मेरे लिए तुम काफी हो.. (भाग - 25)

Raghav Is Happy For Shrutika And Her Boyfriend


वाचक देवो भवं
(मागल्या भागात आपण पहिले कि राघवच्या साखरपुड्यात सगळे पाहुणे राघवला बघून कुजबुज करत होते. राघव चे आई बाबा संभ्रमात होते. कि लोकं असे का वागत आहेत. दुसरीकडे सुप्रिया राघववर खूप चिडली होती. आता याचे कारण कळेल आपल्याला पूर्णपणे.. साखरपुडा कार्यक्रमात अंगठी घालण्याच्या वेळी नेमेके कोण आले आणि थांबावले हेच जाणून घ्यायचे आहे ना तुम्हाला..? कळेल कि.. एक मात्र मला खूप आवडले कि माझे सगळे वाचक फ्रेंड किती इंटेलिजन्ट आहेत.. I am proud of u all... साखरपुडा थांबवणारी व्यक्ती कोण यावर किती तर्क लावलेत तुम्ही.. कोणी बोलले कि दीपक काका आलेत, कोणी बोलले गोविंद काका म्हणजे आपल्या कथेचे व्हिलन...तर कितीतरी जण बोलले कि दस्तरखूद्द दुर्वा परत आली कि काय, तिच्या राघव वरील प्रेमाखातर.. अहो पण कितीही काहीही झाले ती आपल्या स्टोरी ची हेरॉईन आहे. इतक्या सहजा सहजी कशी ऐकणार...? इथे बिचाऱ्या राघवचा साखरपुडा थांबलाय.. ) आता पुढे...

राघवने श्रुतिकाचा हात हातात घेऊन अंगठी घालणार इतक्यात मागून आवाज आला. थांबा...! हा साखरपुडा नाही होणार.. ही शुद्ध फसवणूक आहे.

हा आवाज ऐकून सगळे वळून बघतात.. ती बोलणारी व्यक्ती बघून सगळे आवाक झाले.. पाहुण्यांमध्ये बसलेले दीपक काका पण त्या व्यक्तीला बघून आवाक झाले. सोबतीला त्यांचा मोठा मुलगा गौरव होता. दोघांची एकमेकांना नजरनजर झाली पण ती व्यक्ती तडक राघवपाशी गेले..

साखरपुडा थांबावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दुर्वाचे बाबा होते.. तेच.. गजानन जोशी..

राघव पहिले संभ्रमात होता. त्याला आवाज तर ओळखीचाच वाटत होता पण चेहरा काही आठवत नव्हता..

राघवचे बाबा :- अहो.. असे काय बोलत आहात तुम्ही..? तुम्ही आहात कोण माझ्या मुलाचा साखरपुडा थांबावणारे..

राघव :- डॅड... हे दुर्वाचे बाबा आहेत.. मि.गजानन जोशी...!

राघवचे बाबा :- काय... खरंच..

गजानन :- हो मीच तिचा बाप आहे. हा साखरपुडा थांबवा. हा खूप मोठा अनर्थ होईल.. मी हात जोडतो तुमचे..

सुप्रिया :- हो काका.. हे दुर्वा चे बाबा आहेत.. गजू काका.. आणि  तुमच्यापासून आणि काकूंपासून एक गोष्ट लपवली जात होती.. ती म्हणजे....(ती राघवकडे बघू लागली..)

राघवची आई :- प्रियु बाळ.. सांग. काहीही लपवू नकोस.. राघव तुला काही बोलणार नाही..

सुप्रिया :- काकू... मला पण इथेच आल्यावर कळले कि राघवची सोयरिक  इथे जुळली आहे. नाहीतर मी आलेच नसते ह्या साखरपुड्यात (आणि रागाचा कटाक्ष टाकत राघवकडे बघते..)

राघवचे बाबा :- काय आहे ते नीट सांगशील का आता..? हा राघव तर सांगण्यापासून राहिला.. बोल बाळा..

सुप्रिया :- काका काकू तुम्हाला असे वाटतेय ना कि मुलीकडचे पाहुणे राघवला बघून कुजबुज करत आहेत तर ऐका.. हे आपल्या दुर्वाचे नातेवाईक आहेत..

राघवची आई :- काहीही काय बोलतेस.. मान्य आहे कि दुर्वा पण कोकणातील आहे आणि श्रुतिका पण.. त्यावरून ते नातेवाईक कसे होतील...

सुप्रिया :- हो काकू.. खरंच बोलतेय मी.. दुर्वा आणि मी तिसऱ्या इयत्तेत होतो तेव्हापासून मैत्रिणी आहोत.. त्यात माझ्या मावशीचे गाव देवगड आहे. मी दुर्वाच्या आई कडच्या आणि बाबांकडच्या पाहुण्यांना चांगलीच ओळखते.

राघवची आई :- अरे देवा..

सुप्रिया :- इतकेच नाही काकू.. ही श्रुतिका दुर्वाची बहीण आहे.. मावस बहीण.. ही श्रुतिकाची आई म्हणजे शीतल मावशी आहेत. शोभना काकूंची सक्खी लहान बहीण.. वैभववाडीला असतात ह्या.. आणि हे त्यांचे मिस्टर पुरुषोत्तम कालेकर...

राघवची मामी :- पण यांनी तर मला सांगितले की यांनी मला सांगितले कि यांची बहीण देवगडला आहे. इथे त्यांच्या बहिणीची जाऊबाई आहे.. जावेच्याच घरात राहत आहेत म्हणून..

सुप्रिया :- हो मामी हे सगळे आपल्याला आणि राघवला फसवत आहेत.. या लोकांना दुरु आणि राघव एकत्र यावेत असे अजिबात वाटत नव्हते.. (बोट दाखवून ) कावेरी काकू हेच ते गोविंद काका ज्यांनी राघवला आणि दुर्वाला खूप त्रास दिला. आणि आता श्रुतिकाचे लग्न लावून देत आहेत राघवसोबत.. आणि ह्या शोभना काकू श्रुतिकाची सख्खी मावशी आहे. आणि दुर्वाची आई..

गोविंद काका(खेकसत ):- आमची मर्जी आम्ही काहीही करू.. तू कोण मध्ये बोलणारी...

राघव :- मि. गोविंद जोशी आवाज खाली ठेवा. ती मानस बहीण आहे माझी...

दुर्वाचे बाबा :- राघव बेटा.. माफ कर मला.. मी त्या दिवशी तुला खूप मारले.. पण प्लीज हा साखरपुडा नको करुस.. मी हात जोडतो तुझ्यापुढे..

राघवचे बाबा :- तुम्हाला काय वाटते.. आम्ही तुमचे बांधील आहोत..? आम्ही काहीही करू.. आमची मर्जी..

दुर्वाचे बाबा :- अहो ऐकून तरी घ्या माझं...!

राघवची आई :- तुमचं काय म्हणणं आहे..? आम्ही तुमच्या दुर्वाशी आमच्या मुलाचं लग्न लावून द्यायचे का..?

दुर्वाचे बाबा :- नाही हो.. मला तर ठाऊकच नाही दुर्वा कुठे आहे ते.. दुर्वाचा आणि माझा संपर्कच नाहीये.. गेली पाच वर्षं.. मी या लेकरासाठी बोलतोय.. श्रुतिकासाठी.. तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. पण या गोविंद दादाने इथे पण मोडता घातला आहे.. श्रुतिकाचे ज्या मुलावर प्रेम आहे त्या मुलाचे वडील आणि हे दोघे business partner होते...  श्रुतिका आणि श्रेयस यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.  ते दोघेही एकाच गावातले आहेत. पण श्रुतिकाच्या वडिलांच्या बहिणीने हे स्थळ आणले म्हणून त्यांनी होकार दिलाय. श्रुतिकाला विचारा. तिला हे लग्न मान्य नाहीये.. तिच्या वडिलांनी तुमच्या श्रीमंतीकडे बघून ह्या लग्नाला होकार दिलाय. आणि गोविंद दादा या लग्नात सामील झालाय तो माझ्यावर सूड म्हणून..

राघव :- कशाचा सूड काका..??

दुर्वाचे बाबा :- जाऊदेत राघव ते इतके महत्वाचे नाहीये. तू फक्त या लग्नाला नकार दे.. इकडे श्रुती आणि तिकडे श्रेयस रडत आहेत एकमेकांसाठी..

राघव :- ठाऊक आहे काका मला सगळे काही.. पण तुम्ही का आलात..?

दुर्वाचे बाबा :- का म्हणजे...? श्रुतिकासाठी आलो आहे.. तिच्यासोबत अन्याय नको व्हायला म्हणून..

राघव :- okk... मग त्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीसोबत.. सॉरी दुर्वा सोबत, त्या दारुड्या कमलाकर सोबत तिचे लग्न लावून देत होता तुम्ही.. जसा हिच्यासाठी जीव कळवळतोय तुमचा त्या दिवशी का नाही कळवळला दुर्वासाठी.? बोला ना मि. जोशी..! ती तुमची मुलगी नव्हती म्हणून का..? आणि श्रुतिकाचे बाबा आज हा साखरपुडा होणार नाही.. कारण मी आणि श्रुतिका एकमेकांना पसंत करत नाहीत. तिने ह्या लग्नाला होकार दिलाय कारण फक्त तुम्ही तिला मरणाची धमकी दिली म्हणून..! पण प्लिज काका श्रेयस इथेच उभा आहे..त्याच्याशीच तुमच्या मुलीचे लग्न लावून द्या.. मी तर लग्न करण्यावाचून आहे. (दुर्वाच्या बाबांकडे कटाक्ष टाकून ) काका माणूस इतका वाईट प्राणी आहे ना कि तो चांगल्या हजार गोष्टी लक्षातच ठेवत नाही.. पण एक वाईट गोष्ट तो आयुष्यभर लक्षात ठेवतो.. हे घ्या साखरपुड्याची अंगठी..

गोविंद काका :- हे तुम्ही असे ठरलेला साखरपुडा मोडू शकत नाही.. आम्ही मानहानीचा दावा ठोकू.. तुम्ही हुंड्याची मागणी केली म्हणून..

राघवची आई :- तुम्ही काहीही बोलण्या अगोदर हे लक्षात ठेवा कि मी हाय कोर्टात वकील आहे..

श्रुतिकाचे बाबा :- थांबा जरा.. राघव बेटा माफ कर मला.. मी गोविंदरावांच्या बोलण्यात आलो.. माफ करा देशमुख साहेब.. माझ्या मुलीचं लग्न राघवशी होऊ शकत नाही.. मी तुमचा जो काही खर्च झाला असेल तर मी भरून देईन..

गोविंदराव :- हा काय वेडापणा आहे रे पुरुषोत्तमा...  लेकीचे इतक्या मोठ्या घरात लग्न होत आहे. तरी तुला तो श्रेयस आवडला..

श्रुतिकाचे बाबा :- नाही. नको गोविंदराव.. मला पैश्याचा मोह नाही.. मला त्यापेक्षा माझ्या मुलीचं सुख महत्वाचे आहे.. श्रेयस बाळ माझ्या श्रुतिकाशी लग्न करशील...?

श्रेयस :- काका जर तुम्हाला हे लग्न मान्य असेल तरच मी करेन.

श्रुतिकाचे बाबा :- माझी हरकत नाही ह्या लग्नाला.. माफ करा देशमुख साहेब.. माफ करा राघवची आई..

   त्याच कार्यालयात आणि त्याच दिवशी श्रुतिकाचा साखरपुडा झाला. पण तिच्या प्रियकारासोबत.. श्रेयस सोबत... सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. जे पाहुणे राघवला बघून कुजबुज करत होते तेच आता राघवचे कौतुक करत होते. हळूहळू पाहुणे निरोप घेत होते. एकीकडे दीपक काका सुप्रियाच्या बाळाला खेळवत होते तर दुसरीकडे श्रेयस त्याच्या भावी सासऱ्याशी गप्पा मारत  होते. या सगळ्या गोष्टी गजाननराव बघत होते. ते लगेच जाऊन दीपक काकांच्या बाजूला बसले. मनात राग असूनही बाहेरच्या लोकांसमोर शोभा नको म्हणून ते मौन hote. पण त्यांच्या मनात गजाननराव यांच्या विषयी प्रचंड राग अजूनही होता.. एव्हाना सगळे पाहुणे गेलेच होते.. फक्त राघव श्रुतिकाचे कुटुंबीय आणि श्रेयस चे आई वडील होते.

दुर्वाचे बाबा :- कसे आहात जावईबापू..? मुलं कशी आहेत..?

दीपक काका :- बरे आहोत आम्ही.. तुम्ही कसे आहात..? तब्येत खालावली दिसतेय..

दुर्वाचे बाबा :- बरे आहोत. जगतोय इतकंच सांगू शकतो. शोभना मन रमावतेय आश्रम शाळेतल्या मुलांमध्ये... ज्या मुलांना आई बाप असूनही नाहीत अश्या मुलांना चित्रकला  शिकवते. मी एकटा पडलोय.. राहून राहून दुर्वाची आठवण येतेय आजकाल.. ती मला सोडून कुठेच गेली नसती.. आजारी पडलो जरा कि स्वतः लक्ष द्यायची..

दीपक काका :- पण आज अचानक कशी आठवण काढलीत हो तुम्ही तिची.. एकवीस काही जास्त वय नव्हतं लेकराला घराबाहेर काढायचं..

दुर्वाचे बाबा :- अहो.. काय सांगू..?. तेव्हा परिस्थिती तशी होती.. नंतर माई गेली.. पण एक कळत नाहीये कि तिला दुर्वाच्या नसण्याचा त्रास झाला.. माई शेवटच्या वेळी असे का बोलत होती कि दुर्वाच्या ह्या अवस्थेला ती जबाबदार आहे. आणि तुमची माफी मागत होती.. बोला ना..

दीपक काका :- बरं झालं तुम्हीच विषय काढला मी स्वतः ह्या विषयावर बोलणार होतो..

इतक्यात गोविंदराव तेथे येऊन उभे राहिले. दुर्वाचे नाव ऐकून त्यांच्या कपाळावर आठया आल्या.

गोविंदराव :- कशाला या शुभ दिवशी त्या काळतोंडीचं नाव काढताय जावईबापू..

गोविंदरावांच्या चढ्या आवाजाने सगळे जण आवाजाच्या दिशेने गेले तर गोविंदराव आणि दीपक काका भांडण करत होते..

दीपक काका :- गजाननराव तुमच्या भावाला आवरायला सांगा.. परीबद्दल वाईट बोललेले मी खपवून घेणार नाही..

गोविंदराव :- जवाई बापू ती मुलगी आपली कुणीच नाही.. तिचा आपल्याशी काहीच संबंध नाही. तिच्यामुळे गावात आमची छी थू झाली... काळतोंडी..

दीपक काका :- माझ्या परीमुळे नाही तर तुमच्या चैताली मुळे तुमची गावात छी थू झालीये..

गोविंदराव हे वाक्य ऐकून स्तब्ध झाले.. त्याना पुढे काय बोलावे हेच सुचत नव्हते.. त्या दोघांचे भांडण ऐकून बरीच लोकं गोळा झाली होती. किंबहुना जास्त मंडळी ही कोकणातीलच होती...

दुर्वाचे बाबा :- दीपक भाऊजी असे काय बोलत आहात..? चैतू कुठे मधूनच आली.? दुर्वाच्या लग्नाशी तिचा काय संबंध..?

दीपक काका :- अहो.. खरी सुरुवात तर तिथूनच झाली ना..!

गोविंदराव :- जावईबापू..! आता ते नको ते विषय काढून काय उपयोग..?

दीपक काका :- आता स्वतःच्या पोरीवर आलं तर कशे मागे सरलात हो.. दुर्वा पण कोणाची मुलगी होती ना.. तर ऐका सगळ्यांनी.. सगळे जण दुर्वाला लांचछान लावत होता ना.. आता सांगतो मी खरं काय झालय.. दुर्वाचे लग्न कमालाकारशी का लावत होते गोविंदराव ते.. चैतालीचे तिच्या कॉलेज मधल्या सोमेश मोने नावाच्या मुलावर प्रेम होते.. तो कमालाकरचा सख्खा मावस भाऊ आणि चुलत भाऊ पण होता. त्याचे आई वडील लहानपणीच गेले..  कमलाकरच्या आई वडिलांनी त्याला सांभाळले.चैतालीपेक्षा सिनियर... त्या दोघांनी प्रेमात स्वतःची लिमिट क्रॉस केली होती.. चैतालीला त्यातून दिवस गेले.. यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला लगेच मोन्यांकडे... पण सारंगरावांनी आधी कमलाकरचे लग्न व्हावे म्हणून अट्टाहास केला.. आणि त्यांनी एका लग्नात दुर्वाला पाहिले होते.. त्यांना दुर्वा घरची मोठी सून म्हणून हवी होती.. दुर्वा आणि कमलाकरच्या लग्नानंतर एक महिन्याने चैतालीचे लग्न करण्याचा प्लॅन होता.. सोमेशने पण या निर्णयाला पसंती दर्शवाली आणि तो काही घरच्यांच्या विरुद्ध नव्हता.. त्यात गजाननराव तुम्ही पण लक्ष्मनासारखे भावाच्या सूचनाचे पालन केले.. तुम्ही लक्ष्मण होता पण तुमचा भाऊ रावणापेक्षा वाईट वृत्तीचा होता हे तुम्हाला लक्षात आले नाही. तुम्हाला तर दुर्वा नववीत असताना कळले होते ना कि तुम्ही तिचे खरे आई वडील नाहीत.. मग तिने स्वतःचा विचार केला तेव्हाच तुम्हांला रक्ताच्या नात्याची जाणीव कशी झाली हो.. मला जर संजीवनीने काही सांगितले नसते तर मला काहीच कळले नसते.. बोला ना गजाननराव..

दुर्वाचे बाबा :- भाऊजी मला माफ करा.. मला चैताली बद्दल काहीच ठाऊक नव्हते.. मी किती करंटा बाप आहे.. ज्या लेकराला लहानपणी न्हाऊ माखू घातलं.. जे लेकरू मी कामावरून  दमून आल्यावर बोलायचं बाबा दमून आलास ना.. आधी जेवण कर मी तुझे पाय चेपून देते.. त्याच लेकराला मारलं.. ह्याच पायांनी लाथा घातल्या.. शोभना रोज तीचं नाव घेऊन झोपेतून दचकून उठते.. पण माझ्या धाकामुळे ती स्वतःच्या लेकराचं नाव पण घरात काढू शकत नाही.

गजाननराव धाय मोकलून रडत होते.. रडणे अनावर झाल्यावर त्यानीं स्वतःचे डोकं भिंतीवर आपटू लागले. राघव जातीने पुढे आला आणि त्यांना थांबावले..

राघव :- काका थांबा जरा.. स्वतःला त्रास देऊन काय उपयोग आहे..? त्यापेक्षा आपण दुरुला शोधूया.. चला बसा नीट खुर्चीवर.. राणू जा बरं काकांसाठी पाणी घेऊन ये..

दुर्वाचे बाबा :- नाही मला पाणी नको.. मला माझी पोर हवी फक्त.. राघव माझी मदत करशील ना तिला शोधायला..??

राघव :- हो काका.. हे काय आत्ताच निघूया आपण.. आधी हे पाणी प्या बघू..

गोविंदराव :- मला एक कळत नाही.. त्या दुर्वावाचून तुमचे काय इतके बिघडले.. गजू अरे माझी पोरं पण तुझीच ना. त्यांना कधी जीव लावला नाही.. त्या दुर्वाचं काय इतकं आहे तुला..? शेवटी ते नासकंच रक्त ना..

हे ऐकून मात्र दीपक काकांचा राग अनावर झाला.. त्यांनी रागातच गोविंदरावांची कॉलर धरली.. गौरव मध्ये आला आणि त्या दोघांना दूर केले..

दीपक काका :- खबरदार दुर्वाला पुन्हा नासक रक्त बोललात तर..

गोविंद राव :- बोलेन मी.. हजार वेळा बोलेन.. तुम्हाला काय करायचं.. तुम्हाला काय तिची इतकी चाढ..? बोला ना.. तिच्यामुळे माझी बहीण मेली.. तिचं नाव घेत होती. रडत होती त्या मुलीसाठी.. ती कोण एवढी लागते तुमची..??

गौरव :- मुलगी आहे ती त्यांची..! आणि माझी बहीण...

गोविंदराव :- मानण्यावर तर मी पण श्रुतिकाला माझ्या मुलीसारखं मानतो.. त्यात काय इतकं.. तू आमच्यात पडू नकोस..

गौरव :- मामा आजवर गजू मामा तुमचं सगळं ऐकून होता.. पण परीला काही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही.. ऐकायचं आहे ना परी नेमकी कोण आहे ते..

दीपक काका :- नको गौरव..! संजूला प्रॉमिस केले होते ना आपण.. कि ही गोष्ट कोणाला समजू देणार नाही. शांत हो.. आपण शोधूया तिला नंतर.. चल बरं इथून..

गोविंदराव :- बोलायला काही असेल तर बोलतील ना.. (आणि छद्मिपणे हसू लागले..)

हे ऐकून दरवाज्याकडे गेलेला गौरव धावतच गोविंदराव यांच्यापाशी आला..

गौरव :- मि. गोविंदराव जोशी ऐकायचं आहे ना.. तर ऐका.. दुर्वा माझी बहीण आहे.. माझी लहान बहिण.. हे जे उभे आहेत ना..

दीपक काका :- नको बेटा गौरव..

गौरव :- डॅड प्लीज आज बोलू देत.. दुर्वा माझी सख्खी बहीण आहे.. आणि तुम्ही तिला सारखं नासकं रक्त बोलत आहात ना.. तिच्यात एक प्रकारे तुमचेच रक्त आहे.. हे जे उभे आहेत ना मि. दीपक जोगळेकर आणि तुमची सख्खी बहीण संजीवनी यांची मुलगी आहे दुर्वा..

एव्हाना एके ठिकाणी हताश होऊन बसलेले गजाननराव खडबडून जागेवरून उठले..

दुर्वाचे बाबा :- हे काय बोलतोय तू गौरव नीट सांग.. तू खोटं नाही बोलत ना..

गौरव :- नाही मामा.. मी खोटं बोलत नाहीये.. दुर्वा माझी आणि साहिरची सख्खी लहान बहीण आहे.. सांगतो मी सगळे.. जेव्हा मामी गरोदर होती तेव्हा आई पण गरोदर होती.. मामीला दहा वर्षे मुल बाळ नव्हते होत.. मामीला मुल दत्तक घ्यायचे तर तुमचा आणि विशेष्करून गोविंद मामांचा विरोध होता.. मामींची डिलिव्हरी खोडद्याला झाली तेव्हा जास्त कुणीच नव्हते. मामीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.. तुम्ही पण नाही.. गोविंद मामा पण रात्री गावाकडे परतले.. कारण इकडे सुजल आजारी पडला.. रात्री मामीची धाकटी बहीण होती पण ती तिच्या लहान बाळाकडेच लक्ष देत होती.. दुसरीकडे आई पण त्याचं हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली होती.. तिला पण लेबर पेन सुरु झाले होते.. आईने पण एका मुलीला जन्म दिला.. थोड्या वेळाने आईला कळले कि तुमचे बाळ दगवले.. ही गोष्ट जेव्हा आईला समजली तेव्हा आई मामीजवळ गेली.. मामी खूप रडत होती.. हातातल्या सलाईन काढून फेकू लागली.. तेव्हा आईला काही सुचेनासे झाले. तिने स्वतःचं बाळ मामीच्या पदरात टाकले आणि बोलली, \"वहिनी डॉक्टरांनी चुकीचे सांगितले.. तुझी नाही.. माझी लेक देवाघरी गेली.. हे घे सांभाळ तुझ्या लेकीला..\" आईने हा निर्णय बाबांच्या मनाविरुद्ध घेतला होता.. मामीची कंडिशन क्रिटिकल होती म्हणून तिने बाळाला बघितलेच नव्हते.. आई आणि मामीचा वॉर्ड जवळच होता.. म्हणून आईने दुर्वाला जेव्हा मामीच्या पदरात टाकले तेव्हा कुणालाच काही लक्षात आले नाही. मामा मामीच्या बाळाचे सोपस्कार माझ्या बाबांनी स्वतःच्या हाताने केले.. मुल नाही दिले म्हणून गजानन मामा तू मामीला सोडून देशील या भीतीने आईने तिच्या बाळाला तुमच्या पदरात टाकले.. पण तुम्ही.. जाऊद्या... माझ्या आई बाबांनी निःस्वार्थ होऊन आपले मुल तुम्हाला दिले आणि तुम्ही..

गोविंदराव :- काही स्वार्थ असल्याशिवाय का दीपक राव स्वतःच मुल कोणाला देतील..

दुर्वाचे बाबा :- बस्स झालं.. दादा.. कधीपासून ऐकतोय तुझं.. मोठा आहेस म्हणून आजवर ऐकत आलो पण आता नाही.. भाऊजींचा काय स्वार्थ असावा स्वतःचे मुल मला द्यायचा.. ते आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक प्रतिष्ठा पाहता माझ्यापेक्षा खूप सक्षम आहेत.. राघव माफ कर मला. दुसऱ्या कोणाचं ऐकून मी तुझ्याशी वाईट वागलो.. तुला माहित आहे का माझी दुर्वा कुठे आहे ते..

राघव :- नाही मला काहीच ठाऊक नाही..

दुर्वाचे बाबा :- प्लीज बेटा मला सांग माझी पोर कुठे आहे ते.. हे तुझे मित्र आहेत ना सगळे.. ह्यांना माहित असेलच ना.. तुम्ही सांगा कुठे आहे माझी दुर्वा..?

राघव :- काका आम्हालाच ठाऊक नाही दुर्वा कुठे आहे ते.. हा कार्यक्रम झाल्यावरच आम्ही पोलीस कंप्लेंट करणार होतो.. ती हरवल्याची.. चला आपण लगेच जाऊयात.. माझ्याकडे आहे दुर्वाचा फोटो..

तितक्यात मागून आवाज येतो,"काही गरज नाही पोलिसात जाण्याची.. मला माहित आहे दुर्वा कुठे आहे ते.. "

हा आवाज ऐकून सगळे जण मागे वळून बघतात.. त्या व्यक्तीला बघून सगळे चकित होतात...

क्रमश
~ ऋचा निलिमा

1) राघव आणि दुर्वा एक होतील का.?
2) ती व्यक्ती कोण असेल जिला ठाऊक आहे दुर्वा कुठे आहे ते..?

🎭 Series Post

View all