मेघ दाटले - भाग 15
अजिंक्यने म्हादुकाकांना त्या शिक्षकांच्या अपघाताबद्दल विचारलं आणि त्यांना घामचं फुटला. त्यांना चार महिन्यांपूर्वी घडलेला प्रसंग आठवला. रात्रीच्या वेळी ते एकदा शेतातून निघाले होते. वाटेवरच असणाऱ्या एका झोपडीवजा घरातून त्यांना ओळखीचा आवाज आला तसे ते थांबले.
" हे पैसे घे आणि आजच्या आज इथून निघायचं. कोनालाबी तू दिसता कामा नये..." दिनेश कोणाशीतरी बोलत होता. त्याने पैशाचं पुडक त्या माणसापुढे धरलं.
" पर जाऊ कुठं.....??? गावात राहिल्यो तर आजची रात तर न्हायी का चालायचं..." तो माणूस विनंती करत म्हणाला.
" आरं येडा का खुळा तू..... निघ लवकर आनी दिसू नग कोनासनी बी. पोलीस येतील तुला शोधत... त्या आधीच जा हिकडून......" दिनेश दटावत म्हणाला.
" आनी पोलिसांनी पकडलनी तर काय करू.....?? माझी बायका पोरं हायती....." तो कळवळून म्हणाला.
" आरं ते बगू आमी.. पर तू निघ आदी. आनी एक ध्यान्यात ठेवायचं कुटबी आमचं नाव घ्यायचं न्हायी.. आपला काय बी संबंद न्हाय.....समजलं न्हवं... उचल ते पुडक नि निघ ..." दिनेशच्या बोलण्याने तो माणूस गडबडीने उठला.
पण तो निघाल्यावर सुद्धा दिनेशने त्याला थांबवलं आणि काय करायचं कुठं जायचं त्याला सांगत होता. इतक्यात बाहेर उभ्या असलेल्या म्हादुकाकांच्या पायाला काहीतरी चावल आणि ते कळवळले. नकळत त्याच्या तोंडून अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली. आत बोलत असलेले दिनेश आणि तो माणुस मात्र सावध झाले. ते कानोसा घेत बाहेर आले. पण तोपर्यंत म्हादुकाका जिवाच्या आकांताने तिथून पळाले
या गोष्टीचा संदर्भ त्यांना दोन दिवसांनीच लागला. कारण राजवाडेंच्या बंगल्यात भाड्याने राहणाऱ्या त्या शिक्षकांचा आणि त्यांच्या बायकोचा अपघात झाल्याची बातमी आली. त्यात ते दोघेही मरण पावले होते. त्यांनी ते संभाषण ऐकलं होतं ते दिनेश आणि त्या ड्रायव्हर मधलं होत ते त्यांच्या लक्षात आलं. पण त्यांनी ते कोणालाच सांगितलं नाही. न जाणो उद्या दिनेश आपल्याला पण मारून टाकायचा या भीतीने ते गप्प राहिले. पण आज अजिंक्यने अचानक असं विचारल्यावर त्यांना काय बोलावं सुचेना.
" मला काय माहीत न्हाय जी.. ते गुरुजी लई चांगले व्हते बगा. गावातल्या साळत शिकवायचे. त्यासनी बी कोनीतरी धमकीच्या चिट्या द्यायचं बगा. पर ते बधले न्हाईत. त्यांनी जाऊन कम्प्लेट केली पोलिसात आनी मग हे समदं असं झालं बगा......" म्हादुकाकांनी वेळ मारून नेली. पण अजिंक्यचं समाधान झालं नाही.
" पण म्हादुकाका तुम्हाला कोणाविषयी संशय...........?? " अजिंक्य बोलत असतानाच नुपूर त्यांना बोलवायला आली.
" अरे काय.... जेवायचं नाही का तुला...?? चल ना. सगळी तयारी झालेय.. उठ चल...." असं म्हणून ती जवळजवळ ओढतच त्याला खाली घेऊन गेली. त्याचं आणि म्हादुकाकांचं बोलणं अर्ध्यावरच राहील. सगळ्यांची छान जेवणं झाली. सगळं नुपुरच्या आवडीचं होतं त्यामुळे ती आज दोन घास जरा जास्तच जेवली. जेऊन झाल्यावर अजिंक्यही मग रूमवर जायला निघाला. जाण्याआधी त्याने नुपुरकडून मिसेस मोहितेंचा नंबर घेतला आणि मामांचा शोधत असल्याचं देखील तिला सांगितलं. त्या अनाथ जीवाला तोच एक आधार होता....!!!
.......................................
नुपूर आता गावात चांगली रुळली होती. आई वडिलांच्या अचानक जाण्याने तिचं विश्व हरवलं होतं. पण त्यातूनही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ती उभी राहिली. अजिंक्यच्या येण्याने तिच्या आयुष्यातही बदल होत होते. त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांच्यात छान मैत्री झाली होती आणि त्यामुळेच नुपुरला या सगळ्या विचारातून बाहेर पडायला मदत झाली. म्हादुकाका आणि निर्मलाबाई तर तिला जिवापलीकडे जपायच्या. त्या तिला कधीही नजरेआड होऊदेत नसत. कारण या आधी बंगल्यात राहणाऱ्या माणसांचा खून झाला होता. त्यामुळे उद्या पुढे मागे नुपुरच्या देखील जीवाला धोका होता. गावातल्या लोकांना दोघही चांगले ओळखून होते. त्यामुळे तिला शक्यतो ते तिला एकटीला पाठवायला तयार नसत. पण अजिंक्य सोबत असला की ती खुश असायची. त्याच्या सोबत बोलायची. भांडायची. त्यामूळे त्यांच्याकडे बघून म्हादुकाका आणि निर्मला बाईंना पण बरं वाटायचं. नुपूर आनंदात असली की घर पण भरल्यासारखं वाटायचं. पण कधी कधी तिला देखील हे एकटेपण घराची शांतता नकोशी वाटायची. ती मग तासनतास पुस्तक वाचण्यात नाहीतर जेवण करण्यात आपलं मन रमवायची. एकदा ती अशीच शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा वाचत हॉल मध्ये बसली होती. ती वाचनात इतकी गढून गेली होती की अजिंक्य आल्याचं पण तिच्या लक्षात आलं नव्हतं. तो हळूच दबक्या पावलांनी चालत तिच्याजवळ आला. आणि तिच्या हाताला धरून तिला जोरात " भों......." केलं. अचानक झालेल्या आवाजाने ती दचकली. तिनं पाहिलं तर तिच्या शेजारी अजिंक्य हसत उभा होता.
" अजिंक्य........ तू........??? अरे किती घाबरले मी......" ती एक सुस्कारा सोडत म्हणाली.
" अग मग काय.. मी आलो तरी लक्ष नाही तुझं. कशात एवढी बिझी......?? " त्याने तिच्या हातातलं पुस्तक काढून घेत त्यावरचं नाव वाचलं.
" Ohh...... My favourite..!!! " तो भुवया उंचावत म्हणाला.
" मला फार आवडतात सस्पेन्स स्टोरीज...... तुलाही आवडतात का....??? " नुपुरने विचारलं.
" हो मग. आणि त्यातल्या त्यात शेरलॉक होम्स माझा favourite आहे.. तुला माहितेय मी त्याच्या सगळ्या गोष्टी किमान दहा वेळा तरी वाचल्या असतील.... दरवेळी वाचताना वाटत की आपण नव्याने हे सगळं वाचतोय....." तो बोलत होता.
" हा. मला पुस्तकं वाचायलाच खूप आवडतं. मग ती कोणतीही असोत. लव्ह स्टोरीज आणि सस्पेन्स स्टोरीज मला जाम आवडतात. शोभा कुलकर्णी आहेत ना अरे त्यांच्या कादंबऱ्या तर वेड लावणाऱ्या आहेत...." ती बोलत असतानाच तिच्या डोक्यात एक कल्पना रेंगाळू लागते.
" ए अजिंक्य, आपण गावात लायब्ररी सुरू करायची का...?? सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा...." ती उत्साहाने म्हणाली.
" hey... Good idea.. गावातल्या मुलांना वाचायला मिळेल नवीन काहीतरी. मी बघतो बोलून बुक रिटेलरशी वगरे... " अजिंक्य.
" हो चालेल. मी पण मॅनेजरशी बोलून घेते. माझ्या अकौंटला पैसे आहेत पण ते पुरेसे नाहीत. मॅनेजरना सांगते चेक पाठवायला...." ती म्हणाली.
दोघेहिजण मग त्या कामाला लागले. ती आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देत होती हे पाहून अजिंक्यला देखील बरं वाटलं.
.........................................
रात्र वाढू लागली तसतसं अजिंक्य आणि शिंदे पोलीस ठाण्यात अस्वस्थपणे बसले होते. अजिंक्यने मिसेस मोहितेना फोन करून मामांशी बराच वेळ बोलत राहा. तरच आपल्याला त्याचा नंबर ट्रेस करणं सोपं जाईल हे सांगितलं होतं. दोन दिवस त्यांचा काहीच फोन नव्हता. त्यामुळे कदाचित आज तरी त्यांचा फोन येईल या आशेवर अजिंक्य होता. आणि त्याप्रमाणे नऊ सव्वा नऊच्या दरम्यान मामींचा फोन वाजला. कंट्रोल रुम मधून अजिंक्यला मामांचा फोन आल्याच कळवण्यात आलं. आता फक्त प्रतीक्षा होती ती त्यांचा नंबर ट्रेस होतोय की नाही याची. थोड्याच वेळात कंट्रोल रूममधून पुन्हा एकदा फोन आला. मामांचा मोबाईल नंबर गावातच डिटेक्ट झाला होता......
क्रमशः......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा