मेघ दाटले - भाग 7

Love , suspense

मेघ दाटले - भाग 7 

( किशोर आणि निशा राजवाडे यांचा खून झाल्यामुळे त्यांनी दत्तक घेतलेली मुलगी नुपूर ही मुंबईहून गावी येते. या खुनाच्या तपासासाठी अजिंक्य इनामदार या क्राईम ब्रँचच्या इन्स्पेक्टरची नेमणूक केली जाते. तो गावी येतो. एकेक पुरावा , केसचा अभ्यास करता करता तो किशोररावांचे भाऊ नितीन , त्यांचा शेतकरी मुलगा दिनेश यांना भेटतो. किशोरराव आणि ऑफिसच्या मॅनेजरशी झालेल्या वादाची चौकशी करायला अजिंक्य कंपनीत जाऊन येतो. तिथे त्याला समजत की सध्या मि. मोहिते हे नुपुरचे मामा कंपनीचा कारभार बघत आहेत. ह्याच संबंधी विचारायला तो नुपुरकडे येतो. तेव्हा ती फोन वर बोलत असते. पाहूया पुढे......) 


" नुपूर.........!! " अजिंक्यने हाक मारली तशी ती दचकली. तिने मागे वळून पाहिलं. 


" तू.......... तू कधी आलास...?? " तिला काय बोलावं सुचेना. 


" आत्ताच....... तू फोन वर बोलत होतीस तेव्हा. काही झालंय का...? " त्याने विचारलं.


" Nothing.... चल आपण आत जाऊन बोलू." 


खरतरं तिला ऑफिस मधुन फोन आला होता. आई बाबांच्या अनपेक्षित खुनामुळे तिला गावी यावं लागलं होतं. त्यामुळे कितीतरी दिवस ती घरीच होती. शेवटी न राहवून तिने जॉब सोडायच ठरवलं आणि तिनं तसं सरांना फोन करून कळवलं देखील. तरी आज दोन दिवसांनी त्यांचा तिला फोन आला. कंपनीमध्ये काहीतरी गडबड झाली होती. त्यासाठी तिला ते पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यासाठी सांगत होते. पण तिचं कशातच मन लागेना त्यामुळे तिने पुन्हा जॉईन करायला नकार दिला. ती त्यांच्याशीच बोलत असताना अजिंक्य येऊन उभा राहिला. दोघेही मग आत आले. झालेल्या फोनबद्दल तिने त्याला काहीच सांगितलं नाही. तिला वाटलं कदाचित आपण घेतलेला निर्णय त्याला आवडणार नाही. त्यामुळे ती गप्प राहिली. दोघेही गप्पच होते. काय बोलावं त्यांना कळेना. 


" मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं...." अजिंक्यने बोलायला सुरवात केली. 

" हा बोल ना........

" आम्ही तुमच्या कंपनीत जाऊन आलो. तिथे समजलं की तुझे मामा सध्या कंपनी हाताळत आहेत. या बद्दल तू सांगितलं नाहीस कधी...." अजिंक्यने विचारलं. 


" तशी मुद्दाम सांगायची वेळच आली नाही. कारण मामा गेली चार वर्ष डॅड सोबतच आमचा बिझनेस बघतोय. मी फस्ट इअरला असताना डॅडना हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी मामाने पुढे होऊन सगळं सांभाळलं होतं. कारण डॅड कंपनीत जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मग तोच बघायचा सगळं. डॅड बरे झाल्यावरही मग त्यांनी त्याच्यावरच जबाबदारी टाकली. कधी ते नसले , बाहेर गेले तरी कंपनीच काम अडू नये म्हणून त्यांनी त्यांच्या नंतर जर कोणाला ऑथोरिटी दिली असेल तर ती मामाला....!! " एवढं बोलून ती थांबली.


" हा. पण मग ते कुठे असतात....?? आणि एवढी मोठी घटना घडल्यावरही ते आले कसे नाहीत...? " त्याच्या पोलीस मनाला आता शंकांनी वेढलं होतं.


" मामा पनवेलला असतो. तो तिथल्या एका कंपनीत कामाला आहे. डॅडनी त्याच्यावर आमच्या कंपनीची जबाबदारी टाकल्यामुळे तो इकडे पण लक्ष देतो. डॅड नि मॉम गेले त्यावेळी म्हादू काकांनी त्याला फोन केला होता. पण त्याला कामासाठी बाहेर जावं लागलं म्हणून तो आला नाही. असं मला म्हादू काकांनी सांगितलं. मी तेव्हा खरंतर काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते...." ती विषादाने म्हणाली. 


'कंपनीच्या कामात लक्ष देणारे मामा अगदी राजवाडेंच्या खुनाच्या वेळीच कसे बाहेरगावी गेले ' अशी एक शंकेची पाल अजिंक्यच्या मनात चुकचुकली पण त्याने तसे काही जाणवून दिले नाही. एवढ्यात त्याचा फोन वाजला. शिंदेंचा फोन होता.


" हॅलो , हा शिंदे बोला. " अजिंक्य.

" साहेब... त्या दिवशी त्या राजवाडेंच्या घरात तो चाकू मिळाला ना त्याचा फॉरेन्सिक कडून रिपोर्ट आलाय..." 


" हा... त्यावर कोणाचे फिंगरप्रिंटस मिळाले का...?? " 

" नाही ना. तेच सांगायला फोन केला. त्यावर कोणाच्याही बोटांचे ठसे नाहीत. 

" ok. अजून काही...?? " 

" नाही साहेब. " एवढं बोलून शिंदेंनी फोन ठेवला.

" काही कळलं का....?? " नुपुरने विचारलं.

" हो. त्या दिवशी तुझ्या खोलीत जो चाकू मिळाला तो तपासासाठी पाठवला होता. त्याचा रिपोर्ट आला. त्यावरही कोणाचे ठसे नाहीत..." 

त्या दिवशी नुपूरवरती हल्ला झाला तेव्हा त्याला तिच्या खोलीत एक चाकू मिळाला होता. रूममधून खाली येताना त्याने तो चाकू रुमालात गुंडाळून आपल्या खिशात ठेवला होता. सकाळी जेव्हा तो तिथून निघाला तेव्हा          त्याने आधी पोलीस स्टेशनला जाऊन तो चाकू तिथे जमा केला आणि मग तो आपल्या घरी परतला. 


" हा. पण मग आता तुम्ही कसं शोधणार त्या माणसाला...?? " तीने अगदी लहान बाळासारखं विचारलं. त्यावर त्याला हसु आलं. 


" काहीही झालं तरी आम्ही त्या माणसाला शोधून काढुचं. अजूनही तपासाच्या बऱ्याच वाटा आहेत... चल मी निघतो. खूप उशीर झालाय. जेवण पण करायचं आहे..." तो हसून म्हणाला. 


" तुला जेवण करता येत....??? " तिने विचारलं.

" नाही. पण आज ट्राय करायचंय....म्हणुनच निघतो..." 

" मग जेऊन जा ना......" ती पटकन म्हणाली. तसं त्याने बाहेर पडता पडता मागे वळुन पाहिलं.


" नाही नको. पुन्हा कधीतरी......" एवढं बोलून तो बंगल्याच्या पायऱ्या उतरून गेला सुद्धा. ती आपली त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघत राहिली.


......................................


 थोड्या वेळाने निर्मला काकू तिला जेवायला बोलवायला आल्या. ती मग जेऊन येऊन पुन्हा सोफ्यावरती पुस्तक वाचत बसली. पण तिचं काही त्यात लक्ष लागेना. ' आपण अजिंक्यला जेवायला थांबवायला हवं होतं का...?? किती करतो तो आपल्यासाठी..!! एका केस साठी तो मुंबईहून एवढ्या लांब आला. परवा मी इतकी घाबरले होते तरी माझ्या एका फोनवर तो धावत आला..... ' या विचारांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं होतं. थोड्या वेळाने मनाशी काहीतरी ठरवून ती उठली. म्हादू काकांना तिने जेवणाचा डबा भरायला सांगितला आणि त्यांना घेऊन ती अजिंक्यच्या रूमकडे निघाली. पोलीस क्वार्टर्स प्रमाणेच त्या खोल्याही लागूनच होत्या. त्यातल्या एका खोलीत अजिंक्य राहत होता. खोल्यांच्या समोर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये नुपूर आणि म्हादू काका येऊन उभे राहिले. तिने म्हादू काकांकडून जेवण हातात घेतलं आणि त्यांना परत पाठवलं. म्हादू काका गेल्यावर ती आतल्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागली. तर तिला काहीतरी ठाक ठाक आवाज येत होता. म्हणून हळूच दार उघडून ती आत गेली. तीन खोल्याचं ते छोटंसं घर होतं. तिनं पाहिलं तर बाहेरच्या खोलीत कपडे इकडे तिकडे टाकलेले होते. घर तसं जुनं असल्याने भिंतींचे पोपडे निघाले होते. रंगकाम तर कितीतरी दिवसात झालेलं नसावं. ती हळूहळू चालत आत किचन पाशी आली. तिनं बघितलं तर अजिंक्य पातेली गॅसवर ठेवून त्या मध्ये मोठा चमचा आपटत होता. तिला हसू येत होतं.  घरात असल्याने तो व्हाईट कलरची बनियन घालून जेवण करण्यात गुंतला होता. व्यायाम करून कमावलेलं त्याच पिळदार शरीर त्यामुळे उठून दिसत होतं. तो घामाने डबडबला होता. जेवण करण्याचे प्रयन्त चालू होते हे त्याच्याकडे बघून स्पष्ट कळत होतं.पण त्याच्या मनासारखं काही जेवण होत असेल असं वाटलं नाही. ती चालत ओट्यापाशी आली. एका पातेलीत करपलेला भात वातावरण सुगंधीत करत होता. त्यावर तिला अजुनच हसू आलं. तो चमचा आपटत असलेल्या पातेलीकडे तिनं टाचा उंचावून पाहिलं. साहेब मॅगी करण्याच्या नादात होते. पण तीही जमेना. 

" मी काही मदत करू का.....?? " तिने हसून विचारलं. तेव्हा कुठे त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं.


" तू......... तू .... इथे...???? " तो जवळजवळ ओरडलाच.  कारण ती अशी अचानक घरी वगरे येईल अशी त्याने कल्पनाच केली नव्हती. 


" wait...... wait..... मी स्वप्नात तर नाहीये ना.. नुपूर कशाला येईल माझ्या घरी... " त्याने स्वतःच्याच डोक्यावर हात मारला आणि तो पुन्हा कामाला लागला. त्याचं असं वागणं पाहून ती जोरजोरात हसू लागली. तेव्हा कुठे तो भानावर आला.


" तू..... तू खरंच आलेयस.....?? " त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य दिसत होतं.


" मग....? तुला काय वाटलं माझं भूत आलंय म्हणून....??? " ती अजूनही हसत होती. 


" तुला एक सांगू......." त्याने विचारलं तसं तिनं मान डोलावली.  " हसताना छान दिसतेस तू....." तो म्हणाला. त्यावर काय बोलावं तिला कळेना. ती मग लाजून दुसरीकडे बघू लागली.


" जेवण येत नव्हतं तर जेवायला थांबला असतास तरी चाललं असतं......" ती म्हणाली.


" नाही. कशाला उगीच तुम्हाला त्रास. मी करत होतो पण सगळं फिस्कटलं....." त्याने तोंड वेडावत सांगितलं. 

" काय करत होतास एवढं जेवण......?? " तिने उत्सुकतेने विचारलं.

" काही नाही. आईला फोन करून आमटी भात कसा करायचा ते विचारलं आणि भात लावला. पण पाणी कमी झालं वाटतं त्यातलं. सगळा करपला. म्हणुन मग मॅगी करायला घेतली पण तीही काही शिजत नाहीये....." तो रागारागाने गॅस वरच्या पातेल्यात चमचा आपटत म्हणाला. 


लहान बाळं कशी मनासारखं झालं नाही की चिडचिड करतात आज तसच काहीसं अजिंक्यचं झालं होतं. तो सांगत होता तेव्हाच तिनं दाबून ठेवलेलं हसू बाहेर पडलं आणि ती मोठ्याने हसली. 


" ए तू हसू नकोस हा..... मी काही मोठा कुक नाही. मला सगळं जेवण यायला...? तुला तरी येतं का जेवण करता...?? मला सांगतेस ती....." तो जरासा रागाने म्हणाला.


" हो, म. मला सगळं जेवण येतं. ते जाऊदे. मी डबा आणलाय तुझ्यासाठी जेवून घे.." तिने आणलेला जेवणाचा डबा पुढे केला.

" थँक्स. खरतरं मला खूप भूक लागली होती. पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको असं वाटतं...... सो ..." अजिंक्य.


" त्रास कसला.... हे घे जेव...." तिने त्याला डबा दिला. 


तो डबा घेऊन बाहेरच्या खोलीत आला. त्याने डबा उघडला. आमटी भात पोळी भाजी आणि एका छोट्या वाटीत कोशिंबीर होती. तो छानपैकी जेवला. त्याला बरं वाटलं. तो डबा ठेवायला आत आला तर ओट्यावर सांडलेला भात , मॅगीचं पातेलं सगळं आवरून पुसलेलं होतं. त्याने नुपुरला डोळ्यानेच ' थँक्स ' म्हटलं. मग ते दोघेही खूप वेळ गप्पा मारत बसले. अजिंक्य मग तिला सोडायला बंगल्याच्या गेट पर्यंत आला. तरीही ते कितीतरी वेळ  तिथेच रेंगाळत राहिले. बोलणं संपवुन मग नुपूर आत गेली आणि अजिंक्यही आपल्या रूम कडे निघाला. दूर झाडात लपुन बंगल्यावर नजर ठेवून असलेली व्यक्ती सुद्धा आपल्या मालकाला  ' आपण काय काय बघितलं ' हे सांगायला पळत सुटली. 


क्रमशः.... 


महिनाभर भाग पोस्ट करता येणार नाही असं म्हटलं होतं. पण तुमच्यासाठी वेळ काढून भाग लिहायला घेतला आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल. पुढील भाग 29/9/20 रोजी रात्री पोस्ट होईल. 

🎭 Series Post

View all