( सर्वप्रथम सगळ्या सगळ्यांना माझ्याकडून खूप म्हणजे खूपच म्हणजे खूपच साॅरी... मी जाणू शकते की तुम्ही दुर्वा आणि राघवला खूप मिस करता आणि मी त्यांची आणि तुमची भेटच घडवून देत नाहीये. रूसणारच ना कोणीही.. पण काही दिवसांपूर्वी माझ्या लिहीत्या हाताला दुखापत झाली होती. मला म्हणून हा भाग उशिरा प्रकाशित करत आहे.. मागल्या भागात आपण पाहिले की कमलाकर दुर्वाला बघण्यासाठी म्हणून तिच्या घरी आला होता. ती सविस्तरपणे तिच्या आणि राघवच्या नात्याबद्दल कमलाकरला सांगते. आता बघूया कमलाकर दुर्वाला होकार देतोय की नकार....? )
दुर्वा ( जोरात ओरडतच ) :- काका...! तुम्ही मला न विचारता परस्पर त्या मंडळींना माझा होकार का कळवला. मला एकदा तरी विचारावंसं वाटलं नाही का तुम्हाला? आई बाबा तुमच्या प्रत्येक शब्दाला मान देतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची मतं माझ्यावर लादण्याचा प्रयत्न करणार.. मी स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. मला माझी स्वतःची मतं आहेत.
गोविंद काका :- वा वा वा...! म्हणतात ना ज्याचं करावं भलं तो बोलतो माझंच खरं अशी गत करून ठेवली या पोरीने... इतक्या कष्टाने तुझ्यासाठी स्थळ आणले आणि तू असा माझा उद्धार करतेयस. मुंबईत काय रंग उधळलेस तू ठाऊक आहे मला...! त्या पोराच्या नादी लागून आधीच आमचं नाक कापलंस तू... आता मला बोलायला निघाली आहेस. लक्षात ठेव या घरात मी सगळ्यात मोठा आहे. गजू आणि शोभना माझ्या शब्दाबाहेर नाहीत. तुला लग्न तर या कमलाकराशीच करावं लागेल लक्षात ठेव.
दुर्वा :- आणि जर मी नकार दिला तर...
दुर्वाचे बाबा :- तर तुझ्या आई बापाचं मेलेलं तोंड पण बघता येणार नाही तुला...
दुर्वा(रडतच) :- बाबा.. आता तुम्ही पण..! तुम्ही तरी समजून घ्या मला..! फक्त तुम्हाला आवडलं नाही म्हणून मी राघवला विसरण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही मला या कमलाकरला होकार देण्यासाठी फोर्स करत आहात. मी काही चुकीचं काम केलंय का...? नाही ना. माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवा. मी आजवर असं काही केलंय का ज्यामुळे तुमची मान शरमेने खाली गेली आहे. बोला ना बाबा...
दुर्वाची आई :- आजवर केली नाहीस.. पण आता तर करत आहेस ना...? तरी मी तुम्ही वारंवार सांगत होते तेव्हा तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. सारखे माझी लेक म्हणून हिला डोक्यावर घेतलं. म्हणतात ना शेवटी...
दुर्वाचे बाबा :- थांब शोभने... जास्त काही बोलू नकोस.. ती ऐकून घेईल आपलं. आजवर सगळं ऐकलं आहे तिने आपलं. दुर्वा हे बघ काका तुझ्याच चांगल्यासाठी बोलत आहेत. त्यांनी उगाच का पायपीट केलीय ह्या स्थळासाठी.. काही तरी असेल ना चांगलं.. आणि आलेलं स्थळ गेलं तर गावात उगाच गवगवा होईल. मुलीतच खोट आहे बोलतील, म्हणून घाबरतात काका.... जा आपली तू खोलीत. जाऊन आराम कर...
दुर्वा डोळे पुसत आपल्या खोलीत जाते. पाहुणे मंडळी जरा उशीर झाला म्हणून संध्याकाळी जेवण करूनच परत गेली म्हणून उशीर झाला होता. इतक्या उशीरा का चर्चा करावी म्हणून सगळे बाकीची कामं आवरून झोपी गेले.
दुसर्या दिवशी सकाळी चैताली आणि शेजारचे बालचमू दुर्वाला घेऊन समुद्रकिनारी फिरायला आणि त्यानंतर देवळात निघून जातात. अर्थात ही आयडीया सुजलची होती. रात्री दुर्वा खोलीत न झोपता अंगणातच तुळशीच्या वृंदावनापाशी वळकटी टाकून झोपली होती. सुजल पाणी पिण्यासाठी बाहेर आला तेव्हा त्याला दिसले की ती थंडीने कुडकुडत होती. त्याने पटकन तिला उचलून पडवीत असलेल्या गादीवर झोपवले आणि तिच्या अंगावर चादर टाकताना तिच्या डोळ्यातले सुकलेले अश्रू दिसत होते. उद्या काहीही करून बाबांशी चर्चा करूया अशी खूणगाठ बांधून तो त्याच्या खोलीत झोपायला जातो. दुसर्या दिवशी सकाळी सगळे जण थोडा वेळ शांत बसून होते. दुर्वा घरात नाही याचा कानोसा घेत सगळ्यांनी चर्चा करायला सुरूवात केली.
गोविंद काका :- गजू... बोललो होतो ना ही पोर डोईजड होईल. पण तुम्ही दोघे ऐकाल तर शपथ... ऐकायला तयारच नाही.. काय कमी आहे त्या कमलाकरामध्ये.. हो थोडासा वयाने मोठा आहे आणि सावळा रंग.. पण त्याने काय फरक पडतो. पोरगा तर सधन आहे.
अवनी :- पण मामंजी.. त्याच्या घरचे वारंवार बोलत होते की दुर्वाला लग्नानंतर नोकरीची गरज नाही. ती इतकी हुशार आहे. आपण पैसे असलेलं घर बघण्यापेक्षा जिथे सुख आणि समाधान मिळेल असं घर बघू दुर्वा ताईसाठी... आणखीन मला एक डाऊट आला. त्याचे डोळे एकदम लाल होते आणि चालताना दोन वेळा अडखळत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या दुर्वाताईला जरा रागातच बघत होता.
सुजल :- त्याच्या डोळ्यात बघितले तर थोडे वेगळेपण जाणवले मला.. बाबा आपण सारासार विचार करून निर्णय घेऊया. अर्थात हा आपल्या दुर्वाच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
गोविंद काका :- सुजल, सुनबाई.. तुमचा गैरसमज झाला असेल. चांगला आहे तो मुलगा. तुला माहिती आहे का काही दिवसांपूर्वी त्याच्या बाबांनी स्वतःच्या पैशाने जमीन घेतली जवळपास चार एकर.. आता फिशरी व्यवसाय करायचा आहे कमलाकरला. मी पण सगळ्यांचा विचार करून स्थळ आणले आहे ना.. बघ ना.. माझा आणि त्यांचा बिझनेस मर्ज झाला तर किती चांगलं होईल. सारखं कामानिमित्त पुण्याची वारी तरी बंद होईल. आणि दुर्वाला चांगल्या ठिकाणी उजवलं याचं समाधान मिळेल...
सुजल :- बाबा तुम्ही हे लग्न नेमकं कशासाठी जुळवत आहात..? दुर्वाच्या आयुष्यासाठी की तुमच्या बुडत चाललेल्या बिझनेससाठी... एकोणतीस वर्षांचा आहे तो.. आपल्या दुर्वाला आत्ता कुठे एकविसावं लागलं आहे.
गोविंद काका :- हे काय बरळतोय गं मैथिली तुझा पोरगा.. मला काही कमी पडत नाहीये माझ्या बिझनेसमध्ये.. तुझं शिक्षण आणि लग्न झालं. तुझी जबाबदारी पार पाडली. आता फक्त चैताली आहे. तिच्यासाठी मी जमवलंय मी बरंच... मी दुर्वाचा विचार केला यात काय वाईट केलं...?
मैथिली :- सुजल...! बाबा ना ते तुझे..! जशी त्यांना तुझी आणि चैतूची काळजी तशी दुर्वाची पण आहे. जरा कडक आहेत पण त्यांचा तुमच्या सगळ्यांवर जीव आहे. तुम्ही तिघेच काय.. माईवन्सचे दोन्ही मुलगे पण यांच्यासाठी सारखे... आणि राहीलं वयातलं अंतर तर आम्हा दोघांमध्ये पण अकरा वर्षांचं अंतर आहे.
दुर्वा आणि चैताली देवळात जाऊन आल्या, शेजारचे बालचमू त्यांच्या घरी निघून गेले. चैतू काॅलेजचं काम होतं म्हणून मैत्रिणीकडे गेली होती. दुर्वा तिच्या खोलीत एकटीच आसवे गाळत होती. तिला नेहमी आधार देणारी माईआत्या तिच्यासोबत नव्हती याचं दुःख राहून राहून वाटत होतं. आत्या तिला जीवापाड जपतो होती पण शेवटी ते आपले आई बाबा आहेत त्यांना आपली जितकी काळजी तितकी तर कुणालाच नसेल ना...? इतक्यात तिच्या खोलीचे दार वाजले. डोळे पुसून स्वतःला सावरत तिने खोलीचे दार उघडले. खोलीबाहेर चैतू आणि दुर्वाचे बाबा उभे होते. काही कळायच्या आतच त्या दोघांनी दुर्वाला घट्ट मिठी मारली.
दुर्वा :- बाबा, चैतू काय झालं गं..? तुम्ही दोघे असे अचानक खोलीत..!
दुर्वाचे बाबा :- चलं आधी बाहेर.. सगळे तुझी वाट पाहत आहेत.
तिचे बाबा तिला ओढतच खोलीबाहेर येतात. पडवीत सगळे तिची वाट बघत असतात. ती आल्यावर सगळे कुतुहलाने तिच्याकडे बघत असतात. तिला जरा वेगळे वाटत होते. ती नजर उचलून तिच्या बाबांकडे बघत होती. त्यांचा चेहरा न्याहाळण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला काही उमगतच नव्हतं.
दुर्वाचे बाबा(तिचा चेहरा ओंजळीत घेत ) :- दुरू...! तुला कमलाकर खूप खुश ठेवेल गं. जसा मी तुझी काळजी घेतो तशीच तुझी काळजी घेईल तो. काकांनी तुझ्या चांगल्याचा विचार केला ना.. अगं त्यांनी असं पण सांगितलं की जर तुमच्या मुलीला लग्नानंतर नोकरी करायची असेल तर खुशाल करू शकते, आमची काही ना नाही. तुझ्या गाण्याच्या बाबतीत किंचित विरोध आहे त्यांचा पण तू कुठे गाणं इतकं सिरियसली घेतेस..
गोविंद काका :- अरे गजू पुन्हा तेच.. तिला काय विचारतो. आपण मोठे आहोत अजून घरात..
दुर्वाचे बाबा :- दादा.. थांब.. नंतर मनात सल नको रहायला... दुर्वा ठाऊक आहे मला की कमलाकर तुला इतका पसंत पडला नाही. पण बघ ना नेहमी आपल्याला हवं तेच मिळतं असं नाहीये ना.. त्याच्या बद्दल विचारलं माहिती काढली आहे तुझ्या काकांनी माझ्या मते तू त्याला होकार द्यावास... त्या मंडळींनी काल रात्री फोन करून त्यांचा होकार कळवला आहे. तू त्यांना पसंत पडली. आता तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे..
दुर्वा :- बाबा जर माझ्या हो म्हणण्याने जर तुम्ही जसे खुश दिसत आहात तितके नेहमी खुश राहणार तर मी तयार आहे हे लग्न करायला...
हे ऐकून तिच्या बाबांनी तिला घट्ट मिठी मारली. तिची आई तिच्याजवळ येऊन तिच्या चेहर्यावर हात फिरवून बोटं मोडली आणि बोलली, "गुणाची गं बाय माझी... बघा भाऊजी तुम्हाला सांगितले ना की दुर्वा होकारच देईल त्या मुलाला.. हे बघा म्हणून मी सकाळीच तिच्या आवडीचे मोदक करून ठेवले होते." आणि बळेबळेच तिला मोदक चारला.
गोविंद काका :- अरे थांबा थांबा.. ऐका सगळे .... पण त्या मंडळींची एक अट आहे. त्यांना लग्न लवकरात लवकर व्हायला हवे आहे. मुहूर्त पण काढला आहे त्यांनी.. पुढल्या महिन्याची ११ तारीख.. तुळशीचे लग्न संपन्न झाल्यानंतर एक दिवस सोडून मुहूर्त काढला आहे. शुभ दिवस आहे ना त्या दिवशी.... दुर्वाला खूप चांगले आशिर्वाद मिळतील. आणि त्यांच्या जास्त अपेक्षा नाहीत. मान पान नकोच. लग्न आटोपशीरच हवं आहे त्यांना.. खूप पुढारलेल्या विचारांचे आहेत माने मंडळी...
सुजल :- म्हणजे बाबा एका आठवड्यानंतरचाच मुहूर्त आहे की हो... जरा जास्तच घाई होतेय असं नाही वाटत का तुम्हाला..? एका आठवड्यात पत्रिका छापणं, खरेदी आणि बरंच काही असतं. कसं होणार आहे...
गोविंद काका :- अरे बाळा.. दोघांची कुंडली आम्ही आधीच जुळतेय का हे पाहीले. त्याच भटजी बुवांनी सांगितले की त्यांनी की दुर्वाचं आत्ता लग्न केलं नाही तर नंतरचा मुहूर्त एकदम चार पाच वर्षांनी योग्य ठरेल. तू मानत नसला तरी आम्ही कुंडली मानतो. आणि हातचं स्थळ जाता कामा नये. मी त्या मंडळींशी..
दुर्वा :- माईआत्याला ठाऊक आहे का सगळं...?
दुर्वाचे बाबा :- नाही गं.. इथून तिचा फोन पण लागत नाही नीट... थोड्या वेळाने आई गच्चीवर जाईल फोन करायला तेव्हा तिच्याशी बोलून घे...
असेच दिवस जात होते. दुर्वाही न राहवून आनंदी दिसण्याचा प्रयत्न करत होती. दुर्वा गावात आणि आत्या अमेरिकेत असल्याने तिचा फोन लागतच नव्हता. सुजल आणि घरातली सगळी मंडळी तिच्या लग्नाच्या तयारीसाठी कसोशीने मेहनत घेत होते. तिच्या मनातील चलबिचल फक्त तिच्या वहिनीला जाणवली. दुर्वाने स्वतःहून लग्नाला होकार दिला म्हणून ती पण काही करू शकत नव्हती. माईआत्या तरी काही मार्ग काढेल असे तिला राहून राहून वाटत होतं. एक दिवस तिच्या आईने फोन लावलाच माईआत्याला..
दुर्वाची आई :- वन्स.. आपल्या दुर्वाचं लग्न ठरलं हो.. पुढल्या महिन्यात अकरा तारखेला आहे. तुम्ही याल की नाही लग्नाला.. नाही म्हटलं तुमची सूनबाई आत्ताच बाळंत झाली आहे. सहा महिने तरी तिथेच थांबावं लागेल ना तुम्हाला...
माईआत्या :- अरे इतक्या लवकर... कशाची घाई आहे तुम्हाला.. दुर्वा आत्ता फक्त एकवीस पूर्ण झाली आहे. आणि काय हो राघवच्या घरच्यांनी बरं इतक्या लवकर मुलाच्या लग्नाचा घाट घातला.
दुर्वाची आई :- इथे राघव कुठे आला मध्येच... तिचं लग्न चांगल्या तालेवार घराण्यात देतोय तिला.. सारंग मोन्यांचा एकुलता एक मुलगा कमलाकर...
माईआत्या :- काय.. तो सारंग मोने..आणि कालिंदी मोने यांचा मुलगा.. तो रत्नागिरीकडे असतो तोच ना...
दुर्वाची आई :- हो वन्स.. तोच..
माईआत्या :- त्याच्याबद्दल तर मी माझ्या नंदेकडून वेगळे काही ऐकले होते एकदा.. नीट तपास केला आहे ना तुम्ही...?
दुर्वाची आई :- हो तर.. त्याशिवाय का आम्ही इतकी घाई करतोय. हीचं लग्न झालं की एक कटकट मिटली आमची..
माईआत्या :- कसली कटकट गं वहिनी.. दुर्वासारख्या नक्षत्रासारखी पोर पोटी आली तुझ्या आणि तू तिला कटकट बोलते...
दुर्वाची आई :- छे हो वन्स.. मी दुर्वाला कुठे बोलले. मी तर या सगळ्या परिस्थितीला बोलले. पण आता कसं सुरळीत चालू आहे. एकदा हिचं लग्न झालं की आम्ही शांत होऊ.
माईआत्या :- बरं जाऊद्या... दुर्वा कुठे आहे..? तिला फोन दे . लेकराचा आवाज ऐकला नाही की कसंतरी होतं मला..
दुर्वाची आई :- हो हो देते की फोन तुमच्या लेकीला.. तसंही तिला आई बापापेक्षा तुमचाच जास्त लळा आहे.. लहानपणी तरी आई आई करायची आता तर नुसती आत्याच हवी तिला..
इतक्यात दुर्वा गच्चीवर येते तर तिची आई तिच्याजवळ फोन देत खाली निघून जाते...
दुर्वा :- हॅलो आत्या... कशी आहेस गं..? मला तुझी खूप आठवण येतेय. काकांची पण.. आपण तिघे कसे छान राहत होतो मुंबईला.. विचारणं चुकीचं वाटतंय पण तरी तू येशील का माझ्या लग्नाला..?
माईआत्या :- ठाऊक नाही बेटा.. पण तू खुश आहेस ना. या लग्नाला तुझा मनापासून होकार आहे ना..? की आई बाबा म्हणतात म्हणून तू होकार देत आहेस. बघ आयुष्य तुला घालवायचं आहे. तू सर्वस्वी स्वतःचा निर्णय घे.
दुर्वा(दीर्घ श्वास घेऊन ) :- आत्तू मी आहे तयार लग्नाला..
माईआत्या :- राघवला विसरलीस इतक्या लवकर..
दुर्वा :- आपण मागचं मागे सोडून पुढे जायलाच हवं ना आता.. तसं म्हणायला गेलं तर पहिलं प्रेम कधी विसरता येणं शक्य नाही गं...
इतक्यात पलिकडून आवाज येतो, "का नाही विसरता येत.." वळून बघते तर तिचे हाताची घडी बाबा उभे होते. इकडे आत्याला सगळा आवाज ऐकू येतो. दुर्वा मान खाली घालून उभी होती आणि तिचे बाबा तिच्या जवळ येऊन उभे राहिले.
दुर्वाचे बाबा :- कोणाशी बोलत आहेस फोनवर...
दुर्वा (चाचपडत) :- माईआत्या आहे फोनवर...
दुर्वाचे बाबा :- खोटं बोलू नकोस माझ्याशी...
आणि तिच्याकडून फोन हिसकावून घेतला.
दुर्वाचे बाबा :- हॅलो कोण...
माईआत्या :- अरे दादा मीच आहे माई... तू पोरीला इतक्या जोरात का ओरडला..
दुर्वाचे बाबा :- काही नाही गैरसमज झाला होता. तू ये ना तिच्या लग्नाला. शोभना बोलली की तुला शक्य नाही म्हणून..
माईआत्या :- मी कुठं काय बोलली. वहिनीच बोलली की सुनबाईकडे लक्ष दे म्हणून.. आलो नाही तरी हरकत नाही..
दुर्वाचे बाबा :- हो... हो... तिचं पण बरोबर आहे की.. इतका खर्च करून इतक्या लांब येशील तर तुझीच दगदग होईल. नंतर पुन्हा आली नाही की तुला परतीचे वेध लागतील. तुला काही जबरदस्ती करत नाही मी.. पण ये जमल्यास लग्नाला. दुर्वाला आवडेल...
दुर्वाचे बाबा फोन तिच्याकडे देऊन खाली निघून गेले. असेच दिवस सरत होते आणि लग्नाची तारीख जवळ येत होती. घरातील अंगणच पानाफुलांनी सजवून मांडव उभारला होता.. त्या दुर्वाची हळद होती. सगळीकडे नुसती लगबग सुरू होती.आधीच पिवळसर खोली असलेली दुर्वा हळदीच्या अंगाने आणखीनच सुंदर दिसत होती. दरम्यान दुर्वाने कमलाकरशी संपर्क साधाण्याचा प्रयत्न केला होता पण तो तिच्या मेसेज किंवा काॅलला अजिबात प्रतिसाद देत नव्हता. लग्नाच्या दिवशी सकाळी साखरपुडा आणि दुपारचा लग्नाचा मुहूर्त ठरवला होता... तिच्या लग्नासाठी सुप्रिया पण देवगडला आली होती. सोबतीला तिची सख्खी मावस बहीण कृपा पण आली होती. कृपा पण कोकणातच राहत होती. जशी सुप्रिया आणि दुर्वा घट्ट मैत्रिणी होत्या तशा चैताली आणि कृपा पण मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच काॅलेजमध्ये शिकत होत्या. कृपा दुर्वाच्या लग्नात आल्यापासून पूर्ण घरभर मजा करत होती. सगळ्यांना कामात मदत करत होती. दुर्वा तिच्या खोलीत तयारी झोपण्याची तयारी करत होती तोच कृपाने तिला मागून घट्ट पकडले. चैताली तिला असेच करायची म्हणून दुर्वाला काही क्षण चैताली आहे असेच वाटले.
दुर्वा :- नाही हं चैतू.. आज गप्पा मारायला नको. सुजल दादा ओरडेल. उद्या सकाळी लवकर उठून पुजा करायची आहे मला..
कृपा :- ताई.. मी चैतू नाही कृपा आहे. आणि काय गं आजचा दिवस तरी गप्पा मारू ना प्लीज...
दुर्वा :- नको गं.. झोप चल आज माझ्यासोबतच तू.. चैतू जाईल काकूकडे झोपायला..
कृपा :- पण एक अट आहे. तू आत्ताच मला भावोजींचा फोटो दाखव. कोणीच मला दाखवला नाही.
दुर्वा :- ओके. हे बघ..
असे म्हणून दुर्वा कपाटातून कमलाकरचा फोटो काढून तिच्यासमोर धरते... कृपा काही क्षण स्तब्ध उभी राहते.
कृपा :- ताई या माणसाशी लग्न करायला चाललीस तू.. हाच ना तो मोने.. तुला ठाऊक तरी आहे का या माणसाबद्दल...
दुर्वा :- असं काय बडबडत आहेस कृपा तू...? नीट काय झालं ते सांग मला...
कृपाने तिला सगळं काही सविस्तर सांगितले तशी ती मटकन खाली बसली आणि डोक्याला हात लावून रडायला लागली.
कृपा :- ताई... हळदच झाली ना फक्त.. उद्याचा दिवस आहे हातात. लग्न परवा आहे. मी काही करू शकत नाही पण तुझं भविष्य तुझ्या हातात आहे.
दुर्वा :-( डोळे पुसत ) मी काहीतरी ठरवलं आहे कृपा.. आता मी डगमगणार नाही. थॅन्क तू की तू वेळीच सावध केलंस मला...
कृपा :- तू नेमकं काय करणार आहेस पण...
दुर्वा :- कळेलच लवकर...
क्रमशः