Mar 02, 2024
रहस्य

मेघ दाटले - भाग 14

Read Later
मेघ दाटले - भाग 14

मेघ दाटले - भाग 14


संध्याकाळी अजिंक्य नुपुरच्या बंगल्यावर येतो. गेट उघडून तो आत येतो तोच त्याला बाहेर म्हादू काका भेटतात. 

" काय म्हादू काका..... कसं आहे वातावरण घरी...?? " तो परिस्थितीचा अंदाज घेत विचारतो.

" लई गरम....... " म्हादूकाका हसत सांगतात. 


" बाप रे... " 

" तुमचं काय खरं न्हाय आता........" ते हातवारे करत त्याला सांगत होते.

अजिंक्यने म्हादू काकांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि त्यांना आत पिटाळलं. ते आत गेल्यावर तोही बंगल्याच्या मागच्या बाजूला गेला. खालच्या मजल्यावर असणाऱ्या मागच्या दरवाज्यातून तो आत आला. निर्मला ताई स्वयंपाकघरात काम करत होत्या. त्या आपल्याच तंद्रीत गाणं म्हणत काम निपटत होत्या. अजिंक्य मागच्या दरवाज्यातून स्वयंपाकघरात आला आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. 


" आआ............." त्याला बघून निर्मला ताई ओरडल्याच असता. तोच त्याने हाताने शांत राहा सांगितलं.

" शहशहशह......... मी आहे अजिंक्य..." त्याने दबक्या आवाजात सांगितलं. 


" काय झालं....??? " त्यांनीही हळू आवाजात विचारलं.

त्याने मग त्यांना सगळी रामकथा ऐकवली. ते ऐकून त्या हसायलाच लागल्या. 


" असं हाय व्हय तरीच ताईसाब दुपारपासून गुश्श्यात हायती.... आता तुमीच करा कायतरी....." त्या म्हणाल्या. 


" हो , त्यासाठीच तर आलोय. तुमची मदत लागेल थोडी...." तो म्हणाला.

" चालतंय की......"  दोघेही मग कामाला लागले.


तोपर्यंत इकडे महादुकाकांनी नुपुरला अजिंक्यची तब्येत कशी आहे ते बघून तरी येऊ म्हणून बळेबळेच तिला बंगल्यातून बाहेर निलं. दोघेजण चालत चालत अजिंक्य राहत असलेल्या घरापाशी आले. पण घराला कुलूप होतं. 

" झालं तुमचं समाधान म्हादुकाका...... बघा दाराला कुलूप आहे....." ती रागाने म्हणाली.

" आवं ताईसाब ते गेलं असत्याल पोलीस ठान्यात.. येतील की.. आपण जरा वाट बघूया..वाईच बसा हत...." ते म्हणाले.


" तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा मी चालले. आपल्याला काळजी म्हणून आपण आलो. पण लोकं फिरतायत गावभर..... " ती तशीच तणतणत निघाली. मागोमाग म्हादूकाकाही निघाले. त्यांचं काम झालं होतं..!!

....................................

ते घरी आले तेव्हा बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं. नुपूर आल्या आल्याच आपल्या खोलीत गेली. पण इतक्यात लाईट गेले तिला काहीच सुचेना. ती जोरजोराने ' 'म्हादुकाका....... म्हादुकाका' म्हणून हाका मारू लागली. ती घाबरली होती. तिला मग मेणबत्ती घेऊन तिच्यासमोरून कोणतरी चालत येताना दिसलं. हळूहळू ती व्यक्ती जवळ आली तसं ती बघतच राहिली. कँडलच्या प्रकाशात अजिंक्यचा चेहरा उजळून निघाला होता. तिनं रागानं तोंड फिरवलं. त्याने मग तिच्या रूममध्ये लावलेल्या एकेक कँडल्स लावायला सुरवात केली. तशी तिची रूम उजळू लागली. ती आश्चर्याने बघतच राहिली. पण तिने तसं दाखवलं नाही. 

" तू कशाला आलास इकडे......?? तुझी मैत्रीण आली असती तुझी काळजी घ्यायला ...." ती तोंड वेडावत म्हणाली. ' वातावरण खरंच खूप तापलंय. म्हादुकाका बरोबर सांगत होते ' तो मनाशीच म्हणाला. 


" हो.. म्हणून तर आलो. ती मैत्रीण काही आली नाही....म्हणून म्हटलं आपल्या हक्काच्या मैत्रिणीकडे जावं.... सॉरी ना...." एवढुस तोंड करत तो म्हणाला. खरंतर त्याच्या अशा छान सरप्राईजमुळे ती खुश झाली होती. पण उगीचच तिचे नखरे चालू होते. 


" कशाला सॉरी बिरी...... मला तुझ्याशी बोलायच नाहीये...." ती त्याच्या पासून तोंड लपवून हसत होती. 


 खट्टी मिठी आहे गं आपली लढाई 
अँम सॉरी.......
चूक झाली सारी माझी 
अँम सॉरी........
मैत्री आपुली हटके थोडी...
थोडी प्यारी थोडी खट्टी....
एकच तू ती माझी यारी
सखी माझी रातराणी.....


तो तिच्यासाठी चक्क गाणं म्हणत होता. ती कान देऊन त्याचे शब्द ऐकत होती. तिला खूप छान वाटलं. तो चालत चालत तिच्यापाशी आला.

" नुपूर... अग मी मस्करी करत होतो तुझी. तुझ्याशिवाय माझी कोणीही मैत्रीण नाही गं. कारण मला कधी वेळच मिळाला नाही. माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत पण तू माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहेस....." तो म्हणाला. त्यावर ती गोड हसली.


" मग आता तरी माफ केलं का तुझ्या मित्राला....?? " त्याने विचारलं.


" जाओ जाओ..... कर दिया माफ.. तुम भी क्या याद रखोगे.....!!! " तिच्या बोलण्यावर दोघही हसायला लागले. 


त्याने मग तिला एका टेबलजवल आणलं. त्यावर जेम्सच्या गोळ्यांनी अँम सॉरी लिहलेला छोटासा रवा केक होता. त्याच्या चाहुबाजुनी कँडल लावल्या होत्या. हे सगळं बघून ती हरखली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या मॉम डॅड नंतर पहिल्यांदाच तिच्यासाठी म्हणून कोणीतरी एवढं करत  होतं. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला जाणवलं.


" काप पटकन..... आणि सांग बघु कसा झालाय तो....?? " तो जरा वातावरण हलकं करायला म्हणाला.


" तू केलास......??? " तिच्या आवाजात कमालीचं आश्चर्य होतं.


" हो ... मी एकट्याने नाही केला काही.. निर्मला ताईंनी पण मदत केली मला....." अजिंक्य


तिने मग केक कापला आणि एक तुकडा खाल्ला. खुणेनेच एक नंबर झाल्याचं सांगितलं. 


" एकटीच खाणारेस का.....?? मला कोण देतच नाही...." तो बाजूला जात म्हणाला.


" अरे घे की........ खरच छान झालाय..." तिने त्याला केक भरवला. दोघेही मग गप्पा मारत खोलीतच बसले होते. खोलीच्या दारातुन म्हादुकाका आणि निर्मला ताई समाधानाने त्या दोघांकडे बघत होते....

...................................

म्हादुकाका अजिंक्य आणि नुपुरला जेवायला बोलवायला आत आले आणि निर्मलाबाई पानं घ्यायला खाली गेल्या. म्हादुकाका आले तसे त्या दोघांच्या गप्पा थांबल्या. 

"ताईसाब चला जेवायला.. आज समदं तुमच्या आवडीचा बेत हाये.. सायेब चला तुमी बी..." म्हादू काका म्हणाले. 


" हो चला... अजिंक्य चल तू पण..." त्याला यायला सांगून नुपूरही खाली गेली.  ती गेल्याची खात्री करून अजिंक्यने म्हादुकाकांशी बोलायला सुरुवात केली. 


" म्हादुकाका मला जरा बोलायचंय तुमच्याशी....." अजिंक्य म्हणाला.


" काय जी......." 


" म्हादुकाका मला सांगा हे सर्जेराव राजवाडे कोण.....?? तुम्हाला काही माहिती आहे का त्यांच्याबद्दल....??? " अजिंक्यने सर्जेरावांचं नाव काढताच म्हादुकाका घाबरले. त्यांना घाम फुटला होता. अजिंक्यने ते पाहिलं.


" काय झालं म्हादुकाका...... घाबरू नका मी आहे. तुम्ही बोला प्लिज....." तो म्हणाला. 

" आवं.... सर्जेराव राजवाडे म्हणजे किशोर भाऊंचा चुलत भाऊ... लई टरकतात गावातली समदी त्यांना... किशोर भाऊंचे काका भाऊसाहेबांचा ह्यो लेक.... लई मिजासखोर हाय बगा... कोनचं चांगलं झालेलं म्हनून बघवत न्हायी दोगासनिबि....." महादुकाकांनी माहिती दिली.


" अस्स...... अजून काही.....?? इथे भाडेकरू होते एक शिक्षक. त्यांचा पण अपघात झाला. त्यांना पण कोणी मारलं असेल असं वाटत का तुम्हाला.....??? " अजिंक्यने विचारलं. म्हादुकाकाना दरदरून घाम फुटला होता. त्यांना काय बोलावं सुचेना. कारण तो असं काही विचारेल असं त्यांना वाटलंच नव्हतं....


क्रमशः....


सध्या दोन तीन दिवस प्रचंड पाऊस आणि त्यामुळे जाणारं नेटवर्क या सगळ्यामुळे भाग पोस्ट करायला उशीर झाला. त्याबद्दल क्षमस्व. पण पुढेही दोन दिवस पावसाची शक्यता आहे त्यामुळे भाग जरा उशिरा पोस्ट होतील. यातुनही शक्य झालं तर पुढील भाग उद्या पोस्ट होईल. धन्यवाद.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//