मी कशाला आरशात पाहू गं ( प्रज्ञा बो-हाडे) भाग ३

आपल कर्तृत्व आपल्याला आरशात पाहण्या-या झळाळी इतके उजळ असते.

©®प्रज्ञा बो-हाडे

मी कशाला आरशात पाहू गं भाग ३


श्याम गीताला घ्यायला येतो फुग्यांनी, फुलांनी सजलेली कार घेवून. त्यावर वेलकम नावाची थर्मोकाॅलची पाटी पुढे आणि मागच्या बाजूला लावलेली असते. गीताला हे सर्व पाहून आनंद होतो. मनात वाटणारी भीती नाहिशी होते.
गोडूल्या परीने जीवन परीपूर्ण बनवले आहे. आता सगळे मंगलमय होणार. माहेरच्यांचा निरोप घेत गीता सासरी जायला निघाली. सासरी पोहचताच सासूबाई दारात भाकरी तुकडा ओवाळायला सज्ज होत्या. गीताने नि:श्वास सोडला. सासूबाईंचा आपल्यावर राग नाही.
गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या बेडरुम पर्यंत सजवल्या होत्या. रुममध्ये रंगबिरंगी फुगे, रांगोळी काढली होती. गीता हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवत होती. उगाच माझीच नजर लागायची असे मनातल्या मनात पुटपुटली.
दुस-या दिवशी बाळाला आंघोळ घालण्याची वेळ आली. तिथे एक मावशी आल्या. बाळाला द्या माझ्याकडे. मालिश करते मी. गीताला वाटले, कदाचित तेल मालिश झाल्यावर सासूबाई येतील आंघोळ घालायला. पण तसे काही घडलेच नाही. नंतर कळाले बाळाला आंघोळ घालायला या मावशी नेमण्यात आल्या आहेत.
गीताला वाईट वाटले. आपल नातवंड म्हणून सासूबाई लाडाने जवळ घेतील. सासूबाई गीताशी चांगल्या वागायच्या परंतु बाळाला सांभाळायला दिवस भराकरता गीताच्या अनुपस्थितीत मावशींची नेमणूक केली होती.
श्याम देखील तेवढ्यापुरते बाळाच्या जवळ जायचा. पण कधी प्रेमाने बाळाला उचलून घेत नव्हता. श्यामने ठरवल्याप्रमाणे बाळाच नाव सुंदरा ठेवण्यात आले. बारश्याच्या वेळी जमलेल्या बायकांची कुजबूज ऐकू येवू लागली. बाळ दिसायला सावळे आणि नाव मात्र सुंदरा. मिळत-जुळत नाव ठेवायला हव जरा.
तर दुसरीकडून आई-वडिल एवढे गोरे आहेत पण बाळ सावळे कसे झाले? असे एक ना एक कानावर ऐकू येत होते. जन्म घेताना रंगरुप घेवून जन्म घेता तर येत नाही? मग यात सुंदराचा काय दोष? आत्ताशी कुठे जन्माला आली, अजून तर सुंदराला जगाशी सामना करायचा.


सुंदरा हळूहळू मोठी होत चालली. ती तीन वर्षाची झाली तसे गीताला दुसरा चान्स आणि यावेळी नातूच हवा असा घरच्यांचा हट्ट पुरवण्यात आला. गोंडस सासूबाईंना हवा तसच मुलगा झाला. तो ही गोरापाण. यावेळी माहेरी न पाठवता सासरीच सर्व डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. बाळाच लगेच बारस झाल त्याच नाव सुशिल ठेवले.
रीमा सुशिलच्या वेळी महिनाभराची सुट्टी काढून गीताकडे आली होती. सुशिलला कोणीच एकटे सोडत नव्हते. एकाने जर त्याला खाली ठेवले तर दुसरे कोणीतरी लगेच त्याला उचलून घ्यायला सज्ज असायचे. सुंदरा बाबत मात्र तसे नव्हते. तीला सास-यांखेरीज कोणीच उचलून घेत नसायचे. क्विचितच काम पडले तर श्याम घ्यायचा. पण तेही मनाविरुद्ध.


गीताला या गोष्टी खटकत होत्या पण बोलायच्या कोणाजवळ. दोघे ही शाळेत जायला लागले होते. सुशिल त्याचा गृहपाठ सुंदरा कडून करुन घ्यायचा. स्वत: मात्र खेळायला निघून जायचा. आपला धाकटा भाऊ म्हणून सुंदरा दरवेळेस त्याला पाठीशी घालू लागली. सुंदरा वक्तृत्व, खेळाडू स्पर्धेत नेहमी प्रथम क्रमांकाची ट्राॅफी घरी घेवून यायची. परीक्षेत पहिला नंबर तिने कधी सोडला नाही.
सुशिलला फारशी अभ्यासाची गोडी नव्हती. लहान वयात तो मोठ्यांची सायकल चालवायला शिकला. सुंदराला नृत्याची आवड आहे हे जाणताच गीताने डान्स क्लास लावण्याची कल्पना श्यामला बोलून दाखवली, परंतु त्याला सुशिलला मोटार सायकल घेण्याचे कबूल केल्यामुळे पुढच्या वर्षी पाहू असे उत्तर ऐकायला मिळाले.


सुंदराला जसे काही या सर्व गोष्टींची सवय झाली होती. सुशिलचे होणारे लाड, कौतुक सुंदरा नेहमी आपल्या पेक्षा लहान आहे म्हणून सुशिलचे लाड होतात हि समजूत करुन घेतली असावी. आपण का नाही सुशिल नंतर जन्माला आलो याची खंत गीता जवळ एकदा सुंदराने बोलून दाखवली. बाबा नेहमी सुशिलला जवळ घेतात. त्याला गाडी, हव ते खायला घेवून येतात. मला काय आवडत हे बाबांना माहित देखील नसणार.


मी खरच इतकी वाईट आहे का? की माझा रंग सावळा म्हणून मी नकोशी वाटते का? मला अस नेहमी शाळेत, काॅलेजला गेल्यावर वाटते. सांग ना आई?


गीता आपल्या मुलीची म्हणजेच सुंदराची समजूत काढते, त्यातून सुंदराच आयुष्य कसे घडते हे आपण पाहणार आहोत अंतिम भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all