मेघ दाटले - भाग 3
एक हवालदार चाकू घेऊन बाहेर आला. सगळेजण आश्चर्याने पाहत होते.
" मॅडम..... तुम्हाला या चाकू विषयी काही माहीत आहे का....?? " पोलिसांनी तो रक्त लागलेला चाकू तिच्यासमोर धरत म्हटलं.
" नाही...... मला कसं माहीत असेल. " ती घाबरून म्हणाली.
" कसं आहे ना मॅडम..... एक तर राजवाडे पती पत्नीनी तुम्हाला दत्तक घेतलं होतं.... तुम्ही काय त्यांची पोटची मुलगी नव्हतात...तुम्हीचं तर त्यांना........." असं म्हणून इन्स्पेक्टर फक्त हसले.
" काय म्हणायचंय काय तुम्हाला..... मी जरी त्यांची मुलगी नसले तरी त्यांनी मला जिवापलीकडे जपलं होतं... आणि माझाही त्यांच्यावर तितकाच जीव होता....." ती काहीशी संतापून म्हणाली.
" हम्म ठीक आहे..... यावर बोटांचे ठसे मिळाले तर खरं काय ते कळेलच....तूर्तास तुम्हाला सगळ्यांना जबानी द्यायला पोलीस स्टेशनला यावं लागेल....." असं म्हणून पोलीस आणि त्यांची टीम निघून गेली.
थोड्या वेळाने नुपूर , म्हादू काका आणि निर्मला ताई पोलीस स्टेशनला गेले. नुपुरने त्यांना सगळं सांगितलं. नंतर निर्मला ताईंची देखील जबानी घेण्यात आली. म्हादू काकांची जबानी अजून बाकी होती म्हणून पोलिसांनी नुपूर आणि निर्मला ताईंना घरी जायला सांगितलं. त्या दोघीही बाहेर जायला निघाल्या. इतक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. गाडीतून उतरून एक व्यक्ती पोलीस स्टेशनकडे येऊ लागली. डोळ्यांवरचा गॉगल काढत तो पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत होता. नुपूर आणि निर्मला ताई सुद्धा बाहेर आल्या. नुपुरच समोरच्या व्यक्तीकडे लक्षच नव्हतं. त्यामुळे तिचा त्या व्यक्तीला धक्का लागला. तिचा तोल जाऊन ती पडणार इतक्यात त्याने तिला सावरलं. दोन क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. नुपूरने स्वतःला सावरलं आणि ती उभी राहिली. त्या व्यक्तीला सॉरी म्हणून ती आणि निर्मला ताई तिथून निघून गेल्या. एव्हाना गाडीचा हॉर्न ऐकून पोलीस देखील बाहेर आले होते. हातातला गॉगल त्याने टीशर्ट मध्ये अडकवला आणि आपला हात पुढे करत त्याने पोलिसांना स्वतःची ओळख करून दिली.
" हॅलो..... इन्स्पेक्टर अजिंक्य इनामदार.... फ्रॉम क्राईम ब्रँच....." त्याने पोलिसांशी हात मिळवला.
इन्स्पेक्टर अजिंक्य इनामदार..!!!!...जवळजवळ सहा फूट उंच....तरणाबांड..जिम करून कमावलेलं शरीर.... गोरा रंग.....छोटीशी ब्राईड दाढी....वेचक नजर....व्हाईट कलरचा टीशर्ट त्यावर चॉकलेटी कलरच लेदरच जॅकेट...जीन्स...हातात घड्याळ.....गाडीची चावी फिरवत तो पोलिसांच्या मागून आत आला. दारातून आत येताना मात्र त्याने क्षणभर मागे वळून नुपूर गेली त्या दिशेला पाहिलं आणि स्वतःशीच हसून तो आत आला. समोरच्या खुर्चीत म्हादू काका बसले होते. त्यांच्या बाजूच्या खुर्चीत अजिंक्य येऊन बसला. समोरच्या इन्स्पेक्टरने त्याला सॅल्युट केलं आणि तो आपल्या खुर्चीत बसला.
" बोला साहेब..... कसं काय येणं केलंत इकडे...." पोलिसांनी विचारलं.
" बिझनेसमन किशोर राजवाडे आणि त्यांची पत्नी निशा राजवाडे खून प्रकरण..... मी याच केसच्या संदर्भात इथे आलोय...." अजिंक्यने सांगितलं.
" हो सर..... बोला ना...." ते म्हणाले
" आजपासून ही केस मी हँडल करणार आहे. कमिशनर साहेबांची तशी ऑर्डर आहे...." असं म्हणून त्याने ऑर्डरचा कागद पुढे केला.
" हो सर.....काहीच प्रॉब्लेम नाही...." इन्स्पेक्टर कागद न्याहाळत म्हणाले.
" केसचा तपास कुठपर्यंत आलाय.... ? " त्याने विचारलं.
" सर त्यांच्या बंगल्यात मर्डर वेपन सापडलंय. एक रक्त लागलेला चाकू मिळाला आहे.. त्यांच्या मुलीची जबानी घेतलेय सर... आता त्यांच्याकडे काम करणाऱ्या नोकर माणसांची जबानी घ्यायची आहे...." ते म्हादू काकांकडे हात करून म्हणाले.
" ठीक आहे. तुम्ही तुमचं काम करा...." तो म्हणाला.
मग पोलीस म्हादू काकांची जबानी घेऊ लागले. त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलं. ते आधीपासूनच गावात होते त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या. त्यामुळे त्यांनी किशोरराव आणि त्यांच्या भावंडांमध्ये झालेल्या वादाबद्दल पोलिसांना सांगितलं.
" एक एक मिनिट........तुम्ही म्हणालात की किशोर राजवाडे यांना एक भाऊ आणि बहीण पण आहे.....?? " म्हादू काकांची जबानी ऐकत असलेल्या अजिंक्यने विचारलं.
" व्हय जी.... त्यांचं भाऊ नितीन दादा हितच राहतात गावमंदी.... पर त्यांचं नि सायबांचं पटलं न्हाय कदी...." ते म्हणाले.
" का.....?? " त्याने विचारलं.
" ते काय आमास्नी माहीत न्हायी सायेब....पर त्यांचा जुना वाडा व्हता तो त्यांच्या चुलत्यानी हडपला आनी या भावनडांच्यात भांडणं लागली......ती आमी समद्या गावानं बघितलं हाय....." एवढं बोलून ते थांबले.
" ठीक आहे.....तुम्ही जाऊ शकता...." पोलीस म्हणाले.
म्हादू काका बाहेर पडले तसं अजिंक्यने इतर पोलिसांशी बोलायला सुरवात केली.
" मग शिंदे तुम्हाला काय वाटतं कोणी केला असेल खून.....?? " अजिंक्यने विचारलं.
" साहेब मला वाटत......त्यांच्या मुलीनेच हे केलं असावं...." शिंदे म्हणाले.
" का......कशासाठी...?? " त्याच्या भुवया किंचित उंचावल्या गेल्या.
" अहो एक तर ती दत्तक घेतलेली आहे..... त्यात राजवाडेंची प्रॉपर्टी आहे भरपुर..... त्यांना मारून हिलाच तर मिळेल सगळं....."
" हमम..... पण तुमचा हा अंदाज खोटा असू शकतो... कारण मी फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट घेऊन आलोय हे बघा...." त्याने जॅकीटच्या खिशातून एक अनव्हलप काढून शिंदेकडे दिल.
" या रिपोर्ट नुसार..... चाकू मारणारी व्यक्ती ही तेवढीच मजबूत असली पाहिजे... वार हे शरीराच्या भागांवर कसेही केलेले आहेत याचा अर्थ मेलेल्या व्यक्तींनी आपल्या बचावासाठी प्रयन्त केला होता.....पण तरीही घाव खोल आहेत त्यामुळे हे काम नक्कीच एखाद्या पुरुषाचं असण्याची शक्यता आहे..." अजिंक्य म्हणाला.
" हम्मम...... साहेब कदाचित त्या मुलीने कोणालातरी मारायला पाठवलं असेल..? " शिंदेंनी आपली शंका बोलून दाखवली.
" बघू..... कळेलच आपल्याला तपास करताना " असं म्हणून तो उठला.
किशोर राजवाडेंनी बिझनेस मध्ये चांगलीच प्रगती केली होती. त्यामुळे मुंबईतही त्यांचं बऱ्यापैकी नाव होतं. अशा व्यक्तीचा अकस्मात खून झाल्यामुळे फक्त गावातच नाही तर बाकी शहरातही खळबळ उडाली होती. म्हणून मग कमिशनर साहेबांनी मुद्दाम अजिंक्यची या केस साठी निवड केली आणि त्याला तपासासाठी गावी पाठवले. अजिंक्यने आजपर्यंत अनेक केसेस हँडल केल्या होत्या. त्यामुळे ही केस देखील तो चांगल्या पद्धतीने सोडवेल अशी सर्वानाच आशा होती.
.............................................
अजिंक्यच्या राहण्याची सोय गावातल्याच एका घरात करण्यात आली. तिथून त्याला राजवाडेंचा बंगला स्पष्ट दिसायचा. असाच तो एकदा संध्याकाळचा घराची पाहणी करायला आणि राजवाडेंच्या मुलीला भेटायला म्हणून बंगल्यावर आला. त्याने बेल वाजवली. नुपुरने दार उघडलं आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. यलो कलरचा लॉंग टॉप त्यावर ब्लॅक प्लाझो.... गळ्यात मोठ्या बुट्ट्यांची माळ..... निस्तेज झालेला चेहरा आणि खोल गेलेले डोळे..... तरीही तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा तजेला असलेला त्याला जाणवला....
" हॅलो........" तिने हाक मारत त्याला जाग केलं तसा तो भानावर आला.... " हॅलो.... मिस्टर कोण हवंय...? "
" तू....... I mean तुम्ही.....??? परवा पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही मला धडकलात आठवतंय...." त्याने आपली चाचरत बोलायला सुरुवात केली.
" What.....??? काय बडबडताय तुम्ही....??? " तिने त्रासिक चेहरा करत विचारलं.
" ओहह..... सॉरी. मला राजवाडेंच्या मुलीला भेटायचं होतं.... केस संदर्भात...." त्याने सांगितलं.
" ok..... या आत...." ती आत गेली तिच्या मागोमाग अजिंक्य देखील आत आला. आत आल्यावर त्याची नजर चौफेर फिरत होती.
" बसा......" तिने सोफ्याकडे बोट दाखवलं. आणि ती समोरच्या खुर्चीवर बसली.
" अं.... हो...." तो सोफ्यावर जाऊन बसला. तोपर्यंत निर्मला ताई त्याच्यासाठी पाणी घेऊन आल्या. पाणी पिऊन त्याने ग्लास समोरच्या काचेच्या टेबलवर ठेवला.
" बोला काय काम आहे तुमचं.....?? " नुपूरने विचारलं.
" Actually ... मी केस संदर्भात चौकशी करायला आलो होतो.... मी इन्स्पेक्टर अजिंक्य इनामदार.... क्राईम ब्रँच....." त्याने उत्साहाने हात पुढे केला पण तिने फक्त हात जोडून नमस्कार म्हंटल्यावर त्याने हात मागे घेतला.
" सॉरी....." तो ओशाळला. " राजवाडेंच्या मुलीला भेटायचं होतं..."
" मीच नुपूर राजवाडे......बोला..." ती हाताची घडी घालून जराशी मागे टेकत म्हणाली.
" ओहह...... राजवाडे सरांबद्दल मला जरा माहिती हवी होती...." तो म्हणाला.
मग तिने त्याला आधीपासूनच सगळं सांगितलं. ती बोलत असताना त्याची नजर बंगल्याचं निरीक्षण करत होती. किशोरराव आणि निशाताईंबद्दल बोलताना ती भावूक झाली. क्षणभरच त्याला इन्स्पेक्टर शिंदेंच बोलणं आठवलं. ' ही मुलगी कशी काय कोणाला मारू शकते...' तो स्वतःशीच म्हणाला. त्याने मग बंगला दाखवण्याबद्दल तिला सांगितलं. तशी ती उठली आणि तिने मग त्याला बंगला दाखवला तो सगळं व्यवस्थित बघत होता. बोलत बोलत मग दोघेही बाहेर आले.
" तुम्ही काळजी करू नका..... तुमच्या आई बाबांच्या मारेकऱ्यांना आम्ही लवकरच शोधून काढू...." तो म्हणाला त्यावर ती फक्त विषादाने हसली.
दोघेही चालत चालत मागच्या बाजूला गेले. बंगल्याच्या मागच्या बाजूला वरच्या मजल्यावर फक्त एक खिडकी होती. कोणी व्यक्ती एवढ्या वरती चढून गेली असेल ही शक्यताच नव्हती. कारण पोलिसांच्या तपासानुसार बंगल्याची दारं खिडक्या या आतून बंद होत्या. त्यामुळे कोणी खिडकीतून आत आला असेल याची शक्यता नव्हती. बंगल्याच्या बाजूला झाडीही बऱ्यापैकी होती. रान वाढलं होतं. तसेच चालत ते दोघे पुढे गेले आणि अजिंक्यच्या पायाला काहीतरी खरखर लागलं. त्याने खाली वाकून पाहिलं तर त्याला मातीत एक छोटं बोटात घालायचं कडं सापडलं. त्याला माती लागली होती.
" हे तुमच्यापैकी कोणाचं आहे का...? " त्याने ते कडं तिला दाखवत विचारलं.
" माझं नाही... आणि बाकी कोणाच्या बोटात मी हे पाहिलं देखील नाही. " नुपूर म्हणाली.
" हम्म......." एवढंच म्हणून त्याने पँटच्या खिशातून एक छोटी प्लॅस्टिकची पिशवी काढली आणि त्यात ते कडं ठेवून पिशवी खिशात ठेवली.
" मी निघतो आता..... काही गरज पडली तर पुन्हा येईन...." ती त्याला सोडायला पुढपर्यंत आली. दोघेही बंगल्याच्या मेन डोअर पर्यंत चालत आले आणि तिचा निरोप घेऊन अजिंक्य पुढे चालू लागला. इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आलं तसं तो पुन्हा माघारी आला.
" कधीही काहीही मदत लागली तर मला या नंबर वरती फोन करा....." असं म्हणून त्याने खिशातून डायरी काढली आणि त्यावर आपला नंबर लिहून कागद नुपूर कडे दिला.
" थँक्स......" ती इतकंच म्हणाली. तो मग तिथून तिला बाय म्हणून बाहेर पडला. त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तर नुपूर कधीच आत गेली होती. तो स्वतःशीच हसला. एकवार मानेवरून हात फिरवत तो चालू लागला... ती त्याला आवडली होती....!!!! तो मग आपल्या रूमकडे निघून गेला. एव्हाना काळोख पडायला सुरुवात झाली होती. दूरवर पसरलेल्या झाडांमधून कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून होतं.....