मी लेखणी

About Lekhani
मी लेखणी


शब्दांना कागदावर
उमटवणारी मी लेखणी
सांगते आपल्याला
मी माझी कहाणी

मराठीत मला लेखणी म्हणतात. हिंदीत कलम व इंग्रजीत पेन म्हणतात.
लेखणी म्हणून मला कोणी जास्त ओळखतच नाही. मला तर पेन या नावाचीच जास्त सवय झाली आहे.
मला स्वतःचे विचार नाही, मत नाही. मी फक्त ज्याच्या हातात असते, त्याचे विचार व मत लिहीण्याचे काम करीत असते.
बाजारात माझी खूप किंमत नाही. पण माझ्यामुळे लिहील्या गेलेल्या शब्दांना खूप मोल असते.
माझा इतिहासही खूप जुना आहे. फार फार पूर्वी माझे स्वरूप आजपेक्षा खूप वेगळे होते. मोराचे पंख शाईमध्ये बुडवून लिहीले जात असे.सुरूवातीला मला लाकडापासून बनविण्यात आले. लाकडापासून ते आजच्या बॉलपेन पर्यंतचा माझा प्रवास खूप मोठा आहे.मला अनेक रंग,रूप मिळत गेले. मी जरी बदलत गेले तरी फार पूर्वीपासून माझा उपयोग करून जे लिखाण लिहिले गेले ते आजही वाचायला मिळत आहे. ऋषी-मुनींनी,साधु-संतानी माझ्या साहाय्याने लिहीलेले ग्रंथ, वेद,पुराणे आजही लोकांना जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत आहे. पूर्वीच्या काळी दूरच्या लोकांना निरोप,संदेश देण्यासाठी माझा उपयोग केला जात असे. राजे,महाराजे कधी शांततेसाठी तहाचा संदेश पाठवायचे तर कधी युद्धाचे आव्हानही द्यायचे.
माझ्यातील ताकदीमुळे इतिहास घडलाही गेला आणि बदललाही गेला .

कोणी कवीने लिहीले आहे,

\" जादू कि किमया
म्हणावी या लेखणीची,
हिच्यामुळे वाताहत झाली किती राजवटींची।
हिने एक शब्द फिरवला आणि सांगता झाली पेशवाईची।
ज्यांच्याकडे हि नांदली ते किती थोर,
ही कधी शेक्सपिअरची तर कधी कुसुमाग्रजांची।।\"

आपापल्या गरजेनुसार प्रत्येक जण माझा उपयोग करतात. जेव्हा माझ्या मदतीने मुले पहिल्यांदा कागदावर अक्षरे काढतात, तेव्हा त्यांना होणारा आनंद पाहून मलाही खूप आनंद होत असतो. विद्यार्थी माझ्या मदतीने लेखन शिकतात, अभ्यास करतात व परीक्षेत उत्तीर्ण होतात. लेखन स्पर्धेत जेव्हा कोणी यशस्वी होते, तेव्हा त्यांच्या इतकाच मलाही आनंद होतो.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व प्रशस्तीपत्र यावर जेव्हा त्यांचे नाव लिहीताना माझा उपयोग होतो, तेव्हा तर मला खूप अभिमान वाटतो.
विद्यार्थी, शिक्षक,नोकरदार वर्ग, व्यावसायिक असे सर्वच जण माझा उपयोग करत असतात. महत्त्वाच्या नोंदी ठेवणे,हिशोब करणे अशा अनेक गोष्टींसाठी गृहिणींना मी मदत करत असते.
लेखक,कवी यांच्यासाठी तर मी वरदानच ठरते. त्यांच्या मनातील विचार कागदावर उतरवून मी त्यांना वाचकांपर्यंत पोहोचवते. पत्रकारांसाठी तर मी एक अस्त्र आहे. ते माझ्या मदतीने समाजात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींना लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करत असतात.
इतिहासात अनेक युद्धे तलवारीच्या जोरावर लढली गेली व जिंकली गेली.

\"एका लेखणीत हजार तलवारीची ताकद असते.\"
असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे.
आणि ते खरं आहे. तलवारीचा वार एका वेळी एकावरच करतो पण माझ्या साहाय्याने शब्दांतून केलेले वार एका वेळी अनेकांवर होत असतात.
म्हणूनचं माझ्याबदल कोणी म्हटले आहे,
\"ये बिना चिंगारी के अंगार जलाती है,
ये बिना रोशनी के राह दिखाती है,
ये बिना रास्ते के मुकाम पर पहुँचाती है।\"

पूर्वीपासून माझ्या साहाय्याने जे लेखन झाले आहे. ते ग्रंथ, पुस्तके या रूपात वाचण्यास मिळत आहे. त्यामुळे संस्कृती ,इतिहास व अजून बरीच माहिती कळत असते. आणि ज्या महानपुरूषांनी महान कार्य केले ,त्यांच्या कार्याची ओळख भावी पिढीला होत असते.
माझे वास्तव्य पूर्ण जगात आहे. अगदी पूर्वीपासून ते आतापर्यंत. माझ्यामुळेच व्यक्तींमध्ये ,समाजामध्ये, देशामध्ये व पूर्ण जगामध्ये विचारांची देवघेव होत गेली. राजकीय, सामाजिक अशा अनेक क्रांती घडत गेल्या. विचारांना प्रगट करण्याचे मी महत्त्वाचे साधन बनत गेले. जेव्हा माझा उपयोग चांगल्यासाठी होतो तेव्हा मलाही चांगलेच वाटते पण जेव्हा माझा उपयोग कोणी स्वार्थासाठी, इतरांना त्रास देण्यासाठी करतात तेव्हा मलाही खूप वाईट वाटते. माझा काही दोष नसताना ,मला अपराधीपणाची भावना येते. म्हणून मला नेहमी वाटते की, मी ज्या हातात असेल,
त्या हातातून सुंदर लिखाण घडू दे..लेखकाचे व वाचकाचेही जीवन आनंदाने भरू दे.
माझ्या ताकदीमुळे
मला तलवारीपेक्षा ही धारदार शस्त्र म्हटले आहे.
मी जितकी धारदार आहे तितकीच मऊ पण आहे.

प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांचे प्रेमळ शब्द मीचं कागदावर आणत असते. ते वाचून समोरची व्यक्तीही लगेच त्या व्यक्तीच्या प्रेमात पडत असते. मी अनेक प्रेमप्रकरणांना यशस्वी केले आहे.
पूर्वी आतासारखी संवादाची साधने नव्हती त्यामुळे माझा खूप उपयोग केला जात असे.
नातेवाईकांना, मित्रमंडळींना पत्रे पाठवितांना प्रत्येकाला माझी गरज असायची. ती पत्रे लिहीताना मला ही कधी आनंद व्हायचा तर कधी दुःख. इतकी त्या शब्दांमध्ये जादू होती. शुभेच्छा देतांना, अभिनंदन करताना व कौतुक करताना लिहिले गेलेले पत्र ,संदेश मला आजही सुखावून जातात.

पण आता मोबाईल, इंटरनेट च्या युगात कागद व मी कोणाच्या हातात सहसा दिसत नाही. टाइप केले आणि पाठविले की झाले काम. वेळही वाचतो आणि लगेच रिप्लाय ही मिळतो. त्यामुळे सर्वांना हे सर्व सोपे वाटते.
आता सर्वच ठिकाणी माझा उपयोग कमी होतांना दिसत आहे. अगोदर सर्वांसोबत कायम असणारी, सर्वांना मदत करणारी मी आता क्वचितच कामास येते.माझा उपयोग कमी झाला आहे पण माझे महत्त्व कधीही कमी होणार नाही.


आजची परिस्थिती पाहता,
मला सांगावेसे वाटते,


नव्या गोष्टींचा जरूर
स्विकार करावा
पण जुन्या गोष्टींचा
विसर न व्हावा


आजपर्यंत माझ्यावर आपण सर्वांनी,आपल्या पूर्वजांनी खुप प्रेम केले. आपणही असेच प्रेम करत रहा व आपल्या भावी पिढीलाही माझी ओळख देत रहा व प्रेम करण्यास सांगत रहा.

आपल्या सर्वांवर प्रेम करणारी मी आपली लाडकी लेखणी ,
संपविते माझी छोटीशी कहाणी



समाप्त

नलिनी बहाळकर