( दिनेश आणि बारकुच्या जबानी वरून अजिंक्य आणि त्यांची टीम साहेब कोण हे बघायला गेली. बारकूने पुढे जाऊन साहेबांना सगळं सांगितलं आणि मग त्यांनी बांधलेल्या मोहितेंच्या डोक्याला बंदूक लावली. पाहुयात आता पुढे )
बारकुला शिव्या घालत त्या व्यक्तीने खुर्चीवर बांधलेल्या मोहितेंच्या डोक्याला बंदूक लावली. मोहितेंना समोर अशा अवस्थेत पाहून तर अजिंक्यच्या पायाखालची जमीनच सरकली. ते त्याला इथे सापडतील अस वाटलंच नव्हतं. रिव्हॉल्व्हर रोखलेले त्याचे हात आपोआपच सैल झाले.
" हा पावन मागं व्हायचं...नि हातातलं खेळनं खाली टाका बगु......." ती व्यक्ती हसत म्हणाली आणि त्यांनी खुणेनेच अजिंक्यला चार पावलं मागे जायला सांगितलं.
मोहितेंच्या डोक्याला लावलेल्या बंदुकीकडे बघत अजिंक्य लांब झाला. त्याने हातातलं रिव्हॉल्व्हर खाली टाकलं. आणि उभा राहिला. इतक्यात त्या व्यक्तीच्या मागच्या बाजूला बघत बारकु म्हणाला..
" दादानु , तुमी कधी सुटलासा......" असं बारकूने म्हणताच त्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं. त्याच क्षणी अजिंक्यने समोरचं रिव्हॉल्व्हर उचलून त्यांच्या डोक्याला लावलं.
" You are under arrest Mr. Sarjerao Rajwade "
.....................................
सकाळचे सहा वाजले तरी अजिंक्य अजुन परतला नव्हता. इकडे नुपूर त्याची वाट पाहून थकली. तिने त्याला एक मेसेज करून ठेवला जर तू दहा वाजेपर्यंत आला नाहीस तर मी मुंबईला निघुन जाईन. रात्री इतकं सगळं घडलं होतं की त्याची तिला काहीच कल्पना नव्हती. पोलीस स्टेशनला सर्जेराव राजवाडे जणु काही झालंच नाही अशा अविर्भावात बसले होते. त्यांनी लांब बसलेल्या दिनेश आणि नितीनरावांकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि ते छदमीपणे हसले.
" बोला , सर्जेराव राजवाडे... कशासाठी केलंत हे सगळं..." अजिंक्य रागाने म्हणाला.
" प्रॉपर्टी साठी...."
" प्रॉपर्टी साठी तुम्ही दोन निष्पाप लोकांचा जीव घेतलात...." शिंदे म्हणाले. त्यावर ते फक्त हसले.
" आवं हा दिनेश नि त्याचा हा बाप दोग बी लई मूर्ख हायती. या नितीनला सांगितलं की तुझा थोरला भाऊ समदं घर स्वतःच्या नावावर करतोय. आनी या येड्याला ते खरं वाटलं. भावासोबत भांडला. वाडा मग आपसूकच आमच्या ताब्यात आला. मग हाव काय सुटना. किसोरन लई इष्टेट मिळावलीय. म्हनून मग या खुळ्या दिनेशच्या डोसक्यात आमी त्यांच्याबद्दल राग भरू लागलो. नि त्याला बी ते पटलं. दिनेशला त्यांच्या खुनात अडकवुन समदी इष्टेत आमच्या नावावर करून घ्यायचं ठरवलं. पर समदं फिस्कटलं. त्या दिशी आमी दिनेशला आत धाडलं नि हे मोहिते मामा आमचं बोलणं ऐकत व्हते. ते मुंबईवरून किसोरला भेटाया आले व्हते पर आमचं समदं बोलणं त्यांनी ऐकलं मग काय त्यांना बी उगा डांबून ठेवाय लागलं..." सर्जेराव राजवाडेंनी सगळ्याची कबुली दिली. सगळे सुन्न होऊन ऐकत होते. गोड बोलून आपल्याच पाठीमागे कोणीतरी खंजीर खुपसत असेल याची दिनेशला कल्पना देखील नव्हती.
त्या दिवशी कंपनीत चाललेल्या घोटाळ्याप्रकरणी बोलण्यासाठी म्हणून मोहिते मामा तातडीने गावी आले होते. पण सर्जेरावांच आणि दिनेशच बोलणं कानावर पडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते काही क्षण तिथेच खिळल्यासारखे उभे होते. त्यांच्या हातातल्या फाईल पडल्या आणि सर्जेरावांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांनी ओळखलं की मामांनी आपलं बोलणं ऐकलं आहे. ते ओरडणार इतक्यात सर्जेरावांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला. त्यांच्या माणसांनी मागून येऊन मामाच्या डोक्यावर जोरात काठी मारली. त्याबरोबर मोहिते खाली कोसळले. सर्जेरावांच्या विरुद्ध तो एकमेव साक्षीदार होता म्हणून मग त्यांनी त्याला आपल्या वाड्याच्या मागच्या झोपडीत लपवून ठेवलं.
मोहितेंनी अजिंक्यचे आभार मानले. अजिंक्यने मग सर्जेराव राजवाडे , दिनेश , बारकु याना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले.
.....................................
हे सगळं आटपेपर्यंत सकाळचे साडे दहा वाजत आले. अजिंक्य रिलॅक्स होऊन खुर्चीवर बसला. रात्रभर या सगळ्या प्रकारामुळे त्याला आता झोप येत होती. त्याने डोळे चोळले. टेबलवर समोरच असलेला मोबाईल त्यांने बघितला तर त्यावर नुपुरचा मेसेज होता.
" तू जर दहा पर्यंत आला नाहीस तर मी मुंबईला निघून जाईन "
अजिंक्यने तो मेसेज वाचला आणि तो उडालाच. ती असं काही ठरवेल असं त्याला वाटलं नव्हतं. मोबाईल घेऊन तो जवळजवळ धावतच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. गाडीला किक मारून तो राजवाडेंच्या बंगल्याकडे जायला निघाला. तो गेला तोपर्यंत मात्र नुपूर निघून गेली होती. म्हादुकाकांनी ती रिक्षेने रेल्वे स्टेशनला गेली म्हणून सांगितलं. अजिंक्यने तशीच गाडी रेल्वे स्टेशन कडे वळवली. गाडी लावून धावतच तो प्लॅटफॉर्म वर पोहचला. पण त्याला नुपूर कुठेच दिसेना. त्याने सगळा प्लॅटफॉर्म पालथा घातला. तेवढ्यात त्याला समोरच्या प्लॅटफॉर्मवर पिंक कुर्ता त्यावर ब्लु जीन्स घातलेली आणि भांबावलेला चेहऱ्याची नुपूर दिसली. आपसूकच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आलं. तो मग क्रॉस करून तिच्या समोर जाऊन उभा राहिला. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. तिने नजर वर करून पाहिलं तर अजिंक्य उभा होता. त्याला बघून तिने नजर फिरवली.
" सॉरी सॉरी सॉरी...... अग तुझा मेसेज मी उशिरा बघितला. रागावू नको ना. रात्रभर केसच्या तपासामुळे झोप नाही गं..... का चिडलेयस एवढी..." तो तिच्या बाजूला बसत म्हणाला.
" असच... कंटाळा आला इकडे. खूप दिवस झाले ना....जाते आता परत...." ती अजूनही त्याच्याकडे बघत नव्हती.
" मला एकट्याला टाकून जाणारेस का इकडे...??? " त्याने तिचा हात हातात घेत अगतिक होऊन विचारलं.
" नुपूर माझं ऐक तरी...काल तुझ्या बाबांचा आणि आईचा खून करणाऱ्या माणसाचा शोध लागला. ..." तो म्हणाला.
" खरंच....!!! " ती त्याच्याकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.
मग अजिंक्यने तिला काल काय काय घडलं ते सगळं सांगितलं. तेव्हा जरा तिचा राग शांत झाला. आणि आपण उगीचच अजिंक्यवरती चिडलो या गोष्टींचं वाईटही वाटलं.
" असं झालं सगळं आता तू बघ. राग ठेवायचा की घालवायचा...." अजिंक्य नजर लपवत हसून म्हणाला.
" काय रे..... जा मी बोलतच नाही...." तिनं तोंड फुगवल.
" अजूनपण बोलणार नाही आहेस का...?? ओके जातो मग मी....." तो उठला.
" बस इथे गपचुप...." ती त्याचा हात खेचत म्हणाली. तो फक्त गालात हसत होता. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
" काल तू काहीतरी सांगणार होतीस मला.... काय गं...?? " त्याने विचारलं.
" काही नाही.. " ती लाजली.
" सांग ना.........." तो. तिने दीर्घ श्वास घेतला. डोळे मिटले.
" अजिंक्य...... मी........ माझं प्रेम आहे तुझ्यावर..!!!!. हेच सांगायचं होतं तुला काल पण तू निघून गेलास. मला वाटलं तुला नसेन आवडत मी. म्हणून मग मी शेवटी मुंबईला जायचा निर्णय घेतला. " एका दमात ती बोलुन मोकळी झाली. अजिंक्य ऐकतच राहिला. आपण ऐकतोय ते खरं की खोटं तेच त्याला कळेना.. नुपुरने डोळे उघडले तर तो एकटक तिच्याकडेच पाहत होता.
" काय पाहतोस असा......." ती जरा लाजत म्हणाली.
तरीही त्याचं लक्ष नव्हतं. शेवटी तिने त्याचा हात हातात घेतला आणि चिमटा काढला. तेव्हा कुठे साहेब भानावर आले.
" आआ......... दुखलं ना...." तोहात चोळत म्हणाला.
" अजिंक्य माझं खरंच मनापासून प्रेम आहे तुझ्यावर....तुझं
?? " तिने उत्सुकतेने विचारलं.
त्यावर तो काहीच बोलला नाही. तोंड पाडून तो डोक्याला हात लावून बसला. नुपुरला वाटलं झालं सगळं. त्याला काही वाटतं नाही आपल्या बद्दल. ती उठून जाऊ लागली तसा त्याने तिचा हात पकडला.
" सोड माझा हात... जाऊदे मला. तुझं उत्तर कळलं...."
" काय कळलं...?? "
" हेच की तुझं माझ्यावर प्रेम नाही ते....."
" हा धरलेला हात मी कधीच सोडणार नाही. असं प्रॉमिस दिलं तरीही......" तो मिश्किल हसला.
" हो........." ती म्हणाली मात्र पण मग तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ जाणवला. ती मागे फिरली आणि अलगद त्याच्या मिठीत विसावली....!!!!! कधीही दूर न होण्यासाठी...!!!!
समाप्त.
काही मेडिकल इमर्जन्सी मुळे मेघ दाटले चा अंतिम भाग पोस्ट करायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. आज तब्बल 15 ते 20 दिवसांनी मी लिहायला घेतलं असेल. रोज वाटतं होतं की वाचक आपल्या भागाची वाट पाहत असतील पण मला लिहिणं शक्य झालं नाही. एवढ्या दिवसानंतर भाग पोस्ट झाल्याने कथेची रुची गेली असेल याची मला कल्पना आहे. पण तरीही शेवटचा भाग न पोस्ट करणं मला योग्य वाटतं नव्हतं. त्यासाठी इतक्या दिवसांनी का होईना भाग पोस्ट करतेय. तुमच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया देखील आल्या असतील पण कोणाशीच संवाद साधता आला नाही. त्यासाठी वाचकांना खरंच सॉरी. सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.तुमचं असंच प्रेम आम्हा सगळ्या लेखकांना मिळुदे. ही आपुलकी कायम अशीच राहू दे. नवीन कथेसह लवकरच भेटू.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा