मेघ दाटले - भाग 12

Love , Suspense

मेघ दाटले - भाग 12


अजिंक्य अजूनही मामांच्याच विचारात होता. बाजूला येऊन नुपूर उभी राहिली तरी त्याचं लक्ष नव्हतं. 


" ओ..... साहेब कुठे हरवलात....?? " तिच्या आवाजाने तो भानावर आला.

" अं........ नाही सहजच...." तो म्हणाला. 

" हम्मम घ्या नाश्ता करा....." असं म्हणून तिने गरम गरम उपम्याची प्लेट त्याच्यासमोर धरली.

" तुला येत का काही करता.......?? माझ्यावरच पहिला प्रयोग नाही ना....??? " प्लेट बघत तो हसून म्हणाला.


" हा हा हा...... सो फनी......" तिने तोंड वेडावल.  " येतं मला म्हणून तर केलं..... बघ ना खाऊन कसा झालाय तो..." ती अधीरतेने म्हणाली.


" हो , हो थांब जरा......" त्याने चमच्याने उपम्याचा घास खाल्ला. पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच रिऍक्शन नव्हती. त्यामुळे तिला काही कळेना. 


" कसा झालाय सांग ना......."  त्याने हातानेच छान असल्याची खूण केली. तशी ती आनंदाने आत पळाली. त्याने तो सगळा उपमा न बोलता संपवला. तोपर्यंत त्याने शिंदेंना फोन करून बोलवलं होतं ते आले. त्यांनी त्याला सॅल्युट केलं आणि ते त्याच्या शेजारी खुर्चीवर बसले. 

" साहेब हे काय लागलं तुमच्या डोक्याला......" त्यांनी काळजीनं विचारलं. 


" काही नाही शिंदे... किरकोळ आहे जखम. आपलं डिपार्टमेंटचं धोक्याचं आहे. होतं असतात अशा जखमा....." तो हसून म्हणाला. 


" पण तरीही तुम्ही काळजी घ्यायला........." शिंदेचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच नुपूर आतून बाहेर आली.. " अरे अळणी झालाय उपमा तू सांगितलं पण नाहीस...." ती तंद्रीतच बाहेर येता येता म्हणाली. आणि तिचं समोर शिंदेकडे लक्ष गेलं तशी ती ओशाळली. आल्या पावलीच मागे गेली.


" साहेब आता काय काळजी नाही तुमची.... काळजी घेणारी माणसं आलेयत की इकडे....." शिंदे अजिंक्यला चिडवत म्हणाले.


" ओ शिंदे काही काय.........." त्यानेही लाजून केसांवरून हात फिरवला. 


दोघेही मग कालच्या अजिंक्यच्या व्हिजितबद्दल बोलत होते. अजिंक्यला आठवलं की मिसेस मोहिते म्हणाल्या होत्या की ' ज्या दिवशी म्हादू काकांचा फोन आला त्याच्या आदल्याच दिवशी मि. मोहिते इकडे आले होते. मग त्यांना कोणीच कसं पाहिलं नाही ...??? त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला कालचा प्रसंग आठवला. 


" अग हो , मामा साताऱ्याला गेलाय मलाच लक्षात नाही. डॅडनीच त्याला पाठवलेलं कामासाठी....." नुपुरने वेळ मारून नेली. 


" हा ते पण असच कायतरी म्हणत होते कामाचं... पण एवढं कसलं ग काम महिना झाला ते अजुन घरी आले नाहीत. तसा रोज फोन येतो त्यांचा.....सुखरूप आहे , काळजी करू नको सांगतात... आता तूच कर कायतरी आणि त्यांना घरी पाठव....." मामी काकुळतीने म्हणाली.


" हो मामी... मी बोलते मामाशी. ती येईल लवकरच घरी..." नुपुरने तिच्या हातावर हात ठेवून हळूच थोपटलं. 


" ते फोन करतात का रोज....??? काय बोलतात तुमच्याशी....? " एवढा वेळ त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या अजिंक्यने विचारलं.

" हा.... रोजच असं नाही. कधी कधी रोज येतो कधी कधी दोन दिवसांनी पण येतो. हेच सांगतात मुलांची काळजी घे. मी लवकरच काम संपवुन येईन. पण त्यांच्या नेहमीच्या नंबर वरून नाही येत फोन. वेगळ्या नंबर वरून येतो...." त्या म्हणाल्या.


" मला द्याल का तो नंबर......? " अजिंक्यने जरा साशंक मनाने विचारलं. त्याला वाटलं खरंच यांच्या नवऱ्याने गुन्हा केला असेल तर त्या नंबर देताना काचकूच करतील. पण तसं झालं नाही. त्यांनी आतून त्यांचा मोबाईल आणला आणि कॉल लॉग मधून तो नंबर काढून अजिंक्यला दिला. त्यांच्यात मग फारसं काही बोलणं झालं नाही. मग ते दोघेही तिथून निघाले. हे सगळं आठवून अजिंक्यने मग तो नंबर शिंदेंना दिला. 


" शिंदे हा मि. मोहितेंचा नंबर आहे. कंट्रोल रूमला फोन करून हा नंबर सध्या कुठे आहे ते बघा. मला उद्यापर्यंत याचे डिटेल्स हवेत.." तो जरा गंभीर होऊन म्हणाला.


" येस सर. सर तुम्ही ज्या गाडीची चौकशी करायला सांगितली होती. त्या गाडीचे डिटेल्स मिळाले.. ही फाईल..."  शिंदेंनी त्याच्या समोर फाईल सरकवली.  " सर ही गाडी सर्जेराव राजवाडे यांच्या नावावर आहे. अपघात झाला त्यावेळी गाडी चालवणारी व्यक्ती ही त्यांच्या इथे कामाला होती. " 


" सर्जेराव राजवाडे......!!!! शिंदे या माणसाची संपूर्ण माहिती मला आजच्या आज हवीय...." अजिंक्य.


" येस सर......." असं म्हणून शिंदे अजिंक्यला सॅल्युट मारून निघून गेले. 


शिंदे गेल्यावर अजिंक्य विचार करत तिथेच बसला होता. सर्जेराव राजवाडे.... हे नाव आधी कसं या केस मध्ये ऐकायला आलं नाही...!!! काहीतरी गडबड आहे.. किशोर राजवाडे हे एक बिझनेसमन होते ही इतकीच गोष्ट आपण धरून चालतो आहोत. पण त्यांच्या बाकीच्या फॅमिली बद्दल , त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही. ते आधी शोधून काढायला हवं. 


" दिवसभर तू कामच करणार असशील तर जाते मी घरी....." नुपुरचा आवाज ऐकून तो आपल्या विचारातून बाहेर आला.


" अग नाही ते केसचाच विचार करत होतो. नुपूर तुमच्या फॅमिली मध्ये कोण सर्जेराव राजवाडे आहेत का...??? " 

" नाही रे.. अशा नावाचं कोण आहे का ते मला नाही माहीत. डॅडनी सगळ्यांशीच संबंध तोडले होते. डॅडना भाऊ आहेत नितीनकाका ते मला माहीत होतं. पण मला आत्या आहे हे पण मला हल्लीच कळलं. कदाचित याबद्दल तुला म्हादू काका सांगू शकतील. कारण ते खूप पूर्वीपासून आमच्या इथे कामाला आहेत. त्यांना नक्कीच माहीत असेल... " ती म्हणाली. 


" ह्म्म......... चालेल. आत्ताच जाऊया का..? ते घरात असतील ना मी बोलतो त्यांच्याशी......." असं म्हणून तो जायला उठला आणि त्याला जरा चक्करल्या सारखं झालं. तो पडणार त्या आधीच नुपुरने त्याला सावरलं आणि खुर्चीत बसवलं.


" हम्मम निघाले लगेच साहेब चौकशीला.. धड उभं तरी राहता येतंय का....?? " ती काहीसं रागावून म्हणाली. 

" इतकं काही झालेलं नाहीये हा मला. मला सवय आहे या सगळ्याची....तू नको काळजी करू....." तो हसून म्हणाला. पण नुपुरला वाईट वाटलं आणि रागही आला.


" हो का......??? बस मग एकटाच. घे तुझी तूच काळजी मी जाते......" असं म्हणून ती रागाने दाराबाहेर गेली.


क्रमशः....

🎭 Series Post

View all