मी तुला माझ्यात जपणार आहे 3

मैत्री ला नाव देण्याची काय गरज?

मी तुला माझ्यात जपणार आहे..

पूर्वार्ध: 

 मीराने त्याचसाठी सिलेक्ट केलेल्या थ्री पिस सूटमध्ये भयंकर सुंदर दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात कुठलाही आनंद दिसत नव्हता, अन् त्याची नजर फक्त मीराच्या वाटेवर खिळली होती. मीरा एकच अशी व्यक्ती होती, जी फक्त त्याची होती, बाकी इथे सगळे त्याला अनोळखी वाटत होती. आणि त्याची प्रतीक्षा संपली, बेबी पिंक रंग त्याला कुंदनचे काम केलेले नाजूक लाल बॉर्डरच्या घेरदार घागऱ्यामध्ये त्याची गोडुली मीरा चेहऱ्यावर एक गोड हसू घेऊन त्याचा पुढे उभी होती. तिला बघून त्याचा ओठांवरसुद्धा बऱ्याच वेळाने हसू उमलले. आता पुढे..

भाग 3

           श्री फार जास्त सोशल होत नसे, त्याला स्वतःतच रमायला आवडत, सोबतीला त्याची बेस्ट साथीदार मीरा असली की मग तर सोनेपे सुहागा असे. आतापर्यंत तिथे येणाऱ्या मोठमोठ्या लोकांसोबत भेटून, जबरदस्तीने बोलून श्री खूप वैतागला होता, मीरा तिथे आली आणि श्रीला आतापर्यंत निर्जीव वाटणाऱ्या त्या जागेत एकदम प्राण ओतल्यासारखे वाटू लागले. तो तिलाच एकटक बघत होता. मीराला त्याचे असे तिला बघणे फार सुखावून गेले. 

"काय?" मीराने भुवया उंचावत त्याला इशाऱ्यानेच विचारले. 

त्याने डोळ्यांनीच 'काही नाही' असे खुणावले. 

"मी कशी दिसतेय?" 

"नेहमी प्रमाणे!" 

ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर रुसल्यासारखे भाव पसरले. 

"नेहमी प्रमाणे गोड!" 

मुलींना सतत अटेंशन, कौतुक आवडते हे त्यालासुद्धा माहिती होते. 

ते ऐकून तिच्या गालात खुदकन हसू पसरले. 

        साखरपुड्याच्या सगळ्या विधी पार पडल्या. श्री आणि मीराने एकमेकांना एनगेजमेंट रिंग घातली. नंतर त्या दोघांपुढे एक पाच लेयरचा मोठा केक दिमाखात येऊन उभा राहिला. मीराला अजूनही अशक्तपणा होताच. खूप वेळपासून उभी असल्यामुळे तिला थोडं गरगरल्यासारखे वाटत होते. केक कापताना सुद्धा तिला नीट उभं राहता येत नव्हते. श्रीने तिच्या कंबरेत हात घालत आपल्याजवळ घट्ट पकडून घेतले होते. आज पहिल्यांदाच न सांगता श्रीने तिला असे आपल्या कुशीत पकडून ठेवले होते. आता तर तिचे केक कापण्यात, कशातच मन लागत नव्हते. त्याचा तो गोड स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता, आणि तेच ती अनुभवत होती. श्री तिचा हात आपल्या हातात पकडत केक कापत होता तर ती त्याला बघण्यात व्यस्त होती.

"काय?" श्रीने तिला नजरेनेच विचारले. 

      काही नाही या आविर्भावात मान हलवली, आणि आपले डोळे खाली करत स्वतःशीच गोड लाजली. 

       सगळे पाहुणे मंडळी श्री आणि मीराला अभिनंदन करत होते. त्यात मीरा खूप थकली होती, आणि श्री सुद्धा कंटाळला होता. 

"त्रास होतोय काय?" श्री मीराचा थकलेला चेहरा बघून म्हणाला. 

"हां!" 

"तरी मी म्हणतच होतो, एवढी घाई करायला नको, पण माझं कोण ऐकताय?महत्वाचा कार्यक्रम आटोपला आहे, बाकीचे हे लोकं बघून घेतील. तू चल आतमध्ये, तुला आरामाची गरज आहे."  

      तिने होकारार्थी मान हलवली. श्रीने आपल्या आणि मीराच्या आईला मीरा विषयी सांगून कार्यक्रमातून काढता पाय घेतला. श्री मीराला घेऊन तिच्या रूममध्ये आला, तिला नीट बेडवर बसवले आणि रूमचा लाईट लावायला गेला. 

"श्री.." 

"हो?" 

"असू दे ना, लाइट्स नको ऑन करू.."

"अगं पण…" 

"बघ, किती शांत वाटत आहे, आणि हा बाहेरचा थोडा प्रकाश येत आहे, तेवढा पुरेसा आहे." 

"बरं!" म्हणत श्रीने बाजूला टेबलवर ठेवलेल्या ग्लासमध्ये पाणी ओतले आणि मीराच्या पुढे धरले. 

"तुझ्या हाताने…" 

श्री तिच्याकडे फक्त बघत उभा होता. 

"खूप थकलेय ना श्री, असा हात वर उचलायला सुद्धा माझ्यात एनर्जी नाहीये." मीरा आपले बिचारेसे नाटकी हावभाव करत म्हणाली. 

      श्रीने एक हात तिच्या मानेमागे पकडला आणि दुसऱ्या हातातला ग्लास तिच्या ओठांना लावला. मीरा त्याच्याकडे बघत हळूहळू पाणी पित होती. अंधारात बाहेरून येणारा मंद मंद प्रकाश श्रीच्या चेहऱ्यावरचे तेज आणखी वाढवत होता, त्यात त्याचे ते हिरवे घारे डोळे, मीरा तर पूर्णपणे त्याच्यात हरवली होती. 

आणि बाहेर एक सॉफ्ट गाणं सुरू झाले…

Shining in the shade in 

sun like

A pearl upon the ocean

Come and feel me, 

com’on heal me

"श्री डान्स?"

"नको!" श्रीला हे असे कपल डान्समध्ये काडीभर सुद्धा इंटरेस्ट नव्हता. 

"बघ ना किती गोड गाणं लागलं आहे." 

"तू थकलीये, तुला आराम करायला हवा." 

"तू असा जवळ असला की, तुझ्या स्पर्शाने सगळा थकवा निघून जातो."

"मीरा, आराम कर. मी बाहेर जातोय." म्हणत बाहेर जायला तो मागे फिरणार तेवढयात मीराने त्याचा हात पकडला, तसा तो मागे फिरला. 

"प्लीज… !" 

         तिची ती प्रेमळ आर्त रिक्वेस्ट आता मात्र तो नाकारू शकला नाही आणि त्याने होकारार्थी मान हलवली. तिच्या ओठांवर गोड हसू उमलले, ती श्रीच्या पुढ्यात उभी राहिली. श्री मात्र तिच्याकडे बघत तसाच उभा होता, आता पुढे करायचं काय, त्याला कळत नव्हते, त्याला अवघडल्यासारखे झाले होते. आतापर्यंत त्या दोघांमध्ये गाढ मैत्री होती, पण आज अचानक ते नातं बदललं होते, तो बावराल्या नजरेने तिला बघत होता. 

        तो शांत बघून मीराने आपला हात त्याच्या पुढे धरला, तिच्याकडे बघतच त्याने आपला हात तिच्या हातात दिला. मीरा त्याचा हात पकडत त्याच्या जवळ गेली आणि त्याचा तो हात तिने आपल्या आपल्या कंबरेवर ठेवला, आणि आपला एक हात त्याच्या खांद्यावर ठेवत डान्ससाठी पोझिशन घेतली. 

हुआ जो तू भी मेरा, मेरा

तेरा जो इकरार हुआ

तो क्यूं ना मैं भी 

केह दूं, केह दूं

हुआ मुझे भी प्यार हुआ

तेरा होने लगा हू, 

खोने लगा हू

जब से मिला हू  

तेरा होने लगा हू, 

खोने लगा हूँ

जब से मिला हू 

        

       

       डान्स करताकरता मीरा श्रीच्या आणखी आणखी जवळ त्याच्या मिठीत जाऊ लागली. श्री ला सुद्धा आता तिच्या शरीराचा स्पर्श जाणवू लागला होता, तो आपले अंग चोरुन घेत होता, पण ती आणखी त्याच्या जवळ जात होती. तिच्या कंबरेवर त्याच्या हाताचा स्पर्श, त्यात त्याची ती उबदार मिठी, तिचे हृदय स्पंदने वाढायला लागली होती, तिच्या हार्टबिट्स आता तिलाच ऐकू येत होत्या. ती आता स्वतःचे भान विसरत चालली होती. सुरू असलेल्या गाण्यासोबत वाहवत जात तिने हळूच श्रीच्या गळ्याजवळ कानाखाली आपल्या ओठांचा स्पर्श करत किस केले. तिचा तो स्पर्श होताच त्याच्या हाताची मुठी टाईट झाली, होणाऱ्या डान्स स्टेप्स आता थांबल्या होत्या. मीरा पुढे जात सेम तसेच करत तिने त्याच्या गालाच्या दुसऱ्या बाजूला किस केले, त्या स्पर्शाने त्याचे डोळे बंद झाले. ती मात्र आता स्वतःला विसरत, पूर्णपणे त्याच्यात सामावू बघत होती. तो मात्र तिच्यापासून दूर जाऊ बघत होता.. ती आता हळूहळू त्याच्या शर्टाची एक एक बटन काढत खाली येत होती.. 

"मीरा, स्टॉप!" तो म्हणाला. पण ती मात्र त्याचं ऐकण्याचा कोणत्याच मूडमध्ये नव्हती. तिचं आपलं त्याच्या शर्टच्या बटन ओपन करणे सुरूच होते. 

"मीरा, आपलं अजून लग्न झालेले नाहीये." 

"ते पण लवकरच होईल." ती स्वतःच व्यस्त होती.  

"मीरा, प्लिज… हे असे व्हायला नको, इतकी घाई बरी नाहीये." त्याचा आवाजात कळकळ होती. 

"श्री, मी तुझी खूप वाट बघितलीये, हे तुला पण माहिती आहे. पण आता नाही, आता माझा श्री माझाच होणार, पूर्णपणे…मनाने आणि तनाने पण.."म्हणत तिने त्याच्या शर्टची शेवटची बटन काढली. आता तिचा हात पुढे जाऊ लागला. आता मात्र त्याच्या संयमाचा तोल ढळला.

"चांगल्या घरच्या मुलींना, हे असे वागणे शोभत नाही. लग्नाआधी कुठला पण पुरुष तिच्यासाठी परपुरूषाच असतो, आणि असायला सुद्धा हवा. प्रेमात इतके वाहवत जाणे चांगले नाही, स्वतःवर संयम ठेवायला शिक." तिचा पुढे जाणारा हात त्याने आपल्या हातात घट्ट पकडत, तिला बेडवर ढकलत तो रागानेच म्हणाला.

"प्रेम म्हणजे भक्ती असते, ना की हे असे शारीरिक नातं. प्रेम खरं असेल तर याची गरज सुद्धा पडू नये. हे जे आता तू करत होती त्याला फक्त वासना म्हणातात. असे सिद्ध करणार आहेस आपले प्रेम? प्रेम करते म्हणे…. " श्री चांगलाच चिडला होता. त्याने तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला आणि रूम बाहेर पडला. 

          त्याचे हे शब्द तिच्या हृदयावर घाव करून गेले..तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागले होते. ती भरल्या नजरेने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. 

      श्री आता भयंकर चिडला होता. त्याला तिथे थांबण्यात आता थोडा सुद्धा उत्साह नव्हता. तो सरळ आपल्या घरी जायला म्हणुन निघाला. 

"श्री, अरे तुलाच शोधत होते." आई त्याला शोधत येत त्याच्याकडे बघत म्हणाल्या. त्याच्या गळ्यावर कानाजवळ असलेल्या लाल किसचे निशाण मात्र त्यांच्या डोळ्यांखालून सुटले नाही.. आणि त्या समजायच्या ते बरोबर समजल्या. श्री का चिडला आहे हे पण त्यांच्या लक्षात आले. 

     तो मात्र काहीच बोलला नाही फक्त त्यांच्याकडे बघत होता.  

"बरं, तू आता घरी जा." 

       श्री चुपचाप तिथून निघून आपल्या घरी आला. कार चालवताना सुद्धा त्याच्यासमोर मीरा येत होती. वारंवार मीराचा तो चेहरा, तिच्या डोळ्यातील पाणी त्याच्या डोळ्यांपुढे येत होते. घरी पोहचताच पळतच तो आपल्या रूममध्ये जात सरळ बाथरूममध्ये थंड पाण्याच्या शॉवरखाली उभा राहिला..

"का मीरा, का अशी वागते आहेस?" त्याला तिला दुखावल्याचा, त्यापेक्षा जास्त आपण तिच्या पात्र नाही, या भावना असह्य झाल्या आणि हाताची मूठ आवळत हात जोरदार भिंतीवर मारला. 

"मीरा ग!" त्याच्या हाताला जोरदार लागलं होते, हातात आणि हृदयात खूप वेदना होत होत्या. डोळ्यातील पाणी आता वरतून पडणाऱ्या पाण्यात मिसळू लागले होते.. 

        बऱ्याच वेळाने श्री बाथरूम मधून बाहेर आला. कपाटात कपडे शोधता शोधता त्याचा हाताला एक जुना अल्बम लागला. 

"माझी मीरा, गोडुली मीरा!" अल्बमचा तो कव्हर फोटो बघून त्याच्या ओठांवर गोड हसू उमलले. टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच तो टेबलवर बसला आणि एक एक फोटो बघू लागला..

"आपली मैत्री अशीच नाही का राहू शकत? का या नात्याला नाव देण्याची गरज आहे? मीरा आपण पहीलेसारखे का नाही होऊ शकत?" विचार करतच त्याच्या हृदयातून एक कळ गेली.. मीराचे पाणावलेले डोळे आठवले आणि त्याचे डोळे पाण्याने काठोकाठ डबडबले. 

     श्री मीराच्या बालपणीच्या आठवणींचा तो अल्बम होता. तीच काय एक त्याच्या आयुष्यातल्या, बालपणीच्या गोड आठवणी होत्या.. एक एक फोटो अल्बमचे पान पालटत तो जुन्या आठवणीत हरवू लागला, त्याला त्याची मीरा सोबत झालेली पहिली भेट जशीच्या तशी डोळ्यापुढे येऊ लागली. 

"ये तो चेंडू दे ना!" एका लहान मुलीचा आवाज येत होता, पण त्याला काहीच ऐकू जात नव्हते, तो छोटासा पिल्लू आपल्याच तालात दोन्ही गालांवर हात ठेवून समोर खेळणारी मुलं बघत होता. 

"काय झालं?" तिच्या आवाजाने त्याने तिच्याकडे बघितले. गोऱ्या गोबऱ्या गालाची, मोठे मोठे काळेभोर डोळे, ब्ल्यू रबरबँड मध्ये वरती बांधलेल्या कुरळ्या केसांच्या लांब दोन मोकळ्या वेण्या, चेहऱ्यावरून झळकणारे ते चिमुकले टेन्शन, आणि छोटेसे गुलाबी ओठातून वरचा एक दात पडलेली ते गोड हसू.. अशी ती गोडूली आपले दोन्ही हात कंबरेवर ठेवत त्याला विचारत होती.  

"तू रूशला आहे काय?" 

तो चूप, तिच्याकडे बघत होता. 

"पप्पा लागवले?" तिचे प्रश्न सुरूच. 

"माझ्यासोबत कोणी खेळत नाहीये."

"आपण खेळू? मला पण कोणी मित्ल नाही भेटला." 

ते ऐकून त्याच्या ओठांवर गोड हसू पसरले. ती आपला एक बोट त्याचा डोळ्यांजवळ नेत होती.

"काय करतेय?" 

"माझ्याकडे पण अशे हिलवे, ब्ल्यू मार्बलस् आहे."

"हे माझे डोळे आहेत, कंचे नाहीत." 

"डोळे तर काळे असतात.. मला बघू दे ना, मला पाहिजे ते.." ती परत आपल्या बोबड्या बोलीत म्हणत त्याच्या डोळ्यात बोट घालणार तेवढयात त्याने तिचा हात पकडला. 

"अगं, हे खरंच माझे डोळे आहेत, डोळ्यात असा बोट नको घालू, टोचेल मला." 

"दुखेल तुला?"

"हो!" 

"रडू येईल?"

"हो!" 

"बलं, मी तुला कधीच रडू देणाल नाही. पिंकी प्लोमिश. पण तू माझा मित्ल होणाल ना?" 

"हो, चल खेळूया!" दोघंही पकिकडे जात बॉल बॉल खेळण्यात दंग झाले. 

        श्री जवळपास सात वर्षाचा तर मीरा पाच वर्षाची असेल. मीरा श्रीच्या घराजवळ नुकतीच राहायला आली होती, दोन्ही घरे अगदी चिपकुन होती. श्रीच्या घरील वातावरण जुन्या वळणाचे होते. आजोबा, आजी, आई, बाबा, त्याला मोठ्या तीन बहिणी असा त्याचा परिवार होता. श्री शेवटच्या बहिणीनंतर तब्बल नऊ वर्षांनी झाला होता, त्यामुळे त्याच्या पुढे त्या सगळ्या बऱ्याच मोठ्या होत्या. श्री सोबत खेळायला कोणीच नसायचे. तो लहानपणापासून तसा शांत होता. मुलांमध्ये खेळायला गेला, आणि काही भांडणं झालीत सगळे त्याला वेगळे करत. पण आता त्याला त्याची मीरा मिळाली होती, त्याची आपली स्वतःची, हक्काची मैत्रीण. तो तिच्यासोबत खूप रमत होता. 

       मीराच्या घरचे वातावरण अगदी श्रीच्या घराच्या विरुद्ध होते. तिच्या घरी खूप मोकळं वातावरण होते. मीराच्या घरी आजी, आई, बाबा, आणि तिच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठा तिचा प्रसाद दादू. बाबांचा बिझनेस, आई नोकरी करायची, आणि दादा, त्याचे आपले वेगवेगळे दिवसभर चालणारे क्लासेस, आणि उरल्या वेळात त्याचे मित्र मंडळ. दिवसभर घरी मीरा आणि तिची आजीच असायच्या. मीराला सुद्धा श्री भेटल्या पासून, तिचं आपलं दिवसभर "श्री श्री" च सुरू असायचे. दोघांमध्ये आता छान गट्टी जमली होती. एकमेकांच्या साथीने असेच दिवस पुढे जात होते.

_______________

"श्री काय झाले? इतका का रडत आहेस?" श्रीला असे खूप वेदनेत रडतांना बघून मीराला सुद्धा रडू येत होते.

_______________

क्रमशः 

©️ मेघा अमोल 

🎭 Series Post

View all