#मीरा माधवचे लग्न आणि बरंच काही.. भाग तीन अंतिम भाग
नमस्कार, कथेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात आपण पाहिले की एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्या मीरा आणि माधवच्या नात्याला काही कौटुंबिक गैरसमजुतीतून मीराच्या घरची मंडळी विरोध करत होती. सरतेशेवटी माधवच्या आनंद काकांच्या पुढाकाराने तसेच आई बाबांच्या समजूतदारपणाने दोघांच लग्न निर्विघ्नपणे पार पडले.
पण लग्नाला इतर पाहुण्यांसोबत संपदाही आली होती. संपदा इथे कशी आणि का आली? काय घडतंय पुढे, पाहूया या अंतिम भागात…
मीराच्या आवाजाने सर्वांचे लक्ष लांबसडक केसांची सैलसर वेणी, हलकासा मेकअप केलेली, डोळ्यांवर साजेसा चष्मा, लाल आणि हिरव्या रंगाच्या नाजूक किनारीच्या राखाडी रंगाची गढवाल साडी परिधान केलेली, एका हाताला घड्याळ बांधल होतं तर दुसर्या हातात नाजूकशी सोन्याची बांगडी होती. हातात साडीला मिळता जुळता लहानसा क्लच घेऊन स्टेजसमोर उभ्या असलेल्या एका स्त्रीकडे गेले.
मीराच्या हाकेला प्रतिसाद देत तिने हसून मीराला लग्नाच्या विधीकडे लक्ष देण्याची प्रेमळ सूचना दिली. सार्यांच लक्ष वेधून घेतलेली ती स्त्री तिच्या देहबोलीवरून बिझनेस वुमन वाटत होती.
तेवढ्यात मीराचे आई बाबा तिची विचारपूस करू लागले. तिने लक्षात ठेवून मीराच्या लग्नाला लावलेल्या हजेरीने आई बाबांचा चेहरा आनंदला होता. मग त्यांनी नयनाताई आणि सुभानरावांना ओळख करून देण्यासाठी बोलावले.
"सुभानराव नयनाताई, ह्या संपदा काळे, पुण्यात यांची हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची चेन आहे. ऐनवेळी फोन करून लग्नाचं आमंत्रण देऊनही अगदी स्वतः आल्या.
"नमस्कार"… सुभानराव आणि नयनाताई म्हणाले
"आणि बरं का, संपदाताई हे आमचे व्याही श्री. सुभानराव संपतराव चौधरी आणि त्यांच्या पत्नी सौ. नयनाताई सुभानराव चौधरी.
ही नावं ऐकताच संपदा सुभानराव आणि नयनाताईंच्या पाया पडण्यासाठी खाली झुकली.
"अहो हे काय करताय मॅडम".. नयनाताई संपदाला हाताला धरून उठवू लागल्या.
"मॅडम नका म्हणू ताई, मी संपदा, संपदा रमेश काळे, वीस वर्षांपूर्वी तुम्हा सर्वांना सोडून गेलेली संपदा.. आनंदची संपदा…" झुकलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत संपदा बोलत होती.
सुभानराव आणि नयनाताई विस्फारलेल्या नजरेने संपदाकडे पहात होते. राग, कुतूहल, काळजी काय नव्हतं त्या नजरेत.
खरंतर त्यांनी संपदाला पाहिले नव्हते. त्यांची आणि संपदाची भेट होण्याच्या आधीच रजिस्टर लग्नाचा घाट घालवा लागल्याने प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. पण आनंदने संपदाला आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख फोटोमार्फत करून दिली होती. तसेच आनंद कडून तिला सर्वांचे स्वभावही पक्के माहीत झाले होते.
श्री. सुभानराव संपतराव चौधरी आणि सौ. नयनाताई सुभानराव चौधरी ही नावे कानावर पडल्यावर ते हेच आहेत हे तिने ताडले.
एव्हाना आनंद संपदाच्या मागे येऊन उभा राहिला होता. पण त्याने नयना ताईंना हाताने खूण करून आता शांत lराहण्यास सांगितले.
"संपदा आपण यावर नंतर बोलू सविस्तर बोलू, लग्नाचे विधी आता पूर्ण होतच आले आहेत." प्रसंगानुरूप वेळ सावरून घेण्यासाठी नयनाताई म्हणाल्या.
"ताई प्लीज मला बोलू द्या, तुमचा जास्त वेळ नाही घेणार मी. आणि आता मला इथे जास्त थांबताही येणार नाही. मीराला भेटून लागलीच निघून जाईन. पण जर आज तुमच्यापुढे मन मोकळं केलं नाही, तर उर्वरित आयुष्यभर मनात खंत लागून राहील." संपदा अगतिकपणे हात जोडून बोलत होती.
नयनाताईनी सुभानरावांकडे पाहिले, तर त्यांनी मान हलवून सहमती दर्शवली. चेहर्यावरून आनंदकाकाही स्थिर दिसत होते.
"अगं ठीक आहे. अशी हात जोडू नकोस, बोल तू"
"ताई लग्न.. लग्नाच्या आदल्या दिवशी कसं ते माहित नाही पण मी ऑफिस मधून घरी गेले तेव्हा घरच्यांना सर्व माहीत झाल होतं. घरी खूप मोठ भांडण झालं, मला मारझोड झाली. बाबांनी माझ्या आत्याला मी तिची सून होईन असा शब्द दिला होता. मला यातलं काहीच माहित नव्हतं. आत्याच्या मंडळींनी माझ्यावर पाळत ठेऊन घरी कल्पना दिली होती. त्याच दिवशी रात्री उशिरा आमच्या कुटुंबाला आत्याच्या गावी रवाना केलं गेलं. दुसर्या दिवशीच लग्न पार पडणार होतं.
पण ज्याच्या बरोबर लग्न होणार होतं त्यानेच अश्या मुलीबरोबर लग्न नाही करायचं स्पष्ट सांगितल. बाबा हाता पाया पडले. पण लग्न मोडले. आणि त्याच वेळी रागात बाबांनी यापुढे तुझं लग्न विसर आणि पुन्हा जर का वाकड पाउल टाकल तर स्वतः चा जीव घेण्याची धमकी दिली. त्यानंतर माझ्या लग्नाचा विषय घरी आजतागायत निघाला नाही.
पण आज झाल्याप्रकाराबद्दल मी तुमची सर्वांची मनापासून माफी मागते."
एव्हाना आनंद काकांचे डोळे भरून आले होते
"अगं, झालं ते झालं. तुझा त्यात दोष नाही. नियतीपुढे कोणाचं चालत नाही ग."..
"बरं, तू मीराला कशी काय ओळखतेस?.. नयनाताईनी विचारलं."
"ताई मी जे काही आज आहे, ते या मीरा मुळेच".. संपदा
"म्हणजे?".. नयनाताई
"पुण्याला मीरा जिथे शिकायला होती तिथे मी मेस चालवायचे. मीरा आणि तिच्या मैत्रिणी नेहमी यायच्या तिकडे. माझ्या हातचं अन्न तिला फार आवडायचं आणि मला मीरा. मी तिच्यात मलाच पहायचे. हळूहळू मीरानेच पुढाकार घेऊन मला हॉटेल सुरू करायला लावलं, तिच्या अभ्यास त्याच क्षेत्रात असल्याने, तिने मला पुरेपूर मदत केली. आणि आज माझी पुण्यात रेस्टॉरंटची साखळी उभी झाली आहे. तिच्या लग्नाला मी न येणं शक्यच नव्हतं. ताई तुमची सून अगदी गुणाची आहे.".. संपदा
"हो, ती तर आहेच की, तिच्यामुळेच आजचा दिवस दिसतोय."..नयनाताई म्हणाल्या.
तेवढ्यात मीरा आणि माधव मोठ्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आले. तसे आनंदकाका मागे सरकले.
नयनाताई, सुभानराव आणि मीराच्या आईबाबांनी नव दाम्पत्याला तोंडभरून शुभाशीर्वाद दिले. मग मीरा माधव संपदा समोर आले.
"ताई.." मीराने संपदाचे हात हातात घेऊन तिला आलिंगन दिले. जसे ते दोघं संपदाचे आशिर्वाद घेऊ लागले तसे संपदाने मीराला घट्ट मिठी मारली आणि तिच्या चेहर्यावर हात फिरवत आशिर्वाद दिले. नकळतच संपदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
मीरा माधवला काही कळलेच नाही. मीराने मात्र संपदाला जेवून जाण्याचा आग्रह केला आणि ती जबाबदारी आपल्या आईकडे सोपवली.
मीरा माधव दुसरीकडे वळताच, संपदा निघण्याची घाई करू लागली.
"ताई निघते मी.." संपदा नयनाताई आणि मीराच्या आईंना म्हणाली.
"नाही नाही असं कसं जेवण करावंच लागेल तुम्हाला." मीराच्या आई
"नाही ताई, निघते मी. मी इथे जास्त वेळ थांबणं श्रेयस्कर ठरणार नाही. प्लीज समजून घ्या मला." संपदा काकुळतीने म्हणाली.
"बरं, मी समजू शकते" संपदाला धीर देत मीराच्या आई म्हणाल्या.
"संपदा आनंद भावोजीना नाही भेटणार का", डोळे पुसत निघालेल्या संपदाला नयनाताई म्हणाल्या.
"नाही ताई, नको मी कुठल्या तोंडाने त्यांच्यासमोर येऊ? आणि आता या वयात माझ्यामुळे त्यांच्या संसारात वादळ यायला नको".. संपदा पुढे चालू लागते.
"आणि जर मला तुला भेटायचं असेल तर.. " आनंदच्या आवाजाने संपदा जागच्या जागी थिजून भरलेले डोळे गच्च मिटते.
"एकदा बोलशील माझ्याशी" संपदाच्या मिटलेल्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसत आनंदकाका म्हणाले.
संपदाने अलगद डोळे उघडले, समोर आनंद काका तिचा आनंद उभा होता. अविरत वाहणार्या अश्रूंच्या पुरामुळे तो धूसर दिसत होता.
दोघांची नजरा नजर झाली, दोघंही निःशब्द होते. इतक्या वर्षांचं मनात साचलेलं नजरेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होते.
इतक्यात कोणीतरी सर्वांना फॅमिली फोटोसाठी बोलावलं.
"आनंद संपदा चला फोटो सेशन करायचं आहे" सुभानराव दोघांची तंद्री मोडत म्हणाले.
"आणि हो मीराचा गृहप्रवेश झाल्यावर, लवकरच धाकट्या सूनबाईंचा गृहप्रवेश होणार आहे. काय आनंद भावोजी?" मिश्कीलपणे नयनाताई बोलल्या.
आनंदने संपदाकडे एक नजर पाहिले, संपदाने डोळ्यांनीच होकार दिला आणि लाजून मान झुकवली.
आज मीरा माधव जोडीनं गृहप्रवेश करणार आहेत तर
घरी काही दिवसातच चौधरींच्या घरात परत सनई चौघडे वाजणार आहेत.
इतिश्री
✍️© स्नेहा किरण नवाळे (पाटील)
छायाचित्र आभार: pixabay
सदर कथा काल्पनिक आहे. कथा आवडल्यास नावासहित शेअर अथवा कॉपी पेस्ट करावी ही विनंती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा