Feb 29, 2024
रहस्य

मेघ दाटले - भाग 20

Read Later
मेघ दाटले - भाग 20

मेघ दाटले भाग 20

 

“ व्हाय, म्याच केला खून “ तो ओरडून म्हणाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

“ पण का ? कशासाठी ? “ अजिंक्यने विचारल

“ आज आमची जी परिस्थिती हाय त्याला फक्त ह्यो किशोर काका जबाबदार हाय . “

“ अस काय केल त्यांनी जे तू त्यांच्या जीवाबारच उठलास ? “

“ काय केल ? आवं आजोबा गेल्यानंतर या माणसान आम्हाला समद्यांना घराबाहेर काढलं. एवढा मोठा वाडा व्हता पन आमस्नी खोपटात राहाया लागतंय. दुसऱ्याच्या शेतात राबाया लागतंय. कुठे बी गेलो तरी या काकाच्या कामाचे गोडवे तुझा किशोर काका असा तूझा किशोर काका तसा, च्यायला कंटाळा आला. समद आमच्या हक्काचं असुन बी आमास्नी मिळालं न्हायी. तवाच ठरवलं काकाची समदी इस्तेस्त आपल्या मिळाया पायजे. पर त्या दिवशी मी त्यास्नी माराया न्हवतो गेलो. फक्त त्यास्नी घाबरवून त्यांच्याकडून सह्या करून घेनार व्हतो.” इतक बोलून तो थांबला.

 

इतक्यात अजिंक्याचा फोन वाजला. नुपुरचा फोन होता. त्याने फोन उचलला.

“ मी कामात आहे. आपण उद्या बोलू. “ अस म्हणून त्याने तीच ऐकूनही न घेता फोन कट केला.

इकडे नुपूर मात्र विचारात पडली इतक काय महत्वाच काम आहे कि मला सांगण्यासारखं नाही ? ती खट्टू झाली. अजिंक्य आपल्याला टाळत तर नसेल ? त्याच विचारात ती बसली होती तिथे सोफ्यावर आडवी झाली. वाऱ्याच्या थंडगार झुळूकेसोबत तिला कधी झोप लागली कळलच नाही.

 

अजिंक्यने फोन कट केला आणि तो पुन्हा एकदा दिनेश काय बोलतोय त्या कडे लक्ष देऊ लागला.

“ हा बोल. तू सांगत होतास काहीतरी. “ अजिंक्य म्हणाला.

“ म्या त्या दिवशी त्यांना माराया गेलो नव्हतो. पर त्यांनी केलेल्या समद्या गोस्ती आठवल्या आणि रागाच्या भरात माज्या हातून नकू ते होऊन बसलं. “ तो खाली मान घालून रडू लागला.

 

अजिंक्यने त्याच बोलण ऐकून घेतलं. त्याला अजूनही अस वाटत होत की, या सगळ्यात जरी दिनेश दोषी असला तरी तो एकटा एवढ धाडस करेल असं वाटत नव्हत. तरीही माणसाची विवेक बुद्धी काम करेनाशी झाली कि माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे त्याने हे सगळ कसं केल हे जाणुन घेण महत्वाच होत. शिवाय केवळ राजवाडे पती पत्नीच्या खुनाचा आरोप दिनेश वरती नव्हता तर बंगल्यात राहिलेल्या शिक्षकांच्या अपघाती मृत्यूचा देखील त्याच्यावर आरोप ठेवला होता.

 

“ हम्म, मला सांग त्या देसाई शिक्षकांचा अपघात कोणी करवुन आणला ?” तो जरा त्याच्या समोर झुकून म्हणाला.

“ मला का विचारताय.. ? मला काय बी म्हाईत न्हायी...” तो घाबरून म्हणाला  

“ ज्या गाडीने अपघात झाला ती गाडी तुझ्या नावावर आहे.” अजिंक्य

“ कुठल्या गाडीचं बोलताय तुमी मला काय बी म्हाईत न्हायी.” दिनेशला काहीच कळत नव्हत.

 

अजिंक्यने मग त्याला गाडीचा नंबर आणि फोटो दाखवला.

“ आवं ही गाडी तर आट दिसापुरवीच घेतलीय म्या. म्या कशाला कोनास्नी ठोकू. काकाला बी चुकून मारलया. त्याचच वाईट वाटतंया अजून बी.”

 

अजिंक्याने काही क्षण विचार केला. ज्या अर्थी गाडी दिनेशकडे आठ दिवसांपूर्वी आली आहे.त्या अर्थी त्याचा त्या शिक्षकांच्या अपघाताशी काहीही संबंध नाही, किंवा मग तो खोट तरी बोलत असावा.

 

“ तू गाडी खरेदी केलीस म्हणतोयस ना ? मग गाडीचे कागदपत्र कुठायत ?” अजिंक्यने विचारलं.

“ घरी हायत.” तो म्हणाला.

 

अजिंक्यने शिंदेना त्याच्या घरी पाठवल आणि गाडीचे कागदपत्र घेऊन यायला सांगितले.

 

“ हे बघ, दिनेश खर बोल. नाहीतर तुझ्यावर अजून एका खुनाचा आरोप लागेल. “ अजिंक्य त्याच्या जवळ जात म्हणाला.

 

“ आवं सायेब म्या खरच सांगतोय. म्या खरच काय न्हाय केल.” तो आता रडकुंडीला आला होता.

 

“ हम्म ठीक आहे. राजवाडे पती पत्नीचा खून कसा केलास ते सांग. हवालदार याचा कबुलीजबाब लिहून घ्या “ अजिंक्य समोरच्या खुर्चीत बसत म्हणाला.

 

दिनेशने बोलायला सुरवात केली.

“  आजोबा गेले आनी घराला अवकळा आली. काका तवा मुंबईला निघून गेला असं गावातली समदी म्हनायची. घरात आता आई,बाबा, मी आनी माझी बहीन तेवडी राहत व्हतो. चार पाच वर्सानी काका परत आला. पर त्याच्या मनात आमच्या कोणाबद्दल बी माया नव्हती. त्यान बाबासंग भांडन करून आमाला समद्यांना घराभाईर काडल. तवापासून काकाबदल डोक्यात राग गेला व्हता. एक दिस या सगळ्याचा मी बदल घेईन असं म्या ठरिवल. मोटा व्हत गेलो तसं लोकांच काकाबद्दलच चांगल बोलन कानावर पडाय लागलं. लई राग यायचा. मग काकान इकड येऊन बंगला बांधला कंपनी काडली. पर आमची परीस्तीती व्हती तशीच राहीली. आमी खोपटात राहत व्हतो आनी काका बंगल्यात. तवाच ठरवल काकाची समदी इस्तेट आपल्या नावावर करायची आनी काकाला आनी त्याच्या घरच्यांना रस्त्यावर आनायचं. मनाशी समद ठरवून म्या रातच्याला त्याच्या बंगल्यावर जायला निगालो. हातात समदे कागद घेतले आनी त्यांना घाबरवायला एक सुरा बी सोबत घ्येतला. म्या निगालो पर वाटत सायेब भेटल्ये त्ये बोलले हीच संदी हाय. दोगांचा बी निकाल लावायची. कारन बंगला गावापास्न लांब व्हता त्यामुले कोनाला काय बी समजल नसतं. म्या आत गेलो आनी मला काकान केलेले अपमान आटवले. त्याच रागाच्या भरात म्या दोगांच्या बी चाकू खुपसला. लई थरथरत व्हतो. काय झालं त्यावर अजुनबी इस्वास बसत नव्हता. तसाच म्या घाबरून पळत सुटलो ते शेतावर आलो. मग पुढ्च आट दिस म्या भाईर बी गेलो न्हायी. म्या हे समद केल खर हाय पर अजुनबी मला ह्ये खर वाटना. सायेब माज चुकल मला माफी द्या. “ एवढ बोलून दिनेश रडू लागला.

 

एवढा वेळ त्याचं बोलण ऐकत असलेल्या अजिंक्यने त्याला विचारल “ हे साहेब कोण सांगशील का ?”

 

क्रमशः...

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//