मेघ दाटले - भाग 18

Love ,Suspense

मेघ दाटले - भाग 18 


अजिंक्यला पाहिल्यावर बारकु जीव घेऊन पळत सुटला. पण अजिंक्यपुढे त्याचा काय निभाव लागणार. एका क्षणी त्याने मागून येऊन बारकुला पकडलं. त्याच्या मजबूत हातांची पकड बारकुला जाणवली.  तसा तो घाबरून उभा राहिला. दोन्ही हात जोडुन तो अजिंक्य कडे वळला. 


" म्या म्या...... काय नाय केलं सायेब.. सोडा मला....." तो म्हणाला.


" मग पळतोयस कशाला...... " असं म्हणून अजिंक्यने त्याच्या पाठीवर एक थाप मारली तसा तो कळवळला. 


" न्हाय सायेब त्ये तुमास्नी येताना बगून पळालो. मला वाटलं तुमी मला पकडाया आलं.... " तो चाचरत म्हणाला.


" हम्म. तुला पकडायलाच आलोय. घरावर लक्ष ठेऊन होतास ना...?? मागे पण मी तुला एकदोनदा बघितलंय इकडे बंगल्याच्या रस्त्याला. बोल कधीपासून नजर ठेवतोयस बंगल्यावर....?? बोल..! " अजिंक्यने त्याच्या मानेवरची पकड घट्ट केली.


" न्हाय सायेब. म्या..... म्या.... कशाला लक्ष ठिऊ. म्या काय केलं.....??? " तरीही तो कबुल होईना.


" आता बोलतोस की नेऊ पोलीस स्टेशनला...?? कधीपासून नजर ठेवतोयस बंगल्यावर सांग...?? कोणी सांगितलं हे तुला करायला.....???? बोल नाहीतर......!!! " त्याने जरा आवाज वाढवला. तसा बारकु नरमला.


" त्ये राजवाडेंची पोरगी आल्यापासान लक्ष ठिवतोय. " बारकु घाबरतच म्हणाला.


" कोणाच्या सांगण्यावरून....?? " अजिंक्य. बारकुला काय बोलावं सुधरत नव्हतं. त्यानं इकडं तिकडं पाहिलं. 


" आता बोलतोस की.....???? " अजिंक्यने त्याला मारायला हात उचलला. 


" मारू नका , मारू नका सायेब सांगतो मी......" असं म्हणुन बारकूने 'हे सगळं त्याने दिनेशच्या सांगण्यावरून केलं ' असं अजिंक्यला सांगितलं. 


अजिंक्यला आधीपासूनच नितीनराव आणि त्यांच्या मुलावर संशय होताच. आता बारकूने सांगितल्यामुळे तर त्याची खात्रीच पटली होती. पण तरीही दिनेश दोषी आहे हे सिद्ध व्हायला सबळ पुरावे अजिंक्य जवळ नव्हते. त्याने मग शिंदेंना फोन करून बोलावुन घेतलं आणि बारकुला त्यांच्या ताब्यात दिला. त्यांना दिनेश वरती नीट लक्ष ठेवायला सांगून  तो मग बंगल्यावरती परतला. नुपूर त्याचीच वाट बघत होती. 


" अरे काय झालं , तू असा अचानक कुठे गेलास....?? " तिचा स्वर रडवेला झाला होता. 


" अगं होतो इथेच. जरा काम होतं सो गेलो. तू बस ना...काय झालं...?? " त्याने विचारलं.


" काही नाही. मामाचा विचार करतेय. मामा सुखरूप असुदे. आता अजुन कोणालाही गमवायची ताकद नाहीये माझ्यात..." तिच्या डोळ्यातून अश्रु ओघळू लागले. अजिंक्यने तिला हलकेच मिठीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर थोपटलं. 


" काही होणार नाही मामाला. मी आहे ना..!! काळजी करू नको सगळं ठीक होईल..." तो म्हणाला. 


" हमम........" ती इतकंच म्हणाली. 


अजिंक्यने मग तिला उठवलं. हळूहळू संध्याकाळ होतं आली होती. त्याने तिला जाऊन थोडावेळ आराम करायला सांगितला आणि तो पोलीस स्टेशनला निघुन गेला. त्याने सांगितलं म्हणुन नुपूर बेडवरती पडुन होती. पण तिला झोप लागेना. एक वेगळीच भीती तिला जाणवत होती. अजिंक्य सोडून गेला आणि तिच्या मनाला हुरहुर लागली. तो कधी परतेल याची....!!! 'आपल्याला असं का होतंय , अजिंक्यची सोबत असली की बरं वाटतं. त्याचा आधार वाटतो. आपल्यासोबत तो असला की आपण सिक्युर आहोत हे फीलिंग येत...' ती स्वतःशीच विचार करत या कुशीवरून त्या कुशीवर फिरत होती. थोड्या वेळाने ती उठुन बसली. ' का होतंय आपल्याला असं....?? इतकं अस्वस्थ आपल्याला या आधी कधीच वाटलं नव्हतं..... मी.... मी प्रेमात तर पडले नाहीये ना अजिंक्यच्या...???  छे कसं शक्य आहे  !!...पण त्याची सोबत हवीहवीशी वाटते..' त्याच विचारात तिला कधी झोप लागली ते कळलंच नाही. अजिंक्य तिथून निघाल्यावर थेट पोलीस स्टेशनला पोहचला. बारकु कडून अजुन काही माहिती मिळते का ते बघायचं होतं. त्याच्या डोक्यात एकामागून एक विचार येऊन धडकत होते. त्याला आता तपास करताना फार जपुन पावलं उचलावी लागणार होती. 

......................................

अजिंक्य पोलीस स्टेशनला येऊन पोहचला. शिंदेंनी त्याला सॅल्युट केला. 

" बोलला का काही......??? " एका कोपऱ्यात बसलेल्या बारकुकडे नजर टाकत तो म्हणाला.


" सायेब तो म्हणतोय की त्याला काही माहीत नाही. पण मला वाटतंय. हे सगळं कोण करतंय हे त्याला नक्की माहीत असावं. त्याला दाखवायचा का आपला पोलिसी हिसका....?? " शिंदेचा चेहरा फुलला होता. 


" ह्म्म..... त्याशिवाय तो बोलायचा नाही..!! " अजिंक्य असं म्हणताच शिंदे त्याला घेऊन आतल्या खोलीत गेले. 


" बोल राजवाडेंचा खून कोणी केला बोल..."  आवाजपाठोपाठ एक गुद्दा हाणल्याचा आवाज आला. 


" न्हाय सायेब मला काय बी म्हाइत न्हायी...." बारकु गयावया करत म्हणाला.


" मग दिनेशने तुला कशाला राजवाडेंच्या घरावर पाळत ठेवायला सांगितलं....??? उगीच...?? दिनेशनेच मारलंय ना राजवाडेंना....???  बोल.... " त्यांनी त्याला मारायला हात उचलला पण बारकु अधिकच गयावया करू लागला. अखेर त्याने राजवाडेंच्या खुनामागे दिनेशचाच हात असल्याचं कबुल केलं..

..........................................


शिंदेंनी मग त्याला म्हादुकाकांनी सांगितलेली राजवाडेंची गोष्ट देखील सांगितली. त्यांच्या चुलत्यानी फसवुन राजवाडेंच्या कुटुंबाला धुळीला मिळवलं होतं. त्यामुळे मग मागच्या केसच्या संदर्भात तपासणी साठी म्हणून आणि कशी माणसं आहेत ते बघण्यासाठी अजिंक्य राजवाडेंच्या पहिल्या वाड्यावर पोहचला.हा तोच अण्णासाहेबांचा वाडा होता जो त्यांच्याच भावाने फसवून आपल्या ताब्यात घेतला. वाडा चांगला मोठा आणि चौसुपी होता.. घराला प्रशस्त ओटी पडवी होती. समोर असणाऱ्या लाकडी गजांमुळे वाडा जुना असल्याची खुण दिसत होती. अजिंक्यने वाड्या समोर गाडी लावली. तो गाडीवरून खाली उतरला. वाड्याच्या पाच - सात पायऱ्या चढुन तो आत आला. भल्यामोठ्या पडवीच्या आवारात भाऊसाहेब झोपाळ्यावर बसुन सुपारी कात्रत होते. अजिंक्य आत आला तशी त्यांनी एक करडी नजर त्याच्यावर टाकली. साधारणतः सत्तरीकडे झुकलेले , चेहऱ्यावर मोठ्या घराण्याचा माज , पांढरा सदरा पायजमा घातलेले भाऊसाहेब झोपाळ्यावर बसून आत आलेल्या अजिंक्यचं निरीक्षण करत होते. 


" कोन पायजे.....?? " त्यांनी कातरलेल्या सुपारीचा तुकडा तोंडात टाकला. 


" सर्जेराव राजवाडे इथंच राहतात ना...? जरा त्यांना बोलवा काम आहे..." तो आजूबाजूला बघत म्हणाला.


" तुमी कोन म्हनायच..... त्ये गावात नवीन पोलीस आलते ते तुमीच काय.....?? " भाऊसाहेब अजूनही त्याचं निरीक्षण करण्यात गुंतले होते. 


" हो. सर्जेरावांना बोलवा....." तो म्हणाला. 


" हा. काय काम हाय येवड आमास्नी सांगितलं तरी चाललं...." ते डोळे किलकिले करत म्हणाले.


" नाही. त्यांच्याकडेच काम आहे. बोलवा त्यांना...." तो जरा चढ्या आवाजात म्हणाला. 


" ठीक हाय.  वाईच बसा हत मी बोलवायला सांगतो त्यांसनी....." असं म्हणून त्यांनी काम करणाऱ्या दामुला हाक मारली आणि त्याला सर्जेरावांना बोलवायला पाठवले. 


थोड्याच वेळात सर्जेराव बाहेर आले. धिप्पाड छाती, चेहऱ्यावर सुतकी भाव तरीही नजरेत एक प्रकारची जरब मोठ्या रुंदावलेल्या मिश्याना पीळ देत ते बाहेर आले. अजिंक्यकडे बघुन त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांचा चेहरा फुलला होता तरीही नजरेची धार काही कमी झाली नव्हती.


" या या पावनं..... आज इकडं कुणिकडं वाट चुकलात...?? " ते हात जोडून त्याच स्वागत करत म्हणाले. 


" तुमच्याकडेच काम होतं माझं... " अजिंक्य.


" बोला की.... काय सेवा करू आपली...."  ते त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाले. 


" मला         सांगा MKG 00838  ही गाडी तुमचीच आहे ना....?? " त्याने जास्त आढेवेढे न घेता विचारलं. 


" कुटची गाडी.....?? आवं आमच्याकड सतराशे साठ गाड्या हायती किती जणांचे नंबर लक्षात ठिऊ...."  त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.  


" मध्यंतरी किशोर राजवाडे यांच्या बंगल्यात राहणाऱ्या शिक्षकांचा अपघात झाला होता....." अजिंक्य.


" आसल..... मग ???? " ते बेफिकीरीने म्हणाले. 


" त्यांचा अपघात ज्या गाडीने झाला ती गाडी तुमच्या नावावर आहे मि. सर्जेराव राजवाडे.. " त्याने खिशातून माहितीचा कागद काढुन दाखवला. 


" आवं अशा किती गाड्या असतील आमच्या मग काय मी बघत राहू व्हय कोण त्या गाडीखाली येतंय नि कोन न्हायी त्ये......" ते विकृत हसले.


" हो. तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल.... " अजिंक्य म्हणाला.


" आवं पर आमी काय न्हाय केलेलं... तुमी मला सांगा गाडी कुटची व्हती म्हणजे दोन चाकाची की चार चाकाची...." 


" बोलेरो होती.फोर व्हीलर. पांढऱ्या रंगाची...." तो म्हणाला.


" आवं मी ती गाडी कधीच इकली....." सर्जेराव म्हणाले.

" कोणाला.....?? " अजिंक्यच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.


" आवं आपल्या दिनेशला... आवं त्यो नितीन राजवाडेंच्या पोराला.. तसा आपला बी लेकच हाय त्यो.. त्यो मागत व्हता कधीची. म्हणुन मग त्याला देवून टाकली. " सर्जेराव 


" मग गाडीची कागदपत्र....??? " अजिंक्यने विचारलं.


" आवं सायेब आपलाच हाय त्यो. चुलत भावाचा पोरगा असला तरी आमचा बी हाय त्यो. त्याला गाडी हवी म्हणून दिली. गाडी आजूनबी माज्याचं नावावर आसल " ते त्याला समजवणीच्या सुरात म्हणाले.


" ठीक आहे. मी निघतो... " असं म्हणून अजिंक्य जायला निघाला.

" सायेब आवं चहा कापी काही घ्या....." सर्जेराव उठून येत म्हणाले.

" नको. पुन्हा कधीतरी...." एवढं बोलून तो वाड्याच्या पायऱ्या उतरून गेला सुद्धा...!! झोपाळ्यावर बसलेले भाऊसाहेब मात्र सर्जेरावांकडे पाहून छद्मी हसले. 


अजिंक्य तिथून बाहेर पडला. पण त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. संशयाची सुई मात्र दिनेशच्याच दिशेने फिरायला लागली होती...!!! 

क्रमशः.....


ईराच्या सर्व वाचकांना दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. या दसऱ्याला सोनं घेण्यापेक्षा जे भुकेलेले आहेत , ज्यांना पांघरायला कपडे नाहीत अशा लोकांना मदत करा. पैशांपेक्षाही वस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं आनंदाचं सोनं पहा आणि आपल्या लाडक्या इरावरती आणि  ईराच्या सर्व लेखकांवरती असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद

🎭 Series Post

View all