मी तुला माझ्यात जपणार आहे
भाग 10
"अँड द बेस्ट न्युरोसर्जन अवॉर्ड गोज टू मिस श्री..".
एका मोठ्या हॉलमध्ये देशातील बेस्ट डॉक्टर पुरस्कार, खूप प्रतिष्ठित असा सोहळा सुरू होता. देशातील सगळी नामांकित डॉक्टर तिथे उपस्थिती होते.
मिस श्री नाव उच्चारले गेले तेव्हा एक ५५-५६ वर्षाची स्त्री जागी उभी राहिली.बेबी पिंक रंगांची प्लेन सिल्क साडी, खांद्यापर्यंत रुळणाऱ्या काळ्या केसांमधून डोकावणारे काही पांढरे सुंदर केस,एका हातात काळया पट्ट्याचे घड्याळ, दुसऱ्या हातात ब्रेसलेट त्यात उठून दिसणारे "M" अक्षराचे लटकन,गोड हसू असणाऱ्या ओठांवर लाईट पिंक लिपस्टिक, चेहऱ्यावर कर्तृत्वाचे तेज, हिरव्या डोळ्यांची ती श्री अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर आली.
"मीरा फ्री हेल्थ सेवा चेन ऑफ हॉस्पिटलच्या अध्यक्षा,प्रख्यात न्युरोसर्जन मिस श्री.."म्हणत तिचं स्टेजवर स्वागत करत तिला पुरस्कार प्रदान करत तिचा सन्मान वाढवण्यात आला.
"Thank you everyone,I dedicate this award to my life,my soulmate Meera.."एक आत्मविश्वासाने भरपूर असा नम्र आवाज आला.त्या आवाजाबरोबर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला..आणि का ना होणार,श्री तिथे उपस्थित सर्वांसाठी एक प्रेरणास्थान होती.
अवॉर्ड प्रोग्राम आटोपला होता.न्यूज मीडियाने खूप गर्दी केली होती.
"Many many congratulations mam!" रिपोर्टर.
"Thanks a lot."श्री हात जोडत म्हणाली.
"मॅम,आता तुम्ही तुमचा अवॉर्ड मीरा यांना डेडीकेट केला,ज्या नावाने तुमच्या सगळ्या संस्था समाजातील लोकांना मदत करतात..त्या मिस मीरा कुठे आहेत?"रिपोर्टर.
"ती इथे आहे,माझ्या हृदयात,कायमची,मी जपलेली माझी मीरा."श्री हसत म्हणाली.
"तुमचे आत्मचरित्र तर आम्ही नेहमीच वाचत आलेलो आहोत,तरी सुद्धा एक प्रश्न..तुम्हाला कधी वाटले होते काय आपला हा समाज तुमचा स्वीकार करेल?काय मेसेज देणार सगळ्यांना?"रिपोर्टर.
"कर्तृत्व मोठं आणि प्रामाणिक असायला हवे, मग समाज स्विकरतोच..मी एवढेच सांगेल की प्रत्येकाला आनंदाने,सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…मी ट्रान्सजेंडर ट्रान्सवुमन डॉक्टर श्री,आपल्या सगळ्यांचे आभार मानते, आणि आता मला रजा द्या."नम्रपणे हात जोडत ती म्हणाली आणि तिथून निघून आपल्या घरी आली.समोर असलेला मोठा मीराचा फोटो शांतपणे बघत होती…
त्यादिवशी रात्री मीरा घर सोडून निघून गेली होती. श्रीला स्वतःच्याच वागण्याचा राग येऊ लागला होता..तिकडे मीरा सुद्धा पूर्णपणे तुटून गेली होती.जवळपास आठ दिवस होत आले होते,पण मीरा श्री सोबत बोलायला की भेटायला तयार नव्हती.
श्री रोज तिच्या खिडकी समोर येऊन उभा राहत.मीरा त्याच्याकडे बघत सुद्धा नसत.रात्र झाली की तो निघून जात.परत दुसऱ्या दिवशी येत मीराची वाट बघत उभा राहत.गेल्या आठ दिवसांपासून त्याचा हाच दिनक्रम सुरू होता.
आज मीरा खिडकीजवळ आली तर श्री चक्क आपले कान पकडून उभा होता.त्याच्या डोळ्यांतले पाणी गालांवर ओघळत होते..बऱ्याच वेळ तो तसाच उभा होता..आता मात्र त्याला तसे रडतांना बघणे तिला असह्य झाले..खरंच तो चुकला काय?मीच त्याला समजून घेण्यात चुकले काय?आता तिच्या डोळ्यांपुढे लहानपणापासूनचा श्री येऊ लागला होता..
पायावर जळल्याचे चटके सहन करत रडतांना श्री,पट्ट्यांचा वळा उमटे पर्यंत मार खाणारा श्री..त्याने एकदा आपल्या केसांच्या वेण्या बांधल्या होत्या तर आजीने त्याचे केस कापून काढले होते.मीराने केस कापू नये,हट्ट धरणारा श्री..तिच्या सोबत कथ्थक करतांना त्याला किती आनंद होत होता..त्याच्या ताईंच्या लग्नात मेहंदी काढली म्हणून तर किती ओरडा पडला होता,मीराच्या मेहंदीच्या हातांचा सुगंध घेत तो आपली हौस पूर्ण करायचा..मीराची पाळी आली तेव्हा,कशाचाच किळस न करता त्याने तिची मदत केली होती, पाळीबद्दल,गर्भाशयाबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यात किती चमक होती,किती आनंदी होता तो..जसे काही हे सगळं त्याच्यासोबतच घडत आहे.मीराला पाळी आलेली बघून तोच किती सुखावला होता..हॉस्पिटलमध्ये सुद्धा लहान बाळांकडे,त्या दूध पाजणाऱ्या मातांकडे किती कुतूहलाने तो बघत असायचा..त्याची स्वयंपाकाची आवड..त्याच्या घरी त्याला कोणी करू देत नाही म्हणून तो मीराकडे येऊन तिला काय काय बनवून खाऊ घालत होता..आता लग्नाच्या वेळी पण त्याला स्वत:च्या कपड्यांमध्ये त्याला काहीच इंटरेस्ट नव्हता,पण मीराचे कपडे घेतांना,साडीच्या पोतला हात लाऊन बघतांना तो किती सुखावून जात होता..
तो मीराच्या माध्यमातून आपली आवड पूर्ण करत होता.तो शरीर होता,पण त्याची आत्मा जणूकाही मीरा होती,तिला सजवतांना तो आपली सगळी इच्छा पूर्ण करत होता.तिच्या रुपात,तिच्या अस्तित्वात तो स्वतःच अस्तित्व शोधत होता.
कॉलेजमध्ये तिच्या दूर असणे..दुसरा मुलगा निवड सांगणे..त्याला तू ऐश्वर्या सारखा दिसतो म्हटल्यावर त्याचे ते गोड हसणे..सुखावून जाणे..त्याचे तिला लग्नासाठी नकार देणे..शारीरिक जवळीक साधताना त्याची चिडचिड होणे..सगळं सगळं तिच्या डोळ्यांपुढे येत होते..
खरंच तो एवढया शिक्षेचा पात्र आहे काय? तो तर लग्नासाठी नकारच देत होता,मीच आत्महत्या करत त्याला लग्न करण्यासाठी भाग पाडले..तो तर वारंवार सांगत होता,तो फक्त एका मैत्रिणीप्रमाणे तिच्यावर प्रेम करतो.. मीरा तुझं प्रेम इतकं कमजोर कसे निघाले,की तू तुझ्या श्रीला ओळखू शकलो नाही?
तिला आता तिची एक एक चूक लक्षात येत होती..त्याला होणाऱ्या त्या सगळ्या वेदना आठवून आता मात्र तिचा कंठ दाटून आला होता..क्षणाचाही विलंब न करता ती होती त्याच अवतारात खाली पळत येत श्रीला करकचून श्रीला बिलगली.तिच्या मिठीने तो अक्षरशः लहान मुलासारखा रडू लागला.
"मीरा मी तुझे लाईफ खराब केले,मला माफ कर एकदाच..पण माझ्या चुकीमुळे मी तुझं आयुष्य खराब होऊ देणार नाही..पण एकदाच माफ कर..तू म्हणशील ते सगळं करेल..तुझ्या शिवाय कोणी नाही ग माझं..तुला असे त्रासात बघून मी सुखाने नाही राहू शकत ग..गेल्या आठ दिवसांपासून जीव गुदमरतोय ग माझा..श्वास घ्यायला पण खूप त्रास होतोय ग मीरा..मला माहिती मी तुझा गुन्हेगार आहे,पण प्लीज एकदाच माफ कर.."तो कळवळून रडत बोलत होता,त्याला नीट बोलता सुद्धा येत नव्हते,इतका त्याचा बोलतांना गळा दुखत होता.
"माझंच प्रेम कमी पडलेरे..मी माझ्या श्रीला नाही ओळखू शकले..तो तर नेहमीच निरागस,निष्पाप होता..तरी त्याला त्रास देत राहिले..जेव्हा माझ्या श्रीला सगळ्यात जास्त माझी गरज होती, तेव्हाच मी त्याला एकटे सोडले.सॉरी श्री.."दोघं एकमेकांच्या मिठीत खूप रडत होते.
______
मीराने श्रीला डॉक्टरकडे नेले..योग्य अशा सगळ्या टेस्ट,काऊन्सिल सगळं झालं.आणि श्री सोबत जे घडते आहे ते अगदीच नैसर्गिक आहे, असे त्यात निष्पन्न झाले.डॉक्टरांनी मीराला श्रीची परिस्थिती समजावून सांगितली.तो जे आहे त्याचा स्वीकार करणे त्याच्या आयुष्यासाठी जास्त चांगले आहे..असे दुहेरी आयुष्य जगणं त्याच्यासाठी घातक आहे..तो कधीही डिप्रेशनचा शिकार होऊ शकतो..आणि डिप्रेशन किती वाईट आहे, हे डॉक्टरांना वेगळं सांगायची गरज नाही..
________
"मीरा तू तुझ्या योग्य मुलासोबत लग्न कर. आपण लगेच divorce घेऊया.."
"Shssss! चूप,बिलकुल चूप..परत कधी असे बोलायचं नाही.."
"पण…"
"माझं प्रेम तुझ्या या शरीरावर नाहीये श्री.. आणि तू शारीरिकरित्या माझा झाला नाहीस म्हणून मी तुला सोडून दुसऱ्या कोणासोबत लग्न करू..माझं प्रेम इतकं लहान नाही श्री.. "
"मीरा,असे भावनिक होऊन नाही चालत..पुढे तुझं अख्ख आयुष्य आहे,वैवाहिक सुख यावर तुझा हक्क आहे..माझ्यासोबत तुझं आयुष्य अंधारमय आहे.."
"तुझ्या गुन्ह्याची तू शिक्षा भोगायला तयार आहेस ना..? "
"हो,तू देशील ती.."
"ठीक आहे,मग मला तुझी साथ हवी..मी जे सांगेल ते सगळं तू करायचं."
"हो..!"
"तू जेंडर म्हणजे लिंग परिवर्तन करायचं."
"काय?असं नाही होऊ शकत?घरदार,समाज कोणीच याचा स्वीकार करणार नाही."
"हे आयुष्य तुझं आहे,तुला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे श्री.."
"पण मीरा"
"माझं ऐकणार ना..?"
"तू म्हणशील ते सगळं करेल..पण तू दुसरं लग्न कर.."
"श्री,प्रेम एकदाच होतं, आणि तूच म्हणाला होता ना प्रेमात शरीराचा काहीच संबंध नाही..माझं लग्न झालंय श्री..तुझ्यासोबत..तू शरीराने काय आहेस मला काहीच फरक पडत नाही..तूच माझा लाईफ पार्टनर,तूच माझा सोल्मेट..आणि जर तू आनंदाने नाही राहू शकत तर मी पण आयुष्यात सुखी नसणार.."मीरा त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होती..हो नाही करता करता शेवटी श्री तयार झाला..
"ऐक,तू खूप हुशार आहेस.येत्या तीन चार वर्षात तुला देशातील बेस्ट सर्जन बनायचे आहे..तुझ्याशिवाय कोणीच अशा क्रिटिकल केसेस हॅण्डल करू शकणार नाही इतकं स्पेशल डॉक्टर तुला बनायचे आहे..दिवस रात्र एक कर..काही कर,पण तुला युनिक बनावे लागेल..मोठे कर्तृत्व हाच यावर उपाय आहे..तेव्हाच हा समाज तुला स्वीकारेल.."
श्रीने होकार दिला..मीरा आणि श्री दोघंही खूप मेहनत घेऊ लागले..श्रीने आपला अभ्यास वाढवला..गरज पडेल ते सगळे कोर्स तो करत होता..क्रिटिकल केसेससाठी त्याला बोलावण्यात येऊ लागले.हळूहळू त्याची स्वतःची ओळख निर्माण होऊ लागली.बाहेर जगात सुद्धा त्याच्या नावाने त्याचा परिवाराची मान उंचावली होती.
दोघांनी मिळून आपले स्वतःचे हॉस्पिटल उभारले.त्यांनी गराजुंसाठी फ्री ट्रीटमेंट मिळेल अशी सोय केली..हळूहळू ते पण नावाला येऊ लागले.तृतीयपंथींना हॉस्पिटलमध्ये सन्मानाने वागणूक मिळत होती.सुरवातीला काही लोकांनी त्याचा निषेध केला होता..मात्र श्रीने त्यांना स्पष्ट सांगितले इथे स्त्री,पुरुष,तृतीयपंथी असा भेद चालणार नाही..इथे फक्त माणसाला उपचार मिळतील..ज्यांना पटत आहे त्यांनी इथे यावे, नसेल पटत तर इथे उपचार घेण्यासाठी काही आग्रह नाही..त्याचे ऐकून सगळे हैराण झाले होते..आधी लोकांनी हॉस्पिटलचा निषेध केला..पण नंतर मात्र उपचार घ्यायला त्यांना तिथे यावेच लागले होते.भेदभाव मिटवून माणुसकी जपण्यात ते हॉस्पिटल यशस्वी झाले होते.श्री आणि मीरा आपली वेगळी आणि युनिक ओळख जपण्यात यशस्वी झाले होते.
____
आता वेळ आली होती लिंग परिवर्तन करण्याची..घरच्यांनी याला खूप विरोध केला..स्वतःचे कमावलेले नाव मातीत मिळवशील म्हणून खूप समजावले सुद्धा…
"आई,बाबा,आजी..खूप झालं आता..श्री तुमच्या मता प्रमाणे जगाला,या समाजासाठी जगाला…आता त्याला स्वतःसाठी जगू देत…आयुष्य एकदाच मिळतं, आणि या जगण्यावर त्याचा अधिकार आहे..त्याला त्याचं अस्तित्व जपू देत…काळजी करू नका तुमचं नाव खराब होणार नाही.. त्यानं इतकं नाव कमावले आहे की तुमच्या कितीतरी पिढ्या त्याचा ऋणी राहतील.."
"श्री,ही कोणी तुझ्या सोबत नसली तरी,मी तुझ्यासोबत आहे…मला फक्त तुझं आनंदी आयुष्य हवे आहे…"म्हणत मीरा त्याचा हात आपल्या हातात घेऊन सगळ्यांसमोर ठामपणे म्हणाली.
घरातील सगळ्यांनी श्रीची साथ सोडली होती…पण मीरा त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती..
जवळपास १८-२० तासांची लिंग परिवर्तनाची सर्जरी दोन टप्प्यांमध्ये यशस्वीपणे पार पडली.एक गर्भाशय सोडले तर श्री आता पूर्णपणे स्त्री झाला होता.आता त्याला दुहेरी आयुष्य जगावे लागणार नव्हते..
_____
"श्री, तुला पुरुषासोबत लग्न करायचे असेल तर तू कर.."
"नाही मीरा, मला शारीरिक ओढ नव्हती ग, मला फक्त मी जसा आहो तसा सगळ्यांनी स्वीकार करावा येवढेच होते.."
"बरं,माझा श्री,माझा नवरा मी इथे माझ्यात जपलेला आहे..आणि तो कायम असणार आहे.मला पण कधीच दुसऱ्या लग्नासाठी म्हणायचं नाही.."
श्रीचे डोळे पाणावले.,.
"आता रडायचं नाही..आता मनमोकळ जगायचं.."मीराने त्याचे डोळे पुसले..आणि त्यांची पुढल्या आयुष्याची वाटचाल सुरू झाली.
त्या नंतर जवळपास ७-८ महिने कोणीच त्याचा स्वीकार केला नव्हता..हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर म्हणून कोणी स्वीकार करत नव्हते..त्याला खूप अपमानास्पद वागणूक मिळत होती.
मीरा सुद्धा ट्रान्सजेंडर,थर्डजेंडर यांच्या आयुष्यावर खूप सेमिनार घेत होती..त्यांना जगण्याचा अधिकार आहे, ते पण सगळ्यांसारखे आहेत, पटवून देण्याचा जिवतोडून प्रयत्न करत होती.
"जो आपल्या शरीराला सांभाळू शकला नाही, आपल्या मनाचा उपचार करू शकला नाही..तो आमचा काय उपचार करणार..सायको.." असे काय काय लोकं त्याला बोलत होती..
पण शेवटी अशा काही मेडिकल केसेस होत्या,की त्याच्याशिवाय कोणी दुसरं ऑप्शन नव्हते..असले तर परदेशात होते, खूप पैसे घेणारे होते…त्यामुळे श्री त्यांना आता accept करावेच लागले होते…त्याने बहुतेक सगळ्याच शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या होत्या..आणि आता त्याचे काम बघता, हळूहळू सगळे त्याचा स्वीकार करू लागले होते. आणि आता तो ती डॉक्टर श्री झाली होती..श्री नावातच प्रेम आहे..ते स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी नाही, म्हणून मीराने त्याचे नाव न बदलता तेच नाव ठेवले होते..
******
वर्तमान…
"मीरा,आज फक्त तुझ्यामुळे आज या समाजात,देशात मला इतका सन्मान मिळाला. आपण जिंकलोय मीरा,आपली सगळी स्वप्न पूर्ण झाली..त्या दिवशी तू साथ नसती दिली तर,माझं अस्तित्व कुठेच नसते,मी जशी आहे तसा कोणी माझा स्वीकार केलाच नसता."तो मीराच्या फोटोला बघून बोलत होता..
"का,सोडून गेली मला..?"श्रीला मीराची शेवटची भेट आठवत होती .
"श्री,मला प्रॉमिस कर,प्रत्येक जन्मात फक्त तू माझा असशील आहे.."कॅन्सर वॉर्डच्या रूममध्ये बेडवर झोपलेली मीरा त्याला वचन मागत होती.
"देवाला सांग,पुढल्या आयुष्यात मला असे अर्धे नको ठेवू…"
"तू काय असणार,मला काही फरक पडत नाही..माझ्याजवळ जास्त वेळ नाहीये श्री..जन्मोजन्मी तू फक्त माझा असणार आहे,प्रॉमिस कर मला.."तिने हात आपला हात पुढे केला..अश्रूपूर्ण नजरेने त्याने आपला हात तिच्या हातात ठेवला..ओठांवर हसू आणत तिने डोळे मिटले ते कायमचेच..
त्यानंतर जवळपास पंधरा वर्ष श्री तिच्या मीराला स्वतःमध्ये जपत आपल्या आयुष्याची लढाई जिंकत सगळी स्वप्न पूर्ण करत होती, आणि आज ते सगळं पूर्ण झाले होते.
हातातली ट्रॉफी तिच्या फोटो पुढे ठेवत श्री तिचा फोटो घेऊन खुर्चीत बसला..अचानक त्याची मीरा त्याच्या डोळ्यांपुढे हसत उभी होती…आपला हात पुढे करून..श्रीने काहीच विचार न करता आनंदाने तिच्या हातात हात दिला.. मीराचा फोटो छातीशी कवटाळून त्याने आपले डोळे मिटले होते नेहमीसाठी…
********
समाप्त
