Login

मीडिया-कल्लोळ (विनोदी कथा स्पर्धा)

This Is Funny Side Of Indian Journalism.


भारतीय प्रसारमाध्यमे! मीडिया-कल्लोळ

ईरावर विनोदी कथा स्पर्धा जाहीर झाली आणि कोकणातील असल्यामुळे मुळातच अंगात कुटून कुटून भरलेला मिश्किलपणा अधिकच उफाळून आला.. मग काय लागले ना डोळे गरागरा फिरायला. आधीच करोना विषाणूंमुळे सारेच जण गंभीर असल्याने माणसातला वेडेपणा काही केल्या सापडे ना!

मग शेवटी ठरवलं शिकलेल्या लोकांकडे नजर ठेवून पाहू. यांत तर नक्कीच विनोदी माणसं भेटतील ही भाबडी आशा ठेवून सोसायटीच्या सी. सी. टी. व्ही. कॅमेरापेक्षा जास्त तिष्ण नजरेने शोध चालू ठेवलं. (काय म्हणताय? सोसायटीच्या बायकांचीं नजर त्यापेक्षा जास्त करडी असते? उत्तर हो आहे यात तिळमात्रही शंका नाही बुवा!).

खूप दिवस काथ्याकूट केल्यावर ही पाहिजे तसे नमुने काही भेटेच ना. (विनोदाचे ओ. माणसांतले नमुने तर वाटे वाटेवर भेटतील. तुम्हांला नाही भेटले तर मला भेटा; तुमची इच्छा नक्कीच पुर्ण होईल.) इंजिनिअरिंग करून बँकेत नोकरी करणारा शेजारचा शामु, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून ब्युटी पार्लरमध्ये कामाला लागलेली मनू असे काही नमुने भेटले पण त्यात काही नाविन्य वाटलं नाही. कारण आजकल तुम्हांला असे ढिगाने भेटतील.

झालं! म्हटलं आता काही आपल्याला विनोदी स्पर्धेत भाग घेता यायचा नाही. पण म्हणतात ना नशिबात असेल तर सगळे योग जुळून येतात. मी विचारात असतानाच पिताश्रीनीं येऊन टिव्ही चालू केला.

आता या जेष्ठ नागरिकांना तरूणाईच्या खोड्या काढायची वाईट सवय! त्यांच्या आराम खुर्चीवरून मी उठावं म्हणून त्यांनी नामी शक्कल लढवली. त्यांनी सरळ न्युज चॅनेल चालू केलं. अधाश्यासारखी करवंद ओरबडताना त्याचा काटा आपल्याला टोचावा आणि सटकन तोंडून किंकाळी बाहेर पडावी अगदी तसंच त्या न्युज चॅनेल वाल्या काकूंचा आवाज कानात शिरला अन मी ताडकन उठून उभा राहिलो.

संगीतखुर्चीच्या कसलेल्या खेळाडूने संगीत थांबल्यावर चपळाईने एखादी खुर्ची पकडावी तसेच पिताश्री त्यांच्या आरामखुर्चीवर विराजमान झाले.

छळ कपटाच्या खेळात पराभूत योध्या प्रमाणे खाली मान घालून जातच होतो की कानावर जे हवं होतं ते ऐकू आलं.

"तीन साल के तैमुर ने दो दिन बाद आज घर के बाहर कदम रखे".

वाळवंटात तहानलेल्या प्रवाश्याला पाण्याचा साठा दिसावा तसेच डोळे लुकलूकले ना! सर्रकन मान वळवली; आणि आपसूक महान शोध पूर्ण झाल्याचं हसू चेहऱ्यावर फुललं.

"या मीडिया वाल्यांपेक्षा विनोदी कोण असेल का?"- मनात केवळ हलकीच शंका आली तेवढ्यात मेंदूने डाव्या हाताला एवढी फास्ट कमांड दिली की थेट स्वतःनें स्वतःच्या कानाखाली आवाज काढला.

"कोई शक?"- मेंदूने गालावर उमटवलेला निरोप गाल चोळत फुसला ना राव!

तसं बघायला गेलं तर हे वर्ष नाहीतर पुढचं वर्ष आपलं काम करेलच या आशेवर एकाच लोकप्रतिनिधीला वर्षोनुवर्षे निवडून देणारा मतदार, दक्षिणेकडच्या चित्रपटातील हाणामारीचे प्रसंग, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, काही उत्पादनाच्या जाहिराती हे ही सारे गंमतीशीर प्रकार! पण या सर्वांवर कुरघोडी करतात ती भारतीय प्रसारमाध्यमे!

खरंतर यांना "प्रसारमाध्यमे" नव्हे तर "अतिसार माध्यमे" म्हणावं अशी यांची कामगिरी. यांची पत्रकारीता पाहून एखादा अतिगंभीर स्वभावाचा व्यक्तीही लोटपोट होऊन हसत सुटायचा.

अतिशोयक्ती वाटते? विचार करा बाळंतपणात करिनाच अमुक किलो वजन वाढलं ही यांची लक्षवेधी बातमी! दिवसातून पन्नास वेळा तरी दाखवतील. बाबांनो अभिनेत्री असली तरी स्त्री आहे ना ती? बाळंतपणात वाढतात वजन. बरे वजनाबद्दल आकडे असे काही फ्लॅश करतील की सैफने घरांत लाद्यांऐवजी वजनकाटेच लावून घेतलेत. आणि ती बेबो का बाबो त्यावरून चालली की यांना तिच वजनाचे नोटिफिकेशन जात असावं. अवघड आहे देवा! खरंच अवघड आहे!

बरं, बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि ठिकठिकाणी पाणी तुंबलय हे दाखवण्यासाठी त्या वार्ताहराला "पाण्यातच" उभं राहून का रिपोर्ट करावं लागतं ते काही अजूनपर्यंत कळलं नाही. पाण्याची पातळी दाखवण्यासाठी त्या वार्ताहराचा जीव धोक्यात घालण्याचा बिनडोकपणा यांना सुचतोच कसा याचा शोध घ्यायला हवा असं ठरवत असतानाच ज्यांच्याबद्दल सहानुभूती असते ते वार्ताहर महाशय म्हणतात-" लोकांनी कृपया अशा अतिवृष्टीकाळात घराबाहेर पडू नये. तुंबलेल्या पाण्यात उतरणं कटाक्षाने टाळावे." बस, माझा खुळेपणावरील संशोधनाचा अग्रक्रम लगेच बदलतो.

आप्तस्वकीय गमावलेल्या व्यक्तीला सांत्वन देण्याऐवजी- " आपल्याला आता कसं वाटतंय?"- असा अनाकलनीय प्रश्न विचारणाऱ्या वार्ताहराकडे पाहून असं वाटत की याची बायको पळून जावी आणि त्याला कोणी तरी विचारावं की " तुम्हांला आता कसं वाटतंय?".

क्रिकेटचा एखादा साखळी सामना जिंकल्यावर त्याची बातमी पहिल्या पानावर ठळकपणे छापतील आणि इतर खेळांनी त्याचवेळी महत्वाची स्पर्धा जिंकली तरी त्या बातमीची शेवटच्या पानावर कुठल्यातरी कोपऱ्यात बोळवण करतील. यावर कडी म्हणजे पुढे - मागे ऑलिपिंक मध्ये अशा खेळात हार झाली तर "क्रिकेटमुळे इतर खेळांची पिछेहाट" ; हि बातमी पुन्हा अगदी ठळकपणे छापतील.

मागे मुबंईवर मोठा दशहतवादी हल्ला झाला होता. त्यावेळेस जीव धोक्यात घालून त्या आतंकवाद्यांचा खात्मा करायला आलेल्या भारतीय सैन्याची सारी व्यूहरचना भारतीय मीडिया लाईव्ह दाखवत होते आणि त्यामुळे पाकिस्तानांतून दशहातवादी गटांना हल्लेखोरांना सावध करणे सोप्प जात होतं. प्रचंड दारु पिलेल्या व्यक्तीने आपलं मानसिक संतुलन गमावल्यानंतर जसं वागावं तसे यांचे हे उद्योग!

आपले विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्य अधिकारी त्यांच्या भारतीय सैन्यातल्या रँक बद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल विचारत असताना; त्या निडर सैनिकाने मी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. आणि आमची मिडिया? तो विंग कमांडर आहे; अमुक सालापासून भारतीय सैन्यात आहे, चेन्नईत त्याच या या भागात घर आहे, त्याच्या कुटुंबात या या व्यक्ती आहेत. अरे काय?? भारत सरकारने खरंतर "बिनडोकपणा" प्रकारात भारतीय मीडियाला पुरस्कार द्यायलाच हवा होता. पुरस्काराची रक्कम म्हणून पोकळ बांबूचे फटके द्यायला हवे होते. (हो, बरोबर बोललात. बांबूला तेल पण लावायला हवं होतं ना? )

बरं, याबद्दल विचारावं तर म्हणतील जे खपत तेच आम्ही विकतो. भले त्यासाठी देशाची इज्जत गेली तरी बेहत्तर!

मंदिरा बाहेर बसणारे याचक एकीकडे आणि जिम मध्ये जाणाऱ्या अभिनेत्रीला वाटेत पकडून एक फोटो, एक फोटो म्हणणारे हे दुसरीकडे. असं काही पाहिलं की दोघांत जास्त गरीब कोण असा प्रश्न पडतोच.

एखाद्याला काही प्रश्न विचारताना माईक त्याच्या इतका तोंडा जवळ नेतील की काही काळासाठी तो बिचारा पण घाबरत असेल की काही बोललो नाही तर ही लोक माईक थेट घशात घालयालाही कमी करायची नाहीत. म्हणूनच त्या प्रकाराला "बाईट" असं म्हणत असतील का ओ?

कोणी निराशेचा सामना करत असेल तर त्याने एकवेळची औषध घेतली नाहीत तरी चालतील परंतु या साऱ्यांची फेसबुक पेजेस आवर्जुन वाचावीत. तुमच्यापेक्षा जास्त मानसिक संतुलन गमावलेली माणसं आजूबाजूला आहेत हे समजून ती व्यक्ती लवकर ठिक होण्याचे चान्सेस जास्त आहेत.

लिहिण्यासारखं खूप काही आहे पण जास्त लिहीत नाही. ( काय म्हणता? सुचायचं बंद झालं? श्या! असलं शक्य नाहीच. कोकणातला आहे मी. आळस हा माझा मित्र असल्याने त्याला भेटायला चाललोय. बाकी टिका तर आम्ही समोरच्याचे कान फाटेपर्यंत करू शकतो बरं!).

या सगळ्या व्यावसायिक मीडियाच्या गराड्यात दर्जा टिकवून ठेवणारे काही चॅनल्स आहेतच. डीडी न्यूज सारख्या चॅनल वर बातम्या पाहताना खरंच ज्ञानात भर पडल्याची फिलिंग येते. कोणत्याही तद्दन माल-मसाल्याशिवाय , मोजक्या शब्दांत मांडणी करून लोकांना बातमी सांगण्याचं कसब बाकीच्यांनी शिकावं ते यांच्याकडूनच! ब्रेकिंग न्यूज म्हणून सारखं सारखं बोंबलत नाही बसलं तरी लोकांची उत्सुकता टिकवता येते हे ही व्यावसायिक मीडियाने त्यांच्याकडून शिकायला हवं.

बाकी समस्त मीडियाला एकच विनंती-" आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाता तर तेवढा दर्जा नक्कीच दाखवा."

आणि सुधारणार नसालच तर घेतंय मी दुसरो भाग लिवुक!

0