Feb 24, 2024
रहस्य

मेघ दाटले - भाग 8

Read Later
मेघ दाटले - भाग 8

मेघ दाटले - भाग 8


' सावली ' बंगल्यावर राजवाडेंचा खून झाल्यापासून कोणीतरी लक्ष ठेवून असायचं. दूरवर पसरलेल्या झाडांमुळे ते लक्षात यायचं नाही. अजिंक्य नुपुरला सोडायला बंगल्या पर्यंत आला होता. तिचा निरोप घेऊन मग तोही आपल्या रूमकडे निघाला. त्यांच्यावर नजर ठेवून असलेली व्यक्ती त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपत असायची. पण त्याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती. अजिंक्य निघून गेला तशी तीही व्यक्ती तिथून बाहेर पडली. चालत चालत ती व्यक्ती एका झोपडीवजा घराजवळ आली. रात्रीच्या त्या अंधारात फक्त रातकिड्यांचा आवाज घुमत होता. रात्र अधिकाधिक गडद होऊ लागली. त्या व्यक्तीने दारातूनच डोकावुन पाहिलं. आतल्या माणसानं त्याला पाहिलं आणि पटकन आत घेतलं. पुन्हा एकवार बाहेर नजर फिरवली. चिटपाखरूही नव्हतं. खात्री करून त्याने दरवाजा लावला आणि तो बाकीच्या माणसांसोबत उभा राहिला. एका खुर्चीवर पायावर पाय टाकून तोंडांत गवताची काडी फिरवत ऐटीत एक व्यक्ती बसली होती. बाजूला दोघे तिघे उभे होते. 

 


" काय मग बारकू...... काय नवीन खबर.....??? " खुर्चीत बसलेल्या व्यक्तीने विचारलं.

 


" काय बी खास न्हाय... हल्ली त्यो इनिस्पेक्टर आनी ती राजवड्यांची लेक सांगाती असतात एकमेकांच्या....त्यो इनिस्पेक्टर लय हुशार हाये.. कंपनीतून बी जावून आला म्हने......."

 


" हम्म... ते कळलंच आमास्नी. तो पोलिसवाला जरा जास्तच पोहचलेला हाय. बड्या बापाची पोरगी मिळतीय फिरवायला तर काय जातंय त्याचं......" त्याच्या या वाक्यावर सगळेच हसले.

 


" पर दादानु त्याच्याकडं दुर्लक्ष करून चालायचं न्हायी. या परकरणाचा तल शोधून काढायच्या आत त्याला इथून उसकवून लावला पायजेल...."  बारकू म्हणाला.

 


" अरे तो काय... पाळंमुळं शोधतोय. त्या आधी आम्हीच त्याचा निकाल लावू..." ती व्यक्ती खुर्चीतून उठत म्हणाली.  " प्रेमाने समजवून बघा त्याला..... न्हाईच ऐकलं बेनं तर ..........." एवढं म्हणून ती व्यक्ती गूढ हसली. त्याच्या हसण्यात बाकीच्यांचीही आपला आवाज मिसळला. रात्र अधिकाधिक गडद होऊ लागली आणि गुन्हेगारी खलबत रंगत चालली होती. दूरवर कोल्ह्यांची कोल्हेकुई रात्रीच्या त्या अंधारात घुमत राहिली. 


............................

 

दोन दिवसांनी अजिंक्य पोलीस स्टेशनला येतो. आत्तापर्यंत त्याला मिळालेल्या माहितीनुसार तो एकेक माहितीचा संदर्भ लावण्याचा प्रयन्त करत असतो. एका मोठ्या व्हाईट बोर्ड वरती या केसशी संबंधित सगळ्यांची नावं लिहिली होती. ' सावली' बंगला , त्यात राहणारे किशोर आणि निशा राजवाडे , त्यांची मुलगी नुपूर, किशोररावांचे भाऊ नितीन आणि त्यांचा मुलगा दिनेश यांच्या माहितीवरून कंपनी मध्ये केलेली चौकशी... तरीही म्हणावे तसे धागेदोरे त्याच्या हाती आले नव्हते. आता या घटनेला जवळपास महिना उलटला होता. पण केस सोडवण्याच्या दृष्टीने सबळ पुरावे मिळत नव्हते. एकेक नाव आणि त्यांच्याशी झालेला सवांद आठवत तो त्या बोर्ड वरती रेघोट्या मारत होता. अचानक त्याला आठवलं की मॅनेजरने निशा राजवाडेंच्या भावाचं नाव घेतलं होतं. मि. मोहिते....!!!! येस...!!! त्यांच्याशी त्याचं अजूनही बोलणं झालं नव्हतं. नुपूर कडून त्याने त्यांचा पत्ता मिळवला होता. त्यामुळे आत्ता त्यांना भेटणं त्याला गरजेचं वाटलं. मग त्याने आणि शिंदेंनी मिळून पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी तपासायला सुरवात केली. 

 

" शिंदे मला सांगा या गावात तुम्हाला किती वर्ष झाली सर्व्हिस करून.....??? " अजिंक्यने विचारलं.

 


" काय साहेब चेष्टा करताय का आमची.....?? " शिंदे हसून म्हणाले. 

 


" अहो नाही. काहीतरीच काय. सांगा ना...?? " 

 

" साहेब माझी पण इकडे हल्लीच ट्रासन्फर झाली. आता 2 वर्ष पूर्ण होतील बघा....." ते म्हणाले.

 


" Ok...  म्हणजे राजवाडेंच्या संदर्भात आधी एखादी घटना घडली असेल तर त्याची तुम्हाला काही कल्पना नसेल.." अजिंक्य काहीसा विचार करत म्हणाला.

 


" नाही साहेब तसं काय माहीत नाही. पण मी जेव्हा इकडे बदली होऊन आलो तेव्हा गावात भीतीच वातावरण होतं. मी चौकशी केली तेव्हा कळलं की राजवाडेंच्या त्या बंगल्यात दोन भाडेकरू राहायचे. त्यांना पण कोणीतरी मारलं असं गावातली लोकं बोलताना कानावर पडलं. पण साहेब मी यायच्या आधीच ती फाईल आधीच्या इन्स्पेक्टरनी क्लोज केली होती. त्यामुळे मी काय लक्ष दिलं नाही मग त्यात....." शिंदे बोलायचे थांबले.

 


" काय.....????  एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला आत्ता सांगताय शिंदे....??? तुम्ही काहीच चौकशी केली नाहीत का त्याबद्दल....? आणि त्या संदर्भात कोणालाच पकडलं नव्हतं......??? "  अजिंक्यच्या चेहऱ्यावर रागाच्या छटा दिसू लागल्या. तरीही तो स्वतःला शांत करत बोलण्याचा प्रयन्त करत होता. 

 


" सॉरी साहेब.. " शिंदे मान खाली घालून उभे राहिले. " पण साहेब मी त्याबद्दल मोठ्या साहेबांकडे विचारलं की ती केस रिओपन करायची का तर ते म्हणाले त्याची काही गरज नाही... तुम्ही आपल्या कामाकडे लक्ष द्या....."  ते पुन्हा अजिंक्य कडे बघत म्हणाले.

 


" It's ok  शिंदे. पण तुम्ही मला हे आधी सांगायला हवं होतं. मी त्या नितीनरावांवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्याबद्दल काही कळलं का....? " त्याने विचारलं.

 


" हो साहेब , मगाशीच आपला माणूस येऊन गेला. त्या नितीनरावांचं गावात कोणाशीच धड बोलणं नाही. त्यांची बायको आणि मुलं पण त्यांना बिचकून असतात. मोठा मुलगा शेती सांभाळतो तो थेट त्याच्या बापासारखा आहे असं गावातली लोकं म्हणतात. त्याच्या नंतरचा एक मुलगा आणि मुलगी आहे त्यांना. पण त्यांचा कोणाशीच संबंध येत नाही......" शिंदे म्हणाले.

 


" अस्स.......!!! " तो जरा विचारात पडला. " अजून काही....???  ते काय करतात कुठे जातात वगरे....??? "

 


" त्यांचा मुलगा दिनेश हा शेतावरच राहतो. फार मोठं शेत नाहीये पण दोन एक एकराचा जमिनीचा तुकडा आहे. त्याचं आणि नितीनरावांचं पटत नाही म्हणे म्हणून तो तिकडे राहतो. त्याची आई आणि बहीण त्याच्यासाठी जेवण वगरे नेतात....." एवढं बोलून शिंदे थांबले.

 


" ok. त्या दोघांवरही लक्ष ठेवून राहा. आणि मला वेळेत अपडेट द्या सगळ्याचे...." असं म्हणून अजिंक्यने घड्याळ पाहिलं. आता जवळजवळ संध्याकाळ होत आली होती. संध्याकाळचे साडेपाच वाजत आले. शिंदेंना सांगून तो घरी जायला निघाला. केसच्याच विचारात तो गाडी चालवत घरी जात होता.

 

........................................

 

खेडेगाव असलं तरी गावात बऱ्यापैकी सगळ्या सोयी उपलब्ध होत्या. रोजच्या लागणाऱ्या वस्तू , भाजीपाला, किराणा सामान , डॉक्टर ,दवाखाना या गरजेच्या गोष्टी गावात मिळायच्या तेवढ्यासाठी तरी उठून शहरात जावं लागत नव्हतं.  एका वारी गावाचा मोठा बाजार भरत असे. त्या दिवशी भाजी पाला , फळं यांची नुसती रेलचेल असायची. वेगवेगळ्या गावातून भाज्यांचे व्यापारी यायचे.  " टोमॅटो 20 रुपये किलो......... ए ए ए इकडे कांदा घे... बटाटा घे..... " अशा आरोळ्यांनी गावातला बाजार सजायचा. नुपूर आणि निर्मला ताई देखील आज बाजाराला आल्या होत्या. आल्या होत्या म्हणण्यापेक्षा निर्मला ताई बळेबळेच आज नुपुरला घेऊन आल्या. घरी बसून तसही ती कंटाळली होती. घरात असलं की आईबाबांच्या आठवणी तिला सतवायच्या. मग पुस्तक वाचत बस नाहीतर म्हादू काकांना आणि मदत कर असं करत ती वेळ घालवायची. तिने बऱ्यापैकी स्वतःला त्या धक्क्यातून सावरलं होतं आणि या सगळ्याला थोड्या फार प्रमाणात अजिंक्यही कारण होता. त्यामुळे आता ती थोडी फार मोकळेपणाने राहायची. दोघीही बोलत बोलत बाजारात आल्या. ती लहान असताना कधी कधी म्हादू काकांसोबत बाजारात यायची. पण तेव्हाचा चार गाड्यांचा असलेला बाजार आता मोठा आठवडा बाजार झाला होता. त्यामुळे तीही सगळं नव्या नवलाईने बघत होती. दोघींनी मिळुन भाजी घेतली. मग त्या गावात असलेल्या गणपतीच्या देवळात गेल्या. देवळाचा नव्याने जीर्णोद्धार केला होता. त्यामुळे देउळ कसं लखलखत होतं. देऊळ थोडं उंचावर होतं. त्यामुळे वीसेक पायऱ्या चढुन दोघीही देवळात आल्या. देवळाचे खांब संगमरवरी खडकांनी सजवले होते.  प्रशस्त जागेमुळे देऊळ मोठं आणि छान दिसत होतं. भिंतीच्या बाजूने येणाऱ्या माणसांना बसण्याची व्यवस्था केली होती. प्रवेशद्वारावर मोठी घंटा लक्ष वेधून घेत होती. घंटा वाजवून नुपूर आत आली. गाभाऱ्यात गणपतीची सुरेख मूर्ती पाहून तिचं भानच हरल. ती कितीतरी वेळ गणपतीच्या त्या मूर्तीकडे पाहत राहिली. तिला वाटलं किती शांत आणि पवित्र वास्तू असते ना देऊळ म्हणजे....!!! आपल्या सगळ्या इच्छा , आकांक्षा , मनातील क्लेश , राग सगळं कसं इथे येऊन थांबतं....!!! इथे मिळणारी शांतता आणि मनाला मिळणारं सुख कोणत्याही हिलस्टेशन किंवा पिकनिक स्पॉटपेक्षा जास्त काळ टिकणारं आहे....!! तिला खूप बरं वाटलं. तिने मनोभावे गणपतीला हात जोडले. डोळे मिटले आणि मनापासून एकच प्रार्थना केली.


' देवा , अजिंक्यच्या प्रयत्नांना यश येऊ दे. आई बाबांनी मला पोटच्या मुलीपेक्षाही जपलं. त्यामुळे आता त्यांना न्याय मिळवून देणं माझं कर्तव्य आहे. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लवकर लागू दे....." 


क्रमशः......

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//