Feb 24, 2024
रहस्य

मेघ दाटले - भाग 4

Read Later
मेघ दाटले - भाग 4

मेघ दाटले - भाग 4 

 

अजिंक्य नुपुरला भेटून आल्यापासून खुश होता. रूमवर आल्यावर सुद्धा सारखा मोबाईल चेक करायचा की नुपुरचा एखादा तरी मेसेज येईल म्हणून . पण तसं काहीच झालं नाही. अजिंक्यचा नंबर नुपुरने तिथेच टेबलवर ठेवला होता. आई बाबांच्या जाण्याने ती अजूनही पुरती सावरली नव्हती. तरीही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून ती स्वतःला खंबीर दाखवायची. गावातले कोण ना कोण येऊन तिची विचारपूस करायचे. किशोरराव आणि निशाताईंनी खूप माणसं जोडली होती. त्यामुळे त्या दोघांचा असा मृत्यू होणं हे सगळ्यांच्याच जीवाला लागलं होतं. त्यामुळे नुपुरची सर्वजण आस्थेने चौकशी करत. तीही सगळ्यांशी बोलायची पण रात्री कोण नसताना मात्र आई बाबांच्या आठवणीने ती व्याकुळ व्हायची. 

 

..........................

 

नितीन आणि किशोररावांमध्ये वाद झाले होते हे अख्ख्या गावाला माहीत होतं. त्यामुळे त्यांच्या खुनाचा तपास करताना नितीनरावांची देखील जबानी घेणं महत्वाचं होतं. म्हणून मग अजिंक्य आणि इन्स्पेक्टर शिंदे साध्या वेषात नितीनरावांच्या घरी पोहचले. छोटंसं जुनं कौलारू घर होत त्यांचं. समोर अंगण मागच्या बाजूला परसदार...ओटी पडवी ,स्वयंपाकघर , एखादं दुसरी खोली इतकंच त्यांचं घर होतं. इन्स्पेक्टर शिंदेंनी नितीनरावांची चौकशी सुरू केली पण सुरवातीला ते उडवाउडवीची उत्तर देऊ लागले. पण त्यांना जरा पोलिसी खाक्या दाखवल्यावर ते बोलू लागले. 

 

 

" नितीन राजवाडे.... घरी कोण कोण असतं तुमच्या..? " अजिंक्यने विचारलं.

 

" साहेब मी , माझी बायको आणि दोन मुलं..." नितीनराव म्हणाले. 

 

" किशोर राजवाडेंशी तुमचे संबंध कसे होते...?? " 

 

" आमचा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता..." ते काहीशा रागाने म्हणाले.

 

" असं..... पण ते तर तुमचे भाऊ होते ना...?? " 

 

" हो . पण आम्ही कधीच एकमेकांशी असलेले संबंध तोडले होते. " 

 

 

" कारण .....??? " 

 

" त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय.... हा आमचा खाजगी मामला आहे. त्यात तुम्हाला दखल घेण्याचं कारण नाही...."  नितीनराव म्हणाले.

 

 

" कसं आहे ना ज्यावेळी गोष्ट एखाद्याच्या जीवावर बेतते ना तेव्हा ती खाजगी राहत नाही नितीनराव.... त्यामुळे पटपट बोलायचं जे काय माहीत आहे ते...." अजिंक्य त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तसे ते थोडे घाबरले पण त्यांनी ते जाणवु दिल नाही. 

 

 

" काय....... काय सांगू साहेब...." त्यांनी विचारलं.

 

 

" किशोर राजवाडे आणि निशा राजवाडे यांचा खून कोणी केला.....??? " शिंदेंनी विचारलं

 

 

" मी........ मी नाही केला साहेब..." ते घाबरत म्हणाले.

 

" पण आम्ही कधी म्हटलं तुम्ही खून केलात म्हणून... काय नितीनराव..... किती घाबरताय..!!! " अजिंक्य बोलला. 

 

 

" बरं मला सांगा.... खून झाला त्या रात्री तुम्ही कुठे होतात.....?? " अजिंक्य

 

" मी घरातच होतो. झोपलो होतो. हवं तर तुम्ही माझ्या बायकोला विचारा..  " ते म्हणाले.

 

 

" हा त्याची खात्री करूच आम्ही..  बरं तुमचा कोणावर संशय...? " अजिंक्यने विचारलं.

 

 

" मी काय सांगू आता... पण त्याच त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरशी भांडण झालं होतं....मला वाटतं त्यानेच किशोरला .........." नितीनराव

 

 

" हमम....... तुम्हाला कसं कळलं की त्यांचा मॅनेजर सोबत वाद झालाय ते.....?? " अजिंक्यच्या या प्रश्नावर ते बुचकळ्यात पडले. त्यांना काय बोलावं सुचेना. 

 

 

" नाही ते....... इथली बाजूची लोकं बोलत होती तेव्हा कानावर पडलं....." त्यांनी वेळ मारुन नेली.

 

" ठीक आहे. आम्ही तपास करूच... गरज लागली तर पुन्हा येऊ तुमच्याकडे..." त्यांच्या हाताला थोपटून अजिंक्य हसत पुढे चालू लागला. इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि    तो पुन्हा मागे आला. त्याने आपल्या खिशातून काल बंगल्याजवळ मिळालेलं कडं नितीनरावांच्या समोर धरलं तसे ते बावचळले.

 

" हे कडं तुमचं आहे का......?? " अजिंक्यने विचारलं.

 

 

" नाही....... मा...... झ नाही..... " ते म्हणाले पण त्यात ठामपणा नव्हता.  मग त्यांचं बोलणं ऐकत दाराला टेकून असणाऱ्या बायकोकडे अजिंक्यने पाहिलं. तो त्यांच्या बाजूला जाऊन उभा राहिला.

 

 

" हे कडं ओळखता का तुम्ही.........? " 

 

 

" हे कडं तर............" त्या पुढे काही बोलणार त्या आधीच नितीनरावांनी त्यांना डोळ्यांचा धाक दाखवला.

 

 

" नाही.... मला माहित नाही.... " त्या मान खाली घालून म्हणाल्या. 

 

 

" हम्म ठीक आहे......." एवढं बोलून अजिंक्य आणि शिंदे तिथून निघाले. पण नितीनराव आणि त्यांच्या बायकोच्या हालचाली अजिंक्यच्या नजरेतुन सुटल्या नव्हत्या. अजिंक्य आणि शिंदे दोघेही चालत पोलीस व्हॅनपाशी आले. दोघांमध्येही आत्ताच्या झालेल्या जबानी बद्दल चर्चा झाली. नितीनरावांवर लक्ष ठेवायला सांगून अजिंक्य गाडीत बसला. 

 

 

..................................

 

बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं. आज म्हादू काका आणि निर्मला ताई दोघेही बाहेरगावी गेले होते. त्यामुळे बंगल्यात नुपूर एकटीच होती. बबाहेरच्या पॅसेजमध्ये ती कितीतरी वेळ बसून राहिली. तिच्या लहानपणीच्या एकेक आठवणी तिच्या भोवती फेर धरू लागल्या. किशोरराव आणि निशाताईंनी किती हौसेने तिच्यासाठी सगळं केलं होतं. पोटच्या मुलीपेक्षाही त्यांनी जास्त जीव लावला होता नुपुरला....!!!  ती दहावी पर्यंत गावातच शिकली त्यामुळे गावातल्या बऱ्याचशा गोष्टी तिला माहीत होत्या. नंतर मग तिच्या शिक्षणासाठी ती आणि आई बाबा पुन्हा मुंबईत आले आणि तिचं गावाकडे येणं कमी होऊ लागलं. दिवस कसे भराभरा सरकले होते. तेच सगळं आठवत ती बाहेर बसली होती. तिला वाटतं होतं आई बाबांनी किती हौसेने हा बंगला बांधला पण त्यात राहायचं सुख मात्र त्यांना मिळू नये याचं तिला वाईट वाटत होतं. त्यांच्या आठवणीने तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. संध्याकाळ झाली तसा गार वारा अंगाला झोंबू लागला म्हणून ती उठून आत आली.  रात्र हळूहळू पुढे सरकू लागली. बंगल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांमधून वाऱ्याचा थंडगार झोत आत येऊ लागला. दार खिडक्या धाड धाड वाजू लागली. पडदे उडू लागले. तसं मग तिनं सगळी दार आणि खिडक्या लावून घेतल्या. आज म्हादू काका आणि निर्मला ताई नव्हत्या त्यामुळे एवढा मोठा बंगला तिला खायला उठला होता. थोडा वेळ ती पुस्तक वाचत तिथेच सोफ्यावर बसली. मग स्वतःपुरत जेवणाचं काहीतरी बनवून तिनं ते खाल्लं आणि भांडी तशीच बेसिन मध्ये ठेवून ती पुन्हा बाहेर आली. थोडा वेळ हॉल मध्ये फेऱ्या मारून ती वरती आपल्या खोलीत झोपायला गेली. रात्र हळूहळू गडद होऊ लागली. तसं तिला अधिकच अस्वस्थ वाटू लागलं. तिने मग खोलीतला छोटा लॅम्प लावला आणि ती पुस्तक वाचत बसली. पण त्याचाही तिला कंटाळा आला म्हणून ती उठली. इतक्यात अचानक लाईट गेले. ती घाबरली. तिला काय करावं सुचेना. एक तर आज म्हादू काका पण घरात नव्हते. ती तशीच चाचपडत खोलीत फिरू लागली. अचानक तिला आपल्या आजूबाजूला कोणतरी असल्याचा भास होऊ लागला. ती घाबरली आणि तेवढ्यात मागून येऊन कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला. ती स्वतःला सोडवून घेण्यासाठी प्रयन्त करू लागली पण तिच्या तोंडावरची पकड घट्ट होती. शिवाय घाबरल्यामुळे तिची दातखिळीच बसली होती. कशीबशी त्या व्यक्तीला ढकलून ती झपझप जिना उतरत खाली आली.  टेबल वरती ठेवलेला अजिंक्यचा नंबर तिने धडपडतच मोबाईलच्या उजेडात डायल केला. ती प्रचंड घाबरली होती. भीतीने तिचे हातपाय थरथरत होते. तिला दरदरून घाम फुटला होता. अजिंक्यने फोन उचलला.

 

 

" हॅलो............. हॅलो अजिंक्य........ तुम्ही ..... तुम्ही प्लिज या.......ल.... का... लवकर  " एवढंच बोलून तिने फोन कट केला आणि तिने दरवाज्याकडे धाव घेतली.

 

 

फोनवर तिचा घाबरलेला आवाज ऐकून अजिंक्य लगेच बाहेर पडला. त्याची रूम बंगल्याच्या जवळ असल्यामुळे तो जवळजवळ धावतच बंगल्याच्या इथे पोहचला. तेवढ्यात दार उघडून धावत बाहेर आलेली नुपूर त्याला धडकली. 

 

 

" अजिंक्य.......... अजिंक्य तुम्ही........." एवढंच बोलून तिने त्याला घाबरून मिठी मारली.

 

 

 

 

क्रमशः......

 

 

 

काही दिवसांपूर्वी ईराच्या फेसबुक पेजवरती तुम्हाला कोणत्या कथा वाचायला आवडतील असं विचारण्यात आलं होतं. तेव्हा बऱ्याच जणांचं उत्तर हे रहस्य कथा वाचायला आवडेल असं होतं. ती उत्तरं वाचून मी ही रहस्य कथा लिहायला घेतली. पण आधीच्या दोन्ही कथांपेक्षा या कथेला खूपच कमी प्रतिसाद आला. याचं वाईट वाटलं. खरंतर तिसऱ्या भागानंतर कथा पुढे लिहायची की नाही हेच मला कळत नव्हतं. कारण कथेचा विषय वेगळा आहे आणि वाचकांना काहीतरी नवीन द्यायचं म्हणून ही कथा लिहायला मी सुरवात केली. पण माझी निराशा झाली. नंतर वाटलं की आपल्या लिखाणातुन तेवढे भाव कदाचित व्यक्त ही होत नसतील त्यामुळे कथेचं लिखाण पुढे चालू ठेवायचं ठरवलं. या नंतरच्या भागांना प्रतिसाद मिळेल अशी आशा करते. धन्यवाद.  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//