मी तुला माझ्यात जपणार आहे 7

स्त्री की पुरुष ... पेक्षा माणूस म्हणून माणुसकीला जगायला शिका.

मी तुला माझ्यात जपणार आहे

भाग 7

"श्री, दूध पिऊन घे." आई श्रीच्या टेबलवर दुधाचा ग्लास ठेवत म्हणाली, पण त्याचे तिच्याकडे काहीच लक्ष नव्हते.

"श्री, अरे कुठे हरवला?एवढे काय लिहितोय?"  

"हं?मीराला पत्र लिहितोय." 

"बरं, दूध पिऊन घे, नाहीतर रात्रीची भूक लागणार नाही." 

"हो." 

पण खरतर गेल्या एक दिड वर्षापासून त्याचं मीरा सोबत बोलणं सुद्धा कमी झाले होते. 

थोड्या वेळाने…

"आई, मित्राकडे जातोय, उशिराने येईल." आवाज देत तो बाहेर पडला सुद्धा. 

"अरे दुधाचा ग्लास?" आई आवाज देत होतीच की तो बाहेर पडला होता. ती त्याच्या खोलीत ग्लास घ्यायला गेली, तर टेबलवर दुधाचा ग्लास जसाच्या तसा होता.

"हा मुलगा पण ना…जे सांगितले कधी ते ऐकणार नाही."म्हणत ती ग्लास घ्यायला गेली तर तिथे ग्लास खाली तिला एक कागद घडी करून ठेवलेला आढळला. तिने तो उचलला आणि वाचायला लागली. 

मी स्वेच्छेने घर सोडून जात आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका.                                      -श्री.      ते वाचून तिच्या हृदयात धडकी भरली, पायाखालची जमीन सरकली, डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली होती. 

    श्रीमध्ये होणारे बदल आता घरात सगळ्यांना कळले होते. त्याचे वागणे त्याच्या बाबांना, आजीला, आणि मग आईला सुद्धा आवडत नव्हते, कोणीच ते स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळे श्रीची खूप घुसमट व्हायला लागली होती. ती लोकं त्याच्यावर खूप दबाव आणत होते, धाक दाखवत, आणि आजपर्यंत श्रीच्या पाठीवर त्यामुळे कितीतरी बेल्ट तुटले होते. श्री आणि त्यांच्या पालकांमध्ये आता एक मोठी पोकळी निर्माण व्हायला लागली होती. वयात आलेल्या मुलांचा मित्र बनावे लागते, त्यांच्यावर जबरदस्ती आपले मत न लादता त्यांचा दृष्टिकोन पण समजून घ्यावा लागतो हेच ते पालक विसरले होते. त्यामुळे तो सुद्धा त्यांच्यापासून दुरावत चालला होता.

        आई वारंवार ते पत्र वाचत होती, तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. विक्रमला सांगायला गेली, पण विक्रम अजून कामावरून आला नव्हता. खाली आजी होती, पण त्यांना सांगून अजून प्रकरण वाढेल याची तिला भीती वाटली, परत विक्रम पण त्याला काय जीवघेणी शिक्षा देईल, विचार करूनच तिच्या अंगावर काटा आला होता. 

"आताच बाहेर पडला आहे, जास्त दूर गेला नसेल.." विचार करत तिने आपली पर्स उचलली, पायात चप्पल सरकवली आणि चुपचाप घराबाहेर पडली. आजूबाजूला, त्याच्या मित्रांच्या घरी सगळीकडे ती पागलासारखी त्याचा शोध घेत होती.      संध्याकाळ ओसरत आली होती, पण श्री कुठेच सापडत नव्हता. त्याने आपल्या जीवाचे काही बरे वाईट तर नसेल केले? या विचाराने तिच्या हृदयात धडकी भरत होती. आता तिचे पाय सुद्धा लटपटायला लागले होते, डोळे कोरडे पडायला लागले होते..आता घरी जाऊन सगळं सांगून पोलिसांची मदत घेऊ या विचाराने ती माघारी फिरली की तिला काही आठवले आणि ती त्या दिशेने जायला लागली. आणि शेवटी तिचा शोध इथे येऊन थांबला होता. 

       श्री अविचाराने घरातून बाहेर पडला तर होता, पण त्याने सोबत काहीच घेतले नव्हते, की त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. कुठेतरी जावे म्हणून बस स्थानकावर आला, पण तिकीटसाठी पैसे नाही, तर त्याला बस मधून खाली उतरवले होते. काय करावे विचार करत तो बराच वेळ फिरत होता, पण काहीच कळत नव्हते, शेवटी तो तिथे येऊन बसला होता. हो मीरा आणि त्याची आवडती जागा, त्यांचा आवडता बगीचा, जिथे लहानपणापासून ते खेळत होते..तिथेच एका कोपऱ्यात असलेल्या बेंचवर तो अश्रू ढाळत बसला होता.

"मीरा गं! का इतकी दूर गेलीस? काहीच ठीक वाटत नाहीये, सगळंच असह्य होत आहे. मी मरणार तर अजिबात नाही, मी भेकड नाहीये, पण मी तिथे त्यांच्यासोबत हे असे दुहेरी, खोटे आयुष्य नाही जगू शकत आहे. मी जसा आहो तसे मला कोणी का स्वीकारत नाहीये? मला खुलून जगायचं आहे, असे लपून नाही जगायचं.. काय करू काहीच कळत नाहीये? तू इतकी दूर, तुला काहीच सांगू पण नाही शकत. देवा तू तरी काही मार्ग दाखव?" श्री विचार करत बसला होताच की त्याच्या गालावर कानाखाली थाडकण आवाज झाला. 

"आई?" तो आपल्या गालाला हात लावत उठून उभा राहिला.

"मेली तुझी आई?" म्हणत तिने सटासट त्याच्या गालांवर अजून तीन चार जोरदार झापडा मारल्या. त्याचा गाल, कान अक्षरशः लाल पडले होते, तिचे बोट त्याच्या गालांवर उमटून आली होती. 

"आई.."

"एक शब्द नाही, चुपचाप घरी चल." ती रागाने म्हणाली. 

"मी घर सोडले आहे. ते माझं घर नाही. मी तिथे येणार नाही." 

"हो? मग कुठेय तुझे घर?" 

"माहिती नाही, पण ते माझं घर नाहीये." 

"मग कुठे जाणार आहेस?" 

"करेल काहीतरी सोय." 

"अच्छा? नाही झाली तर?" 

"होईलच काहीतरी." 

"पण तरीही नाही झाली तर? दोन दिवस उपाशी राहशील, अक्कल ठिकाणावर येईल, तेव्हा परतशिलच ना? पण मग तेव्हा तुझा बाप तुला घरात तर घेणार नाहीच, पण त्यांची अब्रू विकायला निघाला बघून तुला जिवंत खाईल…"

"नको काळजी करू, मी नाही येणार तुमच्या घरी." 

"हो ना, मग कुठे जाणार तेच तर विचारत आहे?" 

"नाहीच कोणी माझा स्वीकार केला, नाहीच काही मिळाले तर मी त्या…त्यांच्याकडे जाईल. आणि ते लोकं कधीच एकटे सोडत नाही, माझा पण स्वीकार करतीलच." 

"ते म्हणजे कोण? तृतीयपंथी?" 

"हो, तेच." 

      असे बोलताच आईने त्याचा हात पकडला आणि त्याला ओढत नेऊ लागली. 

"आई, मला कुठे घेऊन चालली आहेस?" 

"तुला जायचं ना तिकडे? मग मीच पोहचवून देते." म्हणत आईने त्याला तिथे असलेल्या किन्नर लोकांच्या वस्तीजवळ आणले. ती पूर्ण गरीब लोकांची वस्ती होती, आणि बाजूला किन्नर लोकांची वस्ती होती. 

"तू जो एवढा माज करतोय ना, माझं मी बघून घेईल, ते माझं घर नाही..अजून काय काय बडबड करत होता. बघ ती मुलं, त्यांच्या डोक्यावर बापाचं छत्र नाहीये."आई समोर बोट करत त्याला काही दाखवत सांगत होती. 

         एक लहान जवळपास बारा वर्षाचा मुलगा, अंगात फाटकी बनियान त्यातून त्याचे हाडके अंग दिसत होते,जणूकाही कधीच पोटभर जेवला नसावा, एका मोठ्या व्यक्तीचा बूट स्वच्छ,पॉलिश करत होता. त्या व्यक्तीने एक नाणं, त्याच्या हातात न देता त्याच्या अंगावर फेकाल्यासारखे केले. त्या कामाचे ते कमी पैसे होते. त्या लहान मुलाने जास्त मागितले. त्या व्यक्तीने त्याला पायाने ढकलले आणि पुढे चालला गेला. 

"त्याचा बाप त्याच्या सोबत असता तर कोणाची तरी हिम्मत झाली असती त्याला असे पायाने लाथडायची? तुझ्यावर आजपर्यंत बाहेरच्या कोणी व्यक्तीने आवाज तरी उठवला आहे काय?कोणामुळे आहे हे?" 

"ती मुलगी, फक्त नऊ दहा वर्षाची आहे. बघ तिच्या आजूबाजूच्या लोकांच्या किती घाण नजरा तिच्यावर आहेत. कष्टाने कमावत आहे, पण ही लोकं तिला सुखाने जगू देणार नाही." एक लहान मुलगी एका टपरीवर भांडे घासायचे काम करत होती, ते दाखवत आई म्हणाली. 

"ते बघ तिकडे ते बालक, बहीण भाऊ, त्यांना राहायला घर नाही, इथे रस्त्यावरच झोपतात. एकतर कोणी वाईट लोकं यांचा काही फायदा उचलणार, नाहीतर पोलीस वगैरे कोणी त्यांना मारमार मारून इथून हाकलून लावणार. या सर्वांचे वर्तमान, भविष्य काहीच सुरक्षित नाही." आई बोलतच होती की तिथे काही गोंधळ ऐकू यायला लागला. तसे त्या दोघांचे लक्ष तिकडे गेले.  

"ए चल फूट, थोडासा अच्छेसे बात क्या किया, तू तो अपनी औकात दिखाने लगी." एक व्यक्ती एका किन्नरवर ओरडत होता. 

"अरे भाई…" ती किन्नर. 

"कौन भाई? किसका भाई? कौन है बे तू, भाई की बेहन? नही ना कूछ? अपनी औकात मे रेह. तेरा काम है दिनमे ताली बजाना, ओर रातमे किसिका बिस्तर गरम करना, बाकी कोई रिश्तेके लिये नही बनी हैं तू!" ती व्यक्ती.

"सून तो…" ती किन्नर त्या व्यक्तीजवळ जात मायेने बोलत होता. 

"एsss अपने गंदे हात मत लगा, चल हट." म्हणत त्याने तिला अक्षरशः धक्का दिला आणि ती खाली पडली. तो निघून गेला. 

"कायकु ऐसी करती रेहती तू? सब धंदा चौपट करायेगी.. कितनी बार समझाया तेरको, ये घर वार, प्यार, रिस्पेक्ट अपने लोगोके लिये नही हैं. ये लोग इतने जलील करके जाते, फिरभी तेरे भेजेमे अक्कल नही आती?" एक किन्नर तिथे येत तिला उचलत म्हणले. 

"अब एक बात गाठ बांध रख, ये जिंदगी अपने को सुखसे जिनेके लिये नही हैं, ये जिंदगी अपनेको काटनी है, ओर भगवानके घर सिधारना हैं. बस भगवान, अब कोई जनम मत देना.. थक गये"." दुसरी किन्नर म्हणाली.

"लल्ली मासी की लात पडेगी, सब समझ जायेगी. नही समझी तो इसे यहासे हकाल देंगे, फिर तो छतभी ना मिलेगा सर ढकणे" 

दोघी तिला समजावत त्यांच्या घरात जात होत्या. 

"खूप नशीबवान आहेस तू, की तुझ्या डोक्यावर मायबापाचं छत्र आहे. जा विचार त्या सगळ्यांना, त्यांच्या जगण्यातल्या वेदना.. आणि जेव्हा तुला ते कळेल ना, तेव्हा समजेल तुझं आयुष्य किती सोपी आहे." 

तिथे कितीतरी अशी अनाथ बालकं होती. कोणी भिक मागत तर कोणाला काम करून सुद्धा अपमान मिळत होता. मार पडत होता.तिथले ते वातावरण, दोन वेळचे जेवण नाही की झोपायला जागा नाही, सगळं श्रीच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. 

"आई, मी काय करू सांग ना? मला हे जबरदस्तीचे आयुष्य नाही जगता येत आहे." 

"मी स्त्री आहे की पुरुष आज? हे जाणून घेण्याचा हट्ट सोड.. स्त्री किंवा पुरुष या आधी तू माणूस आहे, हे घे लक्षात. बघ, त्यांच्याकडे ते सगळं नाही, जे तुझ्याकडे आहे… तू हुशार आहेस, जरी तू स्वतःसाठी काही नाही, पण यांच्यासाठी काहीतरी नक्कीच करू शकतो. त्या दिवशी दवाखान्यात त्या लोकांना ट्रीटमेंट देत नाहीये बघून त्रास झाला होता ना? भांडला होता ना तिथल्या नर्स, डॉक्टर सोबत.. असं भांडून तू मदत करणार आहेस काय? बन मग डॉक्टर, कर त्यांची मदत." आई.

         श्रीच्या डोळ्यांपुढे काही दिवसांआधीचा तो दवाखान्यातला प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला होता. आईला बरे नाही म्हणून तो आईला घेऊन दवाखान्यात गेला होता. तिथे त्यांचा नंबर येण्याची वाट बघत होते, की तिथे दोन किन्नर आले होते. त्यातल्या एकीची तब्येत खूप खराब होती. दुसरी किन्नर डॉक्टर, नर्सच्या हातपाया पडत तिच्या त्या दिदीची ट्रीटमेंट करा म्हणून खूप विनंती करत होती. पण कोणीच त्यांना मदत करत नव्हते. 

"सिस्टर, दीदीको बहुत बुखार है, दवाई तो दे दो.." ती छोटी किन्नर कळकळीने विनंती करत होती. 

"एक बार नही बोला तो समझ नही आता?" नर्स.

"मॅडम, वो मर जायेगी. भगवानके लिये सिर्फ दवाई का नाम तो बता दो." 

"गंदी नालीके किडे, तुम्हे हात लगायेंगे तो हम बिमार होजयेंगे.." चलो निकलो इधरसे.

"ओ मॅडम, गंदी नालीके कोणाला म्हणत आहात? तुम्हाला ज्या देवाने जन्म दिला आहे, त्याच देवाने यांना बनवले आहे. एवढे अहंकारी बनू नये माणसाने की त्याचीच परतफेड तुम्हाला करावी लागेल…तुम्हाला औषध देण्यायोग्य बनवले आहे ना, मग आपले कर्तव्य करा. त्याचं लिंग काय आहे बघण्यापेक्षा तो माणूस आहे एवढे पुरेसे नाही का?" तिथे त्या किन्नर लोकांचा अपमान होतांना बघून श्री मध्ये बोलला. 

"तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये घ्याल तर आम्हाला इथे परत यायला जमणार नाही. यांना इथे घुसुच कसे दिले?" तिथे बसलेले इतर पेशंट आता आवाज वाढवू लागले होते. 

         शेवटी तिला तिथे ट्रीटमेंट दिली तर हॉस्पिटलचे रेपुटेशन खराब होईल, सांगितले गेले. वरतून त्यांचा खूप घाण शब्दात अपमान करून त्यांना अगदी कुत्र्यासारखे हॉस्पिटल बाहेर हाकलून लावले होते. 

       आईला घेऊन तो बाहेर पडला, तर पुढे थोड्या अंतरावर गर्दी होती. त्याने जाऊन बघितले तर त्या बिमार किन्नरचा मृत्यू झाला होता. पोलिस लोकं, बाकी लोकं अगदी त्यांना एखाद्या जनावराप्रमाणे वागवत होते. ते बघून त्याचा जीव खूप कळवला होता. माणुसकी पूर्णपणे मेलिये, त्याचा विश्वास बसला होता. ते सगळं आठवून त्याचा परत डोळ्यात अश्रू आले होते. 

"माणुसकीसाठी, समाजासाठी जग..आयुष्याचे एक लक्ष ठरव…मग जगताना इतका त्रास होणार नाही." आई.

    आपले डोळे पुसत त्याने स्वतःशीच काही निर्धार केला. 

"आणि एक लक्षात ठेव, जोंपर्यंत तुझी ओळख तुझ्या बापच्या नावाने होत आहे, तोपर्यंत त्यांचं नाव खराब होईल असे काहीही वागण्याचा तुला अधिकार नाही. ज्या दिवशी तुझी स्वतःची ओळख निर्माण करशील, तू काहीही करायला मुक्त…अगदी मरण्यासाठी सुद्धा.. पण तोपर्यंत कोणालाही तुझ्याबद्दल काहीच सांगायचं नाही, अगदी मीराला सुद्धा काही माहिती व्हायला नको. खा माझ्या डोक्याची शप्पथ.." आई.

त्याने होकारार्थी मान हलवली, आणि ते दोघे घरी निघून आले.        श्री खूप मन लावून अभ्यास करू लागला. आणि यावेळ अगदी परत तो बारावीमध्ये राज्यातून पंधरावा आला होता. त्याला एका मोठ्या प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली होती. तो कॉलेजमध्ये सुद्धा खूप मन लावून अभ्यास करत होता. बाकी तो मित्रमैत्रिणीमध्ये फारसा रमत नव्हता. एका वर्षातच त्याच्या हुशारीचे चर्चे कॉलेजभर होऊ लागले. टेनिस तो खूप चांगला खेळत, त्यात तो पुरस्कार मिळवू लागला होता. 

          पण कुठेतरी त्याच्या भावना त्याच्या मनातच दडून बसत. कधी कधी त्याला असह्य वाटत. मग त्याने लेखणीचा आधार घेतला..आणि मनातल्या भावना कागदावर उतरवू लागला. तो स्वतःच्याच विश्वात मुक्त संचार करू लागला..भावना मोकळ्या करू लागला. 

******

     एक दिवस कॉलेज मधून परत येताना काही मुलं एका मुलीची छेड काढत होते, अश्लील हातवारे करत तिला त्रास देत होते. तिथे गर्दी जमली होती, पण सगळे फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. श्रीला सुरू असलेले ते कृत्य आवडले नाही, आणि तो त्या मुलीच्या मदतीला गेला, पण त्या मुलांनी श्रीला च खूप मारले, त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली होती, कसाबसा उभा राहत तो तिथे जमलेल्या लोकांकडे मदतीच्या अपेक्षेने बघत होता, पण कोणीच पुढे येत नव्हते. त्या गुंड प्रवृत्त्तीच्या मुलांमधील एक मुलगा श्रीवर हात उचलणार, तोच कोणीतरी त्याचा हात धरुन त्याला चांगलाच जोरदार धक्का दिला. 


******

क्रमशः      
🎭 Series Post

View all