मेघ दाटले - भाग 10
अजिंक्यने दगड फेकून दिला आणि तो चिट्ठी वरील मजकूर वाचू लागला.
' राजवाडेंच्या परकरणापासून लांब राहायचं नायतर परिणाम चांगलं व्हनार नाहीत..'
चिठ्ठी वाचून त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. कारण या आधी देखील अशा कितीतरी धमक्या केसेसचा तपास करताना मिळायच्या. त्याने तो कागद नीट घडी केला आणि पँटच्या खिशात ठेवून दिला. तो पुन्हा आत आला. नुपुरला 'गुड नाईट ' विश करून तो झोपायला गेला. पण त्याला झोप येत नव्हती. आज दिवसभरात कितीतरी नवीन गोष्टींची उकल त्याला होत होती. त्यामुळे आता त्याच्यासमोर निशा राजवाडेंचे भाऊ , दिनेश , नितीन ही सगळी माणसं फेर धरून उभी असलेली दिसली. पण त्यातूनही नेमका खरा गुन्हेगार कोण हे त्याला समजत नव्हतं. या तीन व्यक्तींपेक्षाही अजून कोणीतरी या सगळ्या प्रकरणात आहे असं त्याला राहून राहून वाटू लागलं. आपल्याला मिळालेली माहिती अपूर्ण असावी त्यामुळे सगळ्यात आधी निशा राजवाडेंच्या भावाला भेटायचं आणि त्यांच्याकडून सगळी माहिती मिळवायची त्यानं ठरवलं. या सगळ्या विचारात तो झोपेच्या अधीन कधी झाला त्याचं त्याला देखील कळलं नाही.
..................................
दोन दिवसांनी सकाळी अजिंक्य पोलीस स्टेशनला आला. तो निघाला तेव्हा देखील एक धमकीवजा चिठ्ठी त्याला त्याच्या बाईकवर ठेवलेली मिळाली. त्याने ती तशीच खिशात टाकली आणि तो स्टेशनला आला. शिंदे फाईल घेऊन काहीतरी चाळत बसले होते. त्यामुळे त्यांचं अजिंक्यकडे लक्ष नव्हतं. अजिंक्यने त्याला मिळालेल्या चिठ्ठया उघडून शिंदेच्या समोर ठेवल्या. समोर अचानक कागद आलेले पाहून शिंदे जागे झाले. त्यांनी नजर वर करून पाहिलं तर अजिंक्य उभा होता. ते पटकन उभे राहिले आणि त्यांनी त्याला सॅल्युट केलं. अजिंक्यने त्यांना डोळ्यांनीच आश्वस्थ केलं.
" घ्या शिंदे. आता जरा केस सोल्व्ह करायला मजा येणारे..... " तो हातावर हात घासत म्हणाला. त्याचा चेहरा फुलला होता. शिंदेंनी त्या चिठ्ठ्या हातात घेऊन वाचल्या.
" अहो साहेब काय हे.....!! कोणाची एवढी हिंमत झाली तुम्हाला असली धमकी द्यायची.... " शिंदे जरा घाबरले होते.
" chill शिंदे. अहो मला सवय आहे या सगळ्याची. शत्रू आपल्यापेक्षा वरचढ होऊ लागला की दुबळी लोकं असे मार्ग अवलंबतात...... असू दे पण. आता मजा येणार आहे ..."
" साहेब या त्या दोन फाईल्स. राजवाडेंच्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंच्या. तुम्ही काढायला सांगितल्या होत्या ना.....? " शिंदेंनी त्याच्याकडे फाईल देत म्हटलं.
" हा good . " तो फाईल चाळू लागला.
" साहेब यात पहिले जे भाडेकरू राहत होते ते गावातल्या शाळेत शिक्षक होते. ते आणि त्यांची पत्नी त्या बंगल्यात भाड्याने राहत होते. त्यांना देखील बंगला सोडून जा म्हणून धमक्या यायच्या. त्यांनी तशी तक्रार केली होती. त्यानंतर थोड्याच दिवसात त्या दोघांचा अपघातात मृत्यू झाला. तो देखील कोणीतरी मुद्दाम घडवुन आणला आहे असं त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा संशय होता. त्यानंतर जे दुसरे भाडेकरू आले किशोररावांच्या ओळखीचेच होते. त्यामुळे म्हादू काकांना पण सोबत मिळेल यासाठी त्यांना ठेवलं होतं. पण थोड्याच दिवसात ते गावी जातो म्हणून जे गेले ते परत आलेच नाहीत... " एवढं बोलून शिंदे थांबले.
" हम्मम ok. शिंदे ज्या गाडीने त्या शिक्षकांचा अक्सिडेंट झाला त्या गाडीचे सगळे डिटेल्स मला हवेत. गाडीचा नंबर , गाडी कोणाच्या नावे आहे , गाडी कोण चालवत होतं ... मला सगळे रिपोर्ट्स हवेत...." त्याने पटापट ऑर्डर्स दिल्या.
" येस सर.... सर आपला खबरी सांगत होता की नितीनराव हल्ली वरचेवर बाहेरगावी जात असतात. आणि शेतातही त्यांचं येणं जाणं वाढलं आहे. बहुतेकवेळा रात्रीच्या सुमारास ते शेतात जातात......" शिंदेंनी माहिती पुरवली.
" लक्ष ठेवा. अजिबात हलगर्जीपणा होता कामा नये. मला रोजच्या रोज त्यांच्या हालचाली कळायला हव्यात. मी आज जरा बाहेर जातोय. संध्याकाळ पर्यंत परत येईन...." एवढं बोलून अजिंक्य घाईतच बाहेर आला.
त्याला पनवेलला जाऊन पुन्हा संध्याकाळ पर्यंत गावात परत यायचं होतं. त्यामुळे तो पोलीस स्टेशन मधून लवकर बाहेर पडला. नुपुरला देखील आपल्या सोबत न्यावं का असा एक विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला. तिला निलं तर आपल्यालाही पत्ता शोधायला फार कष्ट पडणार नाहीत असा विचार करून त्याने गाडी बंगल्याच्या दिशेने वळवली. आज तो पोलिसांची गाडी घेऊन निघाला होता. तो बंगल्यापाशी आला त्याने बेल वाजवली. निर्मला ताईंनी दार उघडलं.
" नुपूर आहे का घरी........??? " त्याने जरा संकोचून विचारलं. त्यावर त्या हसल्या आणि त्यांनी त्याला आत बोलवलं. तो त्यांच्या मागोमाग आत गेला.
" ताईसाब... बगा कोन आलंय तुमच्याकडं....." निर्मला ताई आत किचन कडे जात म्हणाल्या. नुपूर सोफ्यावर बसून कसलतरी पुस्तक वाचत होती. त्यांच्या आवाजाने तिने डोकं वर करून पाहिलं तर निर्मला ताईंच्या पाठोपाठ अजिंक्य आत आला होता.
" तू........? असा अचानक.....?? " ती जरा घाईत त्याच्या समोर येत म्हणाली. तिचा असा उतावळेपणा बघुन निर्मला ताई हसत आत निघून गेल्या. अजिंक्यला मात्र ओशाळाल्या सारख वाटलं. त्याने मग इकडे तिकडे उगीचच मान फिरवली.
" मी ते आज कामासाठी मुंबईला जातोय. तूझ्या मामांकडेही जायचा विचार आहे. तू येणारेस का माझ्या सोबत.. if you don't mind....!!! तेवढाच तुलाही चेंज होईल. मी संध्याकाळी परत येणारे..." तो म्हणाला.
" चालेल. मला खरंच कंटाळा आलाय इथे बसून. मी आवरून येते 10 मिनिटात. थांब हा....." असं म्हणून ती आपल्या वरच्या खोलीत गेली.
तोपर्यंत निर्मला ताई अजिंक्यसाठी चहा घेऊन आल्या. चहा पीत तो तिथेच हॉलमध्ये बसला. त्याचं लक्ष नुपूर वाचत होती त्या पुस्तकावर पडलं. ' शेरलॉक होम्सच्या साहसी कथा ' त्यानं वाचलं. ' ohh my favourite ' तो मनाशीच म्हणाला. तेवढ्यात त्याला कोणाची तरी चाहूल लागली. त्याने पाहिलं तर जिन्याच्या पायऱ्या उतरत नुपूर खाली येत होती. स्काय ब्ल्यू कलरचा टॉप , त्यावर पांढरी लेगीन... गळ्याभोवती गुंडाळलेला ब्लॅक कलरचा प्रिंटेड स्कार्फ... हातात स्टीलच वॉच.. कानात मोठ्या मण्यांचे कानातले.... आणि छोटा किल्प लावून रुळणारे मोठे केस.... आज कितीतरी दिवसांनी ती अशी तयार झाली होती. तिच्या एका हातात एक हँडबॅग होती. ती सावरत ती अजिंक्य जवळ आली. निर्मला ताईंना जाऊन तिने बाहेर जातेय म्हणून सांगितलं आणि ते दोघेही बाहेर पडले. आज पहिल्यांदाच ती त्याच्या सोबत त्यांच्या पोलिसांच्या गाडीत बसली होती. अजिंक्यने गाडी स्टार्ट केली. दोघेही गप्पच होते. नुपूर आपली खिडकीतून दिसणार सौंदर्य बघत निघाली होती. वाऱ्याच्या येणाऱ्या झोतासोबत तिचे केस उडत होते आणि ते सावरताना तिची होणारी धांदल पाहून अजिंक्यला हसू येत होतं. त्यांची गाडी महाड मधुन बाहेर पडली आणि मेनरोडवरती आली. अजिंक्यने मग गाडीतल्या रेडिओचं बटण फिरवलं. त्यावर छान जुनी हिंदी गाणी लागली होती.
हवा के साथ साथ .......... अरे.... अरे !!!
घटा के संग संग.....
हवा के साथ साथ घटा के संग संग
ओ साथी चल.......
मुझे लेके साथ चल तू .......
युही दिनरात चल तू......
ओ साथी चल...........
" waw..... its my favourite ...!! " नुपूर म्हणाली.
" खरच...?? मला जुनी गाणी सगळीच आवडत नाहीत. पण त्यातली मोजकीच आवडतात. हे पण आवडतं फार..." अजिंक्य म्हणाला.
दोघेही मग गाणं ऐकण्यात गुंतले होते. अजिंक्यने मग एका हॉटेल जवळ चहा पिण्यासाठी गाडी थांबवली. दोघेही मग चहा नाश्ता करून तिथून निघाले. दोघेही छान गप्पा मारत निघाले. गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही. त्यामुळे दोन तीन तासातच ते पनवेलला येऊन पोहचले. नुपूर अजिंक्यला मामाच्या घरी घेऊन गेली. मामा घरी नव्हते पण त्यांच्या पत्नीशी बोलून दोघेही तिथून बाहेर पडले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून मात्र अजिंक्यच्या डोक्यात विचारांचा गुंता झाला होता. पुन्हा एकदा त्याच्यासमोर नवीन प्रश्न उभे राहिले होते. आणि त्या सगळ्याची उकल करणं आता गरजेचं होतं. परतीच्या प्रवासात दोघेही गप्प होते. नुपूरचीही अवस्था काही वेगळी नव्हती. तीही भांबावली होती. त्यांना गावी पोहचायला जवळजवळ रात्रीचे साडेनऊ वाजले होते. नुपुरला घरी सोडून अजिंक्य आपल्या रूमकडे जायला निघाला. अचानक त्याच्या गाडीसमोर चारपाच माणसं येऊन उभी राहिली. त्याने जोरात गाडीला ब्रेक मारला आणि तो खाली उतरला.
क्रमशः......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा