मेघ दाटले - भाग 2

Suspense , Love

मेघ दाटले - भाग 2 

नुपूर बंगल्यात आली. तिने पाहिलं तर समोर किशोर आणि निशाताईंचा मृतदेह ठेवले होते. ते दृश्य बघून तिने एकच किंकाळी फोडली. आजूबाजूच्या बायकांनी तिला सावरलं. कितीतरी वेळ ती रडत होती. पोलिसही आले होते. ती आल्यानंतर मग पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. आलेली माणसं हळूहळू आपापल्या घरी जाऊ लागली. ती हॉल मध्ये तशीच एकटक बघत बसली. तिला आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टीचं भान नव्हतं. आज सकाळीच तिला म्हादू काकांचा फोन आला होता. किशोरराव आणि निशाताईंचा चाकू खुपसून खून करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे म्हादू काका सकाळी कामाला म्हणून बंगल्यात आले. ते आले तेव्हा बंगल्याचं दार उघडचं होतं. ते आत गेले तर समोरचं दृश्य थरकाप उडवणार होतं. त्यांचे मालक आणि मालकीण दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले.तसं त्यांचं अवसानचं गळाल. त्यांचे पाय लटलटू लागले. कसंबसं तिथून बाहेर पडत त्यांनी गावच्या सरपंचांना ही बातमी सांगितली. तसे ते तातडीने तिथे आले. त्यांनी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तोपर्यंत म्हादू काकांनीही नुपुरला फोन करून कसबस सांगितलं. तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. म्हणून मग ती मिळेल त्या ट्रेनने गावी आली. या सगळ्या प्रकारामुळे गावात भीतीच वातावरण पसरलं होतं. या आधीही गावात त्याच बंगल्यात राहणाऱ्या भाडेकरूंचा खून करण्यात आला होता आणि आता तर मालक व मालिकिणीचाच खून झाला होता. त्यामुळे बंगल्यावर येताना नुपुरकडे सगळे साशंक नजरेने पाहत होते. 

.....................................

बराच वेळ झाला तरी नुपूर तिथेच बसून होती. काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं. आजुबाजूची माणसं देखील आता पांगली. फक्त म्हादू काका , त्यांची बायको आणि गावचे सरपंच , पोलीस इतक्याच व्यक्ती उरल्या होत्या. सरपंच बाहेर पोलिसांसोबत बोलत होते. पण पोलिसांना नुपुरशी बोलायचं होतं म्हणून ते आत आले. 


" ताईसाब.......पोलीस आल्याती....तुमच्याशी बोलायचं हाय त्यास्नी...." म्हादू काका म्हणाले. पण तिचं लक्षच नव्हतं. ती सुन्न होऊन जमिनीकडे बघत होती. 

" ताईसाब......आवं ताईसाब....." म्हादू काकांची बायको निर्मला तिला हलवून जाग करत होती.


" अं....... अं.......काय झालं....??? " तिने विचारलं

" पोलीस....भेटाया आलेत तुमास्नी...." निर्मला म्हणाली.

" मॅडम.....आम्ही दोन्ही डेडबॉडीज ताब्यात घेतल्या आहेत. तुमचा कोणावर संशय....?? " पोलिसांनी विचारलं.


"नाही.....मला यातलं काहीच माहीत नाहीये...." ती दुसरीकडे बघत म्हणाली. 


" मग त्यांची कोणाशी दुष्मनी.... किंवा कोणाशी भांडण वगरे झाल्याचं तुम्हाला काही माहितेय का....??? " 


" नाही मला खरंच काही माहीत नाही. मॉम डॅड फार चांगले होते. ते कधीच कोणाशी वाईट वागले नाहीत......पण तरीही असं का झालं मला माहित नाही...." एवढं बोलून नुपूर रडू लागली. 


" ठीक आहे मॅडम.. तुमचं दुःख आम्ही समजू शकतो तरीही उद्या रीतसर तक्रार नोंदवायला तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल....." असं पोलिसांनी सांगितलं.


" ok....."  ती असं बोलल्यावर पोलीस बाहेर आले. 


लांबवर पसरलेल्या झाडांच्या रांगांमध्ये कोणीतरी लपून बंगल्यावर लक्ष ठेऊन होतं. पोलीस बाहेर आले तशी ती व्यक्ती पळाली. पोलिसांनी मागे पुढे नजर टाकली पण त्यांना कोणीच दिसलं नाही. मग सरपंचांचा निरोप घेऊन ते तिथून निघून गेले. त्यानंतर सरपंच देखील नुपुरला काळजी घ्यायला सांगून तिथून निघून गेले. घरात आता फक्त म्हादू काका , त्यांची बायको निर्मला आणि नुपूर होते. नुपूर आपली छताला डोळे लावून शांतपणे बसली होती. म्हादूकाकांना तिची अवस्था पाहवेना. म्हादू काकांचा फोन आल्यावर ती तातडीने निघाली होती. त्यामुळे तिने काहीच खाल्लं नसेल हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या बायकोला तिच्यासाठी जेवण करायला सांगितलं आणि ते ही तिच्या मदतीसाठी गेले. नुपूर अजूनही आई बाबा गेले या धक्क्यातून सावरली नव्हती. त्यात त्यांचा कोणीतरी खून केला आहे ही गोष्ट जास्तच भयानक होती. थोड्या वेळाने निर्मलाताई तिच्यासाठी जेवण घेऊन आल्या. पण तिला भूक नव्हती. त्यांनी जबरदस्तीने तिला दोन घास भरवले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तसा नुपुरच्या तोंडुन जोराचा हुंदका बाहेर आला. ती निर्मलाताईंना बिलगून रडू लागली. आज इतक्या वर्षानी तिला पुन्हा एकदा पोरकेपणा जाणवू लागला. त्यांचं हसतं खेळतं कुटुंब क्षणार्धात उध्वस्त झालं होतं. तिचं असं मायेचं माणूस म्हणून आता कोणीच उरलं नव्हतं. गावात नितीन काकांच घर होतं. पण त्यांच्याशी किशोररावांनी कधीच संबंध तोडले होते. त्यामुळे मग मुद्दामहून ते नुपुरच्या मदतीला येतील अशी आशाच नव्हती. 

.............................................

दुसऱ्या दिवशी नुपूरला घेऊन म्हादुकाका आणि निर्मलाताई पोलीस स्टेशनला आले. नुपूर कडून पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली. आता त्यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी कोणतीच अडचण आली नसती. काल गुन्हा घडला ती जागा आणि बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांनी सील करून ठेवला होता. फक्त घरातल्या लोकांना राहण्यासाठी एक बाजू मोकळी ठेवली होती. तरीही कोणत्या गोष्टीला हात न लावण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. नुपूर सोबतच पोलीस पुन्हा बंगल्यावरती आले. आता त्यांनी झडती घ्यायला सुरुवात केली. बंगला चांगलाच मोठा होता. त्यामुळे प्रत्येक खोलीत जाऊन कपाटं , दार , खिडक्या सगळं तपासायला सुरवात झाली. कपाटातून कपडे , बाकीच्या वस्तू बाहेर पडू लागल्या. अशातच पोलिसांना नुपुरला दत्तक घेतल्याची फाईल मिळाली. ती फाईल घेऊन ते बाहेर आले. 


" मॅडम , किशोर साहेब आणि निशा मॅडमनी तुम्हाला दत्तक घेतलं होतं हे तुम्हाला माहितेय का ? " 


" हो......मी पाच वर्षांची असताना ते मला या सावली बंगल्यात घेऊन आले आणि कायम सावलीसारखे माझ्या पाठीशी उभे राहिले....." तिच्या डोळ्यात पाणी आलं.


" हमम..... मॅडम अजून काही सांगू शकाल का त्यांच्याबद्दल.....जेणेकरून आम्हाला तपास करायला सोपं जाईल..." 


" हो. डॅड आधी मुंबईत एका कंपनीत जॉबला होते. त्यांच्या हुशारीमुळे त्यांना प्रमोशन मिळत गेलं. हाताशी पैसे साठल्यावर त्यांनी गावी आपलं घर असावं म्हणून बंगला बांधला आणि इथेच व्यवसाय उभारला. माझ्या शिक्षणासाठी आम्ही पुन्हा मुंबईत गेलो पण मग मला जॉब लागल्यावर त्यांना वाटलं की त्यांचं रिटायर्ड लाईफ इथे घालवावं सो ते दोघेही इकडे आले....पण असं काही घडेल असं वाटलंच नाही....." ती पुन्हा रडू लागली.


" मॅडम तुमचा कोणावर संशय वगरे....? कारण ते बिझनेस करत होते त्यामुळे त्यांनाही प्रतिस्पर्धी निर्माण झाले असतीलच..... तुम्हाला ते कधी काही बोलले का....किंवा काही कौटुंबिक वाद.....??? " पोलिसांनी विचारलं. त्यांच्या शेवटच्या वाक्यावर मात्र म्हादू काकांचा चेहरा पडल्याचं पोलिसांना जाणवलं पण त्यांनी काहीच विचारलं नाही. 


" मला यातलं खरंच काही माहीत नाही. आणि बिझनेसचं म्हणाल तर तुम्ही मॅनेजरशी बोलू शकता. ते तुम्हाला सांगतील....." ती म्हणाली. 


" ठीक आहे. आम्हाला बाकीच्यांचीही जबानी घ्यायची आहे. सध्या तरी खुनाच  काहिच प्राथमिक कारण दिसत नाहीये....." 


ते बोलत असतानाच एक हवालदार आतल्या खोलीतून  एक रक्त लागलेला चाकू रुमालात पकडून घेऊन येतात. नुपूर , म्हादू काका आणि निर्मला ताई क्षणभर एकमेकांकडे पाहतच राहतात....


क्रमशः......

🎭 Series Post

View all