मेघ दाटले - भाग 6

Love , suspense

मेघ दाटले - भाग 6

दिनेशच्या विचारातच अजिंक्य पोलीस स्टेशन कडे जायला निघाला. गावाबाहेरच्या शेतांच्या जवळ एक छोटं तळ होतं. तो चालत असताना सहज त्याचं तिकडे लक्ष गेलं. तिथे निवांत कोणीतरी बसलेलं त्यानं पाहिलं. तो थोडासा चालत तळ्याजवळ आला. नुपूर शांतपणे तळ्यातलं पाणी बघत बसून होती. 

" मिस राजवाडे...... तुम्ही काय करताय इथे...?? " अजिंक्यने आश्चर्याने विचारलं. तसं तिने मागे वळून पाहिलं. अजिंक्यला बघून ती उठून उभी राहिली. 

" तुम्ही कसे काय इकडे.....??? " तिने विचारलं.

" केसच्या संदर्भातच तपास चालू आहे...." तो म्हणाला.

" हा. काही कळलं का....कोणी मारलं असेल माझ्या मॉम डॅडना....??? " तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं.

" अजून तरी काही ठोस पुरावा मिळालेला नाही. पण शोध चालू आहे.....पण तुम्ही काय करताय इकडे...? " अजिंक्य

" घरात राहून तेच तेच विचार येत राहतात डोक्यात त्यामुळे जरा बाहेर पडले. चालत चालत इकडे कधी आले कळलंच नाही. ही माझी खूप फेव्हरेट जागा आहे. मी लहान असताना डॅड मला कायम इथे घेऊन यायचे. पाण्यात खूप मजा करायचो आम्ही....." ती भडभडून बोलत होती.

" ह्म्म मी समजू शकतो...तुमची काही हरकत नसेल तर आपण थोडा वेळ इथे बसू शकतो का....?? " त्याने हसून विचारलं.

" हो..... And call me Nupur... अहो जाओ करण्याइतपत मोठी नाही मी...." ती किंचित हसून म्हणाली.

" हो......"

 दोघेही मग तळ्याजवळच्या दगडांवर बसले आणि आपले पाय त्यांनी पाण्यात सोडले. त्या गार पाण्याच्या स्पर्शाने  त्यांना खूप बरं वाटतं होतं. अजिंक्य आणि नुपूर मग दोघेही गप्पा मारत बसले. तसं बघितलं तर अजिंक्यच बडबड करत होता. त्यामानाने नुपूर शांत राहून त्याच बोलणं ऐकत होती. सुरवातीला त्याला ती ऐकतेय म्हंटल्यावर बरं वाटलं पण नंतर ती काहीच बोलत नव्हती त्यामुळे तो जरा खट्टू झाला. 

" खूप बोअर करतोय का मी तुला....?? तसं असेल तर जातो मी...." तो एवढुस तोंड करत म्हणाला.

" नाही तस नाही... मी ऐकतेय तू बोलतोयस ते..." ती म्हणाली खरं पण तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. 

" हम्म..... कळलं किती लक्ष आहे ते.... जातो मी. उगीच तू बोअर होशील..." तो जरा रागातच उठला आणि चालू लागला. तिने हाक मारल्यावर तो थांबला. 

" अरे....!!! असं काय आता... बोल की. मी देते लक्ष. ये आपण गप्पा मारू खरंच....!! " ती म्हणाली.

" नको. सगळ्यांना वाटत आम्ही पोलीस म्हणजे एकदम रफ टफ असतो. प्रेमाने बोलणं जमत नाही आम्हाला. पण असं नसतं आम्हालाही भावना असतात. ज्या आम्हालाही वाटतं असतं कोणाशी तरी शेअर कराव्यात... पण कामातून वेळच मिळत नाही. एक ड्युटी संपली की दुसरी... मी आता या केस साठी आलोय म्हणून जरा निवांत आहे. नाहीतर मुंबईत एका वेळी दहा दहा केसेस हँडल कराव्या लागतात.....जाऊदे तुम्हाला काय सांगायचं....."   तो आपला बडबडत होता आणि ती  भान हरपून त्याचं बोलणं ऐकत होती. त्याचा आवाज , बोलण्याची पद्धत, त्यांचं समोरच्याला छाप पाडणारं व्यक्तिमत्त्व ती आज पहिल्यांदाच नोटीस करत होती. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तशी तिने मान दुसरीकडे वळवली.  

" सॉरी...... ये बस. बोलू आपण. खरतरं मॉम डॅड माझे सगळे हट्ट , लाड पुरवायचे. त्यामुळे माझी प्रत्येक गोष्ट मी त्यांच्यासोबतच शेअर करायचे. माझ्या मैत्रिणी पण घरी यायच्या. खूप धमाल करायचो आम्ही.. पण एखादं स्वप्न तुटावं तसं मॉम डॅडना माझ्यापासून हिरावलं गेलं... या सगळ्यातून बाहेर पडायला मला थोडा वेळ लागेल...प्लिज..." तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या हातांवर पडलं. त्याला वाटलं उगीच बोललो आपण एवढं. आत्ताच तर ओळख झालेय आपली लगेच कशी बोलेल ती भडाभडा. स्वतःच्याच डोक्यात टपली मारून तो तिच्या बाजूला येऊन बसला. 

" सॉरी..... मी जरा जास्तच बोललो ना.. पण खरं सांगू तुला केसच्या निमित्ताने मी जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा मला नविननविन माणसं भेटतात. काही खरी काही खोटी.. काही माणसाचं दुःख एवढं असतं ना की ते पाहिल्यावर आपण सुखी आहोत असं वाटतं आपल्याला... तुझे आई बाबा गेले हे खरंच खूप वाईट झालं. पण आता यातून तुलाच सावरायला हवंय. तू अशी रडत राहिलेली त्यांना आवडेल का.....? " 

" अजिबात नाही........" ती लहान मुलासारखं म्हणाली.

" हम्म मग आता तुला स्वतःला स्ट्राँग झालं पाहिजे. आपणच आपले प्रश्न सोडवायचे असतात. अशी जास्त विचार करत राहिलीस तर आजारी पडशील..." त्याच्या या वाक्यावर ती जराशी हसली. तेव्हा त्याला जरा बरं वाटलं. 

" आपण निघुया का खूप उशीर झालाय.....?  " तो उठत म्हणाला.

" बाप रे...... थोड्या वेळाने अंधार पडेल. माझ्या लक्षात कसं आलं नाही. घरी लवकर जायला हवं. मी निर्मला काकूंना न सांगताच आलेय. त्या वाट बघत असतील माझी. "  ती घाईतच उठली.₹

" थांब मी येतो तुझ्यासोबत... तुला सोडून मग जाईन मी. " अजिंक्य

" नाही. नको..... मी जाईन..... " तिने सभोवार नजर फिरवली. पण त्या बाजूला तिला चिटपाखरूही दिसलं नाही.  

" नको. संध्याकाळ झालेय. मी तुला सोडतो आणि मग जाईन मी पण..." तो ठामपणे म्हणाला. त्यावर काय बोलावं तिला सुचेना. खरतरं त्याला तिच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलायचं होतं. तिला सावध राहा सांगणं गरजेचं होतं. कारण किशोर आणि निशाताई गेल्यानंतर तिच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. पण त्याने हे सांगणं टाळलं. त्याने ती अजून घाबरली असती. त्यामुळे याबाबत उद्या तिच्याशी बोलू असं ठरवून तो चालू लागला. त्याच्यासोबत तीही घराच्या दिशेने जायला निघाली.

.....................................

दुसऱ्या दिवशी अजिंक्य राजवाडेंच्या कंपनीमध्ये पोहचला.  त्याने स्वतःच आयडी दाखवून रिसेप्शनिस्टला, मॅनेजरला बोलवायला सांगितलं. तिने फोन करून त्यांना अजिंक्य आल्याच सांगितलं तसे ते बाहेर आले. 

" हॅलो सर.... मी इथला जनरल मॅनेजर आहे. महेश सावंत.."  मॅनेजरने अजिंक्यशी हात मिळवत आपली ओळख करून दिली. 

" हॅलो..... इन्स्पेक्टर अजिंक्य इनामदार. फ्रॉम क्राईम ब्रँच...." त्यानेही स्वतःची ओळख सांगितली. 

" या सर. आपण माझ्या केबिनमध्ये बसून बोलुया..." असं म्हणून ते अजिंक्यला घेऊन आपल्या केबिनकडे  गेले. कंपनीच्या स्टाफ समोर त्यांना तमाशा नको होता. जाताना त्यांनी रिसेप्शनिस्टला दोन चहा आत पाठवायला सांगितले. 

दोघेही सावंतांच्या केबिनमध्ये गेले. 

" सर बसा...... " सावंतांनी खुर्ची समोर करून अजिंक्यला बसायला सांगितलं आणि तेही आपल्या चेअर वरती येऊन बसले. 

" हे पहा. मि. सावंत मी इथे तुमचा पाहुणचार घेण्यासाठी आलेलो नाही. मिस्टर आणि मिसेस राजवाडे यांच्या खुनासंबंधी चौकशी करण्यासाठी आलो आहे..." अजिंक्यने त्यांना स्पष्टच सांगितलं. 

" पण सर त्याच्याशी माझा काय संबंध....??? " सावंतांनी गोंधळून विचारलं.

" काय संबंध....?? ही कंपनी राजवाडेंची आणि तुमचा संबंध नाही कसा.... तुमचा आणि राजवाडेंचं भांडण झालं होतं ना....??? "  अजिंक्यच्या बोलण्यावर मात्र सावंत चपापले. त्यांना थोडासा घामही फुटला होता. इतक्यात चहा घेऊन एक कामगार आला. चहा टेबलवर ठेऊन तो निघून गेला. अजिंक्यने त्यांचा घाबरलेला चेहरा पाहिला. 

" घ्या.... तुम्हालाच जास्त गरज आहे चहाची..." अजिंक्यने त्यांना चहाचा कप देत म्हटलं. सावंतांनी थरथरत्या हातानी चहाचा कप घेतला.

" हं..... बोला कशावरून वाद झाला तुमच्यात ....?? "  चहाचे घोट घेता घेता अजिंक्य बोलत होता. 

" साहेब ते........... ते एका कामगाराला मी चूक नसताना कामावरून काढून टाकलं म्हणून साहेब भडकले होते...." सावंत म्हणाले.

" अच्छा...... का काढून टाकल तुम्ही त्या कामगाराला....?? " आता अजिंक्य चहा संपवून उठून उभा राहिला होता. 

" ते....... ते तो चार - पाच दिवस कामावर आलाच नव्हता... त्यामुळे मी त्याला कामावरून कमी केलं...." ते म्हणाले.

" हम्मम........." अजिंक्य आता केबिनमध्ये फेऱ्या मारायला लागला. हळूहळू चालत तो सावंतांच्या चेअर पाशी आला. त्यांच्या समोरच तो टेबलवर बसला.

" फक्त एवढंच कारण आहे का सावंत........??? कसं आहे ना... सावंत आम्हाला ना सवय आहे.. गोड बोलून एखादी गोष्ट मिळत नसेल तर बाकीच्या मार्गाने ती मिळवायची...." तो शर्टाची बाही दुमडत म्हणाला. तसे ते थोडे घाबरले. 

" साहेब........ मी........... मी खरंच सांगतोय तुम्हाला......." सावंत

" हं........  सावंत मला इथला चहा काही फारसा आवडला नाहीये......"  तो जरा तोंड वाकडं करत म्हणाला. " पोलीस स्टेशनच्या बाहेर एक चहाची टपरी आहे आपण तिथे जाऊन मस्त कटिंग टाकू..... काय....??? .... चला..."  

" नको...... नको .... साहेब मी ...मी सांगतो....." असं म्हणून सावंतांनी सांगायला सुरुवात केली.  " खरतरं मी कंपनीत अफरातफर करत होतो. साहेब मुंबईला असायचे त्यामुळे त्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी त्यांना रोजचा रिपोर्ट द्यायचो. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. पण नंतर जेव्हा साहेब इकडे आले आणि त्यांनी कँपनीत पुन्हा लक्ष घालायला सुरवात केली त्यावेळी मला काय करावं सुचेना. एकदा त्यांनी अकाउंट चेक केले त्यावेळी त्यांना मी केलेली अफरातफर लक्षात आली आणि त्यांनी मला खूप सुनावले. मला त्यांनी नोकरीवरून काढून टाकले. पण मी हातापाया पडून माझी नोकरी वाचवली.पण साहेबांनी माझा खूप अपमान केला सगळ्यांसमोर. नाही नाही ते बोलले. त्यावेळी मी शांत राहिलो...."  एवढं बोलून ते गप्प बसले. 

" आणि..... या अपमानाचा बदला म्हणून तुम्ही त्यांचा खून केलात..... बरोबर...??? " अजिंक्य.

" नाही नाही साहेब.... काहीतरीच काय. भलेही ते मला बोलले असतील. मला त्यांचा रागही आला होता.पण मी त्यांना मारलेलं नाही....." सावंत विनवत म्हणाले.

" हमम...... ते आम्ही शोधुन काढुचं. मला सांगा कंपनीचे कोणी लॉयर आहेत का....?? राजवाडेंच्या नंतर आत्ता कँपनी कोण हँडल करतंय...." त्याने विचारलं. 

" सर निशा मॅडमचे भाऊ... मि. मोहिते सध्या सगळं सांभाळत आहेत..... बाकीची माहिती तुम्हाला वकील साहेब देतील. ते मुंबईला असतात हे त्यांचं कार्ड. अडव्होकेट सुनील राऊत. " 

" निशा राजवाडेंचे भाऊ......???? " कुठे असतात ते आणि काय करतात.....??? " अजिंक्यला नवीनच माहिती मिळत होती. त्यामुळे त्याच्या बोलण्यात आश्चर्य होतं.

" सर ते पनवेलला असतात. कधीतरी ते इकडे येऊन जातात. पण या बाबतीत बाकी कोणालाही माहीत नाही.  साहेब मुंबईतून इकडे आल्यानंतर थोडे दिवस ते ऑफिसला यायचे. पण नंतर त्यांना त्यांचं रिटायर्ड लाईफ जगायचं होतं त्यामुळे त्यांनी सुनील साहेबांना यात लक्ष घालायला सांगितलं......" सावंत.

" आय सी..... मला त्यांचा नंबर हवा होता...."

सावंतांनी नोटपॅडवर नंबर लिहिला आणि कागद फाडून अजिंक्यकडे दिला. 

" साहेब..... पण मला नाही ना शिक्षा होणार...?? मी कंपनीचे सगळे पैसे परत करेन...." त्यांनी अजिंक्यला विनवत म्हटलं. त्यावर तो फक्त हसला.

" सध्या तरी नाही... पुन्हा भेटूच..." असं म्हणून तो तिथून        निघुन गेला. तसा सावंतांनी सुटकेचा निश्वास सोडला. टेबलवर ठेवलेला पाण्याच्या ग्लासमधलं पाणी ते गटागटा प्याले आणि त्यांनी लगेच कोणाला तरी फोन डायल केला. 

...........................

अजिंक्य नुपुरला भेटायला बंगल्यावर गेला. तेव्हा ती बाहेरच कोणाशी तरी फोनवर बोलत होती. कंपनीतून त्याला जे काही कळलं होतं ते त्याला नुपुरला सांगायचं होतं. त्यामुळे तो संध्याकाळीच तिला भेटायला आला. 

" मी आत्ता नाही येऊ शकत.. तुम्हाला कळतंय का...?? " ती फोनवर कोणाशी तरी चिडून बोलत होती. 

" तुम्ही केलंयत ना... मग तुम्हीच निस्तरा ते.... आणि मला पुन्हा फोन करू नका...." असं म्हणून तिने रागाने फोन ठेवला.

अजिंक्य तिचं बोलणं ऐकत तिच्या मागेच उभा होता. 

" नुपूर.......!!!! " त्याने तिला हाक मारली. तशी ती दचकली.

क्रमशः.....

🎭 Series Post

View all