मेघ दाटले - भाग 11

Love , Suspense

मेघ दाटले - भाग 11


नुपुरला घरी सोडून अजिंक्य रूमवर जायला निघाला. रात्रीचे दहा वाजत आले. बाहेर काळोख तर नुसता मी म्हणत होता. कुठे चिटपाखरूही दिसत नव्हते. अजिंक्य आपल्याच विचारात गाडी चालवत होता.आणि अचानक त्याच्या गाडी समोर चार पाच लोकांनी गराडा घातला. त्याने करकचून गाडीला ब्रेक मारला. असं अचानक कोणतरी गाडी समोर आल्यावर तो थोडासा भांबवला. तो दोन मिनिटं शांत बसून राहिला. गाडी समोर आलेल्या लोकांनी आपले चेहरे काळ्या फडक्यांनी झाकले होते. त्यांचे फक्त डोळे दिसत होते. त्यातल्या दोघांच्या हातात काठ्या होत्या. दिसायला देखील चांगले दणकट होते. थोड्या वेळाने अजिंक्य गाडीतून खाली उतरला आणि एक हात गाडीच्या दरवाज्याला टेकुन अगदी शांतपणे त्यांच्या समोर उभा राहिला. दोन क्षण शांततेत गेले. तो चालत चालत पुढे गेला आणि गाडीच्या समोर जाऊन उभा राहिला. त्या माणसांपैकी एक माणुस पुढे आला. त्याने अजिंक्यची कॉलर पकडली. 


" काय रे ए , तुला सांगितलेलं ना त्या राजवाडेंच्या प्रकारणापासून लांब राहायचं..... सांगून समजत नाही का तुला..... " तो जरा अरेरावीने म्हणाला. अजिंक्य फक्त शांत उभा होता. त्याने त्या माणसाचा हात धरून आपल्या कॉलर वरून बाजूला केला. त्या माणसाला अधिकच राग आला. त्याने अजिंक्यला थोडंस ढकललं तसा तो त्या बाकीच्या माणसांसमोर गेला. आता सगळे त्याच्याभोवती गोल उभे राहून फिरू लागले. इतक्यात त्यांच्यातल्याच एकाने अजिंक्य वरती हात उचलला. अजिंक्यनेही त्याला प्रत्युत्तर दिले. त्यांच्यामध्ये बरीच बाचाबाची झाली. अजिंक्यने त्यांना चांगलीच धूळ चारली. पण तरीही त्यांच्यात रग शिल्लक होती. अजिंक्य मग पुन्हा गाडीत बसण्यासाठी जाऊ लागला तसा त्यातल्या एका माणसाने आपल्या जवळची काठी जोरात त्याच्या डोक्यात मारली.  " आआहहहहह........." तो जोरात ओरडला आणि खाली कोसळला. जमलेली ती माणसं इकडे तिकडे बघत त्या अंधारात दिसेनाशी झाली. अजिंक्य तिथेच विव्हळत पडला. थोड्या वेळाने त्याची शुद्ध हरपली. तो त्या खडकाळ रस्त्यावर किती वेळ पडून होता देव जाणे. गाडीचे हेडलाईट्स तेवढे चालू होते. त्यामुळे चुकून माकून एखादी व्यक्ती तिथे आलीच तर त्याने अजिंक्यला पाहिलं तरी असतं. पण जवळपास कोणाचा मागमूसही नव्हता. रात्र वाढत होती तसतसा रातकिड्यांचा आवाज मात्र आसमंतात घुमत राहिला.

.......................................


दुसऱ्या दिवशी सकाळी अजिंक्यला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं तर तो आपल्या रूममध्ये बेडवर झोपला होता. समोर बघितलं तर नुपूर बेडच्या फळीला टेकून पेंगा काढत होती. त्याला थोडंस हसू आलं. ' किती निरागस दिसतेय ही झोपेत...' तो मनातच म्हणाला. पण आपण आपल्या घरी कसे आलो याचा त्याला प्रश्न पडला. तोपर्यंत नुपुरला देखील जाग आली. ती डोळे चोळतच उठली. 


" अरे , उठलास तू....?? ..... म्हादू काका याला घेऊन जा आणि हा फ्रेश होऊन येईपर्यंत तिथेच थांबा....." तिने पटापट ओर्डर सोडल्या आणि ती चहा करायला आत निघाली.


" पण मला इथे कोणी आणलं कळेल का....?? " तो भांबावल्या चेहऱ्याने म्हणाला.


" त्यावर आपण नंतर सुद्धा बोलू शकतो ना....? जा आधी फ्रेश हो , मी चहा करतेय.... " त्याला एक रागीट लूक देत ती आत गेली.


जवळच उभे असणारे म्हादू काका त्याला आधार द्यायला पुढे आले. अजिंक्यच्या डोक्याला मार लागला होता त्यामुळे त्याला चक्कर आली असती. म्हणून मग नुपुरनेच म्हादु काकांना मदतीसाठी थांबवुन ठेवलं. काल अजिंक्य कितीतरी वेळ त्या रस्त्यावरचं पडून होता. गाडीचे लाईट्स तसेच चालू होते. म्हादू काका रात्री सगळं आवरून दार खिडक्या लावायला म्हणून बाहेर आले. दरवाजा लावून घ्यायच्या आधी त्यांनी बाहेर नजर फिरवली. तर त्यांना त्यांच्या येणाऱ्या वाटेवरच कोणाची तरी गाडी उभी असलेली दिसली. आधी त्यांना वाटलं कोणाची तरी भांडणं चालू असतील नाहीतर मग कोणाची गाडी बंद पडली असली तर...?? असं वाटून त्यांनी बंगल्याचं दार लोटून घेतलं आणि ते चालत चालत अजिंक्यच्या गाडीपाशी पोहचले. त्यांनी पाहिलं तर अजिंक्य बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला होता. त्यांनी त्याला कसंबसं उचलून गाडीत बसवलं आणि ते पुन्हा बंगल्यात आले. नुपुरला त्यांनी घडलेली घटना सांगितली. ती मग त्यांच्या सोबत लगेचच तिथे आली. अजिंक्यच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. त्याला घरापर्यंत न्यायचं कसं हा प्रश्नच होता. कारण त्याचं घर जवळ असलं तरी त्याला अशा अवस्थेत चालत नेणं शक्य नव्हतं. शेवटी मग नुपुर ड्रायव्हिंग सीटवर बसली. तिने हळूहळू चालवत गाडी त्याच्या रुमपाशी आणली. म्हादू काकांनी आणि तिनं मिळून अजिंक्यला आत आणलं आणि बेडवर झोपवलं. तिने मग म्हादू काकांना डॉक्टरांना घेऊन यायला पिटाळलं. ते येईपर्यंत तिने त्याला कसतरी बसत करून त्याच्या डोक्याला लागलेली जखम स्वच्छ पाण्याने पुसली आणि त्याला थोडा वेळ तसच बसवून ठेवलं. त्याच्या डोक्याला पाठीमागे जखम झाली होती त्यामुळे त्याला नीट झोपवून फायदा नव्हता. डॉक्टरांना ड्रेसिंग करता येणं शक्य नव्हतं. म्हणून मग ती त्याच्या बाजूला उभी राहिली. त्याचं डोकं तिच्या खांद्यावर होतं. आज पहिल्यांदाच असं कोणतरी तिच्या इतक्या जवळ होतं. तिचा श्वास फुलला होता. त्याचं ते जवळ असणं तिला सुखावत होतं. थोड्या वेळाने डॉक्टर आले त्यांनी त्याच्या जखमेवर पट्टी बांधली आणि त्याला झोपवलं. त्याच्यासाठी गोळ्या औषध लिहून दिली. ते गेल्यावर मग नुपूर तिथेच बसून होती. म्हादू काकांना तिने बाहेरच्या खोलीत झोपायला पाठवलं. नुपुरला देखील बसल्या बसल्याच तिला झोप लागली ती सकाळी अजिंक्यला जाग येइपर्यंत..!!! तिने मग चहा केला तोपर्यंत अजिंक्य फ्रेश होऊन आला. म्हादू काका देखील सोबत होते. तिने मग दोघांनाही चहा दिला आणि तीही त्याच्या समोर चहा पिऊ लागली. अजिंक्यने तिला खुणेनेच चहा छान झाल्याचं सांगितलं. त्यावर ती खुश झाली. तिने मग म्हादू काकांना त्याची औषध आणायला पाठवलं. 


" आज कोणीही कुठेही जाणार नाहीये......" तिने फर्मान सोडलं. रिकामे चहाचे कप आत नेता नेता ती म्हणाली.


" ही सूचना माझ्यासाठी होती का....?? " त्याने हसून विचारलं. 

" दुसरं कोण इथे आहे , असं मला वाटतं नाही. " ती आतूनच ओरडली. तो मग हळूहळू चालत आत आला. 


" पण मला काम आहे पोलीस स्टेशनला.... मला रिपोर्ट द्यावा लागतो माझ्या कामाचा. कधीही काहीही केलेलं नाही चालत कळलं का... राजवाडे मॅडम...." तो हसला.


" असुदे , तरीही जायचं नाही. किमान आज तरी नाही. तुझ्या डोक्याला जखम झालेय. मी तुला जायला परमिशन देणार नाही....." ती अधिकाराने म्हणाली तसं त्याला बरं वाटलं.


" हो का.... पण मग मी शिंदेंना तरी बोलावून घेतो. कालच्या माझ्या व्हिजिट बद्दल त्यांना सांगायला हवं....." अजिंक्य. 


" बरं... पण मी जास्त काम करू देणार नाही. " असं म्हणून ती आत किचन मध्ये जेवणाचं बघायला गेली. 


अजिंक्य हॉल मध्ये बसून कालच्या त्यांच्या भेटीचा विचार करू लागला. कालचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. नुपूर त्याला घेऊन पनवेलच्या एका महात्मा चौकात आली. गाडी तिथेच रोडवरती ठेऊन ते दोघेही एका गल्लीतून पुढे गेले. गल्ली अरुंद होती. जागोजागी पाणी वाहत होतं. दोन्ही बाजूला अनेकांची घर दिसत होती. ती पार करत करत दोघेही गल्लीच्या शेवटी असलेल्या घराजवळ आले. नुपुरने बेल वाजवली. तिच्या मामीने दार उघडलं. तिला समोर बघून मामीच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं. 


" नुपूर तू.....??? अशी अचानक कशी काय आलीस....? आणि हे कोण...? "  ती आपली भडाभडा प्रश्न विचारत होती. 


अजिंक्यने आत पाऊल टाकलं. तीन खोल्यांचं ते छोटंसं घर होतं. मामाची दोन मुलं बाजूलाच सोफ्यावर अभ्यास करत होती. मामीने समोरच्या बेडवरती त्या दोघांना बसायला सांगितलं . जागेची अडचण दिसत होती. सगळीकडे सामान जमेल तसं ठेवलेलं दिसत होतं. मामीने दोघांनाही पाणी आणून दिलं. दोघही पाणी प्याले. 


" अग हे इन्स्पेक्टर अजिंक्य. आई बाबांचं अचानक असं झालं ते तुला कळलंच असेल ना.....??? " तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं.


" हो ग बाळा. मला यायचं होतं गं पण माझा धीरच नाही झाला बघ यायचा. खूप वाईट वाटलं....." असं म्हणून मामीने देखील डोळ्याला पदर लावला. 


" हे त्या केसचा तपास करत आहेत. म्हणून मग ते मामाला भेटायला आलेत. मामा कुठाय....??? " तिने डोळे पुसत विचारलं.


" म्हणजे.....???? अग असं काय करतेस हे तुमच्या इकडेच गेलेत. ज्या दिवशी म्हादू काकांचा फोन आला त्याच्या आदल्या रात्रीच हे तुमच्याकडे गेले. त्यांना ऑफिस संदर्भात काहीतरी बोलायचं होतं तुझ्या बाबांशी म्हणून कामावरून आल्यावर घाईतच तिकडे गेले....."  मामीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. पण इकडे अजिंक्य आणि नुपुरच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. कारण नुपुरच मामाशी काहीच बोलणं झालं नव्हतं आणि मामी तर म्हणत होती की तो गावीच आला होता म्हणून. काय खरं काय खोटं तिला कळेना. ती विचारात पडली. 


" काय ग नुपूर....?? मी काय विचारतेय.. हे भेटले ना तुला....??? " मामीचा स्वर आता कापरा झाला होता.


" अग हो हो... आत्ता आठवलं. डॅडनी त्याला कामासाठी साताऱ्याला पाठवलं होतं आणि काही दिवस तिकडेच राहायला पण सांगितलं होतं... माझ्याच लक्षात नाही बघ..." तिने वेळ मारून नेली. पण खरंतर तिला काहीही सुचत नव्हतं. 


मामीने मग त्या दोघांसाठी चहा केला. थोडा वेळ बोलून दोघेही बाहेर पडले. तिथुन बाहेर पडल्यावर मात्र नुपुरने मामाबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचं अजिंक्यला सांगितलं. मामी काळजी करू नये म्हणून तिने थाप ठोकली होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करत अजिंक्य बसला होता. जर त्या रात्री मामा गावात आले होते तर ते कोणाला माहीत कसं नाही....?? त्यांनीच तर राजवाडेंचा खून केला नाही ना....??? आणि आता ते लपून राहिले असतील.......????? की....... की त्यांच्या जीवाला धोका असु शकतो........???? असे एक ना अनेक प्रश्नांनी त्याच्या मनाला घेरलं होतं. त्याच्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं... राजवाडेंच्या खूनाचं रहस्य दिवसेंदिवस गूढ होतं निघालं होतं. 


क्रमशः........


भाग पोस्ट करायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. पुढील भाग दोन दिवसांनी पोस्ट केला जाईल. 

🎭 Series Post

View all