मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (अंतिम)

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांत रंग भरताना...

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे
भाग दहावा

"ही काय मस्करी आहे. कोण बोलतंय. आणि अभी तो तिथे आहे का..? प्लीज काय फालतूपणा करताय.." पण फोन कधीच कट झालेला असतो. पुन्हा ती त्या नंबर वर कॉल लावते पण तो बंद असतो.

कावेरी खुप घाबरते. ती घड्याळात पाहते तर सव्वा तीन वाजले असतात. ती आभा ला कॉल करायचा विचार करते पण पलीकडच्या व्यक्तीचं बोलण आठवतं. आज जर नंबर बदलला नसता तर तिथे काय झालं ह्या बद्दल आभा ने नक्कीच सांगितलं असत. म्हणून ती पच्छाताप करत होती. आता तिला तिथे जाण्याशिवाय काही पर्याय नसल्याने ती सहा वाजण्याची वाट पाहत बसली. विचार करून करून ती तिचं डोक ठणकायला लागल. साडे पाच च्या सुमारास तिला मेसेज आला. हा तोच नंबर होता. तिला पत्ता पाठवून बरोबर सहा वाजता तिथे येण्यासाठी त्यात सांगितलं होत. मेसेज पाहून लगेच घाईघाईत च निघाली. काका सोसायटी च्या मीटिंग ला गेल्याने तिला सहज निघता आलं.

कॅब करून ती त्या पत्त्यावर पोहचली. पण कुठे नक्की जावं तिला कळेना. ती इथे तिथे पाहू लागली. तितक्यात तिला कॉल आला त्या व्यक्तीचा. त्या व्यक्तीने समोरच्या कॅफे मध्ये शेवटच्या टेबलवर यायला सांगितले. कावेरी चालू लागली. तिच्या मनात खुप धडधड होत होती. अभी चा चेहरा तिला सतत आठवत होता. ती त्या टेबलावर येताच, तिला तिथे फॉर्मल कपड्यांमध्ये एक व्यक्ती बसलेली दिसली. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली तशी ती व्यक्ती देखील उभी राहिली.

"कावेरी..?"

"कोण आहात तुम्ही..?"

"हाय..!" आणि त्या व्यक्तीने शेकहॅन्ड करण्यासाठी हात पुढे केला पण कावेरी ने पूर्णतः दुर्लक्ष केलं.

"अभय कुठेय..?"

"तुम्ही बसाल तर सांगतो सर्व सविस्तर." तो तिला विनंती करत म्हणाला. कावेरी नाईलाजाने बसली.

"हाय मी श्रीकांत. आभा चा होणारा नवरा. तुम्हाला फोन करून इथे बोलवणारा तो मीच होतो. पण ते सगळं खोटं होत."

"काय..?" कावेरी रागात उभी राहिली.

"प्लीज तुम्ही रागवू नका. मी सांगतो तुम्हाला."

"काय सांगणार आहात..? तुम्हाला माहितीये किती जीवाला घोर लागला होता माझ्या, तुमचा फोन येऊन गेल्यानंतर. बोलायचं होत तर सरळ बोलवायचं न. अशी फालतू थट्टा कशाला करायची." कावेरी जोरात त्याच्यावर ओरडली. तिचा आवाज ऐकुन बाकी सगळे त्यांना पाहू लागले. श्रीकांत ने तिला शांत करत पुन्हा बसवले. खुप प्रयत्न केल्यावर थोड्यावेळाने कावेरी शांत झाली.

"आय एम सॉरी. पण मला सांगा जर मी तुम्हाला फोनवरच सगळं सांगून बोलावलं असत तर आला असता का तुम्ही..? नाही आला असता मला माहितीये ना."

"एक मिनिट. तुम्हाला माझा नंबर कुठून भेटला..?"

"ते मी तुमच्या घरी गेलो होतो. मोबाईल व्हेरिफिकेशन करायला आलोय म्हणत आभा कडून घेतलेला तुमचा जुना मोबाईल नंबर दाखवून नवीन नंबर घेऊन आलो." कावेरी ला हसू की रडू काही कळत नव्हतं.

"हो पण म्हणून ही अशी पद्धत योग्य आहे का..? जर का मी पोलिसांना बोलवलं असतं तर काय झालं असत.."

"चुकलंच माझं जरा पण सध्या परिस्थितीच अशी आहे की.."

"म्हणजे काय झालं सगळ ठीक तर आहे ना तिथे..?"

"ठीक आहे ही आणि नाही सुद्धा." त्यानंतर श्रीकांत ने आतापर्यंत घडलेला सगळा वृत्तांत तिला सांगितला. त्याच बोलणं ऐकताना कावेरी च्या चेहऱ्यावर येणाऱ्या छटा सतत बदलत होत्या. सायली वर तिला खुप राग आला. आत्यावर देखील आला आणि तिने तसे बोलूनही दाखवले. जरी ती त्याची आई असली तरीही.

"हे बघ मी मानतो झालेल्या गोष्टी खुप विचित्र आहेत पण किती दिवस त्यांना असच कवटाळून बसायचं. आपल्याला च त्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल ना.."

"पण मी काय करू शकते.."

"तुम्हाला काहीच करायचं नाहीये. मी तर तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून द्यायला आलोय."

"जे आता कधीच शक्य नाहीये."

"पण का..?"

"आता वेळ निघून गेलीय."

"पण उशीर नाही ना झालाय.."

"तरीही माझं उत्तर नाहीच असणार आहे."

"अभय ला तुमच्याशी लग्न करायचं असेल तरीही..?"

"तो का करेल माझ्याशी लग्न.. त्याच प्रेम तर..."

"बघा, घडलेला सगळा प्रकार तुम्हाला मी सांगितला. तिने घात केलाय त्याच्या मनावर. त्यातून त्याला सावरताना किती त्रास झाला असेल ते तर तुम्हाला कळू शकत. तुमचं त्याच्यावर असलेलं प्रेम आम्हाला मिळवून द्यायचं आहे ही आमची इच्छा आहे. तो कधीच तुम्हाला स्वतःहून लग्नासाठी विचारणार नाही कारण त्याला तो स्वार्थ वाटतोय. इथे तुम्हाला मी धमकी देण्यासाठी नाही आलोय. हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. जर तुम्हाला ही हयात स्वार्थ वाटतं असेल तर तुम्ही तुमच्या वाटेला जाऊ शकता."

"त्याला स्वतःला यायला लाज वाटत होती का.. आजची गोष्ट नाहीये, लहानपणापासून च असा करत आलाय तो नेहमी माझ्यासोबत. नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो ना तो मग माझा का नाही केला कधी.." कावेरी तिचे दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून रडू लागली.

"यापुढे तुझाच विचार करेन आय प्रॉमिस." आवाज ओळखीचा वाटल्याने तिने चेहऱ्यावरचा हात काढून पाहिला तर बाजूला गुडघ्यावर बसून दोन्ही हाताने कान पकडले होते तो अभय होता. कावेरी त्याला पाहताच आश्चर्य चकित झाली. त्याच्या पाठी मागे पाहिले तर सगळे पाटील कुटुंब, श्रीकांत चे आई बाबा, तसेच त्याचे मामा मामी आणि सोबत तिचे आई वडील देखील होते. सगळे एकत्र ओरडले.
 

"सरप्राइजSsss"
 

हे सत्य आहे की स्वप्न तिला काहीच कळेना. तिने हळूच चिमटा काढून पाहिला स्वतःला तेव्हा तिची खात्री पटली की हे सत्य होत जे तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की अस होईल. आभा तिच्या आणि कावेरी च्या आई बाबांना समजावून त्यांना इथे घेऊन आली होती. शेवटी आपल्या मुलांच्या आनंदाशिवाय दुसर काहीच महत्वाचं नाही म्हणत त्यांनी देखील झालेलं सोडून दिलं आणि ते ही सहभागी झाले त्यांच्या ह्या प्लॅन मध्ये. काहीवेळ तिथे बसून तिला सगळ समजावून सांगितलं. मग थोड्याफार गप्पा मारून दोघांना कॅफे मध्ये सोडून बाकी सगळे जवळच्या हॉटेल मध्ये जेवायला गेले. अभय ने पुन्हा एकदा तिची मनापासून माफी मागितली. कावेरी ने ही पुन्हा त्या जुन्या आठवणी न काढण्याचे वचन त्याच्या कडून घेतले. आणि ते दोघेही बाकी सगळे गेलेल्या हॉटेलवर पोहचले. आणि सेलिब्रेशन सुरू झालं.

पुढच्या आठवड्यात

शेवटी आभा आणि श्रीकांत व अभय आणि कावेरी चे लग्न जमले. सेलिब्रेशन पार्टी च्या दोन दिवसानंतर च दोन्ही जोडप्यांचा साखरपुडा झाला. लग्न पुढच्या किंवा काही महिन्यानंतर करण्याचे आधी ठरले होते परंतु कावेरी ला आता कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती म्हणून तिच्या हट्टापायी पुढच्या आठवड्यात च लग्न करण्याचे ठरले. लग्न पुढच्या आठवड्यात असल्याने आता फक्त त्यांच्याजवळ सात दिवस तयारी साठी उरले होते. बाकी लग्नाच्या आठवड्यात येणाऱ्या रविवारी लग्नाची तारीख ठरवली. आणि आधीच्या प्रत्येकी दिवसांत बाकी सगळे कार्यक्रम ठरले. आभा ने लग्न साध्या पद्धतीत करण्याची इच्छा श्रीकांत ला बोलून दाखवली होती. म्हणून त्याने सगळ्यांना दोन दिवसात सगळी कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करण्याचे सांगितले. अभय आणि बाबांना ना सोबत घेऊन त्याने त्याची सगळी उपाय योजना सांगताच बाबांच इतक्या लवकर तयारी कशी होईल ह्याच टेन्शन मिटल होत. दोन दिवस आभा, कावेरी आणि त्यांच्या आई सगळ्या मिळून खरेदी ला गेल्या होत्या. त्या दोन दिवसात सतत व्हॉट्स अप, व्हिडिओ कॉलिंग द्वारे खरेदीच्या चॉइस होत होत्या. अखेर कसे बसे त्यांनी त्यांची खरेदी संपवली होती. त्या उरलेल्या चार दिवसात पॅकिंग आणि इतर कामांची लिस्ट काढली होती त्या सगळ्या पूर्ण करायच्या होत्या. जरी साध्या पद्धतीत असलं तरी लग्न म्हटलं तर खुप कामे असतात.

अभय ने जवळच्या आणि खास लोकांना आमंत्रण दिली. येणाऱ्या लोकांना चांगली आठवडा भराची सुट्टी काढून येण्यासाठी सांगितले होते. श्रीकांत च्या सांगण्या वरून त्याने तिथे भेटण्याचे ठिकाण फक्त टाकले होते पण लग्न कुठे आहे हे मुद्दाम टाकले नाही कारण त्याला आभा ला सरप्राइज द्यायचे होते. पत्रिकेवर असणाऱ्या बाप्पाचा अपमान किती वेळा त्याने पाहिला होता. त्यामुळे अभय ने ह्या वेळी कागदी पत्रिका वाटण्या ऐवजी त्याने डिजिटल माध्यमाने सगळ्यांना आमंत्रित केले. त्यामुळे पत्रिकेचा चा खर्च वाचला. त्या खर्चात त्याने जवळच्या वृद्धाश्रमात जाऊन ते त्यांना देणगी स्वरूपात दिले आणि बदल्यात सगळ्या आजी आजोबांचे शुभ आशीर्वाद सगळ्यांसाठी घेतले.

शनिवार आला तसा श्रीकांत च्या सांगण्यानुसार सगळे संध्याकाळी सगळे तयार होऊन आपआपले सामान पॅकिंग करून खाली श्रीकांत ने पाठवलेल्या गाडी जवळ येऊन सामान आत ठेवू लागले. मागून छोटी मिनी बस देखील आली. त्यात बाकी सगळे आमंत्रित केलेले नातेवाईक आणि मित्र मंडळी होती. अभय, श्रीकांत आणि बाबां शिवाय कोणालाच लग्नाचे ठिकाण माहीत नव्हते. बस मध्ये मज्जा मस्ती करत शेवटी दोन एक तासाने त्या ठिकाणी पोहचले. श्रीकांत आणि अभय दुसऱ्या गाडीत होते. ते आणि त्यांची मिनी बस आधीच तिथे येऊन उभी होती. ते ठिकाण होत, "नेचर वॉक" (काल्पनिक ठिकाण). जिथे श्रीकांत ने आठवड्याभरा साठी बुकिंग केले होते. हिरवागार परिसर, विविध प्रकारचे घरे, तिथल्या पक्ष्यांचे मंजुळ आवाज, नदी, त्यातली बोट, दुरून दिसणारे डोंगर, लाल मातीचा सुगंध, मुंबई सारख्या शहरात अगदी सुंदर गावासारख तिथलं मंत्रमुग्ध करणार वातावरण बघून क्षणभर सगळे भारावून गेले. आत प्रवेश करताना तिथे आभा Weds श्रीकांत आणि अभय Weds कावेरी असं लिहलेले पाहून आभा हळूच गालात हसली. मोठ्या मोकळ्या जागेवर सुंदर मंडप बांधला होता. कावेरी भान हरपून सारं काही पाहत होती. तिला तर सगळ स्वप्न वाटत होत. सगळ्यांनी आपले सामान काढून बाहेर येऊन आजुबाजूचा परिसर बघण्यास गुंग झाले. थोड्यावेळाने अभय आणि श्रीकांत ने सगळ्यांना फ्रेश होऊन आराम करण्यासाठी सांगितले. सगळे आपल्या रूम्स ची चावी घेऊन आराम करण्यासाठी निघून गेले.

दोन दिवस कसे निघून गेले कोणालाच काही कळले नाही. मेहंदी चा आजचा कार्यक्रम छान पार पडला. आभा आणि कावेरी ज्यांनी यापुढे कधीच हाताला मेहंदी न लावण्याचे ठरवले होते त्या दोघींनी ही हातभर सुंदर आणि रेखीव मेहंदी काढली होती. मेहंदी मध्ये नाव कोरत असताना कावेरी आणि आभा थोडावेळ पुरत्या भावनिक झाल्या. त्यांना त्यांची मागील मेहंदी ची जळमटे आठवली. ज्यात आज खऱ्या प्रेमाचा रंग चढणार होता. रात्री सगळे जेवून हॉल मध्ये येऊन गप्पा मारत होते. मग अंताक्षरी चा खेळ मधीच सुरू झाला होता. गाणी बोलताना मध्येच आपल्या प्रेमी जोडप्यांची होणारी नजरानजर ह्याने गालावर लाली चढत होती. अंताक्षरी चांगलीच रंगली होती अगदी रात्री उशिरा पर्यंत. मग आज्जी चा ओरडा बसला तेव्हा कुठे सगळ्यांना उद्याच्या कार्यक्रमांची जाणीव झाली. मग ओरडा खात सगळे आपल्या खोलीत निघून गेले. मगाशी होत असलेल्या गडबड दंग्या च्या वातावरणात आता निरव शांतता पसरली होती. कावेरी ला झोप येत नसल्याने ती बाहेर येऊन एकटीच तलावाच्या दिशेने दूरवर असलेला चंद्र पाहत उभी होती. तिला तिच्या पाठीमागे कोणीतरी असल्याचं जाणवलं. तिने झटकन मागे वळून पाहिले. त्या व्यक्तीचा चेहरा तिला अंधारात नीटसा दिसला नाही. ती खुप घाबरली. तिथून निघून जाताना तिचा पाय अडखळळा आणि ती ओरडणार तितक्यात त्या व्यक्तीने खाली पडण्यापासून वाचवलं आणि तिच्या तोंडावर हात ठेवला. कावेरी डोळे उघडून पाहते तर तिच्या डोळ्यांसमोर अभय होता. तिचा अभी. ती त्याच्या कुशीत होती. ती लाजली आणि सावरत उभी झाली.

"अभी.. तु काय करतोयस इथे..?"

"हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तु काय करतेय इथे..? आज्जी ने पाहिलं तर तुझ काही खर नाही.."

"हो. मला झोप येत नव्हती रे.."

"काय बोललीस, परत बोल.."

"काय झोप येत नव्हती."

"झोप येत नव्हती रे...? रे..?" अभय भुवया उंचावात म्हणाला.

"मग काय बोलायचं.." कावेरी लाजत बोलली.

"रे वैगरे नाही हा. आता नवरा होणार आहे मी. अहो बोलायचं..! काय बोलायचं..?"

"अहो.." कावेरी मान हलवत बोलली.

"जा आता खुप उशीर झालाय. जाऊन झोप." कावेरी गुड नाईट बोलून तिथून जात होती.

"आणि ए वेडाबाई,"

"हं.." कावेरी ने मान वळवून पुन्हा पाठी पाहिलं.

"मस्करी करत होतो. नवरा तर असेनच पण आधी मित्र आहे मी तुझा. सो अहो नंतर अरे आधी." अभय डोळा मारत म्हणाला. तशी कावेरी लाजत तिथून निघून गेली. मग दबक्या पावलांनी आपल्या रूम मध्ये आली. बाजूला आभा झोपली होती. तिची झोपमोड होऊ नये म्हणून तिने हळूच दार बंद करत बेडवर जाऊन पडली आणि पुन्हा आपल्या हातावरील अभय च्या नावाची मेहंदी आणि हिरवा चुडा मनभरून पाहून घेतला. तिला कित्येक दिवसांनी आज छान वाटत होतं. देवाचे मनोमन आभार मानत ती झोपून गेली.

**********************

लग्नाच्या दिवशी

मराठमोळ्या सौंदर्यात दोन्ही नवरी मुली नटल्या होत्या. कावेरी ने जांभळ्या रंगाची तर आभा ने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी घातली होती. आज्जीने बघताच दोघींची दृष्ट काढली. मंगळाष्टकांची वेळ येताच कावेरी च मन धडधडू लागलं. काल रात्री अभय ची उष्टी हळद लावताना तिचं मन अगदी फुलपाखरा इतकं हलकं झाल होत तसं तिला वाटू लागलं. मधेच तिला तो दिवस आठवू लागला. ज्या दिवशी अभय ने सायली च्या गळ्यात हार घातला होता. पण आज दिवस आपला आहे. आज च्या दिवशी अभय आपल्या गळ्यात हार घालणार, म्हणत तिने सगळे विचार बाजूला सारले. मंगलाष्टके संपली. दोन्ही जोड्यांनी मिनिटाच्या फरकाने आपापल्या जोडीदाराच्या गळ्यात हार घातला. लग्नाचे सगळे विधी पार पडले. अखेर आभा श्रीकांत ची आणि कावेरी अभय ची ऑफिशियली झाल्या. सगळ्यांनी नवरदेव आणि नवरी ला गिफ्ट देऊन फोटोज् काढून घेतले. श्रीकांत ने मुद्दाम जेवणाची पंगत ठेवली. सगळे जण एकत्र नवरा नवरी सोबत जेवायला बसले. रिती नुसार दोन्ही जोडप्यांनी जेवताना एकमेकांना घास भरवत उखाणे सुद्धा घेतली.

जेवण वैगरे करून सगळे आता घरी निघण्याची तयारी करू लागले. बाहेर दोन सफेद गाड्या उभ्या होत्या. त्यावर गुलाबांच्या पाकळ्यांनी सुंदर सजावट केली होती. दोन्ही जोडपे सगळ्यांना नमस्कार करत येत होते. कावेरी आणि आभा सगळ्यांच्या गळाभेट घेत होत्या. डोळ्यांत पाणी होत. बाबांची गळाभेट घेत असताना दोघींच्या भावना अनावर झाल्या आणि त्या खुप रडू लागल्या. वातावरण देखील भावनिक झाले होते. लहानपणा पासून जिवापाड प्रेम करून जपलेली बाहुली अशी एकाएकी घरातून निघून जातेय हे पाहताना दोघींचे आई वडील भरपूर हळवे झाले. पाऊले उचलत नव्हती तरी जड अंतःकरणाने त्यांनी गाडीत बसवत आपल्या मुलींचा निरोप घेतला. गाडीत निघून जाईपर्यंत ते हात हलवत बाय करत राहिले. थोडावेळ थांबून बाकी सगळे मित्र मंडळी आणि नातेवाईक देखील एकमेकांचा निरोप घेऊन बस मध्ये चढले. पाटील आणि देशमुख कुटुंबांनी कावेरी च्या आई वडिलांचा निरोप घेऊन ते देखील आपापल्या गाडीत बसले.

आभा च्या डोळ्यांतून अश्रू वाहण्याचे थांबत नव्हते. श्रीकांत ने हळूच तिच्या हातावर हात ठेवत तिला धीर दिला. दुसरी कडे अभय देखील कावेरी ला मिठीत घेऊन तिच्या पाठीवर हळुवार हात थोपटत तिला शांत करू लागला. न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांत आता चांगलाच रंग चढला होता. त्यामुळे चौघांच्या डोळ्यांत थोडे आनंदाश्रु देखील तरळले. पुढील आयुष्याची स्वप्न रंगवत असलेल्या जोडप्यांना आपल्या कुशीत घेऊन ही गाडी सुखद वळणाच्या दिशेने सुसाट वेगाने धावत जात होती.

****** समाप्त *****

????????वाचकांना मनापासून Thank You.. पुन्हा भेटू लवकरच.. खुप miss करेन तुम्हाला आणि तुमच्या कथेबद्दलच्या प्रेमळ  प्रतिक्रियांना.. ????????

ह्या कथेचे सारे हक्क © अक्षता कुरडे. यांच्या जवळ राखीव आहेत..
ही कथा कॉपी पेस्ट करून किंवा परवानगी शिवाय दुसऱ्या प्लॅटफॉर्म टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

🎭 Series Post

View all