Login

मेघ दाटले - भाग 5

Love, suspense

मेघ दाटले - भाग 5

नुपूर धावतच बाहेर आली. समोरून येणाऱ्या अजिंक्यला ती जोरात धडकली. तिला दरदरून घाम फुटला होता.

" अजिंक्य........... अजिंक्य .... तुम्ही...." एवढंच म्हणून तिने त्याला मिठी मारली. इतक्यात लाईट देखील आले. ती अजूनही डोळे घट्ट मिटून त्याला मिठी मारून उभी होती.  त्याला काहीच कळेना. त्याने तिला आपल्यापासून दूर केलं आणि तिच्या दोन्ही हातांना पकडून तिला समोर धरलं.

" काय........काय झालंय......? " त्याने विचारलं.

" ते......... ति....... ति..... तिकडे आत कोणीतरी आहे...." ती कसंबसं म्हणाली. 

त्याने मग तिला बाजूला केलं आणि तो बंगल्यात आला. त्याने बंगल्यात सगळीकडे शोधलं. वरच्या रूम मध्ये जाऊन देखील त्याने चेक केलं. पण त्याला कोणीच दिसलं नाही. तो तसाच बाहेर आला. नुपूर अजूनही बाहेर होती. त्यामुळे मग तो तिला आत घेऊन आला. त्याने तिला सोफ्यावर बसवलं आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आला. ती गटागटा पाणी प्याली. त्याने हलकेच तिच्या हातावर हात ठेवला. पण तिने स्वतःचा हात बाजूला केला.

" सॉरी.........." तो म्हणाला. थोडा वेळ असाच शांततेत गेला. त्याने तिला जरा रिलॅक्स होऊ दिलं. ती थोडी शांत झाल्यावर त्याने तिच्याशी बोलायला सुरवात केली.

" नेमकं काय झालं..... ?? सांगाल का....? " त्याने विचारलं.

" माझ्या रूम मध्ये कोणीतरी होतं. त्यांनी माझं तोंडही दाबून धरलं. कशीबशी मी तिथून सटकले आणि खाली आले....." असं म्हणून तिने घडलेला सगळा प्रकार त्याच्या कानावर घातला. 

" हम्म..... तुम्ही इथेच थांबा. मी पुन्हा एकदा वरती जाऊन बघून येतो...." तो उठून जाऊ लागला. 

 " मी.......... मी पण येते वरती.... मला एकटीला इथे भीती वाटतेय..." ती म्हणाली. 

" ok......" दोघेही मग जिन्याने वरच्या खोलीत गेले. त्याने नुपुरला लाईट लावायला सांगितला. तसा खोलीभर प्रकाश पसरला. त्याची नजर सगळीकडे फिरू लागली. इतक्यात त्याला खिडकीजवळच्या कपाटाच्या खाली काहीतरी पडलेलं दिसलं. त्याने पुढे जाऊन पाहिलं तर तिथे एक चाकू पडला होता. त्याने आपल्या खिशातून रुमाल काढला आणि चाकू हातात घेतला. याचा अर्थ तिच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीनेच ती व्यक्ती आज बंगल्यात आली होती. पण त्यांच्या झटापटीत चाकू हातातून इथे पडला असावा असं अजिंक्यला वाटलं. पण त्याने त्याबाबत नुपुरला काहीच सांगितलं नाही. मिळालेला चाकू त्याने बेड शेजारच्या टेबलवर ठेवून तो कपाटाकडे आला. त्याने कपाट उघडून बघितलं. पण तिथे कोणीच नव्हतं. त्याच्या डोक्यात शंका येऊ लागली तसं त्यानं खिडकी उघडली. खिडकी वरच्या मजल्यावर असल्याने तिथे कोण येईल असं वाटलं नाही तरीही त्याने पाहिलं. खाली देखील कोणीही नव्हतं. समोर फक्त मिट्ट काळोख आणि रातकिड्यांचा किरकिर करणारा आवाज ऐकू येत होता. चहूबाजूला नजर फिरवून त्याने पुन्हा खिडकी लावून घेतली. दोघेही मग खाली आले. 

" आज तुम्ही एकट्याच कशा....?? कोण नाही का तुमच्यासोबत ....? " अजिंक्यने विचारलं. 

" नाही.... म्हादू काका आणि बाहेरगावी गेलेत. मी आज एकटीच होते..." तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती दिसत होती. 

" याचा अर्थ आज तुम्ही एकट्या होतात ही गोष्ट कोणाला तरी कळली असावी. त्याशिवाय अशी अनोळखी व्यक्ती तुमच्या बंगल्यात येणं शक्य नाही... म्हादू काका आणि घरी नाहीत हे अजून कोणाला माहीत होतं....? "

" कोणालाच नाही... मी सोडून हे कोणालाच माहीत नव्हतं..." ती म्हणाली.

" ठीक आहे. उद्या बघू आता.... तुम्ही वरती जाऊन झोपा. मी थांबतो इथेच...." तो तिच्या काळजीने म्हणाला.

" नाही... मी ठीक आहे आता..... सॉरी तुम्हाला इतक्या रात्री त्रास दिला. " नुपूर

" त्रास कसला. ही तर आमची ड्युटी आहे. तुम्ही जाऊन झोपा प्लिज. मी खाली थांबतो. तुम्ही आता सेफ आहात...." असं म्हणून त्याने तिचं काही न ऐकता तिला वरती झोपायला पाठवलं. 

अजिंक्य देखील थोडा वेळ जागा राहिला. हॉल मधल्या शोकेसेस मधून त्याने एक पुस्तक वाचायला काढलं आणि तो तिथेच सोफ्यावर बसून वाचू लागला. वाचता वाचता त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही. तो तिथेच सोफ्यावर अंग आखडून झोपी गेला.

...........................................

दुसऱ्या दिवशी नुपूर लवकर उठून खाली आली. तिनं पाहिलं तर अजिंक्य पुस्तक वाचता वाचता तसाच झोपला होता. ती पाय न वाजवता त्याच्या जवळ गेली आणि ती त्याच्या हातातलं पुस्तक हळूच काढून बाजूला ठेवू लागली. पण त्यामुळे त्याची झोप चाळवली आणि तो जागा झाला. नुपुरला इतक्या जवळ बघून त्याचे तर हार्टबीट्स वाढले होते. आपण क्षणभर स्वप्नचं बघतोय असं त्याला वाटलं. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तीही त्याच्या नजरेत बेधुंद होऊन पाहत राहिली. तेवढ्यात अजिंक्यच्या हातातलं पुस्तक खाली पडलं आणि त्या आवाजाने दोघेही भानावर आले. दोघेही गोधळले काय बोलावं त्यांना सुचेना. 

" मी तुमच्यासाठी चहा करून आणते. तोपर्यंत तुम्ही फ्रेश होऊन या हवं तर....." असं म्हणून तिने वॉशरूम कडे हात दाखवला आणि ती आत गेली. 

थोड्या वेळाने तोही फ्रेश होऊन आला. रात्रभर अवघडून झोपल्याने खरंतर त्याची मान दुखत होती. पण त्याने तसं जाणवू दिलं नाही. तोपर्यंत नुपूर दोघांसाठी चहा घेऊन आली. चहाचा कप तिने अजिंक्यला दिला आणि ती ही चहा पिऊ लागली. दोघेही गप्पच होते. एकमेकांकडे चुकून लक्ष गेलंच तर फक्त चेहऱ्यावर एक स्माईल देऊन पुन्हा आपल्याच विचारात जात होते. शेवटी अजिंक्यनेच बोलायला सुरुवात केली. 

" तुम्ही कायमच अशा गप्प असता का....?? " त्याने तिला बोलत करायला विचारलं.

" नाही. तसं नाही......." एवढंच म्हणून ती पुन्हा गप्प बसली.

" तुमच्या आई बाबांच्या बाकी फॅमिली बद्दल तुम्हाला काही माहीत आहे का.... म्हणजे तुमचे काका काकू....वगरे...??" 

" काका..... माझे ....??? मला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही...." ती आश्चर्याने म्हणाली.

" Strange ....!!!!  तुमचे काका काकू देखील याच गावात राहतात...." अजिंक्य.

" ओहह..... पण मला त्यांच्याबद्दल कधीच कोणी बोललं नाही...." 

" हमम..... ठीक आहे... मी निघतो आता..." चहाचा कप समोरच्या टेबलवर ठेऊन तो जायला निघाला. पण दोन पावलं जातो न जातो तोच तो मागे आला.

" Friends......??? " त्याने तिच्यासमोर हात पुढे करून म्हटलं. ती कितीतरी वेळ तशीच उभी होती. हात पुढे करावा की नको हेच तिला कळेना. शेवटी तिने त्याच्या हातात हात दिला.

" ok....." ती एवढंच म्हणाली आणि पटकन त्याच्या हातातून तिने आपला हात सोडवून घेतला. तो ही मग काही न बोलता तिथून निघून गेला.

..............................

चार दिवसांनी अजिंक्य आणि शिंदे गावात फिरत होते. लोकांकडून काही मिळते का ते बघत दोघेही तपास करत होते. अजिंक्य एकेक गोष्ट बारकाईने बघत होता. जसजसे ते पुढे जाऊ लागले तसतशी घरे मागे पडू लागली आणि हिरवीगार शेते नजरेला पडू लागली. दोघेही शेत बघत बघत एका शेताजवळ येऊन शांतपणे उभे राहिले. ते मोकळं हिरवंगार शेत बघून त्यांना बरं वाटलं. कामाचा थकवा कुठल्याकुठे पळाला. दोघेही कितीतरी वेळ तसेच उभे होते. इतक्यात त्यांना दुरूनच एक माणूस येताना दिसला. त्याच्या झोकांड्या जात होता. तो माणूस हळूहळू जवळ येऊ लागला तसं त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या डोक्याला मार बसलाय आणि त्यातून रक्तही वाहतंय. तो तसाच चालत पुढे जाऊ लागला. तेव्हा    शिंदेंनी त्याला थांबवलं. त्याला  पाणी दिलं.

" अहो दादा......  कुठे लागलं तुम्हाला एवढं...?? " शिंदेंनी विचारलं.

"    व काय सांगू साहेब तुमास्नी...... त्यो आपल्या नितीनचा पोरगा शेतात गोफण फिरवीत होता..... त्यातला एक दगुड माझ्या डोक्यात बसला तिथुन येताना... मी वरडलो पर साद बघाया बी आला न्हायी त्यो...." तो माणूस जखम झालेल्या डोक्याला हात लावून कसंबसं बोलत होता. 

" शिंदे... तुम्ही यांना आधी डॉक्टरकडे न्या..... मी जरा बघून येतो काय प्रकार आहे तो...." अजिंक्य म्हणाला.

मग शिंदेंनी गाडी चालू केली आणि अजिंक्यने हाताला धरून त्या माणसाला व्यवस्थित गाडीवर बसवलं आणि तो शेताकडे चालू लागला. पाचेक मिनिटं चालून गेल्यावर अजिंक्यला शेताच्या मध्यभागी कोणतरी मोठयाने गोफण फिरवत असलेलं दिसलं. तो तसाच चालत पुढे आला. शेतातच एक छोटंसं खोपट होतं. तिथे नितीनरावांच्या शेतात काम करणारा गडी राहायचा. तो पाणी आणायला म्हणून त्याच्या खोपटाकडेच येत होता. त्याने अजिंक्यला पाहिलं आणि ' कोन पायजे ' म्हणून चौकशी केली. त्यावर त्याने गोफणीवर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवलं. तो गडी मग त्या व्यक्तीला बोलवायला गेला. शेताच्या मध्यभागी बांधलेल्या मचाणावर गोफण फिरवत दिनेश उभा होता. नितीनरावांचा एकुलता एक मुलगा.....!!!! गड्याने निरोप दिल्यावर त्याने त्या मचणावरूनच खाली उडी मारली. अजिंक्य मगापासून त्याच्याकडेच बघत होता. हळूहळू चालत दिनेश अजिंक्यपाशी आला.

" बोला...... काय काम होतं....??." दिनेशने विचारलं.

" तुम्ही गोफण फिरवताय...... त्याने एक माणूस जखमी झालाय.... तुम्हाला काही कल्पना आहे का त्याची...??? " अजिंक्यने जरा ताठ स्वरात विचारलं.

" हे विचारायला तुम्ही बोलवत मला....?? मी काय आता सगळ्यांवर लक्ष ठेवत राहू का... कोण येतंय कोण जातंय.... कोणाला गोफणीचा दगड लागतोय...." दिनेश त्रासून म्हणाला.

" हो. कारण तुमच्यामुळे लागलंय त्यांना..... गोफण फिरवताना तुमचं लक्ष हवं आजूबाजूला....." अजिंक्य

" ओ साहेब...... कशाला उगाच डोक्याचं दही करताय. जावा चला. लय काम आहेत मला....." त्याने अजिंक्यला थोडस ढकलत म्हटलं. 

" निदान त्या माणसाच्या औषधपाण्याचा तरी खर्च करा....तुमच्यामुळे झालय सगळं... त्या माणसाला खूप लागलंय...." अजिंक्य बोलत होता पण दिनेश कानात बोट घालून त्रासिक चेहरा करून सगळं ऐकत होता.

" ओ... सायेब... तुम्ही कशाला या भानगडीत पडताय... एवढं हाय तर तुम्हीच करा की खातीरदारी त्याची..... कसं..??? " असं म्हणून दिनेश जोरात हसला आणि पुन्हा शेतात जाऊ लागला. 

अजिंक्यला राग येत होता. पण तरीही तो शांत राहिला. त्याच्या डोक्यात वेगळेच विचार थैमान घालत होते. त्यामुळे तो पोलिस स्टेशनच्या दिशेने चालू लागला.

क्रमशः.....

सर्व वाचकांचे खूप खूप आभार... तुमचा प्रतिसाद हेच लेखकाचं टॉनिक असतं त्यामुळे लिहायला हुरूप येतो. 4 था भाग पोस्ट करायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. त्याचं कारणही मी तुम्हाला त्या भागाच्या शेवटी दिलं होतं. मला माहित आहे कोणतीही कथा लगेच सगळ्याना आवडणं शक्य नाही पण मी माझ्या परीने तुमच्या मनोरंजनासाठी पूर्ण प्रयन्त करत आहे. त्यामुळे लगेच कथा वाचक डोक्यावर घेतील अशी अपेक्षाच नाहीये. पण अगदीच कमी असणारा प्रतिसादही निराश करतो. म्हणून मला तुम्हाला ते सांगावस वाटलं. पण त्या नंतर आलेल्या कमेंट्सने खरंच पोट भरलं. असंच प्रेम यापुढेही राहूदे हीच विनंती. पुढचे भाग एक दिवसाच्या फरकाने पोस्ट केले जातील. धन्यवाद...!!

🎭 Series Post

View all