मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग आठवा)

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांत रंग भरताना...

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे
भाग आठवा

श्रीकांत हा आत्याचा मुलगा असल्याचं नुकतच कळल्याने, आभा आधीच शॉक झाली होती. नियतीचे असे कसे हे चक्र तिला काहीच कळतं नव्हतं. ती भांबावलेल्या नजरेने श्रीकांत ला पाहत होती.

"आई, तु तिला काही विचारू नकोस. जे काही आहे ते मला विचार. मी स्वतःहून मैत्री केलीय तिची."

"पाहिलंस दादा, कसा बोलतोय हा. आमच्या आदित्य ला गिळून शांत नाही झाली. आता माझ्या श्री वर हीची वाईट नजर.." आत्या पुढे काही बोलणार तोच श्रीकांत ने तिला थांबवलं.

"बास्स आई. खुप झाल आणि त्यांनी ही खुप सहन केलं. माफ कर मला पण आज मी नाही ऐकणार तुझ."

"ए श्री, काय चाललंय रे तुझ..? हा आमच्या घरचा वाद आहे. तु ह्यात नको पडुस. आणि अभय पटकन काय तो आतच निर्णय घे आणि सांग मला. आता आठवडाभर काय एक क्षण देखील लावणार नाही मी. माहितीये ना काय बोलले आहे मी..?" सायली अभय च्या दिशेने जात बोलली. अभय ला तीच बोलणं आठवलं. तसं तो घाबरला. त्याला फक्त त्याच बाळ दिसू लागलं. जे त्याला काहीही करून गमवायच नव्हत.

"हेच ना, की लवकरात लवकर वेगळा संसार थाटायचा आणि नाही ऐकलं तर ह्या बाळाला जगात येऊच देणार नाही..? हेच ना सायली ताई..?" श्रीकांत मोठ्याने बोलला. जे ऐकुन सगळेच अवाक् झाले.

"सायली काय बोलतोय हा..? हे खरं आहे का..?" सायली चे बाबा.

"अरे वसंता तु बोल ना काहीतरी. हे काय बोलतेय सायली..?" आज्जी.

"आई तु बस इथे शांत. आम्ही बघतो. तु थांब." आभा चे बाबा आज्जीला सोफ्यावर बसवत बोलले.

"हे काय अभय..? तु ह्याला सांगितलंस..? आपलं काय ठरलं होतं आठवत नाही का तुला..?" अभय ला ही गोष्ट आभा ने च त्याला सांगितली असणार म्हणून त्याला त्या गोष्टीचा पच्छाताप झाला. त्याने आभा कडे रागाचा कटाक्ष टाकला. आणि श्रीकांत च्या दिशेने गेला. आभा ला काही कळेच ना की अचानक अभय असा का वागतोय.

"अग सायली मी नाही काही सांगितलं त्याला. अरे ए श्रीकांत प्लीज तु जा इथून. नको अजुन त्रास वाढवू आमचा. आम्ही बघून घेऊन आम्हाला काय करायचंय ते तु जा." अभय श्रीकांत चा हात धरत त्याला बाहेर जाण्यासाठी थोड खेचत घेऊन जाऊ लागला. पण श्रीकांत जायला तयार नव्हता. सगळे जण त्याला थांबवायला गेले, पण आत्याने सगळ्यांना अडवल.

"दादा अरे ऐकुन तरी घे माझं.. दादा प्लीज.." श्रीकांत अभय ला विनवणी करत होता. पण अभय काहीच ऐकुन घ्यायच्या मनस्थितीत नव्हता.

"हे बघ तु जा मला माझं बाळ हवंय, तु जा." अभय एकसारखं हेच बडबडत होता. श्रीकांत ला सहन झालं नाही. त्यांनी जोरात अभय ला ढकलल आणि मोठ्याने त्याच्यावर ओरडला.

"अरे ती प्रेग्नेंट असेल तर ना.." श्रीकांत च्या ह्या वाक्याने घरातले इतर आणि अभय चकित झाले. आत्या आणि सायली च्या तर चेहऱ्यावरचा रंग च उडाला. श्रीकांत हळूच जाऊन खाली पडलेल्या अभय ला उठवायला मदत करत होता.

"तु काय बोलतोयस.." अभय चे ओठ थरथरत होते.

"हो दादा, हेच सांगायला मी इथवर आलो आहे. फक्त मदत करायला."

"श्री.. अक्कल आहे का तुला. स्वतःच स्वतःचे तु निर्णय नाही घेऊ शकत आणि म्हणे मदत करणार. तु निघ आताच्या आता इथून." आत्या श्री वर जोरात ओरडली.

"हो कारण ते तु नाही घेऊ दिले मला. नेहमी मला स्वतःमध्ये कमतरता भासवत राहिली तु. तु घेतलेले निर्णय किती योग्य आहेत माझ्यासाठी म्हणून एका ओझ्याखाली सतत दबत ठेवलेस."

"पाहिलंस ना दादा..? आजवर माझ्या शब्दापुढे न गेलेला आज कसा शब्दांशी शब्द वापरतोय. कोणी शिकवलं रे तुला..? ह्या आभा ने का..?" आत्या.

"हो आई अगदी बरोबर, तिनेच शिकवलं. आपल्या आत असलेल्या संवेदनशील मनाचा वापर कोणाला करू द्यायचा नाही. चूक तिथे चूकच. तिथे अजिबात साथ द्यायची नाही. मग भले ते कोणीही असो. त्यामुळे ते अजुन चुका करण्यास प्रोत्साहित होतात. वेळीच चूक दाखवून द्यायची. हे तिनेच शिकवलं."

"बघ श्री आपण घरी जाऊ आणि ह्या विषयावर चर्चा करू. चल तु जा इथून." श्री चा हा पावित्रा पाहून आत्या चपापली. तेवढ्यात आभा ने दार बंद करून घेतलं.

"आत्या कसं आहे ना, आज काय तो सोक्षमोक्ष लागूनच राहणार." आभा निक्षून बोलली.

"श्री बाळा, काय झालं आता तरी सांग." सायली चे बाबा.

"मामा अहो, ह्या दोघी खोट्या आहेत. त्यांनी ह्या अभय दादा ला आणि त्याच्या कुटुंबाला फसवल." आत्या मधे काही बोलणार तितक्यात तिला सायली च्या बाबांनी थांबवलं.

"श्री बाळा, जे काही आहे ना ते सगळ सविस्तर सांग आम्हाला." अभय ची आज्जी.

"काही दिवसांपूर्वी च माझी आणि आभा ची भेट झाली. आणि त्यावेळी आदित्यचा विषय आल्याने आम्ही पडताळून पाहिले, योगायोगाने तोच आदित्य होता. भेटल्या पासून आभा सतत काळजीत होती. तिने मला सायली च्या संशयित वागण्याबद्दल सांगितले. तेव्हा मी सायली च्या असलेल्या आधीच्या प्रेमाबद्दल सगळ सांगून टाकलं. पण आभा त्याबद्दल तु कोणाला काही बोलली नाहीस का..?"

"श्रीकांत मी तेच सांगायला सगळ्यांना इथे बोलवलं होत. पण सायली च्या गुड न्यूज मुळे मी सुद्धा तो विषय तिथेच संपवला. उगाच आनंदात विरजण नको म्हणून."

"पण तिला विचारलं का हे अस अचानक कसं झालं..?"

"एक मिनिट श्री. थांब मी लगेच माझे रिपोर्ट्स आणते आणि मग बघते.." सायली त्याला बोलून आपल्या खोलीच्या दिशेने वळली.

"कोणते ते आईने बनवलेले खोटे रिपोर्ट्स ना सायली..?" श्रीकांत च्या ह्या वाक्या सरशी तिची पावले तिथेच थांबली.

"क..काय बोलतोयस तु.." सायली.

"जा ना मग. थांबली का तु..? तु खोटे रिपोर्ट्स आण. मी तो डॉक्टर इथे उभा करतो. ज्याने पोलिसांची धमकी दिल्यावर हे मान्य देखील केलं आहे."

"सायली हे खरं आहे का..? बोल लवकर. श्री काय बोलतोय ते खर आहे का बोल.." सायली ने मान हलवताच सायली च्या आईला आणि बाकी सगळ्यांना धक्का बसला. तिच्या आईने लगेच तिच्या थोबाडीत दिली.

"सायली हा काय मूर्खपणा आहे..? तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं. परिणामी आभा ला देखील ओरडलो का तर तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे आणि तू हे अस वागलीस..?" अभय चे वडील.

"अहो ह्यात तिची काय चूक. आपणच चुकलो तिच्यावर इतकं प्रेम केलं." अभय ची आई.

"वसंतराव, वहिनी मी माफी मागतो तुमची. माझेच संस्कार कमी पडले असतील." सायली चे बाबा.

"सायली चे बाबा तुम्ही का माफी मागता. जिने चूक केली तिला विचारा ना..! हे सगळ कश्यासाठी..?" आज्जी.

"आज्जी ह्या सगळ्यात फक्त तिची चूक नाहीये. मला खूप वाईट वाटतंय हे बोलताना पण हे सगळ आईचं डोक आहे." श्रीकांत आत्याकडे पाहून बोलला.

"पण श्रीकांत तुला कसं काय कळलं हे सगळं..?"

"मामा, मला आई अनेकदा संशयास्पद रित्या फोनवर बोलताना दिसली. पण मी दुर्लक्ष केलं. एकदा आई अभय च्या आईशी बोलताना, तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडताना पाहिला जेव्हा तिला कळलं की ते पुण्यात येणार आहेत. तिने तिथेच सायली ला फोन केला आणि लगबगीने गच्चीवर गेली. तिचा होत असलेला गोंधळ पाहून मी हळूच जाऊन तीच आणि सायली च बोलणं ऐकलं. त्यात तिने हा सगळा कारभार सायलीला करायला सांगितला."

"पण का..? इतकं काय झालं की आत्याला आमच्या भावनांशी खेळावं लागलं..?" आभा.

"हो आणि जेव्हा मी त्यांना फोनवर सांगितलं की आम्ही आभा कडे जातोय तिला काही महत्वाचं सांगायचं आहे. तेव्हा ते त्यांना जाणून घ्यायचं होत." आभा ची आई. आत्या आणि सायली दोघीही मान खाली घालून उभ्या होत्या.

"पण श्रीकांत मग तू मला लगेच फोन करून सांगितलं का नाहीस ह्याबद्दल..?"

"आभा माझ्याकडे काही पुरावा नव्हता. आणि आई जेव्हा डॉक्टरांशी बोलत होती तितक्यात तिचं लक्ष माझ्यावर गेलं. तिला संशय येऊ नये म्हणून मी तिला भूक लागलीय मला बोललो. खाली ये लवकर. अस बोलून तिथून जावं लागलं. आणि मग ती काय बोलली नेमकं डॉक्टरांशी ते नाही कळलं."

"मग ते डॉक्टर..?"

"ते तर मी सहज निशाणा मारला आणि तो अचूक लागला. माझं बोलणं सिध्द झाल. आई च्या ह्या अश्या कुरघोड्या चालूच होत्या हे मी जाणून होतो. पण त्याला खतपाणी घालत बसणार नाही म्हणून हे सगळं करावं लागलं मला मामा."

"बरं केलंस मुला. नाहीतर आम्ही कधीपर्यंत अंधारात असतो, कळलही नसतं." आज्जी.

"आज्जी आणि इतकंच नाही तर ह्या दोघींनी, काही असा प्रसंग निर्माण करायचा जिथे कावेरी सायली सोबत असेल आणि तिथून पाय घसरून पडण्याचं नाटक करून खोटा अपघात घडवायचा. त्यामुळे बाळ गेल्याचं सार खापर कावेरी वर येईल. त्याने खोटी प्रेगेनंसी तिथेच थांबवता येईल आणि नावही तिच्यावर."

"बापरे..! आधीच ती त्या पाटल्या चोरीच्या लावलेल्या आरोपामुळे खचली आहे. त्यात हे अस झाल असत तर.. विचार ही करवत नाही माझा तर." अभय ची आई.

"तुम्ही दोघी इतक्या खालच्या पातळीवर जाल, हे वाटलं नव्हतं." सायली चे बाबा.

"त्या पाटल्या देखील ह्या दोघींनीच चोरल्या असतील मामा. आता ह्यानांच विचारा काय आहे ते सगळं." त्या दोघीही काही बोलत नव्हत्या. सायली ची मान तर अजुनही वर होत नव्हती. तिला खुप लाज वाटत होती तिच्या कृत्याची.

"बाबा, तुम्ही पोलिसांना फोन लावा. ह्या त्याशिवाय काही बोलणार नाही."

"नाही बाबा थांबा मी सांगते सगळं. प्लीज थांबा." बाबा फोन काढून काही बोलणार तितक्यात सायली ने त्यांना थांबवलं. बाबांनी आभाकडे पाहिलं. तिने ठीक आहे चा इशारा करताच, बाबांनी फोन ठेवला.

"हो त्या पाटल्या मी च चोरल्या होत्या आणि नाव कावेरी वर टाकलं."

"अग पण का..? त्या बिचारीने काय तुझ बिघडवल होत जे तु अस वागलीस तिच्यासोबत..? आभा.

"बिचारी..? माझ्या नवऱ्याला अशी मिठी मारताना तिला पाहिलं, आणि माझ तर डोकंच फिरलं. आधी तर त्या अश्याच हरवल्या म्हणून सांगणार होते पण नंतर परिस्थिती लक्षात घेऊन तिच्यावरच नाव टाकलं."

"पण तुझ तर प्रेमच नव्हत ना अभय वर..? तो कोण आहे मनोज, त्यावर प्रेम करत होतीस आणि लग्नानंतर देखील तु त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये बरोबर..?"

"हो नव्हत प्रेम. पण झालं आता. अभय च्या सोज्वळ स्वभावावर. त्याच्या प्रत्येक एक गोष्टीवर प्रेम झाल माझं. आजपर्यंत कोणी माझी इतकी काळजी घेतली नसेल जितकी अभय ने घेतली. हे ठरवून नाही केलं मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मनोज माझा भुतकाळ होता. अभी तु माझा आहेस आता. प्लीज अभी मला माफ कर. मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही." अभय काहीच बोलत नव्हता ना तिच्याकडे पाहत होता.

"अजुन एक खोटं. वाह..!"

"अरे हे काय चाललंय..? कोण आहे हा मनोज..?" सायली चे बाबा.

"मामा तुम्हाला माहीत नसेल पण मी सगळी माहिती काढली आहे. तो जो मनोज का काय आहे ना तो हाच आहे ज्याच्या गाडीने आपल्या आदित्य चा अपघात झाला होता. ओह सॉरी घडवला होता. बरोबर ना सायली..?"

"नाही... हे साफ खोटं आहे. उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस."

"सायली हे काय केलंस तु.. ज्याने तुला इतकं प्रेम केलं त्यालाच तु.."

"आई अग हे सगळ खोटं आहे ग प्लीज माझ्यावर विश्वास ठेव."

"विश्वासाची गोष्ट तु नाही केली तर बरं होईल सायली. आज जिथे कुठे असेल तो त्याला हे सगळं बघून खुप वाईट वाटलं असेल." आभा.

"आभा प्लीज माझं ऐकुन घे. मी दादाला मारण्यासाठी नाही त्याला सगळ सांगण्यासाठी त्याला त्याच्या पाठी पाठवल होत. जे तो तुला सांगायला येत होता."

"म्हणजे..?"

"मनोज वर माझं प्रेम होत. पण त्याला ना नीट नोकरी होती ना डिग्री. भाड्याने गाडी घेऊन कसबस तो घर चालवत होता. घरी तरी कसं सांगावं म्हणून मी सगळ आत्याला सांगितलं. जर ह्यात तिने मला काही मदत नाही केली तर सरळ जीव देईन म्हणाले. तिला खुप गयावया केल्यावर तिने मदत करण्याचं मान्य केले. यावर उपाय म्हणून मला अभय शी लग्न करण्यासाठी सुचवलं. मग काही कारण काढून वाद निर्माण करायचा आणि घटस्फोट घेऊन अर्धी प्रॉपर्टी आणि पोटगी घ्यायची. त्यानंतर मनोज ला बिझनेस सुरू करून द्यायचा. पोटगी ही मिळत राहिलं आणि मनोज चा ही काही त्यात जम बसल्यानंतर लग्न करायचं. पण कुणास ठाऊक कसं हळदीच्या दिवशी दादाला हा सगळा प्रकार समजला. आमच्यात खुप भांडण झाल आणि लगेच तो तिथून तुला सांगायला तुझ्या घरी यायला निघाला. मी लगेच घरी जाऊन आत्याला सांगितलं. तिने लगेचच मनोज ला त्याच्या पाठी जाऊन थांबवायला लावले. पण नंतर ही बातमी आली की दादा चा अपघात झाला. पाठून भराघव येणाऱ्या ट्रक ची धडक मनोज च्या गाडीला बसून दादाच्या गाडीला बसली. ट्रक तिथून निघून गेला पण मनोज आणि दादा तिथेच पडून होते. काही वेळाने Ambulance तिथे आली. मनोज च्या हृदयाचे ठोके मंद गतीने चालू होते त्यामुळे त्याला तात्काळ उपचार करून वाचवलं पण दादा तिथेच गतप्राण झाला होता." सायली ने रडत रडत सगळी हकीकत घरच्यांना सांगितली. बाकी घरचे देखील आदित्य च्या आठवणीने मुसमुसू लागले.

"सायली तु चूक नाही, तुझ्या हातून अपराध घडलाय. एका निष्पाप मुलाचं आयुष्य तु बरबाद करायला जात होती. आणि माझ्या मुलाला तर.." असं बोलत सायली चे बाबा ओक्साबोक्शी रडू लागले.

"बाबा, मला माहितीये मी मान्य करते. पण मी हे सगळं मुद्दाम नाही केलं ना मनोज ने. मलाही खुप राग आला होता पण जेव्हा सगळी हकीकत कळाली तेव्हा मग मला माझीच चूक दिसली. पण काहीच करू शकत नव्हते. पोलिस सुद्धा त्याच काही म्हणण ऐकुन घेत नव्हते. जामीन मंजूर करायला आणि केस लढवायला पैसे लागणार होते म्हणून मी त्या पाटल्या चोरून मिळालेल्या पैशात त्याची मदत करून त्याची सुटका करणार होते. मग त्याच्यासोबत चे संबंध संपुष्टात आणणार होते. शेवटी माझ्याच मुळे तो अडकला होता. आणि हे सगळं करण्यासाठी मला घरच्यांच्या नजरेपासून वाचायचं होत. त्यासाठी मी अभय ला वेगळं राहण्याची अट घातली."

"मला असं वाटतं आपण इथून निघुया. मला एक क्षण देखील ह्या मुलीचा चेहरा पाहवत नाहीये." आभा ची आई.

"नाही थांबा. आभा, पोलिसांना फोन कर आणि बोल हिला घेऊन जायला." सायली चे बाबा. आभा चे बाबा आभा ला नाही अस खूणावून पुढे होतात आणि सायली च्या बाबांना धीर देतात.

"हे बघा मला कळतंय तुम्हाला आता काय वाटतं असेल आणि काय तुमच्या मनाची अवस्था झाली असेल. एकुलता एक मुलगा जाण्याचं दुःख ईथे कोणीच जाणून घेऊ शकत नाही. ह्यात तुमची काही चुकी नाही. उगाच बदनामी होऊन तुम्हाला अजून दुःखात नाही लोटता येणार मला." सायली त्यांच बोलणं ऐकून बाबांच्या पाया पडत त्यांना सॉरी म्हणायला जाते तितक्यात ते तिथून उठून दुसरीकडे जातात.

"बाबा प्लीज मला माफ करा. मला फक्त एक संधी द्या. आई ऐका ना तुम्ही तरी समजावा ना बाबांना. आज्जी प्लीज. प्लीज कोणीतरी माझं ऐकुन घ्या. माझं खरच अभीवर खुप प्रेम आहे. अभी बोल ना काहीतरी काय झालं तु का काही बोलत नाही..अभी..." इतका वेळ सगळं ऐकत चकार शब्दही न काढणारा अभय ने सगळ्यांसमोर बोलला,

"घटस्फोट.. लवकरात लवकर.." जे ऐकुन सायली ला धक्का बसला. पण इतर सगळ्यांना त्याचा हा निर्णय पटला.

"अभी.. काय बोलतोयस तु. असं नको बोलुस. मला नको अस एकटीला सोडून जाऊ. मी खरच तुझ्यावर प्रेम करू लागलेय अभी. ऐक ना.." पण अभय काहीच न ऐकता तिथून निघून बाहेर जातो. आभा आज्जी ला हाथ देत उठवत असताना पुन्हा सायली आज्जी च्या समोर जाऊन त्यांची माफी मागते. गयावया करते.

"सायली तुला माहीत नसेल कदाचित, आदित्य च्या गेल्यानंतर तुमच्या घराची जबाबदारी स्वतःहून त्याने घेतली होती. तुम्हा सगळ्यांची काळजी कशी घेता येईल याच्याच विचारात होता तो. त्याला तर माहीत ही नव्हती तु कशी आहेस, तुझा स्वभाव कसा आहे, पण तुझ्या आत्याच्या त्या अटीमुळे त्याने तुझ्याशी लग्न करून तुला सर्वस्व मानलं. आणि त्याचा शब्द पाळला. तुझ्यावर विश्वास ठेवून खुप मोठी चूक केलीय आम्ही." सायली ला पुढे काही बोलवेच ना. ती अशीच हताश होऊन उभी होती. पाटील कुटुंब सगळे तिथून निघून गेले. श्रीकांत देखील त्यांच्या गाडीपर्यंत गेला.

"मला माफ कर श्रीकांत, आज केवळ मला आणि माझ्या घरच्यांना मदत करण्यासाठी तु तुझ आणि तुझ्या आई च्या नात्यात दुरावा आला. ह्याची परतफेड कशी करू मी कळत नाही. पण इतकं नक्की की मी कधीही तुझ्या मदतीला जशी असेल तशी धावून येईल..."

"मग त्यासाठी तुला माझी बायको व्हावं लागेल."

"काय..?"

"हो मग एक बायको च तर नवऱ्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीत, अडीअडचणींत कुठेही असली तरी कधीही मदतीला धावून येते."

"येते मी काळजी घे." आभा ला काय बोलावे कळत नव्हतं.

"त्यासाठीच तर बोलवतो आहे. आयुष्यभराची साथ देऊन काळजी घेण्यासाठी."

"आई आहे ना.."

"हो. पण आता अवघड आहे. वाटत आता घरातही घेणार नाही ती." त्याचा पांचट विनोद ऐकुन आभा मंद हसत मान हलवत, त्याचा निरोप घेते. आणि निघून जाते. पाठमोऱ्या गाडीकडे तो दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहतो. परिस्थितीची जाणीव होताच हळूहळू त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर गंभीर छट उमटते. तो आत घरात जातो. काही क्षणापूर्वी वादळ आलेल्या घरात निरव शांतता पसरली होती. सायली च्या बाबांना तिची आई धीर देत होती तर आत्या ही तशीच त्यांच्या शेजारी डोक्याला हात लावून होती आणि सायली एका कोपऱ्यात शून्यात नजर लावून बसली होती.

"मामा, शांत व्हा. चला वरती तुमच्या खोलीत." श्रीकांत जाऊन त्यांना उठवतो आणि खोलीत घेऊन जायला निघतो. तितक्यात त्यांचा तोल जातो आणि ते पडणार तोच आई आणि श्रीकांत बाबांना पकडतात. आत्या देखील त्यांना सांभाळायला पुढे सरकत त्यांना हात लावायला जाते. पण सायली चे बाबा हात दाखवून तिला तिथेच थांबायला सांगतात.

"नको. अजून नको माझ्या जीवनात विष कालवू."

"दादा.."

"जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथून आणि माझ्या आयुष्यातून निघून जा. यापुढे माझ्याशी कोणतेही संबंध नसतील. तुझ्याशी ना सायली सोबत." बाबांच्या तोंडून हे वाक्य ऐकताच सायली आणि आत्या बिथरतात. आपण हे काय करून बसलो याचा त्यांना पच्छाताप होतो.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

दुसऱ्या दिवशी

आभा च्या घरी काल आल्यापासून कोणीच न जेवता आपापल्या खोलीत आले तसे फ्रेश होऊन निघून गेले. प्रवासात थोडफार आभा ने जबरदस्ती करून सगळ्यांना खायला लावले तेव्हढेच. कोणीच ह्या विषयावर चर्चा करत नव्हते. अभय सुद्धा खुप धक्क्यात होता. इतकं प्रेम करून देखील त्याच्या वाट्याला हे सगळं येईल त्याला कधी वाटल नव्हतं. आई ने रात्री त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला थोडावेळ एकटं राहू दे म्हणत तो विषय काढला नाही. आभा पण त्याच्याशी बोलणार होती, पण लगेच बोलणं ह्यावर तिला ठीक वाटलं नाही म्हणून ती गप्प होती.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सायली च्या घरी

सायली च्या घरी देखील अजुनही तशीच शांतता होती. आई तिथेच त्यांच्या शेजारी बसल्या होत्या. काही वेळाने आत्या आणि सायली त्यांच्या खोलीत आल्या पण बाबांनी त्यांना पाहून न पाहिल्यासारखं केलं. श्रीकांत त्यांच्या गोळ्या घ्यायला मेडिकल स्टोअर मध्ये गेला होता. तो ही नुकताच आला आणि खोलीत दोघींना पाहून त्यानेही दुर्लक्ष केले.

"मामा, ही वेळ नाहीये खरतर पण परिस्थिती अशी आहे की कधीही काही होईल त्यामुळे मी आत्ताच सांगून ठेवतो तुम्हाला." आता श्रीकांत काय बोलणार त्या दोघींना काही कल्पना नसल्याने दोघी एकमेकांना पाहू लागल्या.

"बोल ना काय झालं.."

"मामा मी आभा सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे." आत्या त्याच्या वाक्यासरशी चकित होते. पण तिच्या ह्या वागण्याने पुढे काही ती बोलूच शकत नव्हती.

"ह्म्म.. निर्णय अगदी बरोबर आहे. पण श्री आता ही वेळ नाहीये. आपल्यावर त्यांचे उपकार आहेत. ते कधी आपण फेडू शकत नाही पण म्हणून अजुन त्यांना त्रास द्यायचा का..?"

"हो मामा पण मी तरी कुठे म्हणतोय की आत्ताच मला लग्न करायचं आहे."

"आभा ला ओळखतो आम्ही. छान, गुणी मुलगी आहे ती. पण आता तिला आणि तिच्या घरच्यांना ह्या सगळ्यातून सावरू दे. तिच्या मनातलं जाणून घे मग पुढे काही पाऊल उचल." मामी श्रीकांत ला समजावत होती.

"हो मामी. नक्कीच. पण एकदा का तिने होकार दिला तर मग मी थांबणार नाही." श्रीकांत आत्याकडे नजर टाकत बोलला. आत्या दुःखी मनाने खजील झाली होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all