मेंढवण दुर्घटना..

एक थरारक सत्य कथा...
मेंढवण दुर्घटना....


आताच काही वर्षा पूर्वी माळीणच्या दुर्घटनेविषयी वाचले व टीव्हीवर देखिल पाहिले..... कसा रात्रीच्या पोटात सगळा गावच्या गाव दरड कोसळून गाडल्या गेला.....

मला बऱ्यापैकी आठवतेय २२ नोव्हेंबर १९९१ शुक्रवारचा दिवस होता... मी तेंव्हा दहावीत होतो.... वर्गात क्लास चालु असताना आमच्या शाळेतील शिपाई दादा सुचना वही घेऊन आले....सरांनी सुचना वाचुन दाखवली.... आपल्या बाजुच्या हायवे नजिक मेंढवण गावात ऐका तेलाच्या टेंकरचा स्पोट झाला आहे....खबरदारीचा उपाय म्हणून शाळेला सुट्टी जाहीर करण्यात येत आहे....


अचानक मिळालेल्या सुट्टीची बातमी ऐकून मला आनंद झाला... मात्र नंतर विचार केला... मेंढवण गाव आपल्या कासा गावापासुन साधारणतः दहा किलोमीटर आहे.... आणि तिकडे टेंकरचा स्पोट झाला तर आपल्या शाळेला सुट्टी कशी काय मिळाली?......


आम्ही शाळेतून नाक्यावर आलो... तर ..नाक्यावर सगळीकडे हाहाकार उडाला होता... त्यांत रुग्णवाहिकाचे आवाज...कानात गूंजत होते.... आमच्या कासा ग्रामीण रुग्णालयाबाहेर लोकांची प्रचंड गर्दी..... त्यांत पेशंट, पेशंटचे नातेवाईक ( जे वाचले होते ते), पोलिस, आजूबाजूचे खाजगी डॉक्टर आणि बघे... यांचा समावेश होता.... इतक्यात एक पोलिस हवालदार आमच्या जवळ आले... .. चला!.. चला!!... शाळेतल्या पोरांनी घरी जा!.... तुमचे काम नाही इथे!... दवाखान्यांत आत मधे फार भयानक परिस्थीती आहे... पोरांनी पाहु नका!.......आम्ही दवाखान्या पासुन बरेच दूर होतो.... तसं आम्ही शाळेच्या ड्रेसवर असल्याने आम्हांला दवाखान्याच्या आसपास जाण्याची परवानगी नव्हतीच म्हणा......मात्र एक कुतूहल म्हणून मी बाकीच्या पोरानंसोबत थांबलो....


आमचा एक शेजारी जो जस्ट दवाखान्यांतुन सगळं पाहुन बाहेर आला होता... त्याने संगितले.... आतमध्ये भयानक परिस्थीती आहे.....जवळ जवळ पन्नास साठ च्या वरती माणस दाखल केलीत.... कोणच्या अंगावर कपडे देखिल नाही.... पार पेटून गेलेत.... आणि बरेचसे पेशंट्सची
तर कातडी लोंबत आहे.... फार फार..... भयंकर!.......आहे सगळं आतमध्ये...


मेंढवण गावातील मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग-८ क्रमांकाच्या महामार्गावरील ते शापित वळण.... ज्या वळणावर आजपर्यंत कितीतरी अपघात झाले होते.... गावच्या जेष्ठ व्यक्तींच्या म्हणण्या नुसार तेथे एकदा ब्रिटिश काळात जोरदार गोळीबार झाला होता..... त्यांत बरेचसे स्थानिक आदिवासी लोकं मारली गेली होती..... म्हणून त्या वळणावर ही घटना घडली अस त्यांचे म्हणणे होते.......


ते काय मानत असतील हा एक वेगळा भाग.... किंव्हा त्याचं ते व्यक्तिगत मत असेल...... मात्र ...अभियांत्रिकी द्रुष्टीने ते वळण चुकीचे आसवे..... कारण त्या धोकादायक वळणावर आजपर्यंत अनेक अपघात झाले होते.... त्यांत २२ तारखेचा तो अपघात सर्वात भयंकर होता....


सकाळी साडे - आठ ते नऊ दरम्यान एक टेंकर त्या वळणावर उलटला....... साहजिक तो पाहण्यासाठी... तेथील गावातील लोकांची व बाजूलाच असलेल्या आश्रम शाळेची मुलं व कर्मचारी यांची गर्दी झाली...


गावकऱ्यांना हा रॉकेलचा टेंकर आहे असे वाटले ......त्यांनी त्याचा कॉक उघडला.... तसं ते केमिकल ( रॉकेल) बाहेर आले...... ते मिळवण्यासाठी त्यांची झटापट चालु झाली.... यांच दरम्यान एक हौशी फोटोग्राफर अहमदाबादकडे जात होता.... त्याने या घटनेचे दोन तीन मिनिट चित्रण केले आणि तो निघाला.......


कॉक उघडल्यावर.... गावकरी कोणी कळशी... कोणी हंडा कोणी बादली भरून ते केमिकल रॉकेल समजून वाहू लागले....त्यांत बरेचसे वाया जात होते..... त्यामुळे रस्ता भिजला होता.... रसत्याच्या बाजुला चिखल झाला होता... त्या गर्दीतून वाट काढत एक मारुती कार आली... व त्या चिखलात त्या गाडीचे टायर रूतले......त्या कारच्या ड्रायवरने गाडी काढण्यासाठी कार जोरदार रेस केली.... तश्या काही ठिणग्या बाहेर पडल्या ...,...आणि धडाम!.... असा आवाज आला.......


अहमदाबाद कडे जाणारा तो हौशी फोटोग्राफर ..दोन किलोमीटर वर असलेल्या सोमटा गावापर्यंत पोहचला होता.....त्याने तो प्रचंड असा आवाज ऐकला..... तो समजला काहीतरी अघटीत घडले ......त्याने तशीच गाडी फिरवली व तो घटना स्थळी पोहचला...... आणि पाहतो तर.......आगीचा मोठा डोम उसळला होता...त्या महास्पोटात त्यांतील केमिकलने भाजलेले लोकं सैरावैरा धावत होते....कोणाच्या अंगावर कपडे होते तर कोणाच्या अंगावर ते देखिल नव्हते.... याचे चित्रण त्याने केले.... आयुष्यात त्यानेही आजपर्यंत असल काही भयंकर शूटिंग केले नसेल......ते तर फक्त अर्धवट भाजलेले होते..... आणि त्या स्पोटात जागेवरच गेले ते?..... त्यांची तर काही गणतीच नव्हती......


त्या घटनेपासुन सगळ्यात जवळचा दवाखाना म्हणजे आमच्या कासा गावातील ग्रामीण रुग्णालय..... त्यांत हे सगळं भाजलेल्या रुग्णांना दाखल करतांना..... पोलिस प्रशासन.. व आरोग्य प्रशासनाने तत्परता दाखऊन अतिशय मोलाची कामगीरी वाजवली.... त्याचबरोबर आजू- बाजूचे खाजगी डॉक्टर देखिल कासा रुग्णालयात येवून त्यांनी सरकारी डॉक्टरना मदत करून माणूसकीचे दर्शन घडवले.....जे वाचण्या सारखे होते त्यांना जे .जे. ,भगवती, जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय ई... ठिकाणी तत्काळ पाठवण्यात आले....


त्या संध्याकाळी मेंढवण गावात एकाचवेळी पस्तीस ते चाळीस चिता एकदाच रचल्या गेल्या.... आणि त्या सगळ्यांना एकाच वेळी अग्नी देण्यात आला......किती मन हेलावून टाकणारे दृश्य असेल ते? .

.या भयंकर घटनेत नक्की किती लोकं गेली याचा आजपर्यंत निश्चित आकडा माहिती नाही.....मात्र या घटनेत.. शंभर पेक्षा जास्त म्रुत्यु झालेत यावर कुणाच दुमत नाही......


तो हौशी फोटोग्राफर त्या घटनेनंतर.... अहमदाबादकडे न जाता परत मुंबईला फिरला ..आणि त्याने ती शूटिंग केलेली क्लिप दूरदर्शनला दिली ....मला चांगलच आठवतेय मी ती क्लिप आमच्या शेजाऱ्यांच्या टीव्हीवर संध्याकाळी साडे सातच्या बातम्यात पाहिली होती.... ती क्लिप मधील दृश्य अतिशय भयंकर ... त्यामुळे ती एडिट केली होती.... तरिही त्यांतील एका आजीबाईनी पळताना पाहुन काळजाचा ठोका चूकला ....त्या हौशी फोटोग्राफर मुळे ही घटना लोकांना माहिती झाली.... नाहीतर याची दाहकता समाजासमोर आली नसती...


या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुधाकरराव नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली... तेंव्हा त्यांचे हेलिकॉप्टर आमच्या कासा हायस्कूलच्या मैदानावरच उतरले होते.... त्यामुळे ती घटना माझ्या आयुष्यात अजूनच अधोरीखीत झाली....


मा.मुख्यमंत्र्यांनी घटना स्थळी जाऊन मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना योग्य ती मदत जाहीर केली... काही कालांतराने ती मदत मिळाली.....मात्र त्यांतील अनेक कुठूंब अशी होती की ती मदत घ्यायला देखिल त्यांच्या कुठूंबात कोणी शिल्लक राहिले नव्हते.......


( सत्य घटनेवर आधारीत )

लेखन: चंद्रकांत घाटाळ..