मी तुला माझ्यात जपणार आहे 6

सुखद उज्वल भविष्यासाठी बालपण पण तसेच सकारात्मक हवे....

मी तुला माझ्यात जपणार आहे 

भाग 6

"अहो काका, त्यात लपवण्यासारख काय आहे? अहो ती नैसर्गिक गोष्ट आहे, एवढे लाजिरवाणे होण्याची गरज नाही." 

" ही काय खुल्लमखुल्ला मेडल मिळाल्यासारखी मिरवण्याची वस्तू नाहीये. वीस रुपये झाले." मेडीकलवाला पेपरमध्ये गुंडाळलेले पॅक समोर ठेवत म्हणाला. 

        श्रीला त्याला उत्तर द्यावेसे तर वाटले होते, पण घरी मीराला आपली गरज जास्त आहे हे ओळखून त्याने काउंटरवर वीस रुपये ठेवले आणि पॅक लगेच घरी परतला. 

         श्री लगेच किचनमध्ये गेला,गॅस ऑन करत एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम केले.

"मीरा,तुझे कपडे कुठे आहेत?" 

मीराने इशाऱ्यानेच कपडे कुठे आहे ते दाखवले. श्री तिथून टॉवेल आणि तिचे कपडे घेऊन आला. 

"गरम पाणी काढून दिलेय,आंघोळ करून घे." तिच्या हातात कपडे देत म्हणाला. 

"पण हे?ही जागा आणि माझे कपडे पण खराब झालेय." 

"ते मी बघतो,आणि तुझे कपडे सर्फमध्ये भिजवून ठेऊन दे." 

"श्री,आंघोळ केली की परत असे नाही ना होणार?" 

"हा,थांब!"त्याने पॅडचे पॅक ओपन केले. 

"हे तर ते टीव्हीमध्ये दाखवतात." 

"हो.हे बघ आंघोळ झाली की निकरला हे असे चिपकवायचे, आणि मग घालायचं."त्याने तिला ते पॅड कसे वापरायचे ते नीट समजावून सांगितले. 

"पण का?"

"सगळं सांगतो,आधी आंघोळ आणि कपडे बदलून ये." 

      ती चुपचाप बाथरूममध्ये निघून गेली.श्रीने सगळी फरशी स्वच्छ पुसून काढली.मीरा सुद्धा श्रीने सांगितल्याप्रमाणे सगळं करून आली. 

"बरं वाटतेय?" 

"हो,पण हे इथे कसेतरी होतंय.पाठ दुखत आहे. पायात पण गोळे आले आहे.सगळच दुखत आहे." 

"तू इथे झोप,मी गरम पाण्याची पिशवी आणि बाम आणतो." 

श्रीने तिच्या पायाखाली उशीचा लोड देत तिला नीट झोपवले आणि पिशवी बाम घेऊन आला. 

"हे घे,जिथे जिथे दुखते तिथे तिथे शेक याने." तिच्या हातात गरम पाण्याची पिशवी देत स्वतः तिच्या पायाजवळ येऊन बसला आणि तिच्या पायाला बाम लावत दाबून देत होता. 

"मीरा,आता तू मोठी झाली." 

"ते तर मी झालीच, आता आठवित आहे, माझी उंची पण बघ तुझ्यापेक्षा थोडीच कमी आहे." 

"तसे नाही.आता तुझे तारुण्यात पदार्पण झाले आहे.हे जे झाले आहे ना,याला menstruation period म्हणजेच पाळी येणे असे म्हणतात." 

"हे आमच्या सायन्सच्या बुकमध्ये होते. 

"तुला तर मग सगळं माहिती आहे.मग अशी वेंधळ्यासारखी का रडत होती?" 

"आमच्या टीचरने ते शिकवलेच नाही. पटापट रीड केले." 

श्रीने ते ऐकून डोक्यावर हात मारला. 

"ठीके. ऐक,हे असे आता प्रत्येक महिन्याला याच दिवसांमध्ये होईल.आणि हे ४,५ दिवस ते७,८ दिवस पण होऊ शकते." 

"काय?नाही नाही, हे खूप घाण आहे.मी आईसोबत डॉक्टरकडे जाऊन औषध घेईल, तर ठीक होईल. मला हे नॅपकिन नाही आवडले, शी आहेत." 

"हे सगळ्यांना होत असते." 

"तुला पण होते असे?" 

"मला नाही,म्हणजे हे असे फक्त मुलींना, स्त्रियांना होत असते." 

"तुला का नाही होत?तू पण तर आता मोठा झाला. तू घेऊन घे ना हे, मी माझा अभ्यास करेल, पण तू हे घेऊन घे."

"I wish! तुला माहिती मीरा, हे तुम्हा मुलींना मिळालेले वरदान आहे, फक्त तुमच्याकडेच नवनिर्माण करण्याची शक्ती आहे. म्हणून तर तुम्ही खूप प्रिशिअस आहात." बोलतांना श्रीच्या डोळ्यांत एक वेगळीच स्वप्नवत चमक होती. 

"काहीही, हे किती घाण आहे, Yuck! अन् प्रिशिअस म्हणे." 

"Shsssss!घाण नाही म्हणायचं,अगदी नैसर्गिक आहे हे. तुम्हा मुलींच्या शरीरात आता हार्मोन्समध्ये बदल व्ह्यायला लागतो,नवीन ऑर्गंस तयार होतात." 

"म्हणजे?"

"अम्मम कसं सांगू?"तो विचार करत होता.

 "हं, खूप सिंपल आहे ते,जसे आपल्या शरीरात अनावश्यक घटक शी सूच्या माध्यमातून आपल्या शरीरातून बाहेर पडतात,तसे हे पण असते.आता बघ ना,आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होत असतं,आणि काही खराब झालेले रक्त जमा होत असतं.मग त्या खराब रक्ताची शरीराला गरज नसते आणि म्हणून ते अनावश्यक रक्त बाहेर पडतं. बस इतकं ते सोपं आहे."

तो सांगत होता पण तिच्या चेहऱ्यावर मात्र त्रासिक भावच होते. 

"हळूहळू तुला सवय होईल आणि त्याचं महत्व पण कळेल.तुला माहिती,आता तुझ्यात शारीरिक बरेच बदल व्हायला लागतील आणि तू आणखी जास्त सुंदर दिसेल."

"सुंदर तर मी आहेच आणि स्ट्राँग सुद्धा आहे." 

एवढया पोटदुखीमध्ये सुद्धा तिने स्वतःचं कौतुक करणे सोडले नाही बघून त्याला हसू आले.

"हो,आहेच तू सुंदर.पण आता याला कटकट न मानता, हा जो बदल आहे तो आनंदाने स्वीकार करायचा,मग त्रास होणार नाही." 

"ठीके,तू म्हणतोस तर ऐकतेय.पण तुला एवढे कसे माहिती?" 

"तुला तर माहीतिये मला मेडिकल विषयाबद्दल जाणून घ्यायला आवडते. लायब्ररीमध्ये बुक्स वाचत असतो, म्हणून कळले." 

"आणि हो परत एक गोष्ट,आता तुझ्यावर तुला स्वतःला सांभाळण्याची जबाबदारी जास्त वाढली आहे. आता तुला खूप सांभाळून राहायला हवे, आपल्या जवळ कोणाला येऊ द्यायचे नाही, आणि ना ही कोणाला आपल्याला शरीराला कुठेच स्पर्श करू द्यायचा,तो व्यक्ती मग कितीही आपल्या जवळचा का ना असेल."

"तुला पण नाही?" 

"हो." 

"श्री,आताच्या आता घरी ये." पलीकडून आईचा आवाज आला. 

"हो,आलोच!"त्याने प्रत्युत्तर दिले. 

"तू तर एक मच्छर मारत नाहीस,मला काय त्रास देणार.." म्हणत मीरा खीखी करत हसायला लागली. ते बघून त्याला पण हसू आले. 

"बरं येतो,आराम कर."म्हणत तो घरी गेला. 

     घरात पाय ठेवल्या बरोबर त्याला तणावपूर्ण वातावरण जाणवले. गेल्या काही वर्षात त्याने खूप मार खाल्ला होता, त्यामुळे आता तो वडिलांच्या डोळ्यांवरूनच समजून जात होता. तो भीत भीतच आतमध्ये गेला. जसा तो आतमध्ये गेला, त्याच्या पाठीवर चांबड्याच्या पट्ट्याने सणसणीत वार झाला. 

"घेशील परत बायकांच्या वस्तू?जाशील परत स्त्रियांच्या दुकानात?" म्हणत दुसरा फटका त्याच्या पाठीवर पडला. 

"आज किचनमध्ये सुद्धा पोळ्या करत होता. तरी या वृषाली म्हणाले होते,त्या अलका कुबलचे चित्रपट, त्या मालिका बघू नको,पण सासू काय कायम वाईटच."आजीने मध्येच आपली री ओढली. 

"अहो पण…"वृषाली बोलतच होती की विक्रम ओरडला,"तू गप्प बस, तूच लाडावले आहेस जास्त.त्या टकल्यांनी सांगितले म्हणून कळले तरी हा मेडिकलमध्ये गेला होता. आमच्या अब्रूचे धिंडवडे काढा तुम्ही?वर्षानुवर्षे कमावलेली इज्जत अशी मी मातीती मिळू देणार नाही." 

     पण श्रीच्या चेहऱ्यावर मारल्याचे काहीच वेदना उमटल्या नव्हत्या.ते बघून विक्रमचा आणखीच संताप झाला."टीशर्ट काढ ती." 

श्रीने चुपचाप अंगातले कपडे काढले. 

"कधी काय तर बांगड्यांचा दुकानात,कधी किचन,आज तर चक्क हद्द पार केली,ते पॅड घ्यायला गेला?"श्रीच्या उघड्या पाठीवर चांबड्याच्या पट्ट्याने विक्रम त्याला अगदी जनावरासारखा मारत सुटला होता. 

        श्रीच्या मात्र डोळ्यात एक थेंब पाणी नव्हते,की एक आह सुद्धा नव्हती की तो जागेवरून थोडासा हलला सुद्धा नव्हता.

      श्री खाली जमिनीकडे बघत होता,आणि विक्रम मारत होता. शेवटी त्या निर्जीव बेल्टलाच त्या सजीव बालकाची दया आली असावी,तो बेल्ट तुटून खाली पडला.तसे विक्रमने हातातला बेल्ट बाजूला फेकून दिला. 

"परत असे काही करतांना दिसला तर पाय तोडून हातात देईल,घराच्या बाहेर जाण्याच्या योग्यतेचा राहणार नाहीस.चल जा आता इथून." विक्रम ओरडला. 

          श्री कोणाकडेही न बघता,एक शब्दही न बोलता वरती त्याच्या खोलीत निघून आला.आई मलमची ट्यूब घेऊन त्याच्या पाठोपाठ आली. श्री खिडकीतून एकटक बाहेर बघत उभा होता. ती त्याच्या पाठीला मलम लावणार तोच श्रीने तिचा हात झटकला. 

"आधी घाव द्यायचे,मग मलम लावायचा." त्याचा आवाजात खूप कोरडेपणा जाणवत होता. 

"अरे पण…" 

"मेडिकलच्या दुकानात का गेलो,ते का घेतले?हे कोणाला विचारावेसे सुद्धा वाटले नाही.तुम्ही आई लोकांनी जर आपले काम नीट केले असते तर आज मला तिथे जाण्याची गरज सुद्धा पडली नसती." 

"म्हणजे?मी असं काय नीट नाही केले तुझे, की तुला ते पॅ….. पॅ….." आई बोलतांना अडखळत होती. 

"पॅड!" 

"तुला पा…….." आई शॉक होत त्याच्याकडे बघत होती. 

"मीरा!किती घाबरली होती ती?आज सुट्टी होती म्हणून बरं झालं,जर शाळेत असती तर? सगळ्यांच्या हसण्याचा विषय ठरली असती. तिला त्रास झाला असता तो वेगळा.आईला तर सगळं कळते ना?मग हे कसं नाही कळले, की आपली मुलगी आता १२ वर्षाची झालीय,पाळी कधी पण येऊ शकते तर तिला आधीच विश्वासात घेऊन याबद्दल माहिती द्यावी?हे इतकं नैसर्गिक आहे,तरी तुम्हाला आपल्याच मुलीला सांगायला लाज वाटावी?तुम्ही लोकं काहीतरी पाप केल्यासारखे का वागत असतात?आज मी एका आईच्या चुकीची शिक्षा भोगली.पण जर गोष्ट मीराची असेल तर मी अशा लाखो शिक्षा भोगू शकतो."तो आपली टीशर्ट घालत म्हणाला. तो बाहेर टेरेसवर जाणार तोच त्याचे हातांकडे लक्ष गेले तर त्याच्या हातावर पट्याने मारल्याचे व्रण दिसत होते.त्याने लगेच कपडे बदलत लांब बाह्यांची टीशर्ट घातली.आणि गच्चीवरून उडी घेत मीराच्या घरी गेला सुद्धा. 

आई निःशब्द त्याच्याकडे बघत होती. 

"मीरा,बरं वाटतेय ना आता?" 

"हो!पण मी तुला कुठेही जाऊ देणार नाही."

"आता काय झालं?"तो परत काळजीत पडला. 

"तू मघाशी म्हणाला ना,कोणाला जवळ येऊ द्यायचं नाही?तुला पण नाही.." 

"हा मग?" 

"पण मी तुला,तू मला माझ्या जवळच हवा आहे. कोणी नसेल तर माझी काळजी कोण घेईल?"ती त्याच्याजवळ जात त्याचा हात पकडत म्हणाली. 

"आहss!" तो एकदम कळवळला. 

"काय झालं?" 

"काही नाही.तू काही खाल्लं काय?" 

"तू परत मार खाल्लाय काय?तुझं आवाज असा का येत आहे?"प्रश्न विचारत तिने त्याच्या हाताच्या बाह्या वरती करून बघितले तर तिला तिथे मारल्याचे दिसले. 

"श्री, श्री हे एवढं?परत कुठे?हे बेल्टचं निशाण दिसतंय.."म्हणत ती खाली झुकत त्याचे पाय तपासू लागली. तिच्या डोक्यात काही आले आणि तातडीने उठत तिने त्याच्या पाठीवरील कपडे वर करत बघितले. 

"श्रीsss!" त्याची ती गोरी पाठ पूर्णपणे लाल, काळी निळी झाली होती. मारल्याचे व्रण उठून दिसत होते.ते बघून तिचा जीव घश्यात अडकल्यासारखा झाला. हृदयात पण तिला खूप दुखल्यासारखे वाटत होते. तिने लगेच जात क्रीम आणले, आणि त्याच्या पाठीवर लावायला हाताचा स्पर्श केला. 

"मीरा गं!"त्याचा वेदनायुक्त आवाज आला. 

तिचा तो स्पर्श झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रून घळाघळा गालांवर ओघळू लागले. तिच्या त्या मायेच्या स्पर्शाने त्याचा मनावर घातलेला बांध तुटला होता.कितीदा तो एका हाताने आपले डोळे पुसत होता,पण त्याचे डोळे मात्र वाहण्याचे थांबत नव्हते.टपटप अश्रू जमिनीवर पडत होते. 

"श्री,खूप दुखतय का रे?काकांचा मार खाण्या इतपत असा का रे असा वागत असतो? तू तर किती शहाणा मुलगा आहेस, तू तर कोणाचेच वाईट सुद्धा चिंतत नाही, तरी का सगळे तुला त्रास देतात?" मीरा त्याच्या पाठीला मलम लावत बोलत होती. 

"श्री, नको ना रडू…!"त्याचे डोळे पुसत ती म्हणाली पण आता तिचाच कंठ दाटून आला होता, आणि क्षणात तिने भोंगा पसरला होता. तिला असे बघून आता मात्र तो चूप झाला.

"मी ठीक आहो.तू काही खाल्लं काय?"श्री तिचे डोळे पुसत म्हणाला. 

"खूप भूक लागली."ती रडतच म्हणाली.

"चल मग जेऊन घे." 

"काहीच नाहीये." 

"अरे वाह! मग तर भारीच." 

"काय?" 

"तू कणकेचा साजूक तुपातला शीरा खाणार? त्याने तुला एनर्जी पण येईल."श्रीच्या डोळ्यात हरवलेली चमक परत आली होती. 

"काकूंनी केला आहे?" 

"नाही." 

"मग?तू माझ्या तोंडाला पाणी का सुटवले?" 

"मी बनवतो, खाणार?"

"तुला येतो?" 

"हम्म,चल." 

दोघंही किचनमध्ये गेले.श्रीने किचन एक आढावा घेतला. लागणारे साहित्य काढून घेतले.इतका सराईतपणे तो हात चालवत होता,की जसे काही तो रोज किचनमध्ये काम करत असेल. 

श्री कढईमध्ये तूप घेत, कणीक भाजू लागला. 

"तुला माहिती,बघ हे तूप सुटेपर्यंत आणि कणकेचा रंग चोकलेटी होईपर्यंत हे छोट्या आचेवर मस्त खमंग भाजायचे."बोलतांना त्याच्या आवाजात खूप उत्साह जाणवत होता. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

"हम्म!" 

"बघ किती मस्त सुगंध सुटलाय. बरं हे दूध, काका काकूंना परत आल्यावर चहासाठी लागेल ना?आपण थोडंसंच घेऊया,आणि थोडं पाणी घालूयात.नंतर त्याने साखर टाकली. विलायची खलबत्त्यात कुटून घातली.आणि शेवटी मस्त काजू, किसमिस त्यात पेरले.आणि मीराच्या हातात प्लेट दिली. 

"अम्मम यम्मी!"मीरा खूप चवीने शीरा खात होती. श्री सुद्धा तिच्या सोबत गप्पा करत होता. 

   दोघंही एका वेगळ्या पण फक त्यांच्या आपल्या दोघांच्या विश्वात हरवले होते. 

_________

        श्री दहावीच्या बोर्डात राज्यातून तिसरा आला होता. सगळीकडे कौतुक सोहळा सुरू होता. घरोघरी सगळे आपल्या मुलांना श्रीचे उदाहरण देत होते.शिकवणी न लावता, स्वबळावर त्याने इतका छान अभ्यास केला होता.पण यातच मीराच्या बाबांना कामाची परदेशात चांगली ऑफर आली,आणि त्यांना गाव सोडून जावं लागलं.मीरा गेली तेव्हा श्री तर अगदी लहान मुलांसारखा रडत होता. 

      मीरा नसल्यामुळे श्री आता एकदम एकटा पडला होता.जसाजसा मोठा होत होता त्याच्या वागण्यात आता खूप बदल व्हायला लागले होते. हे बदल आता त्याला सुद्धा जाणवायला लागले होते.घरी आई वडिलांना पण लक्षात आले होते. त्यामुळे त्याच्यावर आणखीच शारीरिक मानसिक आघात होऊ लागले होते.मीरा नसल्यामुळे कोणाजवळ मन सुद्धा हलकं करता येत नव्हते. ना त्याच्या वेदनांवर कोणी फुंकर घालणारे होते, आणि नाही कोणी त्याला समजून घेणारे होते.यातच तो बारावीमध्ये दोनदा नापास झाला.तो डिप्रेशनचा शिकार व्हायला लागला होता.

त्याचं बालपण पूर्णपणे करपून गेले होते. 

________

        मी स्वेच्छेने घर सोडून जात आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. 

                       तुमचा श्री. 

  (नंतर त्याने तुमचा शब्दावर पेनची रेघ ओढली होती.) 

******

क्रमशः

🎭 Series Post

View all