( मागल्या भागात आपण पाहिले की दुर्वाचे आई बाबा आणि काका तिच्या लग्नासाठी घाई करत होते. गेले काही दिवस आई वडिल्यांच्या वागण्यातला कोरडेपणा तिला जाणवत होता. पण तरीही ती मूक साक्षीदार म्हणून सगळं सहन करत होती. तिला मुळीच लवकर लग्न करण्याची इच्छा नव्हती. ) आता पुढे
दुसरं्या दिवशी सकाळी सकाळी दुर्वाची आई तिला उठवायला म्हणून खोलीत येते.
दुर्वाची आई :- दुर्वा उठ पटकन.... मोन्यांकडची मंडळी पोचतील लवकर.. रोज पहाटे रियाजाला उठणारी तू आज अजुनही झोपली आहेस. उठ पटकन..
दुर्वा :- आई काय घाई झाली गं तुला आणि बाबांना माझ्या लग्नाची.. मला माझं करिअर घडवायचं आहे. माझी मेहनत बघता मला सहा महिन्यात आरामात प्रमोशन मिळू शकते.. तेही कुणाच्या वशिल्याशिवाय... असं काय करता तुम्ही? मी तर तुमची सख्खी एकुलती एक मुलगी आहे ना..
तिच्या भाबड्या प्रश्नाने तिची आई एकवार वळून तिच्याकडे बघते. तिच्याजवळ येऊन एकवार डोक्यावर हात फिरवणार इतक्यात बाहेरून तिच्या बाबांचा आवाज आला, "शोभना माझं पाकीट कुठे आहे गं??"
दुर्वाची आई :- ही घे साडी नेसून तयार हो. लवकर बाहेर ये. स्वयंपाक घरात मदत करायला.
दुर्वा :- आई तू आज जीव लावायला पण का चाचरत आहेस गं?? काही टेन्शन आहे का?
दुर्वाची आई :- जास्त विचारू नकोस आणि आवर पटकन...
दुर्वाची आई कामासाठी निघून गेली. इकडे दुर्वा साडी नेसून तयार होते. मनातलं दुःख लपवण्याचा ती प्रयत्न करत होती. पण आई बाबा म्हणतील ती पूर्व दिशा समजून ती आज आलेलं स्थळ बघायला तयार झाली. मोने मंडळी येण्यासाठी खूप सवड होती म्हणून ती खोलीतच बसून राहिली. तिने आज स्वयंपाकघरात जायचे प्रकर्षाने टाळले होते. खोलीचे दार बंद केलं तरी बाहेरची लगबग तिच्या कानावर येत होती. एकवार राघवला फोन करूया असेही तिच्या मनात आले पण तिने तिच्या भावनांना आवर घातला. नकळत तिचे डोळे भरून आले. डोळ्यातले अश्रू पुसत असताना तिला सुप्रियाचा फोन आला.
सुप्रिया :- अगं आहेस कुठे..? मी उद्या मावशीकडे येतेय हडपसरला... तू कुठे राहतेस ? स्वारगेट कडे ना? ये ना मला भेटायला...! काकू राघवशी नाही पण माझ्याशी तर बोलू देतात ना तुला..?
दुर्वा (रडतच) :- अगं आज मला बघायला पाहुणे येत आहेत. काकांनी त्यांच्या ओळखीचं एक स्थळ आणले आहे. मला त्या मुलाला बघायची अजिबात इच्छा नाही. पण मी आई बाबांपुढे हतबल झालेय गं. एक अवनी वहिनी सोडली तर कोणीच माझ्या बाजूने नाहीत. माईआत्या तिकडे कॅलिफोर्नियात आहे. काय करू समजत नाही.
सुप्रिया :- काळजी नको करूस. आले तर भेटून घे त्यांना.. तुला जर पटलं नाही तर दे नकार.. तुझ्या मर्जीविरुद्ध थोडीच ते लग्न लावून देतील तुझं...? तू राघवबद्दल समजावून सांग ना त्यांना...! गैरसमज दूर कर त्यांचा...
दुर्वा :- अगं बाबांना राघवचे नाव घेतले तरी सहन होत नाही. त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी माझ्यावर आवाज वाढवला. एकतर त्यांना बीपीचा त्रास आहे.
दुर्वा सुप्रियाशी बोलत असताना सुजल खोलीबाहेर टकटक करत असतो.
दुर्वा :- चल बाय सुप्रिया.. नंतर बोलू. दादा बोलवतोय..
दरवाजा उघडला तर दादा बाहेरच उभा होता. दुर्वाचे गाल ओढून तिला बोलला, "चल दुर्वा...! मंडळी आलीत."
सुजल त्याच्या लाडक्या बहिणीला घेऊन दिवाणखान्यात येतो. आईने दिलेल्या निळ्या रंगाच्या साडीत तिची पिवळसर गोरी कांती अजुनच खुलून दिसत होती. नेहमीप्रमाणे तिच्या चेहर्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता. तरीही तिचं रूप नक्षत्रासारखं खुलून दिसत होतं. सगळे जण तिला बघत होते. तिची नजर मात्र खाली जमिनीकडे खिळून होती.
गोविंद काका :- हा माझा मुलगा सुजल गोविंदराव जोशी. आणि ही त्याच्यासोबत आहे ती दुर्वा..!
मुलाकडील एक माणूस :- अरे आजवर आम्हाला वाटत होते की सुजल गजाननरावांचा मुलगा आहे म्हणून.. आणि दुर्वा धाकटी...! तो इथे नव्हता ना.
गोविंदकाका :- अहो सुजल माझाच मुलगा. पण कसं आहे माझ्या गजूला मुलगा नाही. आता माझा मुलगा त्याचाही मुलगाच ना... ही एकटीच आहे दुर्वा... दुर्वा गजानन जोशी.. ! गजाननाची मुलगी... ही डावीकडे माझी मुलगी चैताली. धाकटी आहे पण कशी घरंदाज आहे. वागणं बोलणं एकदम शिस्तबद्ध.. माझ्या शब्दाबाहेर नाही. आता काॅमर्सच्या शेवटच्या वर्षाला आहे.
मुलाकडील एक माणूस :- चैतालीला दाखवताय का??
गोविंदकाका (चमकून ) :- छे...! छे...! माझी चैताली नाही.. ही दुर्वा.. हिच्यासाठी तुमच्या मुलाला आम्ही बघतोय.
मुलाकडील एक माणूस :- मग तिच्याबद्दल काही सांगा ना...!
गोविंदकाका :- हो. हो. अरे गजू सांग ना तूच आता.
दुर्वाचे बाबा :- ही माझी बायको शोभा आणि ही आमची मुलगी आहे दुर्वा. नुकतीच इंजिनियर झाली आहे. अभ्यासात आणि स्वयंपाकात अतिशय निपुण आहे. पुण्यात नोकरी करतेय सध्या...! गाणंही शिकतेय. काही महिन्यात विशारदही पूर्ण होईल.
मुलाचे बाबा :- अरे वाह.. हुशार आहे म्हणजे पोरगी. हा माझा मुलगा कमलाकर सारंग माने..... ही त्याची आई कालिंदी... गावची शेती बघतो आणि मत्स्यपालनाचा व्यवसाय उभा करण्याची इच्छा आहे त्याची. तशा मला दोन मुली पण आहेत. मोठी सावित्री आत्ताच बाळंत झाली म्हणून येऊ शकली नाही. आणि ही छोटी नेत्रा. मागच्याच वर्षी हिचं लग्न झालं. आमचं घर एकदम भरलेलं आहे बघा... तुमच्या मुलीला नोकरी करण्याची गरजच नाही बघा..
दुर्वा एकवार नजर उचलून त्या मुलाकडे बघते. किंचित निमगोरा.. तेल लावून भांग पाडलेले केस.. साधा पण ब्रॅन्डेड शर्ट घालून बसला होता. त्या मुलाचे डोळे लालभडक दिसत होते. आणि ओठही किंचित वेगळे वाटत होते. पण सगळ्यांसमोर म्हणून ती शांतच बसून राहिली.
सगळी मंडळी एकमेकांशी गप्पा मारत होती. कमलाकर कितीतरी वेळ दुर्वाला रागातच न्याहाळत बसला होता. त्याची नजर दुर्वाला अतिशय असह्य करत होती. ती एकवार त्याच्याकडे आणि आईकडे बघत होती. पण आई आपल्याच धुंदीत होती. इतक्यात कमलाकरची धाकटी बहीण नेत्रा अचानक उभी राहीली.
कमलाकरचे बाबा :- नेत्रा.. बेटा काय झाले..? अशी उभी का राहीलीस...? तुला ही दुर्वा आवडली नाही का??
नेत्रा :- तसं काही नाही बाबा..! दुर्वा खूप गोड दिसतेय. पण आत्ताच तिचे बाबा बोलले की ही गाणं शिकतेय. आम्हालाही ऐकू देत हिचा आवाज..
दुर्वाचे बाबा :- हो तर.. दुर्वा गायिल की गाणं...! बेटा गाऊन दाखव.
दुर्वा :- पण बाबा आत्ता..
गोविंदकाका :- काय हरकत आहे....! इतकी काय साहेबीन आहेस का तू..? म्हण की गाणं..
दुर्वा :- ठिक आहे..
आणि ती गायला सुरूवात करते...
दैवजात दुःखें भरतां
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
पूर्ण गाणं होताच सगळ्यांनी तिचे कौतुक केले. लग्नाची पुढची बोलणी सुरू होणार इतक्यात अवनी त्यांना अडवते.
अवनी :- एक मिनिट..! मला असे वाटते की कमलाकर आणि दुर्वा ताई या दोघांनी एकट्यात बोलावे.
नेत्रा :- हो ना.. केव्हाचे आपण सगळे बोलत आहोत.. त्या दोघांना पण बोलू द्या..
दुर्वा आणि कमलाकर दोघेही बाहेर अंगणात येतात. कमलाकर काही बोलणार इतक्यात दुर्वा बोलू लागते,"हे बघा.. मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न..! माझं एका वेगळ्या मुलावर प्रेम आहे.." आणि सगळी हकीकत सांगितली.
यावर कमलाकरने "ओके" अशी प्रतिक्रिया दिली आणि दोघेही घरात येतात. घरात आल्यावर कमलाकर त्याच्या बाबांजवळ जाऊन हळूहळू आवाजात कुजबुज करतो.
कमलाकरचे बाबा :- आम्ही आमचा निर्णय काही दिवसांनी कळवतो. आता खूप उशिर झाला आहे. चला..
गोविंदकाका :- आमच्याकडून तर होकारच समजा तुम्ही..
कमलाकरचे बाबा :- ठीक आहे.. अच्छा..
असे म्हणून कमलाकर आणि त्याच्या घरची मंडळी जोश्यांचा निरोप घेतात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा