मेरा कुछ सामान.. भाग २

कथा एका वेगळ्या नात्याची


मेरा कुछ सामान.. भाग २

मागील भागात आपण पाहिले की यश आणि समीरा हे छान मित्रमैत्रिणी असतात. बघू पुढे या मैत्रीचे काय होते?


" ए हाय समीरा.. कशी आहेस? यश कुठे?" मिहीरने विचारले. हे वाक्य ऐकून आदीचा चेहरा कठोर झाला.

" मी छान. पण यश कुठे आहे, मला कसे माहिती असणार?"

" बस काय.. तो तर आमच्याशी नाही पण तुझ्याशी न चुकता बोलतो. तुमची खास मैत्री आहे ना? मग तुला माहित असेलच?" मिहीर तिरकसपणे बोलत होता.

" तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. आम्ही दोघे नक्कीच बोलतो. पण त्यात खास असे काही नाही. आणि आमच्या मैत्रीला खास म्हणण्याआधी स्वतःच्या मनाला विचार ना, तू मला किती वेळा मॅसेज करतोस? माझे काय चालू आहे ते विचारतोस? तू पण होतास ना, माझ्याच वर्गात?" समीराचा आवाज किंचित चढला होता. " हे बरे आहे, स्वतः कोणत्याही मॅसेजला रिप्लायही द्यायचे कष्ट घ्यायचे नाहीत. पण दुसरे बोलत असतील तर त्यांना टोमणे द्यायचे. तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते." समीराचे हे रूप बघून मिहीरला अपराधी वाटले.

" सॉरी समीरा. मला तसे म्हणायचे नव्हते." बोलून तो तिथून निघाला. पण हे सर्व संभाषण यश आणि निशाच्या कानावर पडले होते. निशाने फक्त एक कटाक्ष यशकडे टाकला आणि ती बायकांच्या ग्रुपमध्ये गेली. समीरा तिच्या गर्ल्स गँगमध्ये रमली होती आणि यश मुलांच्या. दोघांचेही हाय हॅलो पलीकडे जास्त बोलणे झाले नाही. ना समीरा यशशी बोलण्यास उत्सुक दिसली ना यश समीराशी बोलण्यात. आदी आणि निशा दोघेही हे बघत होते. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे घरी गेले. कपडे बदलत असताना आदीने विषय काढलाच.

" तो मिहीर असं का बोलत होता?"

" ते मी कसे सांगू? त्याला तर साधा कोणाचा वाढदिवस असेल तरीही मॅसेज करायला वेळ नसतो आणि म्हणे खास मैत्री." समीरा मिहीरचे नाव घेतल्यावर चिडली होती.

" कोणी नावं ठेवेल असे आपण वागायचे का?" आदी आरशात बघत म्हणाला.

" तुला जे बोलायचे आहे ते सरळ बोल."

" काय गरज आहे त्या यशशी सतत बोलायची? बाकी कोणी नाही का तुला?"
समीरा उठली. तिने मोबाईल आणला. आदीच्या हातात दिला.

" घे.."

" काय? कशाला?"

" बघ ना, मी काय बोलते ते. एखादी स्त्री पुरूषाशी मनात निखळ मैत्री ठेवून बोलूच शकत नाही का? आणि ते बोलणे म्हणजे काय? तर सुप्रभात, शुभ रात्री.. त्यासोबत झालेल्या दोनतीन गप्पा. यात काय वावगं आहे सांगशील?"

" मला तसे नाही म्हणायचे.."

" मग जे म्हणायचे आहे ते एकदाच बोलून टाक. तुला चित्रपटात रस नाही. यशला आहे म्हणून त्या विषयावर आम्ही बोलतो हे चूक? एखादा नवीन ट्रेक त्याला सापडला तर हे चूक? की त्याच्याशी मी बोलते म्हणून माझे तुझ्यावर प्रेम नाही, असे तुला वाटते?" काहीच न बोलता आदीने समीराला मिठीत घेतले.

" हो. वाटते मला भिती.. माझी ही बायको तो पळवून घेऊन जाईल म्हणून."

" वेडाच आहेस.. समजून घे. तो फक्त माझा मित्र आहे. माझे सर्वस्व तर तूच आहेस." समीरा मिठी घट्ट करत बोलली.


आदीचा गैरसमज तर दूर झाला. निशाचा होईल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all