कोकणातला आजोबा - एक अविस्मरणीय प्रसंग

Memorial moment of my life.


 

#माझ्या_आयुष्यातील_अविस्मरणीय_प्रसंग.

माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग आपल्यासमोर सादर करत आहे.तसे लक्षात ठेवण्यासारखे बरेच प्रसंग आहेत पण आपल्या आयुष्याला एक नवी दिशा किंवा नवा दृष्टीकोन देणारा प्रसंग म्हणून मी तसाच एक प्रसंग इथे घेऊन येत आहे.

आमच्या शेजारच्या गावातील कॉलेजमध्ये माझं अकरावी बारावीचं शिक्षण पूर्ण झालं. पुढच्या शिक्षणासाठी मी 'एस.बी.खाडे महाविद्यालय कोपार्डे' इथे ऍडमिशन घेतलं. आमच्या गावापासून कॉलेजपर्यंतच अंतर फक्त पंधरा किलोमीटर होतं. पण तिथवर जायला मला दोनवेळा बस बदलावी लागायची. कोकणातून कोल्हापूरकडे येणाऱ्या बस शक्यतो प्रवाश्यांनी फुल्ल भरलेल्या असायच्या. त्यामुळे जास्तीतजास्त वेळा उभ्यानेच प्रवास करावा लागे. खाचखळग्यांचं साम्राज्य असणाऱ्या रस्त्यावरून धावणारी ही लालपरी वाऱ्याच्या वेगाने पुढे एक एक गाव मागे टाकत धावायची. एखाद्या मोठ्या खड्यात चाक गेल्यावर प्रवाशी असे उसळी खायचे जसे की ऑस्ट्रेलियामधील पर्थच्या खेळपट्टीवर जणू बाउन्सर बॉल उसळी खातो. बऱ्याचदा आम्ही उभा असणाऱ्यांचं डोकं छताला जाऊन असंकाही आदळायचं जस बसच्या छतालाच फुटबॉल समजून रोनाल्डो स्टाईलने हेड शॉट मारावा. हे सगळं घडताना आपल्या पाठीवर असणारी सॅक बरोबरच आपला धक्का एखाद्या कॉलेजसुंदरीला लागू नये याची पुरेपूर काळजी घ्यावी लागायची. मला असा वैतागवाडीचा प्रवास करण्याचा खूप कंटाळा यायचा. त्याकाळी कॉलेजला बाईकवरून येणारी मुलं दुर्मिळ होती, जो बाईकवरून यायचा त्याच्याकडे मुला मुलीसहित सगळेच बघत रहायचे. मलापण वाटायचं आपणही बाईक घेऊन यावं आणि थोडा आपणही भाव खाऊन जावं. 

आमच्याकडे पण हिरो होंडा बाईक होती पण ती वडिलांना ऑफिसला जाण्यासाठी लागत होती. त्यामुळे कधीतरी चुकून माझ्या हाताला लागायची. मग कानात वारं शिरलेल्या पाडसासारखं मी सुसाट सुटायचो. आमच्या कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कॉलेजला शनिवारी सुट्टी असायची आणि रविवारी सुरु असायचं.

वडिलांना रविवारी सुट्टी असल्याने रविवारी बाईक घरी असायची. मग मी हट्ट करून बाईक घेऊन कॉलेजला जायला लागलो. माझ्यासह माझे दोन मित्र अरुण आणि रवि असे तिघेजण आम्ही एका गाडीवरून जात होतो.

एक वेगळाच अनुभव यायचा जणू स्वर्ग दोन बोटावरच उरलाय. बाईक असली की आमच्या वागण्यात एक वेगळा आत्मविश्वास असायचा. मग आपण किती फिरतोय? कुठे कुठे जातोय? याचं भान राहायचं नाही. अगदी कॅन्टीनला जायला सुद्धा बाईकवरूनच जायचो.

आधी फक्त रविवारी बाईक नेणारा मी नंतर वडीलांना जॉबच्या ठिकाणी पोहोचवून मग तिथून बाईक घेऊन बाहेर पडू लागलो.

वडील अगदी शिस्तप्रिय आणि काटकसर करणारे असल्यामुळे ते बाईकचे मीटर बघून किलोमीटरचे अंक लक्षात ठेवायचे आणि बाईक किती फिरवलीये याचा त्यांना अंदाज यायचा. तर आम्हीही किती फिरतोय याचा अंदाज त्यांना येऊ नये म्हणून आम्ही कॉलेजवर गेल्यावर किलोमीटर दाखवणारी केबल काढून ठेवू लागलो. अशा पद्धतीने आम्ही बेफिकरे बनून उनाडक्या करत सगळीकडे बाईकवरून फिरायचो. कॅन्टीनमध्ये नास्ता तर ठरलेलाच असायचा. आपण बाईक आणि पैशाचा गैरवापर करून अनावश्यक उधळपट्टी करतोय याचं भान त्यावेळी नव्हतं. पण एकेदिवशी एक अशी घटना घडली ज्याने मी पुरता बदलून गेलो.

एकेदिवशी काही कारणास्तव मी बाईक न नेता बसने कॉलेजला गेलो होतो. कॉलेज पूर्ण करून बसमधून परत गावाकडे येतेवेळी बसमध्ये कंडक्टर एका माणसाशी वाद घालत होता. उत्सुकतेपोटी मी जरा पुढे जाऊन पाहिलं. तर एक सत्तर पंच्याहत्तरी पार केलेला वृद्ध कोकणी माणसाबरोबर तिकिटाच्या पैशावरून कंडक्टर वाद घालत होता. तो वृद्ध अगदीच गरीब आणि आजारी दिसत होता. कंडक्टर त्याला बोलू लागला,

"ये म्हाताऱ्या तिकिटाचे पैसे नाहीत तर कशाला चढलास एसटीत? पुढच्या स्टॉपवर गुमान खाली उतरायचं."

असं म्हणत तो त्याला खूप वाईट शब्दात सुनावत होता.

त्यावर तो वृद्ध थरथरत्या हाताने हातातली चिल्लर पुढं करत म्हणाला,

 "सायेब हायत की व पैस,हिंगाकी(घ्याकी) हे."

त्याला ते किती पैसे आहेत हेपण कळत नव्हतं. 

यावर कंडक्टर त्याला दातओठ खात दंडाला पकडून गदगदा हलवत म्हणाला,

 "एवढ्या पैशात तिकीट निघत नाही, चल उतरं खाली आधी."

हे दृश्य बघून मला काय झालं काय माहित! माझ्या तळपायांची आग मस्तकात गेली. पुढे सरसावून मी कंडक्टरचा हात पकडला आणि म्हणालो,

"हात सोड त्याचा. तुला जरातरी माणुसकी आहे आहे की नाही? तुझा वडील नाहीतर आजोबा याजागी असता तर हेच केलं असतंस का तू?  किती आहेत तिकिटाचं पैसे ते मी देतो, पण माणसांशी नीट बोलायचं सांगून ठेवतो."

यावर सगळे सहप्रवाशी माझ्याकडे कौतुकाने बघू लागले.

कंडक्टर लाजून चूर झाला त्याने खाली मान घातली.

पण माझं मन अजून शांत झालं नव्हतं. मी पुढे म्हणालो,

"आज या आजोबाचं पैसे मी देतोय, पण असाच जर इथून पुढे कोणी गरीब हतबल माणूस एस.टी मध्ये असला तर त्याला अशी वागणूक देऊ नको. दररोज हजारो घोटाळे करणारे लोकं सरेआम बिनधास्त फिरत असतात तसंच तिकीट बुडवून प्रवास करणारे पण खूप असतात, मग अशात एखाद्या गरीब म्हाताऱ्याला फुकट नेलास तरं आभाळ नाही कोसळणार! उलट पुण्य लागलं."

यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मला थोडं वेगळं वाटलं कारण आजवर दुसऱ्यासाठी कधीच भांडलो नव्हतो.

मग मी त्या आजोबांजवळ जाऊन त्यांना विचारलं,

"आजोबा कुठं जायचं हाय? गाव कुठलं?"

यावर त्यांनी सांगितलं,

 "म्या बर्कीचा हाय."

(आमच्या गावापासून बर्की हे पस्तीस किलोमीटर अंतरावर कोकणात असणार एक सुंदर गाव आहे. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.)

मी म्हणालो,

"हिकडं कुठं गेलतासा?"

ते म्हणाले,

"कोलापूरला थोरल्या दवाखान्यात (सीपीआर) गेलतो डोळं दाखवाया. नदरनं(नजरेनं) अंदूक दिसतंय."

मी म्हणालो,

 "भेटलं काय डॉक्टर?"

यावर ते हताशपणे म्हणाले,

"गरीबाची कोण दाद घेतया? फिरून फिरूनशान आलो मागारी."

मी म्हणालो,

"बरोबर कोण नाही आलं व्हय?"

ते म्हणाले,

"कोण येणार? पोरग हाय म्हमईला. म्या आन म्हातारी हाय गावात."

मी म्हणालो,

"येताना कसं आलासा कोल्हापूरला?"

यावर ते म्हणाले,

"कळ्यापातूर चालत आलू, मग हितन एका टरकाला (ट्रकला)हात करून गेलो."

(बर्की ते कळे पस्तीस किलोमीटर ते चालत आलेले.)

मग मी म्हणालो,

"तिकिटाला किती पैसे लागत्यात माहित हाय काय आजोबा."

यावर ते म्हणाले,

"मला ते कायबी कळत नाय, कोलापुरात भीक मागून हे पैस गोळा केलंत." 

भीक मागून पैसे जमवले हे ऐकून मला गहिवरून आलं, अचानक हुंदका येऊन डोळे भरून आले.

क्षणभर मी स्तब्ध झालो.

यातून सावरून मी म्हणालो,

"आजोबा हे तुमचं पैसे तुमच्याकडंच ठेवा."

आणि मी कंडक्टरला तिकीटाचे पैसे विचारले, 

माझ्याकडेही तेव्हा जास्त पैसे शिल्लक नव्हते. फक्त त्यांच्या तिकिटापुरतेच होते. ते मी तिकिटाला देऊन टाकले. एवढ्यात माझा स्टॉप आला होता. मी उतरताना एकदा त्या आजोबाकडे पाहिलं. ते निरागसपणे शून्यात नजर लावून बघत होते. त्यांना हेपण कळत नव्हतं की आपलं तिकीट कोणीतरी काढलं आहे. पण त्याच्याशी मला काही घेणेदेण नव्हतं. मी माझं कामं केलं होतं. मी खाली उतरलो आणि बस पुढच्या प्रवासासाठी निघून गेली. 

आता मला पुढची बस पकडायची होती. पण माझ्याकडे माझ्या तिकिटासाठी पैसे नव्हते. इथून माझं गाव तीन किलोमीटर होतं. मग मी कोणाची वाट न बघता चालत निघालो.

चालता चालता त्या आजोबांचा चेहरा समोर दिसत होता. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष दिसत होता, वयाची पंच्याहत्तरी पार केली असताना बर्की ते कळे हा पस्तीस किलोमीटरचा पायी केलेला खडतर प्रवास आठवत होता.

या दरम्यान त्यांनी काय खाल्लं असेल? ते घरातून कितीदिवस असे बाहेर भटकले असतील? या विचारांनी डोकं सुन्न झालं. या जगातलं भीषण वास्तव समोर दिसत होतं. 'अशा परिस्थितीशी झगडणारी कितीतरी माणसं या जगात वावरत असतील.' असा प्रश्न भेडसावत होता.

काही रुपयाच्या तिकिटासाठी भीक मागून एकेक रुपया जमा करणारा तो हतबल आजोबा डोळ्यासमोर फेर धरत होता 

आणि आपण कसं वागायला हवं? आई वडिलांनी कष्ट करून आपल्यासाठी कमावलेला एक एक रुपया कसा वापरला पाहिजे यांची जाणीव झाली, बाईक कोणत्या कामासाठी आणि कशी जपून वापरायला हवी यांची जाणीव झाली. एक एक रुपयाचं मोल लक्षात आलं होतं.

कळे ते पुनाळ हे तीन किलोमीटरच अंतर आपण कुठे चुकत होतो आणि इथून पुढे कसं वागायला हवं?  या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी चालत होतो.

त्या आजोबाच्या तिकीटामुळे आज खिसा रिकामा झाला होता, पण लाखमोलाच्या शिकवणीने माझ्या विचाराची श्रीमंती वाढली होती. या प्रसंगाने माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. ते आजोबा कोण होते मला माहित नाही, त्यांनाही मी कोण होतो माहित नाही. आज ते या जगात असतील किंवा नसतील काही माहिती नाही. पण त्यांच्यामुळे माझ्यातला मी मला सापडलो आणि त्यांच्यामुळे मला एक नवा दृष्टीकोन मिळाला.

                                   धन्यवाद.

आपलाच मित्र.

श्री.सारंग शहाजीराव चव्हाण.

मु.पोस्ट.पुनाळ, 

ता.पन्हाळा, 

जि.कोल्हापूर.

पिनकोड-416205

मोबाईल-9975288835.