मी तुला माझ्यात जपणार आहे 4

घरातील स्त्री पुरुष वाद... मुलं मुलींसाठी ठरवलेली वेगवेगळी मापदंड..

मी तुला माझ्यात जपणार आहे 

भाग 4

पूर्वार्ध : 

 श्री आणि मीराचा साखरपुडा होतो. मीराला अशक्तपणा वाटत असतो म्हणून श्री तिला तिच्या रूममध्ये आणून सोडतो. श्री परत जायला निघतो पण मीरा मात्र रोमँटिक मूडमध्ये असते. ती त्याच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करते, श्रीच्या संयमाचा बांध सुटतो, आणि तो मीराला बेडवर ढकलत तिच्यावर खुप रागावून तिथून निघून जातो. घरी त्याला त्याचे जुने फोटो अल्बम सापडतात,ते बघत तो जुन्या आठवणीत रमतो. त्याची आणि मिराची पहिली भेट आठवते. मीरा त्याचा शेजारी राहायला आली असते. दोघांची खूप छान मैत्री होते, अगदी एकमेकांचे जीव की प्राण असे मित्र बनतात. 

आता पुढे : 

     श्री मीरा यांच्यामध्ये खूप सुंदर, निरागस अशी मैत्री निर्माण होते. दोघंही एकमेकांना अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा शेअर करत असे. एकाला काही वेदना झाल्या की दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येत होते, इतकं त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होते. असेच दोघे सोबतीने मोठे होत होते. 

          एक दिवस लहानगा नऊ दहा वर्षांचा श्री वरती गच्चीवर एका कोपऱ्यात आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन एकटक दूरवर कुठेतरी बघत बसला होता. 

     

          मीरा नेहमीप्रमाणे खेळत तिच्या गच्चीवर आली तर तिला कोपऱ्यात बसलेला श्री दिसला, आणि तिला लगेच कळले श्री रडतोय, ती पळतच त्याच्या जवळ आली. 

"श्री, तू का रडतोय? तू माझा शहाणा बाळ ना, असे रडू नाही." मीरा आपल्या हातांनी त्याचे डोळे पुसत म्हणाली. पण त्याचे तर अश्रू कधीच रडून रडून सुकले होते, अश्रूंचे ओघळ तेवढी गालांवर दिसत होते. कोणीतरी अश्रू पुसायला येईल म्हणून वाट बघून त्याचे डोळे थकले होते, पण त्याच्या डोळ्यात वेदना मात्र तशाच होत्या. तो फक्त मीराकडे बघत होता.

"बाबा रागावले काय? बोलणं श्री? काय झालं?" ती त्याच्या जवळ बसत म्हणाली. बोलतांना तिचा हात त्याच्या पायाला लागला, तसा तो एकदम विव्हळला. मीराने थोडे खाली वाकून त्याच्या पायाकडे बघितले तर त्याचे दोन्ही पायाला भाजल्यासारख्या ३–४ जखमा होत्या. 

"Ssssss!" मीरा त्याच्या जखमेला स्पर्श करणार तेवढयात तो विव्हळला. तिने घाबरून आपला हात मागे घेतला. 

"इथेच थांब, मी एक मिनिटात आली, कुठे जाऊ नको." भार भार काही इन्स्ट्रक्शनस् देत मीरा पळत खाली गेली सुद्धा, आणि थोड्याच वेळात एक ट्युब घेऊन त्याचा जवळ येऊन बसली. 

"श्री, कसं काय रे एवढे जळले? असा कसा तू खेळ खेळतो?" मेडिसिनचे झाकण उघडत मीराची बडबड सुरु होती. तिने ट्युबमधून थोडे क्रीम आपल्या बोटावर घेतले, आपल्या मांडीवर त्याचा एक पाय घेतला आणि ते क्रीम त्या जखमेवर लावू लागली. 

"मीरा गं!" त्याच्या मुखातून वेदनेने भरलेले शब्द बाहेर पडले आणि त्याच्या डोळ्यात अश्रूंचा पुर दाटून आला. घळाघळा अश्रू त्या गालांवरून ओघळू लागले. 

"श्री, बस थोडंसं, मग तुला चांगलं वाटेल. पण हे एवढे कसे भाजले?" फुंकर मारत ती औषध लावत होती. 

        श्री काहीच बोलला नाही, चुपचाप तिच्याकडे बघत त्याला थोड्यावेळ पूर्वी घडलेले आठवू लागले. 

           नेहमीप्रमाणे त्याची आई काही काम करत होती, आणि तो आई सोबत त्याचा बाल गप्पा करत होता. 

"श्री, तिथे मुलींसोबत काय खेळत असतो? जरा त्या मुलांमध्ये खेळत जा." आई. 

"मला ती मुलं अजिबात आवडत नाही, फार मारामारी करतात, मला फार त्रास देतात. कोणीच मला आपल्या टीममध्ये खेळायला घेत नाही. आणि तुला माहिती या माझ्या मैत्रिणी घरघर खेळताना मला त्यांच्या टीममध्ये घ्यायला भांडतात, सगळ्यांना मीच नवरा हवा असतो." श्री. 

ते ऐकून आईला खूप हसू आले. 

"बरं बरं, मग तुला कोणाचा नवरा बनायला आवडतं?" आपलं काम करता करता वृषालीने त्याची मस्करी केली. 

"मला? अं.. मीरा…" त्याने हसुन उत्तर दिले. 

"आई, मला लाडू दे ना? ते तिकडे आजी असते, तू इथे डब्बा भरून ठेव ना." 

"बरं, चल देते, आणि इथे पण ठेवते हा डब्बा माझ्या सोन्यासाठी." आई त्याच्या केसांमधून मायेने हात फिरवत म्हणाली.

 "आई, तुला माहिती मी सगळ्यांना आवडतो.. त्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, सगळ्यांना मीच हवा असतो. त्या म्हणतात मी खूप चांगला मुलगा आहे, अजिबात भांडत नाही, म्हणून त्यांना माझ्यासोबतच खेळायला आवडते." चालता चालता श्रीची काँटिन्यू बडबड सुरु होती. आई हू हू करत होती. दोघेही किचनमध्ये गेले. 

"श्री, तुला कितीदा सांगितले आहे, असे चालायचे नाही म्हणून? थांब आज तुला चांगलीच समज देते." म्हणतच श्रीला काही कळायच्या आतच आजी चुलीतले जळके लाकूड घेऊन श्रीजवळ आली आणि त्याच्या पायाला तीन चार ठिकाणी चांगले चटके दिले. 

       श्रीचे ते नाजूक पाय चांगलेच भाजले होते.. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता, रडत होता, आजी मला सोड म्हणून विनवणी करत होता, आपल्या आईकडे मदतीच्या अपेक्षेने बघत होता, पण कोणीच त्याचा मदतीला आले नव्हते. श्रीला असे रडतांना बघून आईचा जीव मात्र कळवळा होता पण आजीपुढे तिची सुद्धा काही बोलायची हिंमत नव्हती. 

"तीन मुलींनंतर दोनदा गर्भपात करावा लागला, त्यानंतर तब्बल ९-१० वर्षांनी हा मुलगा जन्माला आला, वंशाला दिवा मिळाला. इतकं नवसाचे पोर ते, तुला नीट सांभाळता येत नाही? सतत मुलींमध्ये असतो, मग आणखी काय शिकणार आहे? त्याला मुलांसोबत खेळायला पाठवत जा. तुझं मुलांकडे लक्षच नसते, काय करत असतेस कुणास ठाऊक. शरयू, शर्वरी तरी ऐकतात, श्रावणीला थोडं घरातले कामधाम शिकवा. तिचं सगळं लक्ष बाहेर असते." आजीची बडबड सुरु झाली. 

"आता मी काय केले?" श्रावणी श्रीची बहीण मध्येच म्हणाली. 

"हे बघ, असे अजून तोंड वर करून मलाच प्रश्न विचारत आहे. सासरी गेल्यावर नाव काढेल, घरात आजी असून, पोरांना काही वळण नाही म्हणतील. लोकं आमच्या तोंडात शेण घालतील. मुलीच्या जातीने सगळं शिकायला हवे, घरातील सगळी कामं यायला हवी, कितीही शिकल्या तरी बाईच्या जातीला चूल आणि मूल चुकत नाही, ते करावेच लागते. सासू, नवऱ्याचे ऐकावे लागते, तेव्हा कुठे संसार सुखी होतो, अन् आयुष्य पूर्ण होते." आजीची आपली नेहमीची टेप सुरू झाली. 

       श्रावणी तोंड वाकडं करत तिथून निघून गेली. श्री मात्र तिथेच रडत उभा होता. 

"मुलाच्या जातीने असे रडलेले बिलकुल शोभत नाही. खबरदार परत असे मुलींसारखा रडतांना दिसला तर? चल जा तिकडे, आणि परत जर मला तू असा बायकी चालतांना दिसला, तर पाय तोडून हातात देईल." आजी रागावली. 

           आजीच्या आवाजाने घाबरून श्री रडता रडता एकदम चूप झाला. त्याने आपल्या दोन्ही हातांनी आपले तोंड दाबून धरले आणि लंगडत बाहेर जाऊ लागला. त्याची आई सुद्धा त्याच्या मागे जाणार तोच आजी परत रागावली, "खबरदार, त्याला परत बाबू बाबू करत डोक्यावर बसवले तर. कोणी जाणार नाही, राहू देत एकटे, तेव्हाच तो सुधारेल."

    

        आणि तो चुपचाप वरती एका कोपऱ्यात येऊन बसला होता. आणि मीरा तिथे आली होती. 

"मीरा, खूप दुखतेय!" श्री रडक्या आवाजात म्हणाला. 

"हे बघ औषध नाही लावले तर आणखी जास्त दुखेल ना ते. आजी म्हणते लगेच औषध लावलं की मग जास्त दुखत नाही. नाहीतर हे ठीक व्हायला खूप वेळ लागेल. तुला तोपर्यंत चालता पण येणार नाही. मग आपण कसं खेळायचं?" 

"खूप आग होते आहे गं!" 

"श्री, तू गोड पिल्लू आहेस ना, शहाणा आहे की नई माझ्यासारखा.. मी कित्ती वेळा पडते, आजी मला औषध लाऊन देत असते, तेव्हा मी अजिबात रडत नाही, मी खूप शूरवीर आहे. तू कुठे पडला सांग बघू मला, आपण ना तिथे पाय मारून, हट करून येऊ." मीराची त्याला समजावण्याचा सुर लागला होता. मीरा अगदी तिची आजी तिला समजावयाची, तशीच मायेने लाडात येत श्रीसोबत बोलत असे. 

            श्रीची आई थोड्या वेळाने वरती आली तर मीरा श्रीच्या पायाला औषध लावताना दिसली. ती त्यांच्या जवळ जाणार तोच परत खालून आजीचा आवाज आला. तिने आपल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि हातातला लाडवाचा डब्बा तिथेच बाजूला टेबलवर ठेवला आणि परत चालली गेली. 

        श्रीला असे रडताना बघून आता मात्र मीराचा सुद्धा कंठ दाटून आला होता. आणि त्या लहानग्या मीराने भोंगा पसरला. ती आपले डोळे चोळू लागली. मग परत मोठ्याने रडू लागली. तिला रडतांना बघून श्रीचे रडणे कुठल्या कुठे गायब झाले. 

"अगं अगं, ते हात दूर कर, औषधीचे हात आहेत तुझे, डोळ्यात जाईल.. जळतील डोळे." तो काळजीने म्हणतच होता की आधीच ते क्रीम तिच्या डोळ्यात गेले होते आणि तिच्या डोळ्यांची आग व्हायला लागली होती. 

"थांब, मी आलोच!" म्हणत तो पळतच रूममध्ये आला. मीराला रडतांना बघून, त्याच्या पायाला जखमा झाल्या आहेत, हे तो विसरला सुद्धा होता. त्याने कपाटातून रुमाल घेतला, एका जगमध्ये थंड पाणी घेतले आणि मीराजवळ येऊन बसला. 

"हात दूर कर.." त्याने रुमाल पाण्यात ओला करून फुंकर मारत तिचे दोन्ही डोळे पाण्याने पुसून काढले. 

"श्रीssss मला खूप दुखत आहे…" 

"आताच मला कोणीतरी सांगितलं होतं, की एक मुलगी खूप बहादुर आहे, रडत नाही…" त्याला मीराला रडतांना बघून थोडं हसू आले. 

"आंsssss" आता मीरा त्याला मारू लागली. 

"माझ्याकडे एक गंमत आहे, लगेच आणतो!" म्हणत तो परत आतमध्ये आला, टेबलवर ठेवलेला डब्बा उघडत त्यातून दोन लाडू काढले आणि परत बाहेर आला. मीराचा हात पकडत तिला बाजूला असलेल्या झुल्यावर बसवत स्वतः पण तिच्या बाजूला बसला. 

"घे…." श्री आपल्या हातातील लाडू देत म्हणाला. 

"एकच?" तिने त्याच्या हातात असलेला दुसरा लाडू सुद्धा घेतला. 

"मला पण खायचा ना." 

"बरं हे घे.." म्हणत तिने त्याला लाडू मधून अर्धा तोडून दिला. 

        दोघेही मोठ्याने झोका घेत लाडू खात हसत हसत गप्पा करत होते. दोघंही खळखळून हसत होते, एकमेकांच्या साथीने आपण थोड्या वेळ पूर्वी रडत होतो, हे सुद्धा विसरले होते. 

          रात्री आई आपले सगळे कामं आटोपून रूममध्ये आली तर श्री झोपलेला दिसला. आज तो दिवसभर नंतर कोणाशीच जास्त काही बोलला नव्हता, अभ्यास करता करताच झोपी गेला होता. आईने त्याचा पाय बघितला, पाय चांगलाच लाल झाला होता, जळालेल्या ठिकाणी घोगला सुद्धा आला होता. आई तिथे मलम लावणार तोच झोपेतच त्याने त्याचे पाय आपल्या छातीजवळ ओढून घेतले. ते बघून आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. 

"अहो, तुम्ही आईंना थोडं समजावा, आजकाल त्या श्रीला सतत रागवत असतात. आज तर अक्षरशः चुलीतील गरम लाकडाने त्याच्या दोन्ही पायांना चटके दिलेत. ते चिमुकलं पोर, खूप कळवळले हो." वृषाली विक्रांतला विनवणीच्या सुरात म्हणाली. 

"आई जे करतेय ते योग्यच आहे. घराला शिस्त हवीच." विक्रांत कुठल्याश्या फाईलमध्ये आपलं डोकं खुपसून बोलत होते. 

"अहो शिस्त वेगळी, पण हे असे चटके वगैरे देणे, किती योग्य आहे? मुलाच्या मनावर काही परिणाम झाले तर? हातातून निघून जायचं हो पोर. आणि आता तो किती लहान आहे, त्याचा बालमनावर परिणाम होईल." वृषाली खूप कळकळीने बोलत होती.

"तेच म्हणतोय, हातातून बाहेर जाण्या आधीच सांभाळावे लागते. लहान वयातच शिस्त लावावी लागते. माहिती आहे ना शिर्केंच्या मुलाने परदेशात जाऊन काय गुण उधळले ते? आता परत पण येत नाही म्हणे. एकुलता एक मुलगा, आता त्या मायबापाने कोणाकडे बघावं? तेव्हा शिर्केंनी लक्ष दिले असते तर आता अशी वेळ आली नसती. तेव्हा फार लाडावले, आता भोगावं लागते आहे. मुलांना शिस्त तर हवीच." 

"अहो, पण आपला श्री आणि त्याचा काय संबंध? श्री किती लहान आहे."

"हे बघ, उगाच नको तो वाद घालू नकोस. आई जे करते ते नेहमी योग्य असते. आम्हाला तिने इतके चांगले संस्कार दिलेत, श्री तिचा नातू आहे, वैरी नव्हे. आणि उगाच माझ्याकडे अशी गाऱ्हाणी घेऊन येत जाऊ नको. मला यापेक्षा पण बरीच महत्वाची कामं असतात." म्हणत विक्रांत फाईल घेऊन बाहेर निघून गेले. 

             वृषालीने श्रीची पुस्तकं नीट उचलून ठेवली. त्याच्या अंगावरचे पांघरून सारखं केले. त्याच्या कपाळावर किस करत, रूमचे दार लोटत, बाजूच्या आपल्या रूममध्ये निघून आली. श्रीच्या विचारात उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला.  

       तेव्हापासून मात्र श्रीने आजीचा चांगलाच धसका घेतला होता. तो आता चुकून सुद्धा बायकी चालत नव्हता. त्यासोबतच त्या दिवशी घरातील कोणीच त्याला जवळ घेतले नव्हते, ना आई आली, ना बाबा, ना बहिणी.. तो आता खूप शांत झाला होता. घरात पण बराच अबोल राहत होता. ज्याने जे काम सांगितले ते तो निमूटपणे करत होता. घरच्यांना पण तो समजदार होतोय असे वाटत होते. 

        पण इकडे जेव्हा तो मीरा सोबत असे, तो एका वेगळ्याच विश्वात असायचा. तिच्यासोबत तो धमाल मस्ती करत. मीरा पण जशी जशी मोठी होत होती, चांगलीच मस्तीखोर व्हायला लागली होती. घरून श्रीला मुलींमध्ये खेळायला बंदी घातली होती, मग मीरानेच शक्कल लढवली आणि ती श्रीला सोबत घेत मुलांसोबत खेळत होती. कधी बॅट बॉल, तर कधी विटीदांडू, कधी कंचे, तर कधी लगोरी खेळत. आता त्यांचा मुलामुलींचा मिळून मोठा ग्रुप झाला होता. कोणी कधी श्रीला काही म्हटले, तर मीरा त्या व्यक्तीशी चांगली भांडून यायची. थोडक्यात काय तर ती त्याची ढाल होती. 

********

मीरा आणि श्रीच्या आयुष्यात काय होणार आहे हे तर  ठरवणार होती...

क्रमशः

🎭 Series Post

View all