मेघ दाटले - भाग 1

Suspense , Love

मेघ दाटले - भाग 1

ती गावाजवळच्या रेल्वेस्टेशनवर उतरली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत आले होते. तिने बाजूला एक नजर फिरवली. बाहेर बऱ्यापैकी अंधारून आलं होतं. चौकशीची खिडकी सोडल्यास कुठेच लाईट दिसत नव्हता. स्टेशनवर माणसांचा मागमूस नव्हता. ती चालत चौकशीच्या केबिनजवळ आली. समोर बसलेल्या माणसाकडे एक नजर टाकून तिने हाक मारली.


" Excuse me..... " ती म्हणाली आणि आतल्या माणसाचं तिच्याकडे लक्ष वेधलं. त्याने पाहिलं तर एक वीस बावीस वर्षांची मुलगी....एका हातात व्हील्सची मोठी बॅग..दुसऱ्या हातात अडकवलेली हँडबॅग....कॅज्युअल लेगिन्स टॉप..त्यावर गळ्याभोवती अडकवलेला स्कार्फ..बऱ्यापैकी हायटेड...अशी त्याला हाका मारत होती.


" काका......राजवाड्यांच्या घरी जायला आत्ता रिक्षा मिळेल का...? " तिने हातातलं घड्याळ बघत विचारलं. त्यावर त्याने जरा साशंक नजरेने तिच्याकडे पाहिलं. 

" हो... इथुन बाहेर पडलात की समोरचं रिक्षा स्टँड आहे.. " त्याने सांगितलं. तो अजूनही तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. 


" ok thanx....." असं म्हणून ती जरा लगबगीनेच स्टेशनबाहेर आली. तिथल्याच एका रिक्षेवाल्याला हात करून तिने बोलावलं. 

" राजवाडेंचा बंगला......" ती रिक्षात बसत म्हणाली त्यावर त्या रिक्षावल्यानेही तिच्याकडे गावात नवीन आलेय वाटतं या अविर्भावात पाहिलं. पण तिने त्याकडे लक्ष दिलं नाही. कदाचित सगळे तिच्याकडे असं का बघतायत याचं कारण तिला माहीत होतं. तिला घरी जायची घाई होती. 

" दादा , जरा लवकर चला हा....." ती सतत हातातलं घड्याळ बघत होती. त्यावरून तिला जायची किती घाई आहे ते कळत होतं.


रिक्षावल्याने तिला बंगल्याजवळच्या वाटेवर आणून सोडलं. त्याने आतपर्यंत यायला नकार दिला. त्यामुळे ती तिथेच उतरून  बॅग घेऊन चालू लागली. थोडं अंतर चालून गेल्यावर तिला म्हादू काका येताना दिसले. 

" ताईसाब.....लई उशीर केलासा यायला....." ते तिच्या हातातली बॅग घेत म्हणाले. 


" हो... ट्रेन उशिरा आली. पण तुमचा फोन आल्या आल्या निघाले यायला...." तिनं सांगितलं.


म्हादू काका तिची बॅग घेऊन पुढे चालू लागले. तशी तीही त्यांच्या मागोमाग निघाली. हळुहळु बंगला दिसू लागला. आजूबाजूला झाडं वाढली होती. तरीही थोड्या लांबून बंगल्याच्या कडा दिसत होत्या. जसजसा बंगला जवळ येऊ लागला तशी तिची पावलं जड होऊ लागली. तिला त्या बंगल्याच्या एकेक आठवणी आठवू लागल्या.


........................................


महाड जवळच्या एका गावात अण्णासाहेब राजवाडे आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. अण्णासाहेबांकडे गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून बघितलं जायचं. अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी नंदिनी यांना तीन मुलं. किशोर , नितीन आणि मुलगी वर्षा. त्यांचं गावात मोठं वडिलोपार्जित घर होतं. मोठं घर असलं तरी त्यांची परिस्थिती मात्र बेताची होती. त्यामुळे अण्णांनी आपल्या मुलांना कष्टाने लहानाचं मोठं केलं. त्यांना चांगलं शिक्षण दिलं. नंतर मग किशोर नोकरीनिमित्त घराबाहेर पडून गेला. तर नितीन गावातच राहून छोटी मोठी कामं करायचा. वर्षाचं लग्न जवळच्याच शहरात करून दिलं होतं. पण अण्णासाहेब आणि नंदिनीताई गेल्यानंतर  मात्र तीनही भावंडांमध्ये वादविवादाला सुरवात झाली. याचाच फायदा अण्णासाहेबांच्या चुलत भावांनी करून घेतला. त्यांनी या तिनही भावंडांमध्ये भांडण लावून दिली आणि घर बळकावलं. भांडणं झाल्यामुळे किशोर , नितीन आणि वर्षा यांच्यामध्ये काहीच नातेसंबंध उरले नव्हते. किशोरने शहरात नोकरी करून कष्टांने सगळं उभारलं. तिथल्याच एका मुलीशी लग्न करून त्याने आपला संसार थाटला. कमी वयात नोकरीत चांगली बढती मिळल्यामुळे बऱ्यापैकी ते शहरात स्थिर झाले होते. पण गावी आपलं घर असावं असं त्यांना वाटू लागलं. वडिलोपार्जित घर कधीच चुलत्यांच्या घशात गेलं होतं. म्हणून मग त्यांनी गावापासून थोडी लांब जमीन घेऊन तिथे मोठा बंगला बांधला. तोच हा बंगला ' सावली '. किशोर आणि त्यांची पत्नी निशा यांनी काही काळ शहरात राहिल्या नंतर गावी येऊन राहायचं ठरवलं. किशोरनी अजून थोडी जमीन विकत घेऊन गावापासून थोडं लांब स्वतःचा व्यवसाय उभारला. शहरातील नोकरी सोडून दोघेही पती पत्नी गावी राहायला आले. आता किशोरचं लक्ष व्यवसायावर होतं. त्यांनी त्यामध्ये झोकून देऊन कामाला सुरवात केली. त्यांच्यामुळे गावातल्या लोकांनाही रोजगार मिळू लागला. लोक त्यांना मान देऊ लागले. लग्नाला बारा वर्षं होऊन गेली तरी त्यांना कोणीच मुलबाळ नव्हतं. त्यामुळे ते दुःखी असायचे. म्हणून मग त्यांनी शहरातल्या एका अनाथाश्रमातून एक पाच वर्षांची मुलगी दत्तक घेतली. तीच ही नुपूर....!!!!  सावली बंगल्यात नुपुरच्या येण्याने चैतन्य पसरलं. तिच्या नाजूक पावलांनी ती घरभर पळू लागली. किशोर आणि निशा दोघेही तिच्या येण्याने खुश झाले. त्यांनी तिच्यावर जीवापाड माया केली. नुपुरच दहावी पर्यंत शिक्षण गावीच झालं. पण मग तिच्या पुढच्या शिक्षणासाठी म्हणून किशोर आणि निशा पुन्हा एकदा शहरात आले. सावली बंगल्याची साफसफाई करायला त्यांनी म्हादू काकांना सांगितलं होतं आणि बाकी व्यवसाया संबंधी गोष्टी ते तिकडून हँडल करणार होते. वर्षामागून वर्ष सरत गेली. नुपुरला त्यांनी इंजिनिअर केलं. तिचंही आई बाबांवर खूप प्रेम होतं. खरतरं ती सोळा वर्षाची झाल्यावरच किशोर आणि निशाने तिला दत्तक घेतल्याचं सांगितलं होतं. पण तरीही त्यांच्या एकमेकांवरच्या प्रेमात कसलाच फरक पडला नव्हता. त्यांनी तिला तळहाताच्या फोडासारख जपलं होतं. नुपुरच शिक्षण पूर्ण झालं तशी ती जॉबच्या शोधासाठी बाहेर पडली. तिला एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉब लागला. तिला थोडे दिवस जॉब करायचा होता म्हणून मग ती तिथेच राहिली आणि किशोर व निशा आपलं रिटायर्ड लाईफ जगण्यासाठी गावी परतले. त्याआधी बंगल्याची साफसफाई होण्यासाठी म्हणून त्यांनी बंगला भाड्याने दिला होता. देखरेख ठेवायला म्हादू काका होतेच. किशोर व निशा बंगल्यात राहायला आल्यानंतर नुपूर एकदा दोनदा घरी येऊन गेली होती. पण गेल्या सहा महिन्यात कामांमुळे तिला येणं शक्यच झालं नव्हतं.

.................................................

हे सगळं आठवतं ती म्हादू काकांच्या मागून चालत होती. तिला आज सकाळीच त्यांचा फोन आला होता. त्यामुळे ती तातडीनं मिळेल ती गाडी पकडून गावी आली. बंगल्यासमोर चांगलीच गर्दी होती. म्हादू काका गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागले. तशी तीही त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागली. उभ्या असलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली. पण तिचं कशातच लक्ष नव्हतं. म्हादू काका तिला घेऊन बंगल्याच्या मोठ्या दारातून आत आले. हॉल मध्येही बऱ्यापैकी माणसं होती. ती आत आली. समोरचं दृश्य बघून तिनं एकच किंकाळी फोडली......


क्रमशः.....

तुला पाहते रे या प्रेमकथेनंतर तुमच्या साठी पहिल्यांदाच एक सस्पेन्स आणि लव्ह स्टोरी लिहायचा प्रयन्त करत आहे. आधीच्या कथेप्रमाणे या कथेलाही तुम्ही तितकाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. सस्पेन्स असला तरी लव्ह स्टोरीही आहे. त्यामुळे तुम्हाला ही स्टोरी देखील आवडेल असे वाटते. तुला पाहते रे चे दुसरे पर्व लवकरच तुम्हाला वाचायला मिळेल. या भागानंतर कमेंट नक्की कळवा. ही फक्त सुरवात आहे नंतर या कथेतही तुम्हाला अनेक वळणं वाचायला मिळतील. असेच प्रेम देत राहा. धन्यवाद.

🎭 Series Post

View all