याला.. त्याने क्षणाचाही विलंब न करता देवगडची वाट धरली.. आज तो फक्त तुझ्यासाठी आला आहे.. तू आत्ताच्या आत्ता निघ याच्यासोबत.. याने त्याच्या आई बाबांना कल्पना दिली आहे थोडीफार.. कमलाकरशी लग्न करण्यापेक्षा जा निघून राघवसोबत..

दुर्वा :- पण अगं आई बाबांचं काय.. त्यांना काय वाटेल की त्यांची एकुलती एक मुलगी लग्नाच्या आधी पळून गेली.

राघव :- दुर्वा आत्ता तू फक्त तुझा स्वतःचा विचार कर.. नंतर लग्न झालं की तुला सल नको रहायला की मी आलो होतो, पळून जाण्याची संधी होती आणि तरीही आपण या नरकात अडकलो.. पुन्हा विचार कर.. आई बाबा तुझेच आहेत. नाराज होतील... किती दिवस.. महिने.. फार फार तर वर्षभर... नंतर त्यांना तुझा स्वीकार करावाच लागणार आहे ना...

दुर्वा :- (दीर्घ श्वास घेऊन) ठीक आहे तुझं म्हणणं.. पण जर मी तुझ्यासोबत आले तर तुझ्या घरातले मला स्विकारतील की नाही..? आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण इतक्या लवकर लग्न कसे करू शकतो.. I mean you are just 24 now...

राघव :- ohh come on Durva.. .मी कुठे बोललो की तुला मी पळवून नेऊन लगेच लग्न करणार आहे.. मी फक्त तुला इथून न्यायला आलो आहे. दोन वर्षे करिअरमध्ये सेटल झाल्यावर करू लग्न.. तोवर तू तुझ्या मुंबईतल्या किंवा माईआत्याचं घर आहे ना.. तिथे जाऊन रहा... तुला कोणी अडवलं आहे.. कारण जर तू इथे आहेस तर त्या कमलाकरशी लग्न करण्यावाचून तुला पर्यायच नाही... तुझे काका आधीच हिटलर आहेत..

दुर्वा :- ठिक आहे.. मी आलेच माझी पर्स घेऊन.. आपण जाऊया इथून निघून...

दुर्वा खोलीत जाण्यासाठी मागे वळून बघते तोच तिचे बाबा तिच्यासमोर येऊन उभे राहिले आणि जोरात तिच्या कानशिलात लावली.. तिला त्यांनी इतक्या जोरात मारले की ती प्रहाराने खाली पडली आणि तिच्या नाकातून रक्त यायला सुरूवात झाली...

दुर्वाचे बाबा :- शेवटी दादा म्हणत होता तेच खरं आहे.. कापलंच हिने.. ए हणम्या, गोद्या अरे सोण्या सगळे या पटकन.. घेऊन जा या पोराला... दुर्वाला पळवून नेतोय का.. आत्ता तुझा मुडदा गाडतो इथे...

ते मोठ्या आवाजात सगळ्यांना बोलवत होते. काही क्षणांसाठी ते गच्चीच्या दुसरीकडे जाऊन उभे राहिले आणि सगळ्यांना आवाज देत होते.

बाबांचे वाक्य ऐकून दुर्वा अडखळतच उभी राहिली. ती राघवपाशी येऊन पुन्हा उभी राहिली.

दुर्वा :- राघव जा इथून सगळे येण्याआधी.. माझ्यासाठी इथे थांबू नकोस..  तुझ्या घरी आई बाबा आणि ख्याती आहेत त्यांचा विचार कर...

राघव :- पण दुर्वा तू.. तुझं काय.... तुला सोडून जाणार नाही मी कुठेच.. इथे माझा  जीव गेला तरी चालेल...

दुर्वा :- राघव तुला माझी शपथ आहे.. जा इथून.. जर तू इथे एक क्षणही थांबलास तर माझं मरण बघावं लागेल तुला.. जा इथून..

इतक्यात काही जण गच्चीवर आले आणि राघवला घेरले. त्यातील दोन जणांनी राघवला पकडले आणि दुर्वाच्या बाबांनी त्याला मारायला सुरुवात केली.

दुर्वा :- बाबा नका मारू त्याला.. मी तुमच्या मर्जीनेच लग्न करणार आहे...  तो फक्त भेटायला आला होता.  बाबा पाया पडते मी तुमच्या..  जाऊद्या त्याला.. प्लीज...

  एव्हाना सगळे जण जागे झाले होते. राघवही मार खाऊन दमला होता. त्याला स्वतःवर आलेला वार अडवणे सहज शक्य होते.  तितकी पिळदार शरीरयष्टी होती त्याची.. पण समोर दुर्वा चे बाबा होते याचे भान ठेवून त्याने निमूटपणे सहन केले... एव्हाना पहाटेचे चार वाजले होते....

  दुर्वाच्या बाबांचा राग अनावर झाला होता. त्यांनी गड्यांना त्याला त्याच्या घरी पोचवण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी सांगितले आणि दुर्वावर एक जळजळीत कटाक्ष टाकून तिच्या लांबसडक केसांना ओढत खोलीत आणले..  मागोमाग गोविंद काका, आई दादा काकू वहिनी सगळे आले होते. दुर्वाच्या बाबांनी रागाच्या भरात तिला लाथाबुक्या मारायला सुरूवात केली. अवनीने त्यांना अडवले...

अवनी :- काका इतकं का मारत आहात ताईला.. तुमचीच मुलगी आहे ना ती.. झाली चुक माफ करा.. गेला राघव इथून.. दुपारीड़ लग्न आहे हिचं...

दुर्वाचे बाबा :- दादा बरोबर बोलत होतास तू.. ही नाक कापणार.. कापलंच होतं नाक माझं हिने.. नशीब मी गच्चीवर गेलो आणि पाहिले..

गोविंद काका :- जाऊदे गजू.. बी पी वाढेल तुझं आणखी.. दुपारी लग्न झालं की आपली ब्याद जाईल...

दुर्वा :- काका मी एकवेळ मरण पत्करायला तयार आहे पण त्या कमलाकरशी लग्न करणार नाही.. तो खूप वाईट माणूस आहे.. राघव खूप चांगला आहे..

दुर्वाचे बाबा :- पुन्हा तेच... तुझं लग्न कमलाकरशीच होईल.   आणि तेही आजच...

दुर्वा ( डोळे पुसत ) :- आणि मी नकार दिला तर.. मला नाही नरकात जायचंय.. तुम्हाला ठाऊक नसेल तर मी सांगते तुम्हाला तो कसा आहे ते.. तो माझ्यासाठी अजिबात योग्य नाही... त्याचं या आधीही लग्न झालं आहे.. माझ्यावर  इतकी वाईट परिस्थिती नाही की एका बिजवराशी लग्न करायला चालली आहे.. तेही कमलाकर सारख्या.. ज्याची बायको त्याच्या जाचाला कंटाळली आणि तिने आत्महत्या केली... बोला ना काका.. मी खरं बोलतेय ना. 

गोविंद काका :- ह... हो ..! झालेलं त्याचं लग्न... मेली त्याची बायको.. पण कशावरून तोच वाईट आहे.. ती पण वाईट असू शकते ना.  तू पण तर लफडं केलं आहेस..

दुर्वा :- बाबा तरीही.. तुम्ही अजुनही माझ्या लग्नाच्या निर्णयावर ठाम आहात.. तुम्हाला अजुनही वाटते हा मुलगा माझ्या लायक आहे..? बोला ना बाबा..?

दुर्वाचे बाबा :- त्याची लायकी काढू नकोस.. तुझी बघ आधी.. दादा म्हणत होताच मला.. नासकं रक्त त्याचे गुण दाखवल्याशिवाय राहत नाही म्हणून..

दुर्वा :- बाबा तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे..? तुम्ही काय बोलू इच्छित आहात..?

गोविंद काका :- हेच की तू आमची मुलगी नाहीस.. आमचं रक्त नाहीस.. अनभिज्ञपणे आमच्या माथी मारलेलं पाप आहेस... आमचं आणि तुझं कोणतं नातं नाही..

दुर्वा :- काका आता स्वतःचा हलगर्जीपणा लपवण्यासाठी तुम्ही माझ्यावर दोषारोप करू नका.. कधीतरी स्वतः केलेली चुक मान्य करा..

इतक्यात दुर्वाची आई खोलीतून काही पेपर्स आणते आणि तिच्यासमोर धरते आणि वाचायला सांगते.. ते पेपर DNA Test चे रिपोर्ट असतात.. त्यावरून हे स्पष्ट होत होते की शोभना आणि कमलाकर दुर्वाचे सख्खे आई बाबा नव्हते.. रिपोर्ट वाचून ती ढसाढसा रडायला लागली आणि मटकन खाली बसली..

दुर्वाची आई :- आता तुला आम्ही तुझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करायची असेल तर बोहल्यावर चढावेच लागेल.. नाहीतर आपलं नातं कायमचं तुटलंच म्हणून समज..

क्रमश:
~ऋचा निलिमा

( काय मग दोस्तहो.. काय वाटतं तुम्हाला.. दुर्वा कमलाकरशी लग्न करेल का.. ? जर केले तर काय होईल आणि नाही केले तर काय होईल..? पटापट कमेंट बाॅक्समध्ये कमेंट करून सांगा बर...)
 

🎭 Series Post

View all