अर्थ -- स्वातंत्र्याचा

About Independence


शिर्षक -- अर्थ  -- स्वातंत्र्याचा
विषय --व्याख्या स्वातंत्र्याची
कॅटेगरी-- गोष्ट छोटी डोंगराएवढी


"सान्वी,सोहम लवकर झोपा बरं.
लवकर झोपले की सकाळी लवकर जाग येईल.
उद्या 15 ऑगस्ट आहे,लक्षात आहे ना ?
झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला जायचे आहे ना ? "

आजी आपल्या नातवांना म्हणाली.

"आजी, तू उठवं हं लवकर आम्हांला."
5 वर्षाची सान्वी आजीला म्हणाली.

"हो,नक्की उठवेल हं ." -- आजी

"आजोबा, 15 ऑगस्ट,1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून आपण या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतो.
पण स्वातंत्र्य म्हणजे काय,आजोबा? "
10 वर्षाच्या सोहमने आजोबांना विचारले.

" स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला मुक्तपणे अभिव्यक्त करणे." -- आजोबा

"म्हणजे काय ? आम्हांला समजेल अशा सोप्या भाषेत सांगा ना ." -- सोहम

"अरे, तुमच्या भाषेत सांगायचे तर आपल्या मनाप्रमाणे वागणे,आपल्यावर कोणाचेही बंधन नाही,आपल्याला आनंद वाटेल तसे करणे म्हणजे स्वातंत्र्य. " -- आजोबा


"आजोबा, मगं आम्ही कुठे स्वतंत्र आहोत? आम्हांला तर तुम्ही, आजी,आई,बाबा रागवत असतात. हे करू नका,ते करू नका. हे असेचं करा,ते तसेचं करा...अशा सारख्या सूचना देत राहतात. कुठे एकटे जाऊ देत नाही. आम्हांला आमच्या मर्जीप्रमाणे वागू देत नाही. म्हणजे आम्ही स्वतंत्रच नाही ना ? "--- सोहम

"हो, ना.. रे ..दादा , बघं ना सर्व आपल्याला रागवत असतात. काही आवडीचे खाऊ पण देत नाही. आईस्क्रीम,चॉकलेट्स मला किती आवडते ! पण त्रास होईल असे सांगून खाऊ देत नाही. "--सान्वी

" बाळांनो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी मनासारख्या करता येतात असे नाही. आपले वागणे चुकीचे असेल आणि त्यामुळे आपल्या स्वतःला किंवा इतरांना, समाजाला,देशाला नुकसान होत असेल तर? म्हणून काही गोष्टींचे नियम,कायदे केलेले असतात ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो पण काही गोष्टींचे पालन करूनचं..
तुम्ही अजून लहान आहात. त्यामुळे मी जे काही सांगतो आहे ,ते आता समजणार नाही पण मोठे झाल्यावर आपोआप समजेल."-- आजोबा

" सान्वी, सोहम , तुम्ही अजून लहान आहात. त्यामुळे तुम्हांला अजून काय चांगले आणि काय वाईट? यातले काही कळत नाही. त्यासाठीच काळजीपोटी आईबाबा आणि आम्ही तुम्हांला काही गोष्टी समजवत असतो,सांगत असतो.ते तुमच्या भल्यासाठीच असते ना ? आमचे म्हणणे,रागावणे तुम्हांला आवडत नसले तरी त्यात तुमचा फायदाच असतो.फक्त तो तुम्हांला जाणवत नाही." --- आजीही आजोबांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या.

" आजी,आजोबा, मला तर वाटते..मी लवकर मोठे व्हावे. आता लहान असल्यामुळे स्वतः च्या मनाप्रमाणे काहीचं करू शकत नाही. तुम्ही मोठे सांगतात तसेच करावे लागते,तसेच वागावे
लागते.मी मोठा झाला की,माझ्या मनाप्रमाणे
वागेन.म्हणजे मी स्वतंत्र होणार.. -- सोहम ने आपली इच्छा व्यक्त केली.

"हो,लवकर मोठा हो बाळा. पण आताचे हे लहाणपण मस्त एन्जॉय करं. नाहीतर मोठे झाल्यानंतर पुन्हा म्हणशील...\"मी लहान होतो तेचं बरे होते ते..\" -- आजोबा हसत हसत सोहमला म्हणाले.

"आजोबा, भारतावर इंग्रजांचे राज्य होते. भारत पारतंत्र्यात होता. म्हणजे काय? " सोहमने विचारले.

"भारतात इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि पुढे राज्यकर्तेच झाले. त्यांनी आपल्या भारत देशाला गुलाम बनविले. भारतातील संपत्ती, पैसा त्यांच्या देशात वाहून नेला.देशाचा सर्व कारभार इंग्रज चालवित होते. सर्व अधिकार त्यांच्याकडे होते. देश आपला असून देखील देशातील लोकांना स्वतः च्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार नव्हता.
देशाला इंग्रजी सत्तेपासून मुक्त करण्यासाठी भारताला 175 वर्षे लागली. एवढ्या वर्षांत भारताचे सर्व प्रकारे नुकसान झाले. स्वातंत्र्यलढ्यात भारताने आपले अनेक सुपुत्र गमविले.
खूप वर्षांनी आणि अनेक संघर्षातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून दरवर्षी साजरा होतो." --- आजोबा

" भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक भारतीय आनंदी झाला असेल ना ." -- सोहम

" देशाला स्वातंत्र्य हवे होते म्हणजेच, आपल्या देशाचा कारभार आपल्या देशातील लोकांनीच करावा आणि तो ही न्यायाने. देशातील प्रत्येक जण सुखी व्हावा. हाच स्वातंत्र्य मिळविण्यामागचा उद्देश होता.
देशातील प्रत्येक व्यक्तीला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचा आनंद निश्चितच झाला. "-- आजोबा

"भारताला फक्त इंग्रज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पण भारतात अनेक समस्या होत्याच. गरिबी, अस्पृश्यता, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी,परंपरा ,धर्म, जात,पंथ याबाबतीत मतभिन्नता अशा अनेक गोष्टी तेव्हाही होत्या आणि आजपर्यंत ही आहेत.
त्यामुळे नुसते स्वातंत्र्य मिळाले म्हणजे सर्व काही नसते ,तर .. त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगणे होय.

आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. पण आजही देशातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र नाही. गरीब हा श्रीमंताचा गुलाम, स्त्रीवर्गावर पुरुषांकडून होणारा अन्याय,सत्ता, पैसा ,पद या गोष्टींच्या अभावामुळे अनेक गरीब,लाचार,मजबूर लोकांना आणि स्त्रीवर्गालाही आपले स्वातंत्र्य उपभोगता येत नाही.
संपूर्ण देश जरी स्वतंत्र असला तरी देशातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. असे म्हणता येणार नाही. "-- आजीही बोलू लागल्या.

" हो,ना आई,खरं आहे तुमचे." असे बोलून प्राजंलीही( सोहम,सान्वी ची आई) गप्पांमध्ये सामील झाली.

" भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर , देशाचा कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी तसेच देशातील प्रत्येक नागरिक सुखी व्हावा यासाठी प्रत्येकाला अनेक गोष्टींचे स्वातंत्र्य दिले गेले. पण त्याबरोबर काही कर्तव्य ही दिले गेले.
पण लोक फक्त मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतात आणि आपली कर्तव्ये मात्र विसरून जातात. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये असतात. ती पार पाडायला हवी . जसे - वेळेवर कर भरणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे पालन करणे. राष्ट्रीय संपत्तीचा काळजीपूर्वक वापर करणे.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्याद्वारे देशातील प्रत्येक व्यक्ती छोट्या दिसणाऱ्या गोष्टींतून सुद्धा आपल्या देशासाठी काहीतरी चांगले करू शकतो. जेणेकरून देशाची सर्वबाजूने प्रगती होईल .देश बलशाली झाला म्हणजे पुन्हा देशावर कोणतीही परकीय सत्ता राज्य करणार नाही. "-- प्राजंली

"हे सर्व अगदी बरोबर आहे, पण आम्ही पुरुष ही अजून स्वतंत्र नाही बरं का ...आम्हांला कोणताही निर्णय आपल्या बायकोला विचारूनचं घ्यावा लागतो..." -- समीर (प्राजंलीचा नवरा) गंमतीने बोलला.
त्याच्या बोलण्यावर सर्वजण हसले.

" हो, मी पण तुझ्या आईला विचारून निर्णय घेतो अजूनही..." बाबा हसत हसत समीरला म्हणाले.


" लहानांना वाटते आम्ही स्वतंत्र नाही, स्त्रियांना वाटते आम्हांला कोणत्याच गोष्टीचे स्वातंत्र्य नाही आणि पुरुषांना वाटते \"स्वातंत्र्य फक्त आम्हांलाच हवे\".
स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे स्वतः च्या मनाप्रमाणे वागणे असे का ? पण.. आपले वागणे हे कायदे,नियम यांच्या विरोधी असेल , इतरांचे नुकसान होत असेल तर ते योग्य नाही. म्हणून प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री असो की पुरुष कोणीही. त्यांनी आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग घ्यावा. पण एका विशिष्ट मर्यादेत राहून. संस्कार, संस्कृती, चांगले नियम ,कायदे हे सर्व सांभाळूनचं. असे प्रत्येकाने वागले तरच देशातील प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याचा आनंद घेता येईल. तरचं खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा केल्यासारखे होईल."-- आजोबा


" आपल्या गप्पांत मुले कधी झोपली कळलेचं नाही.." -- आजी

"आई,बाबा आपल्या मुलांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ व्यवस्थित समजावून सांगितला पाहिजे म्हणजे त्यांना ही नीट कळते. ही लहान मुलेच देशाचे भावी आधारस्तंभ असतात."-- समीर

"चला,झोपू या सगळे. बराच वेळ झाला गप्पांमध्ये." --- आजी सर्वांना सांगून झोपायला गेल्या.



सकाळी सर्वजण लवकर उठून झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला गेले आणि अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या आनंदात सहभागी झाले.