( सर्वप्रथम सगळ्यांना खूप म्हणजे खूपच खूप साॅरी.. आपल्या कथेचा हा भाग ही मी अतिच उशिरा प्रकाशित करत आहे. पण मला माहित आहे तुम्ही सगळे माझे फ्रेन्ड्स आहात ना...! मागला भाग खूप छोटा होता.. त्यासाठी खूप साॅरी.. पण तुम्ही गोष्ट वाचत आहात हे वाचून मला खूप छान वाटतेय. मागल्या भागात आपण पाहिले की दुर्वाचे आई बाबा आणि मोठा भाऊ तिच्याशी जरा तुटकच वागत होते. दुर्वाची इच्छा नसुनही काकांनी तिच्यासाठी एक स्थळ आणले. तिला बिचारीला काही विरोध करताच आला नाही. डोळ्यात पाणी साठवून ती देवगडची वाट धरते. ) आता पुढे....
दुर्वाची आई :- बघा.. ही महाराणी अजून झोपली आहे. सुजल उठव तिला. मी गाडीतून सामान बाहेर काढते.
सुजल :- दुर्वा उठ.. आलं देवगड..
सुजलचा आवाज ऐकून दुर्वा जागी होते. बाहेर सगळे नातेवाईक तिची वाट बघत होते. ती उठल्यावर सुजल गाडीतून सामान काढायला मदत करत असतो. ती आपली मान खाली घालून चालत असते. इतक्यात एक मुलगी धावतच तिच्यापाशी येऊन तिला घट्ट मिठी मारते.
दुर्वा :- चैतू...! कशी आहेस?? आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे?
चैताली :- मी मस्त आहे गं परी.. तू किती छान कुर्ता घातला आहेस गं.. काका किती मोकळ्या विचारांचे आहेत. माझे बाबा तर मला असे कपडे घालूच देत नाहीत.
दुर्वा :- अगं.. तुझा सलवार तर खूप सुंदर आहे. मला देशील एकदा घालायला??
इतक्यात मागून गोविंद काका येतात. त्यांना चैतालीने दुर्वाशी गप्पा मारलेलं पहिल्यापासूनच आवडत नव्हते. त्यांनी नजरेने खुणावून चैतालीला आत जाण्यास सांगितले. दुर्वा चैतालीपेक्षा अभ्यासात, कामात हुशार होतीच वरून दिसायला चैतालीपेक्षा उजवी आणि गोड गळ्याची पण होती. ती जेव्हा देवगडला यायची तेव्हा सगळे तिचे कौतुक करत होते. तिचा लाघवी आणि बडबडा स्वभाव सगळ्यांच्या मनावर भुरळ घातल होता. गोविंद काका मात्र नेहमी तिचा हेवा करत आणि तिटकाराही करत.. सगळे तिला लाडाने परी म्हणून हाक मारत याचाही त्यांना त्रास होत असे. पण तरीही आपल्या भावाची मुलगी म्हणून सगळ्या मुलांसारखे तिलाही जीव लावायचे.
इतक्यात तिची वहिनी अवनी तिच्याजवळ येते. तिचा हात घट्ट हातात घेऊन हळूवार कुरवाळले.
अवनी :- दुर्वा ताई..! टेन्शन नको घेऊस.. तुझा काहीही निर्णय असेल तो मला मान्य आहे. कोणीही तुझ्या पाठीशी नसलं तरी मी आहे तुझ्या पाठीशी...! चल आत ये. फ्रेश हो लवकर. तुझी आवडती फिल्टर काॅफी करते मी.
दुर्वा :- वहिनी..! एकटी तू कशी करशील..? इतके जण आहेत घरात आता...! मी करेल ना तुला मदत.
अवनी :- काही गरज नाही. मी मोठी आहे. माझं ऐकायचं... मस्तपैकी अंघोळ कर आणि ये काॅफी घ्यायला.
दिवाळीसाठी सगळे जण घरात गोळा झाले होते. अख्खी पडवी गप्पागोष्टी आणि हास्याने गजबजून गेली होती. दुर्वा आवरून त्यांच्यासोबत जाऊन बसते. तिच्या वहिनीची तिला परिपूर्ण साथ होती; म्हणून ती पूर्ण दिवाळी आनंदात साजरी करणार अशी खूणगाठ मनाशी बांधते. तिची वहिनी गरम काॅफीचा मग तिच्या हातात देऊन किचनमध्ये येते. दोन दिवसांनी दिवाळी असते म्हणून घरातल्या सगळ्या बायका आणि सुना फराळ बनवायला लागल्या होत्या. लगोलग चैताली आणि दुर्वा स्वयंपाकघरात येतात. दुर्वा पळतच जाऊन आईच्या हातातून लाटणं घेते आणि स्वतः शंकरपाळीचं पीठ लाटायला सुरूवात करते.
दुर्वा :- आई तुला किती वेळा सांगितलं मी.. की शंकरपाळे मीच बनवणार.. तू जाऊन आराम कर. तू गाडीत माझ्या आणि वहिनीच्या मध्ये बसली होतीस. आमच्या वजनाने तुझे खांदे दुखतील बरं.. जाऊन बस थोडा वेळ.
तिच्या अशा बोलण्याने सगळ्या बायका तिच्याकडे कौतुकाने बघत होत्या. इतक्यात एक करडा आवाज सगळ्याना ऐकू आला, "फक्त हसायला येतं का? मोठ्या काकूचा काही मान आहे की नाही..?" दुर्वा वळून बघते तो गोविंद काकांची बायको तिची काकू मैथिली कमरेवर हात ठेवून उभी होती. दूर्वा जाऊन तिच्या पाया पडते. काकू क्षणाचाही विलंब न करता तिच्या हातात पाचशे रुपये ठेवते आणि आशिर्वाद देते, "शतायुषी हो..!"
दुर्वा (तिला घट्ट मिठी मारत ) :- काकू तू फक्त दहा सेकंद कवागू शकते. त्यापेक्षा जास्त नाही.
मैथिली काकू :- कसं आहे माझं कोकरू..?
दुर्वा :- मस्त आहे मी. तू कशी आहेस?
मैथिली काकू :- मी बरी आहे गं.. पण तुझ्या आवाजात असा कोरडेपणा का आहे..? मनात जे आहे ते बोल माझ्याजवळ..! तुला अशी शांत आणि उदास कधी बघितलं नाहीये मी..!
दुर्वा (चाचरत) :- अगं आपण सगळे इथे आहोत. माईआत्या आणि काका नाहीत. चार वर्षं त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. ते माझ्या आवडीचं सगळं करायचे. सकाळपासून दोनदा फोन केला, पण लागतच नाहीये.
दुर्वाची आई :- चार वर्षांचं आठवतंय. नेहमी तर आमच्यासोबत करतेस ना साजरी दिवाळी..!
मैथिली काकू :- शोभने... काय चाललंय तुमचं..? दिवाळी आहे. आनंदात राहण्याच्या प्रयत्न कर. पोरींनो..! जा बाहेर. आता आम्ही जावा स्वयंपाक करतो. तुमच्या फराळाचा गोंधळ नंतर घाला. दुर्वा तुझं उलथनं दे माझ्याकडे..
दुर्वा :- काकू ते उलथनं नाही.
मैथिली काकू :- हो ठाऊक आहे. पलटी मास्टर. ते दे आणि जा पळ आता. अवनी आणि चैतू तुम्ही पण जा.
दोघी जावा आणि घरात काम करणारी सखुमावशी तिघी मिळून जेवणाचा बेत करतात. त्यांच्या हातचं रूचकर असं अस्सल कोकणी जेवण करून तृप्तीचा ढेकर देतात. इकडे सगळ्या जणी राहीलेला फराळ बनवत असतात. गावात असल्याने शेजारच्या बायकाही त्यांना मदत करायला आल्या होत्या. जेवणानंतर तब्बल दोन तासांच्या मेहनतीला यश मिळाले आणि सगळा फराळ तयार झाला. शेजारची चिंगी पळतच अंगणात येते आणि जोरात बोलते, "सगळ्या जणांनी ऐका. दिवाळीचा सगळा खाऊ तयार झाला. " आणि हातातली लाडू खात नाचत होती.
सुजल :- चिंगी.. मला पण लाडू हवाय. दे ना मला.
चिंगी :- नाही दादा. आज फक्त मलाच. उद्यापासून तुम्हाला. दिवाळीचा नैवेद्य तरी होऊ दे. नाही तर आधीच खाल्लं तर बाप्पा पनिश करतो.
सुजल :- मग बाप्पा तुला पनिश करेल आता..
चिंगी :- बाप्पा लहान मुलांचा फ्रेन्ड आहे. तो मला पनिश नाही करणार.
इतक्यात दुर्वा बाहेर आली. तिथे तिचे लांबचे चुलत काका बसले होते. त्यांनी खुणावत तिला त्यांच्यापाशी बोलावले.
काका :- कशी आहेस बाळा..?
दुर्वा :- मी मस्त आहे काका..! तुम्ही कसे आहात?
काका :- मी मस्त आहे गं..! पण तू आमची दुर्वा नाहीस, जी आधी वाटायची. चार वर्ष काय आत्याकडे राहीलीस. आम्हाला विसरलीस. इकडे आलीच नाहीस सुट्टीत.
दुर्वा :- असे काही नाही काका..!अहो, मी इंजिनियरिंगेला होते ना. आम्हाला सुट्टीच नसते मुळात. पण आता आली ना मी. आता मी खूप धमाल करेल.
दुर्वा जरी वरकरणी शांत आणि आनंदी वाटत होती, पण मनात विचारांचे काहूर माजले होते. राघवची राहून राहून आठवण येत होती. सगळे जण गप्पा मारत असताना तिने मात्र शांतच बसणे पसंत केले. शेजारची आणि घरातील सगळी लहान मुले अवनी वहिनीभोवती गराडा घालून बसली होती. अवनी त्यांना सिंड्रेलाची गोष्ट सांगत होती. इतक्यात अवनी वहिनी उभी राहून बोलली, "बरं ऐका सगळे जण..! आता आपल्याला दुर्वा ताई गाणं म्हणून दाखवणार आहे."
दुर्वा :- वहिनी मुड नाहीये गं. नंतर कधीतरी.
दुर्वाचे बाबा :- म्हण की गाणं..! सगळ्यांना ऐकायचं आहे.
सगळी मुले "दुर्वा ताई गाणं" म्हणून जोरजोरात ओरडायला लागली.
दुर्वा :- थांबा थांबा सगळे..! मी गाणं गायला तयार आहे पण माझी एक अट आहे. अवनी वहिनी तू मला पेटीवर साथ दे.
अवनी :- ताई..! मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला साथ द्यायला तयार आहे.
अवनीने पेटीवर सराईतपणे बोट फिरवले आणि दुर्वाने गाणे गायला सुरूवात केली...
कंठातच रुतल्या ताना,
कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा, जा, जा, जा,
घेउनि या मोहना
कदंब फांद्यावरी बांधिला,
पुष्पपल्लव गंधित झोला कसा झुलावा,
परि हा निश्चल, कुंजविहारीविना
वृक्षांची, कुजबुज सरली
झणि पक्ष्यांचीओळखिचे स्वर
कानि न येता, थबके ही यमुना
मुरलीधर तो नसता जवळी,
सप्तस्वरांची मैफल कुठली ?
रासक्रिडेची स्वप्ने विरली, एका कृष्णाविना
तिचे गाणे पूर्ण होताच दुर्वाने तिचे आपसूक मिटलेले डोळे उघडले तर सगळे जण अजुनही तिच्या गाण्यात गुंतले होते.
चैताली :- दुर्वा...! किती छान गातेस गं...! मला मुळी येणारच नाही जायला असं..!
गोविंद काका :- आपल्या घरात आजवर कोणी गायलं
नाही. फक्त हीच..
गोविंद काका बोलल्यावाचून राहिलेच नाहीत.
सुजल :- अहो काका..! दुर्वाने गाण्याची मुहूर्तमेड रोवली जोशी घराण्यात. असे सारखे टोमणे का मारत असता तुम्ही तिला..?
हे ऐकूनच गोविंद काका गुश्यात त्यांच्या खोलीत जातात.
दुर्वाचे बाबा :- सुजल गप्प बसायला काय होतं तुला...!
सुजल :- जाऊदे...! इथे काही बोलण्यात तथ्यच नाहीये. अवनी मला ही पाण्याची बाटली भरून दे. मी गच्चीवर झोपतोय.
असेच दिवस जात होते. जोश्यांच्या घरात दिवाळी आणि भाऊबीज धुमधडाक्यात साजरी झाली होती. भाबड्या दुर्वाला वाटत होते की तिच्या लग्नाचा विषय सगळे जण विसरले असतील. ती निश्चिंतपणे घरात वावरत होती. भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी दुर्वा सगळ्यांना चहा देत होती.
गोविंद काका :- अनायासे दुर्वा इथेच आहे. मुलाकडच्या मंडळींना उद्या बोलावतोय मी...!
दुर्वा :- काका..! तुम्हाला इतकी काय घाई झाली आहे माझ्या लग्नाची...?
तिचा आवेश बघून दुर्वाच्या आईने तिला स्वयंपाकघरात जायला सांगितले. इकडे दुर्वा स्वयंपाकघरात येऊन ढसाढसा रडायला लागली. इतक्यात तिची वहिनीने तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि हळू आवाजात कुजबुजली, "येऊ दे त्या मुलाला...! तुला पसंत नसेल तर नको करूस लग्न...! मी आहे ना तुझ्या पाठीशी...!"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा