मेघ दाटले - भाग 9

Love , Suspense

मेघ दाटले - भाग 9

देवाला तिने मनोभावे नमस्कार केला. देवळाच्या आवराभोवती नजर फिरवली सगळं कसं निरव शांत वाटतं होतं. खूप दिवसांनी ती अशी शांतता अनुभवत होती. कॉलेजचं शिक्षण मग नोकरी या सगळ्या मधून तिला स्वतःसाठी वेळच मिळायचा नाही. मुंबईच्या त्या गर्दीच्या कोलहलातून अशी शांतता मिळणं दुर्मिळच...!!!! त्यामुळे देवळात तिला प्रसन्न वाटलं. ती आणि निर्मला ताई दोघीही थोडा वेळ तिथेच बसल्या. संध्याकाळ होउ लागली तसा पाखरांचा किलबिलाट सुरू झाला. सगळेजण आपल्या घरट्याकडे परत फिरत होते.. त्यांच्या किलबिलाटाने सगळा आसमंत उजळला होता. घरी परतणारा सुर्य देखील जाता जाता निळ्या शर्टावर रंग उधळत होता. दोघीही मग उठल्या. पायऱ्या उतरून त्या मुख्य रस्त्याला आल्या आणि त्यांची पावलं घराच्या दिशेला वळली. निर्मला ताई नुपुरला तिच्या आजोबांच्या गोष्टी सांगत होत्या. गावात त्यांना सगळे कसे मान द्यायचे , त्यांच्या शब्दाला गावात असणारी किंमत , मग ते गेल्यावर चुलत्यानी किशोर, नितीन यांच्यात भांडणं लावून दिली ते त्या सांगत होत्या. 

" अण्णासायबानी लई कस्ट केलं. पोरांना बी चांगलं वाढवलं....पर सुख बघवत न्हाय ग पोरी कोनाला... तुझ्या चुलत आजोबांनी लुबाडल बघ सगळं....." निर्मला ताई आपल्या तिला सांगत होत्या. तिच्या डॅड आणि नितीन काकामध्ये वाद होते हे तिला माहीत होतं. पण का , कशावरून याची तिला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या समोर देखील तिने काकांच नाव घेतलं नव्हतं. कारण तिलाच काही गोष्टींची पूर्ण कल्पना नव्हती. त्यामुळे तिने त्यांच्याबद्दल काही न सांगायचं ठरवलं होतं. पण आता आज निर्मला ताईंकडून तिला बऱ्याच गोष्टी कळत होत्या. 

" का , काय झालं......??? " नुपुरने विचारलं.

" आग गावात तुमचा लय मोटा वाडा हाई. तो तुझ्या बाबाच्या काकानी हिसकवला आनी तुझ्या बाबाच्यात आणि काका , आत्याच्यात भांडणं लावून दिली की.....!!! "

" whatt....???  डॅडना बहीण पण आहे.... ? मला माहीतच नव्हतं. फक्त नितीन काका नि डॅड मध्ये वाद आहेत मला ठाऊक होतं पण नक्की काय झालेलं मला माहित नाही...." नुपूर

" आगं ते आमास्नी बी माहीत न्हायी पर ल्योक म्हणत्यात तुझ्या त्या काका आजोबांनी नितीन भाऊला सांगितलं की सगळी जमीन नि ह्यो वाडा तुझा बाबा एकटा घशात घालाया बघतोय.. तुझ्या बाबाला यातलं काय बी माहीत नव्हतं. नितीन भाऊंचा त्या काकावर इस्वास बसला. त्यो तुझ्या बाबाला न्हायी न्हायी ते बोलला. तुझी आत्या बी तसलीच... माहेराची इष्टेत हवी होती ना तिला ती बी भांडली. मग तुझा बाबा हे गाव सोडून गेला मुंबईत....." निर्मला ताई भडाभडा बोलत होत्या. 

" बाप रे. तरीच डॅडना खूप चीड होती काकाची. त्यांनी कधी नावही काढलं नाही त्याचं नि आत्याचं.... मग काय झालं.....?? " तिने कुतूहलाने विचारलं. 

" मग काय..... त्या चुलत्यानी तुझ्या काकाला तुझ्या बाबा इरुद्ध भडकवलं. त्याला वेगल व्हाया लावलं आनी मग त्यांच्यात भांडणं लावली नि वाडा घेतला की आपल्या ताब्यात..... गावात कोनाशी धड न्हाय बग त्या काकाच आनी त्याच्या त्या पोरंग्याचं बी. वाड्यावर बी कोनी कामाला जात न्हाय. तुजा नितीन काका बी तसलाच अजुन बी त्यांच्या तालावर नाचतोया.... " त्या दात ओठ खात सगळं सांगत होत्या. 

" मला यातलं काहीच माहीत नाही. डॅड कधीच काही बोलले नाहीत. " नुपुरला बिचारीला हे सगळं ऐकून शॉकच बसला होता. 

" मग सांगत्येय काय.....!!!! तुज्या बाबानं मातर नाव काढलं बग अण्णासायबांचं.. गावात परत आला ह्यो बंगला बांधला... मोटा कारखाना सुरू केला.. गावातल्या लोकांसनी रोजगार मिलाला बग.. नि तुज्या बाबाचं  वागणं बोलणं बी अण्णांवानी हुत. लोकं जोडली त्यानं समदी.. आमच्या पोरीचं लगीन पन किशोर भाऊंनी लावून दिलनी.. तुजी आइ नि बाबा दोग बी भली मानस हुती.... पर असं काय झालं ...... चांगलं कुनाचं झालेलं बघवत न्हाय गो पोरी कोनाला......" असं म्हणून त्यांनी डोळ्याला पदर लावला. 

नुपुरच्या पण डोळ्यात एव्हाना पाणी उभं राहिलं होतं. बोलत बोलत त्या दोघी बंगल्यापाशी आल्या. म्हादू काकांनी दार उघडलं. दोघीही आत आल्या. निर्मलाताईंनी भाजी नेऊन आत ठेवली. नुपूर तिथेच हॉल मध्ये सोफ्यावर येऊन बसली. आता येताना निर्मला ताई तिला सांगत होत्या तेच सगळं तिला आठवत होतं. तिने थोड्या वेळाने मोबाईल चेक केला. अजिंक्यचा काही फोन मेसेज आहे का ते तिने बघितलं पण मोबाईलवर काहिच नोटिफिकेशन नव्हत्या. मॉम डॅडच्या आठवणीने तिला पुन्हा एकदा भरून आलं होतं. त्यामुळे कोणापाशी तरी मन मोकळं करावं असं तिला वाटायला लागलं. थोडा वेळ ती तशीच शांत बसून राहिली. मग तिनं अजिंक्यला मेसेज करायला मोबाईल हातात घेतला आणि ती मेसेज टाइप करू लागली. 

..........................................

पोलीस स्टेशन वरून निघाल्यापासून अजिंक्यच्या डोक्यात केसचाच विचार घोळत होता. त्या विचारांच्या तंद्रीत तो कधी घरी आला कळलं नाही. तो मग फ्रेश झाला आणि त्याने मस्तपैकी चहा टाकला. तरीही डोक्यात निशा राजवाडेंचा भाऊ , त्या भाडेकरूंना मारल्यावर घाईत बंद केलेली केस.... हे सगळं विचारचक्र फिरत होत. नि दुसऱ्या बाजूला चहा करणं चालू होतं. अचानक त्याचा हात गरम पातेलीला लागला. त्याच्या हाताला जोरात चटका बसला तसा तो भानावर आला. त्याने चहा कपात ओतला आणि चहा पित तो बाहेरच्या खोलीत आला. पँटच्या खिशातून त्याने मोबाईल बाहेर काढला. आज दिवसभर कामाच्या गडबडीत त्याला मोबाईकडे बघायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. त्याने पाहिलं तर नुपुरचा थोड्या वेळापूर्वी मेसेज आला होता. त्याने मेसेज ओपन केला. 

" hi.... आलास का तू घरी ?? "  नुपूर.

" हो आत्ताच. सॉरी दिवसभर बिझी होतो त्यामुळे बोलता नाही आलं. " अजिंक्यने मेसेज सेंड केला. मोबाईलची रिंग वाजली आणि नुपुर घाईने मोबाईल चेक करू लागली.

" its ok... काय करतोयस....?  मला खूप एकटं वाटतं होतं म्हणून केला मी मेसेज......." 

" का गं..... आई बाबांची आठवण येतेय का....?? " त्याने रिप्लाय दिला.

तिने मेसेज वाचला आणि तिला वाटलं ' याला कसं कळलं माझ्या मनातलं..' तिच्या चेहऱ्यावर एक हास्याची रेष उमटली. खरतरं निर्मला ताई तिला आत भाजी निवडायला येता का विचारायला आल्या होत्या. कारण मगाशी तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनाची घालमेल त्यांना जाणवत होती. त्यामुळे तिचं मन दुसरीकडे वळवायला म्हणून त्या भाजीचं निमित्त काढून आल्या होत्या.  पण हातात मोबाईल घेऊन बसलेल्या नुपुरच्या चेहऱ्यावर हसू पाहून त्या परत फिरल्या. मग ती आणि अजिंक्य बराच वेळ मोबाईवर एकमेकांशी बोलत राहिले. त्यामुळे तिला आता बऱ्यापैकी रिलॅक्स वाटलं. इकडे अजिंक्यला देखील तिच्याशी बोलून बरं वाटलं होतं. दिवसभराचा त्याचा कामाचा थकवा कुठल्या कुठे पळाला होता. अचानक त्याच्या दारावर धापकन कायतरी पडल्याचा आवाज आला. त्याने मोबाईल समोरच्या टेबलवर ठेवला आणि तो दार उघडून बाहेर आला. त्याने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं. तो तसाच दोन पावलं चालला नसेल तेच त्याच्या पायाला कायतरी लागलं. त्यानं पाहिलं तर एक कागदाचा बोळा पडला होता. त्याने तो हातात घेतला आणि उघडून पाहिलं. एका दगडाला कागद गुंडाळला होता. त्यावर काहीतरी लिहलं होतं.  दगड बाजूला करून तो कागदावरील मजकूर वाचू लागला. 

क्रमशः.....

माझं शेड्युल सध्या खूप बिझी आहे. पण वाचकांच्या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे जास्त गॅप न घेता पुन्हा लिहायला सुरवात केली आहे. भाग शक्यतो एक दिवस आड पोस्ट करण्याचा प्रयन्त असतो तरीही उशीर झालाच तर तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. भाग 10 उद्या संध्याकाळी पोस्ट होईल. 

🎭 Series Post

View all