मेघ दाटले - भाग 17

Love , Suspense

( मि. मोहितेंचा नंबर गावातच डिटेक्ट झाल्याने शिंदे आणि अजिंक्य दोघेही अस्वस्थ होते. अजिंक्य मग नुपूर सोबत त्यांच्या कंपनीत आला तर शिंदे म्हादुकाकांशी बोलण्यासाठी गेले. पाहुयात पुढे ) 


अजिंक्य आणि नुपूर दोघेही कंपनीत आले. नुपुरने मॅनेजर सावंतांकडे पन्नास हजारच्या चेकची मागणी केली पण त्यांनी तो नाकारला. नुपुरला त्यांच्या अशा नकाराच आश्चर्य वाटलं.


" पण का.... का नाही देऊ शकत तुम्ही चेक....?? " तिने न कळुन विचारलं.


" सॉरी मॅडम. पण मि. मोहितेंनी तसं सांगितलंय की त्यांना विचारल्याशिवाय कोणतेही चेक अथवा कॅश द्यायची नाही..." सावंत निर्विकार चेहऱ्याने म्हणाले.


" काय.....??? मामा...... मामा म्हणाला असं....?? I mean मि. मोहिते स्वतः म्हणाले असं...??? " अजूनही तिला हे खरं वाटतं नव्हतं. 


" हो मॅडम. त्यांनी तशा instructions  दिल्या आहेत. " सावंत.


" त्यांनी तुम्हाला instruct केलं ना. मग त्यांनी स्वतः येऊन तुम्हाला हे सांगितलं का....? " अजिंक्यने नेमका प्रश्न विचारला. त्यावर काय बोलावं ते सावंताना कळेना.


" ते....... ते..... ते म्हणजे........ सरांचा फोन आला होता चार दिवसांपूर्वी...." ते नजर दुसरीकडे वळवत म्हणाले.


" अस्स.... मग मला नंबर देता का जरा. मला बोलायचंय त्यांच्याशी...." अजिंक्यने मोबाईल घेण्यासाठी हात पुढे केला.


" सर ते...... ते त्यांचा नंबर डिलीट झाला....." सावंत कसेबसे म्हणाले. त्यांनी खिशातून रुमाल काढून हळूच कपाळावरचा घाम टिपला. 


" काही हरकत नाही. तुमच्या कॅटलॉग नाहीतर कार्ड वरती त्यांचा नंबर असेलच ना.....?? " अजिंक्य म्हणाला.


" येस सर.. पण त्यांनी त्या दिवशी मला वेगळ्या नंबर वरून फोन केला होता....... आणि तो ... तो नंबर माझ्याकडून डिलीट झाला..." ते घाबरून बोलले. अजिंक्यचं त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष होतं. 


" मग कशावरून तुम्ही खोटं बोलत नाही आहात मि. सावंत...." इतका वेळ त्यांचं बोलणं ऐकत असलेली नुपूर म्हणाली.


" नाही मॅडम खरंच...... खरंच फोन आला होता..... " ते म्हणाले.


" मला काही माहीत नाही. मला चेक हवा आहे. डॅडच्या केबिनच्या कीज द्या.... " ती ओरडून म्हणाली. 

" सॉरी मॅडम पण मी नाही देऊ शकत..... " ते अजूनही आपल्या गोष्टींवर ठाम होते. 


" ओके. मग मला आमच्या जॉईंट अकाउंटचं पासबुक हवंय. ते तरी मी घेऊ शकते ना मि. सावंत. कारण ते आमचं पर्सनल अकाउंट आहे आणि डॅड ते कंपनीतच ठेवायचे. तेवढं तरी देऊ शकाल ना तुम्ही....??? " तिचा आवाज चढला होता.


" येस मॅडम.. " ते एवढंच बोलले आणि त्यांनी राजवाडेंच्या केबिन मधून तिला पासबुक आणून दिलं. 


तिने पासबुक उघडून पाहिलं तर त्यांच्या खात्यात जवळजवळ दहा लाखांपर्यंतची रक्कम होती. आतापर्यंत तिला कधी जॉईंट अकाउंट मधल्या रकमेची गरजच पडली नव्हती. कारण तिच्यासाठी ते कायम तिच्या पर्सनल अकौंटला पैसे पाठवायचे. एक ठराविक रक्कम दर महिन्याला तिच्या खात्यात जमा व्हायची. पण आता लायब्ररी ओपन करण्यासाठी तेवढे पैसे पुरेसे नव्हते त्यामुळे ती आज चेक मागायला कंपनीत आली होती. 

............................................


अजिंक्य आणि नुपूर कंपनीत गेले तीच संधी साधुन शिंदे बंगल्यावर आले. बाहेरचं म्हादुकाका झाडांना पाणी घालत होते. शिंदेंना बघितल्यावर त्यांनी पाण्याची झारी तिथेच ठेवली आणि ते पुढे आले.


" सायेब , या ना.. पर ताईसाब न्हाईत घरी....." ते म्हणाले.


" नाही मला तुमच्याशीच थोडं बोलायचं होतं म्हणून आलो. " शिंदे म्हणाले.


" सायेब आपन आत जावुन बोलुया काय.... ? तुमास्नी चाललं ना...?? " म्हादुकाका बोलले.


" हो चालेल. चला आतच जाऊन बोलू. " दोघेही आत गेले. म्हादुकाकांनी शिंदेंना सोफ्यावर बसायला सांगुन ते त्यांच्यासाठी पाणी घेऊन आले. शिंदे पाणी प्याले आणि रिकामा ग्लास त्यांनी समोरच्या टेबलवर ठेवला.


" म्हादुकाका मला सांगा ज्या दिवशी तुमच्या मालकांचा आणि मालकीण बाईंचा खून झाला त्या रात्री मि. मोहिते इकडे येणार होते वगरे तुम्हाला काही माहीत होतं का...??? " शिंदेंनी थेटच विचारलं.


" न्हाय जी. किसोर भाऊ नि ताई व्हत्या तवा आमी सांच्यालाच घरला जायचो ते सकाली यायचो बगा..मामा यायचे व्हते वगरे असं काय बी भाऊंस्नी बोलताना आमी नाय ऐकलेलं.... " म्हादुकाका म्हणाले. एव्हाना निर्मला बाई पण काम आटपून त्यांच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या होत्या. 


" बरं, पण त्यानंतर तुमच्या पैकी कोणी त्यांना गावात पाहिलं का....?? " 


" न्हाय जी. ते आले असते तर तुमास्नी बोललो असतो की.... " म्हादुकाका म्हणाले.


" बरं म्हादुकाका एक विचारू का तुम्हाला तुम्ही बरीच वर्षं या माणसांसाठी काम केलंत मग एखादी अशी गोष्ट आहे का त्यांच्याशी संबंधित की त्यामुळे केसच्या तपासात आम्हाला मदत होईल." शिंदे बोलले तसं म्हादुकाका आणि निर्मला बाईंनी एकमेकांकडे पाहिलं. 

म्हादुकाकांनी मग अण्णासाहेब गेल्यानंतर राजवाडे भावनडांमध्ये झालेले वाद , त्यानंतर त्यांच्या चुलत्यानी म्हणजे भाऊसाहेबांनी बळकवलेला वाडा या सगळ्या बाबत शिंदेंना सांगितलं. शिंदेही लक्षपूर्वक ऐकत होते. त्यानंतर त्या शिक्षकांचा खून झाला त्यावेळी म्हादुकाकांनी बघितलेला प्रसंगही शिंदेच्या कानावर घातला. 


" म्हादुकाका अहो तुम्ही हे सगळं आधी का नाही सांगितलंत....?? " शिंदेंना आश्चर्य वाटलं.


" आवं लई घाबरलो व्हतो. त्यात त्यो दिनेश लई डेंजर हाये..  उद्या काय झालं तर केवड्याला पडायचं म्हनून गप राहिल्यो जी..... " ते खाली मान घालुन म्हणाले. 


" ठीक आहे. पण ही गोष्ट तुम्ही कोणाजवळ ही बोलू नका. तुम्ही या गोष्टीचा एकमेव साक्षीदार आहात. त्यामुळे तुमची साक्ष ही महत्वाची आहे... काळजी करू नका . सगळं ठीक होईल.. " त्यांच्या पाठीवर हलकेच थोपटुन शिंदे निघुन गेले. 


.........................................

दोघेही मग कंपनीतून घरी परतले. येताना देखील दोघेही गप्पच होते. नुपूर मात्र सावंतांच्या बोलण्याचा विचार करत होती. तिला अजूनही खरं वाटतं नव्हतं की , मामाने कंपनीमध्ये असं काही सांगितलं असेल. त्याच विचारात ते घरी आले. अजिंक्यने अजुनही नुपुरला मोहितेंचा नंबर गावातच डिटेक्ट झालाय ते सांगितलं नव्हतं. दोघेही घरी आले.


" अजिंक्य , माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की मामाने असं काही सांगितलं असेल... मला वाटतंय की सावंत नक्कीच खोटं बोलत असणार. " ती ठामपणे म्हणाली.


" हो मलाही तसंच वाटतंय..... खरंतर तुला अजुन काहीतरी सांगायचं आहे. " त्याने बोटांची चाळवाचाळव करत म्हटलं.


" काय.... ? " ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागली.


" नुपूर , तुला आठवतंय मी त्या दिवशी तुझ्याकडून मिसेस मोहितेंचा नंबर घेतला होता. त्यानंतर आम्ही दोन दिवस मि. मोहितेंच्या फोनची वाट पाहत होतो. पण त्यांचा काहीच फोन आला नाही. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला त्यावेळी आम्ही त्यांचा फोन ट्रेस करायचा प्रयत्न केला. आणि असं लक्षात आलं की त्यांचा नंबर गावातच डिटेक्ट होतोय... " एवढं बोलून तो थांबला. 

" काय.......???? अरे पण मग तू हे मला सांगितलं का नाहीस...?? आणि मामा जर गावात आहे तर तो मला भेटायला कसा आला नाही....??? " तिच्या डोक्यात आता अनेक प्रश्नांनी थैमान घालायला सुरवात केली. डोकं धरून ती तशीच शांत बसून होती

" नुपूर मला वाटतं मि. मोहितेचं असं वागणं कोड्यात टाकणारं आहे. दुसऱ्या नंबर वरून फोन करणं , जर ते त्या दिवशी गावात आले होते तर ते कोणालाच कसे दिसले नाहीत...?? कदाचित ते अडचणीतही असू शकतील असं मला राहुन राहुन वाटतंय." खरंतर      आता त्यालाही कोणत्या बाजूने तपास करावा तेे     कळत नव्हतं . 

" अजिंक्य... खरंच मामा अडचणीत असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवं रे.... मला अजुन कोणीही माझ्यापासून दुरावलेलं नकोय ... " नकळत तिच्या गालावरून एक अश्रू ओघळला. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन शांत बसुन होती.   


 इतक्यात अजिंक्यचं लक्ष बाहेर गेलं. बंगल्याच्या समोर असलेल्या दाट झाडीतून कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेऊन होतं. सदरा पायजमा घातलेला आणि बारीक अंगकाठीचा बारक्या डोळे किलकिले करून त्यांच्यावर नजर ठेवुन होता. अजिंक्यने नुपुरला बाजुला केलं आणि अर्जंट काम आहे सांगुन तो बंगल्याच्या मागच्या दाराने बाहेर पडला. तिथून तो झाडांच्या आड लपत हळूहळू बारकु उभा होता तिथे येऊ लागला. आणि तो त्याच्या नजरेच्या टप्प्यात आल्यावर बारकुने त्याला पाहिलं आणि तो पळू लागला. अजिंक्यही त्याच्या मागोमाग पळाला. दाट झाडीतून धावताना अडचण येत होती. तरीही अजिंक्य जोरात पळत होता. एका इन्स्पेक्टर पुढे बारकुचा काय निभाव लागणार... !! अखेर अजिंक्यने बारकुला पकडलंच....!!! 

क्रमशः.......

पुढच्या एक दोन भागात ही कथा संपेल. खरंतर कथा अजुन पपुढे चालू ठेवावी असा विचार होता. पण आत्ता मला ते शक्य नाही. त्याबद्दल क्षमस्व. कथा लिहायला सुरुवात केली त्यावेळी मला असं वाटतही नव्हतं की माझ्या कथा वाचकांना इतक्या आवडतील. माझ्या लेखनात कित्येक वेळा चुका होत असतील. पण माझ्याकडे लॅपटॉप अथवा कम्प्युटर नाही जो शब्द चुकल्यावर लगेच तुम्हाला दुरुस्त करून देईल. तरीही मी जमेल तेवढं व्यवस्थित लिहण्याचा प्रयत्न करते. आमचंही लिखाण तितकंच प्रामाणिक आणि जीव ओतून लिहलेला असतं. मला काही फार मोठी लेखक म्हणुन मिरवायचं नाहीये. पण काही जणांना वाटत की नवीन असणारी लोकं आजकाल कोणीही लेखक होतात. हो , आम्ही नवीन आहोत. पण आम्ही ही शिकतोय. कोणत्याही गोष्टीची कधीतरी सुरवात ही असतेच. अशा वेळी आपल्याच सहलेखकांचं कौतुक करावं अशी अपेक्षा नाही पण निदान ' कोणीही लेखक होतं ' असं बोलून लिहणाऱ्याची उमेद तरी घालवू नये. मी सध्या अशा फेज मध्ये आहे जिथे मी रोज डोक्यावर टेन्शन घेऊन वावरतेय. मला स्वतःसाठी असा थोडा वेळ ही गेल्या महिन्याभरात मिळालेला नाही. पण तरीही वाचकांसाठी मी लिहायला घेतलं ते ही माझी आवड जपण्यासाठी आणि आपण बाकीचे विचार सोडून कथेत गुंतून राहू यासाठी. वाचकांच्या कमेंट्स आल्या की खरंच छान वाटतं. मग ते साधं ' कथा छान आहे ' इतकी का कंमेंट असेना. रोज शंभर दोनशे कमेंट्स येणाऱ्यांना हे सुख कसलं कळायला..?? पण मला त्यांना सांगावंसं वाटतंय की नवीन लेखक होऊ घातलेल्या व्यक्तींसाठी 50 कमेंट्स ही खूप मोठ्या असतात. काही जण मानधनासाठी , कमेंट्स साठी लिहत नाहीत त्यांच्या लेखनाची प्रतिभा इतकी आहे की खूप साऱ्या कमेंट्स , वाचकांचं प्रेम , कथेची लोकप्रियता इतकं सारं असताना देखील ते कथेला रँक नाही यासाठी असमाधानी आहेत याचं आश्चर्य वाटतं.. असो, मला कोणाच्याही लेखनाविषयी लिहायचं नाही आणि माझी तेवढी पात्रता ही नसेल. पण आपल्याच सोबतच्या लेखकांची अशी मतं वाचली की फार वाईट वाटतं..!! 

🎭 Series Post

View all