मी कशाला आरशात पाहू गं ( प्रज्ञा बो-हाडे) भाग ४

आपल्या कर्तृत्वाला आरशा इतकी झळाळी लाभत असते.

©®प्रज्ञा बो-हाडे

मी कशाला आरशात पाहू गं भाग ४


सुंदरा एक दिवस खिडकीत बसून स्वत:च्याच विचारात मग्न होती. तिच्या डोक्यात विचारांच काहूर माजले होते. आपली आई सोडली तर कोणालाच मी नको आहे. लहानपणापासून आजी, पप्पा, शाळेतल्या, काॅलेजमधल्या मैत्रिणींनी सावळ्या रंगावरुन बोल लावले. काळी, मुंगळी अश्या उपमा दिल्या. तुला काय करायचे नटून-थटून कोळसा काळा तो काळाच. असे हदयाला चटका लावणारे भाष्य ऐकायला मिळाले. कोणाकोणाला तोंड द्यायच. आपण सावळ आहोत यात आपली काय चूक. डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
आई तिथे आली. आईच्या नजरेतून ती गोष्ट चुकली नाही. आईने खूप सुंदर शब्दांत सुंदराची समजूत घालण्याकरता उदाहरणे दिली.
आपला जन्म हि दैवी देणगी आहे. एकदा लाभलेल्या जन्मात सुंदर गोष्टी आत्मसात करायच्या. चांगल्या गोष्टी नेहमीच जीवनात पुढे जाण्याची गवाही देतात. तर, वाईट गोष्टी काळजीपूर्वक पावले उचलायला शिकवत असतात.
आपल्या रंग, रुपा पेक्षा आपण माणूस म्हणून समाजात कसे वावरतो हे महत्वाचे असते. आपली कोणत्याही कामाप्रती असणारी निष्ठा, आपण ते इतरांपेक्षा वेगळ्या खूबीने कसे पूर्ण करतो, आपल कर्तृत्व, आपल्याला आवडणारे छंद विकसित करत असताना आपला वेळ सन्मार्गी कसा लावतो ह्या कडे लक्ष दिले की आयुष्य जगण्याच पडलेल कोड चुटकीसरशी सोडवल जात. आपल्यात काही कमी आहे म्हणून ज्या गोष्टी उत्तम आपल्याला जमतात त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते.


प्रत्येकामध्ये असा काही एक गुण लपलेला असतो तो त्याच्याइतका अचूक दुस-या कोणालाही जमतच नाही. त्या गुणांची जाणिव एकदा प्रत्येकाला आत्मसात झाली की जीवनातल्या नैराश्याचे मळभ आपोआप दूर सारले जाईल.
सुंदरा तू तुझ्यात लपलेल्या त्या गुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न कर. तुला आत्तापर्यंत जे करायला आवडत होते, पण लोक नाव ठेवतील या विचाराने तू ते काम करण्याच धाडस कधी केल नाही. त्या गोष्टी करायला सुरवात कर. मी तुला नेहमीच पाठिंबा देईन.


आईने सांगितलेल्या वाक्यांनी सुंदरा भारावून गेली. आईचा हात डोक्यावर असल्यावर कशाची भीती? आपल्याला गाणी गायला आवडते. सुंदराने गाण्याचा क्लास लावायचे ठरवले. त्यातून गायनाच्या अनेक स्पर्धा पार करत मानसन्मानाचे अनेक योग येत राहिले. त्यातच अभ्यास करुन एम. पी.एस ची परीक्षा देण्याचा सुंदराने निर्णय घेतला.


तेव्हा देखील पप्पा आणि आजी ने हिणवले, आरशात तोंड पाहिले का कधी. जमणार आहे का तुला. या बोलण्याकडे सुंदराने चांगल्या बाजूने पाहत. मन लावून अभ्यास केला. पहाटे उठून गच्चीवर जावून छोटा बल्बच्या उजेडात अभ्यास करु लागली.
सुंदराच्या प्रयत्नांना यशाची झालर मिळाली. क्लास - १ परीक्षा पास झाल्यावर डि. वाय. एस. पी पदी निवड झाली. दुस-या शहरात पोस्टिंग झाल्यावर घराचे चित्र पालटून गेले. कधी न बोलणारी रीमा मावशी तिच्या मुलांना घेवून घरी आली होती. आजी लाडाने जवळ करत होती. पप्पांनी आज स्वत:हून पंजाबी ड्रेस आणि ज्वेलरी आणली होती.
आज माझ्यातला खटकला जाणारा सावळेपणा कुठे गेला? याचा विचार सुंदराच्या मनात आला. आजीला आणि पप्पांना सावळा रंग आवडत नाही. आत्तापर्यंत कधीही कौतुक न करणारे. माझी नात, माझी मुलगी म्हणून लाड करत आहेत.
हा कर्तृत्वाचा रंग इतकी झळाळी देणार हे आधीच माहित असते तर मी मनातल्या मनात स्वत:ला इतकी दूषणे दिलीच नसती.
आज पुन्हा एकदा ज्या माऊलीने मला इथपर्यंत आणण्याची संधी दिली. तिच्या जवळ जावून मन मोकळ करावस वाटत आहे.

सुंदरा : आई, आज मला पहिल्यांदा स्वत:ला पाहण्यासाठी आरशाची गरज भासत नाही.

आई : का ग मध्येच काय अशी बोलते आहेस. मला समजले नाही तुला काय बोलायचे आहे ते.

सुंदरा : कर्तृत्वाचा रंग आपल्या शरीरावर चढवला गेला अथवा यश आपल्या हाती ओंजळ भरुन उभ असले की, आपल्या नावाचा जयजयकार आपल्या कल्पने पलिकडचा असतो नाही का? याकरता स्वत:ला पाहण्याची आरशाची गरजच भासत नाही.

आई : आजवर तू सावळ्या रंगामुळे आजी आणि वडिलांच्या प्रेमाला मुकली होतीस , नातेवाईक, आजूबाजूचे लोक तूझी खिल्ली उडवत होते. तेव्हा तुझ्यापेक्षा माझ्या आत्माला यातना अधिक होत असायच्या. तुला फारश्या जाणवू नये म्हणून मी त्या दाबून ठेवायची. तुझी समजूत काढता - काढता मी देवासमोर जावून रोज रडायची. पण देवाने माझी हाक ऐकली बघ.


आज तुला मोठा पदावर कार्यरत केले. माझ्या मुलीला पाहण्यासाठी कर्तृत्वाचे गुण हेरणारी नजर हवी. त्यात तिची छबी पाहायला मिळेल.

सुंदरा : बरोबर बोलते आई. मी आता कशाला आरशात पाहू. माझी ओळख माझ्या कर्तृत्वात लपली आहे. माझ्याकडे पद येताच क्षणी नकोशी वाटणारी मी सर्वांना हवीशी वाटायला लागली. मी तर पूर्वीचीच आहे. माझ्यात काहीच बदल झाला नाही. माझ्या नावा मागे डि. वाय. एस. पी पाटी लागली आणि सावळेपणा दिसेनासाच झाला.


तू या आधी मला समजून सांगितले आपल्या दिसण्यापेक्षा आपले कार्य समाजात पाहिले जाते. याचाच विचार मनी घेवून मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. माझा छंद जोपासला. आणि आज तू दिलेली साथ माझ्या आयुष्यात जादूची कांडी फिरवल्यासारखी जीवन जगण्याच्या नव्या अध्यायात पावले उमटवण्यास मदतनीस ठरत आहे.


वाचकहो, सुंदरा तर तिच्या आयुष्यात सुखी झाली. आजी तिच्या अवतिभवति पिंगा घालते. माझ्या बबडीला हे आणते स्वत:च्या हाताने करुन. पप्पा आता तर स्वत:हून तासान तास बोलत असतात. आठवड्यातून कुटूंबासोबत फिरायला जाण्याची रुपरेषा बाबाच आखतात.
सुंदराच्या मनात विचार येतो, \" जर हे पद लहान असताना मिळवता आल असत तर, पप्पांनी मला उचलून घेतले असते. खांद्यावर बसून यात्रेत फिरवले असते. आजीने स्वत:च्या हाताने मला भरवल असते. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावतात. उशीरा का होईना हे सुख पदरात पडले याचा आनंद सुंदरा उपभोगत होती.


या कथामलिकेवरुन एक संदेश नक्की तुमच्या पर्यंत पोहचवावासा वाटतो तो हा की, आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना जाणून, आवडीचे छंद जोपासत, जिद्दीने ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न जरुर करावा. कर्तृत्वाची जोड आपल्या नावा मागे आली की, आपल्याला स्वत:चा चेहरा पाहायला आरशाची गरज भासणार नाही. तो चेहरा आपण गुणगौरवाने, कौतुकाने पाहू शकतो.


कथामालिका कशी वाटली कमेंट करुन जरुर सांगा.

समाप्त : 

🎭 Series Post

View all