Feb 24, 2024
रहस्य

मेघ दाटले - भाग 21

Read Later
मेघ दाटले - भाग 21

मेघ दाटले भाग – 21

 

पोलीस स्टेशनला अजिंक्य दिनेशची जबानी ऐकत होता. रात्र हळूहळू गडद होत होती. मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक अंगावर शहरा आणत होती. रात्रीचे जवळजवळ दोन वाजत आले होते. तोपर्यंत शिंदे दिनेशच्या घरून गाडीचे कागदपत्र घेऊन आले. त्यांच्यासोबत दिनेशचे वडील नितीनराव पोलीस स्टेशनला आले. त्यांनी एकवार दिनेशकडे पाहिलं. रडून रडून त्याचे डोळे लाल झाले होते. तो आपला शून्यात नजर लाऊन बसला होता. नितीनरावांच्या येण्याची चाहूल लागली तशी त्याने नजर त्यांच्याकडे फिरवली. पाणी साठ्लेल्या डोळ्यांनी त्याने बापाकडे पाहिलं. त्याच्या त्या केविलवाण्या नजरेने तो आपल्याला सोडवण्यासाठी बापाकडे हजार आर्जव करत होता. नितींनरावाना देखील त्याची अवस्था पाहवत नव्हती. त्यांनी फक्त डोळे मिटुन त्याला आश्वस्थ केल आणि ते तिथल्याच एका बाकावर जाऊन शांतपणे बसले.

 

“ साहेब हे गाडीचे कागदपत्र.” शिंदे अजिंक्य समोर फाईल ठेवत म्हणाले.  “ साहेब हे सगळे कागदपत्र खोटे आहेत. यात फक्त गाडी दिनेशच्या नावावर केली असल्याच भासवल आहे.”

 

अजिंक्यने काळजीपूर्वक सगळे पेपर तपासले. ते बघितल्यावर त्याच्या आठवल कि म्हादू काकांनी त्या शिक्षकांचा अपघात झाला त्या दिवशी दिनेशला त्या ड्रायव्हर सोबत बोलताना बघितलं होत. तो मग खुर्चीतून उठला आणि दिनेशच्या समोर जाऊन उभा राहिला.

 

“ मला सांग तू ही गाडी कोणाकडून खरेदी केलीस ?” अजिंक्यने विचारल

 

“ त्ये सायबांच्या वळखीचा एक मानुस आला व्हता. गाडी कमी किमतीला व्हती म्हणुन मग म्या बी ती घ्यायचा इचार केला. “ तो म्हणाला

 

“ पण गाडी तू पाहिलीस का ? गाडी पूर्णतः चांगली होती का ? “ अजिंक्य

 

 

“ न्हाय. तो मानुस म्हनला जरा गाडीचं काम करावं लागेल बाकी गाडी चांगली हाय. थोडं काम करून गाडी मिळतीया ती कशाला सोडा म्हनून म्या घेतली गाडी. अजून पैक बी दिल न्हाईत त्याचं “ दिनेश म्हणाला.

 

“ अरे पण, इतक्या सहजासहजी तुला तो माणूस गाडी विकतोय याचा संशय नाही का आला तुला ...? “ अजिंक्यने जरा चिडून विचारल.

 

“ वाटल की. पर तो मानुस सायबांच्या वळखीचा व्हता म्हनून मग गप बसलो. “

 

दिनेशच्या बोलण्यावरून त्याला ह्या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती हे दिसत होत. त्याला मुद्दामहून कोणीतरी या सगळ्या प्रकारात गोवत होत. हे एव्हाना अजिंक्यच्या लक्षात आल. तरीही दिनेश पूर्णपणे निर्दोष आहे हे देखील सिद्ध होत नव्हते.

 

“ मला सांग पाच महिन्यांपूर्वी जेव्हा त्या देसाई सरांचा अपघात झाला, त्या रात्री तू कोणालातरी पळून जायला पैसे दिलेस ना ?”

 

हे ऐकून मात्र दिनेशची पाचावर धारण बसली. त्याला काय बोलाव सुचेना. तो खुर्चीतून उठून अजिंक्य जवळ आला. त्याच्या पायाशी पडून तो गयावया करू लागला.

 

“ म्या न्हाय दिले कोनाला पैसे......” तो रडत म्हणाला.

 

“ खोट बोललास तर सगळ तुझ्याच अंगाशी येणारे दिनेश त्यापेक्षा खर बोल. नाहीतर तुझ्यावर अजून एका खुनाचा आरोप ठेवला जाईल.

 

“ माझा या समद्याशी काय बी संबंद नाय. त्या दिशी ते पैसे मी सायबांनी सांगितले म्हनून द्याया गेलो व्हतो आनी त्यांनी त्या मानसाला दिलेला निरोप तेवडा मी पोचीवला आनी मी घरी आलो बगा. माझी काय बी चूक न्हाय सायेब माफी द्या मला....” तो गयावया करत राहिला.

 

अजिंक्यने काही वेळ विचार केला. तरीही कोणत्या तरी गोष्टी अपूर्ण आहेत अस त्याला राहून राहून वाटत होत. एका बाजूने गुंता सुटतही होता तर दुसऱ्या बाजुने पुन्हा एकदा नवी गुंडाळी समोर दिसत होती. त्याचं लक्ष दिनेशच्या शेजारी बसलेल्या बारकुकडे गेलं. बारकू मगापासुन शांत बसून समोर जे घडतंय ते पाहत होता.

 

“ हा बारकू तुझ्यासाठीच काम करतो न...? कधीपासून सांगितलं होतस त्याला बंगल्यावर लक्ष ठेवायला ?” अजिंक्यने विचारल.

 

“ म्या.....?? आवं माझा काय संबंद म्या न्हाय या बारकुला कोनावर बी लक्ष ठेवाया सांगितलेलं ..” तो बारकुकडे बघत म्हणाला. आपल नाव निघताच  बारकू तिथून पळून जाऊ लागला पण शिंदेनी त्याला पकडलं

 

“ बोला बारकू शेठ कोणाच्या सांगण्यावरून नजर ठेऊन होतात बंगल्यावर...? “ शिंदेनी त्याची मान आवळत विचारल.

 

“ सांगतो सांगतो........” असं म्हणुन बारकूने पण साहेबांचं नाव घेतलं. दिनेशला मात्र आश्चर्य वाटल. आपल्या पाठीमागे इतक काही घडत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती.

 

“ हम्म , आता तर तुझ्या साहेबाना भेटायलाच हव. काय नाव तुझ्या साहेबांचं...? “ अजिंक्यने विचारलं.

 

दिनेशने नाव सांगताच अजिंक्य लगेचच बाहेर पडला सोबत बारकुला देखील घेतलं. शिंदे आणि एक हवालदारही सोबतीला होते. ते निघून गेल्यावर नितीनराव दिनेशपाशी आले. त्यांनी त्याला छातीशी कवटाळल. खोल खाईत पडणाऱ्या मुलाला बघून ते काहीही करू शकत नव्हते. इतके दिवस आपल म्हणुन ज्यांना जवळ केल होत. त्याच लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. दिनेशला जवळ घेऊन ते कितीतरी वेळ रडत राहिले. पैशापाठी धावता धावता त्यांच्यावर पोटच्या मुलालाच गमवायची वेळ आली होती.....!!!

 

....................................................

पहाटेचे चार वाजत आले. अजिंक्य आणि बाकीचे सगळे गावाबाहेरच्या शेताजवळ असलेल्या एका झोपडीवजा घराजवळ आले. दार उघडून बारकू आत आला. समोरच्याच एका खुर्चीवर एक व्यक्ती डोळे मिटुन पडली होती.

 

“ सायेब........ सायेब उटा.....” बारकू त्या व्यक्तीला उठवत करत म्हणाला.

 

“ काय रं बारक्या ही येळ हाय का उटवायची.......” असं म्हणुन त्या व्यक्तीने एक जोरात शिवी हासडली.  “ काय झालं काय आग लागली काय कुट...?” जरा नाराजीनच ती व्यक्ती उठली.

 

“ आवं सायेब त्या इनिस्पेक्टरला समद समजलंया..........” बारकू जरा घाबरत घाबरतच म्हणाला.

 

“ मग काय झालं...... आपला काय संबंद नाय कशाशी.......” असं म्हणुन ते आतल्या खोलीत गेले. त्यांच्या पाठोपाठ बारकू देखील आत आला.

 

“ आवं पर दिनेसन तुमचं नाव घेतलंया.......” बारकू म्हणाला त्यावर ती व्यक्ती फक्त हसली.

 

“ तशीच येळ पडली तर ह्यो हाय कि आपला हुकमी एक्का.........” त्या व्यक्तीने खुर्चीला बांधलेल्या मि. मोहितेंवर एक नजर टाकली आणि ते हसले.

 

इतक्यात झोपडीच दार उघडून अजिंक्य आत आला. त्याच्या हातात रिव्हॉल्वर होत. त्याला असं अचानक आलेलं बघून ती व्यक्ती चिडली.

 

“ बारक्या......... साल्या माझ्या घरचं मीठ खातोस नि माझ्याच पाटीत खंजीर खुपसतोयास.....” ती व्यक्ती दाट ओठ चावत म्हणाली आणि पुढच्याच क्षणी सदरयात लपवलेली बंदूक त्यांनी बाहेर काढली आणि मोहितेंच्या डोक्याला लावली.

 

क्रमश.............

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//