Dec 01, 2021
कथामालिका

मधुरीमा (भाग १८)

Read Later
मधुरीमा (भाग १८)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

मधुरीमा (भाग१८)


"मधे, काय हे? अजूनही तू कनफ्युज्ड् आहेसच का? झाली ना आता एंगेजमेंट ! अन् तू तर म्हणाली होतीस रुद्र तुला पहिल्याच भेटीत आवडला होता म्हणून." रीमा.

"हो गं, मला रुद्र बद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आई-बाबांची काळजी वाटतेय, अन् तिकडे जायची भीती." मधुरा.

"काळजी वाटणं साहजिक आहे, ती वाटायला पण हवी. पण जी नवीन नाती निर्माण होत आहेत ती बहरण्यासाठी त्या नात्यांना वेळ दे. तुला ना सगळं असं आधीच माहिती असायला हवं असं वाटतं. ते काय आपलं सिलॅबस आहे का? हे असं, ते तसं अन् बाकीचं हे असंच राहणार असं असायला. मी तर म्हणते, रुद्रसोबत तू मनसोक्त गप्पा मारत जा, त्यामुळं तुला त्याचा स्वभाव लक्षात येईल आणि त्याच्यासोबत बोलताना एकंदरीत घरचे लोक कसे आहेत, घरातलं वातावरण कसं आहे हे पण कळेल हळू हळू. काका काकूंनाही मदत कर थोडीफार. सगळं दोघेच बघताय. आणि भविष्यात काय होईल काय नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आताचे दिवस मस्त जग काका काकूंसोबत." रीमा.

"हो, बरोबर आहे तुझं. ए तुला तर असा काही प्रॉब्लेम तर जाणारच नाही ना. किती दिवसापासून ओळखतेस तू तर अरविंदला!" मधुरा.

"काय उपयोग इतक्या दिवसांपासून ओळखते त्याचा." रीमा.

"का गं? काय झालं? अशी का बोलतेस?" मधुरा.

"काही नाही गं, असंच. जाऊ दे ना. कोणता विषय घेऊन बसलीस तू." रीमा.

"रीमा, सांग हां सरळ सरळ काय झालं ते." मधुरा.

 

रीमाने मधुराला ती जर्मनीला आल्यावर काय झालं होतं ते सगळं सांगितलं.

"अन्, हे सगळं तू आता सांगतेय मला. पागल आहेस का रीमा? एवढं सगळं घडलं अन् तुला माझ्याशी साधं शेअर करावं नाही वाटलं. एवढी परकी वाटले का मी तुला?" मधुरा.

"असं नकोस गं म्हणू, परकी वगैरे असा मी विचार पण नाही करू शकत. तुझ्या घरी पण तुझ्या लग्नावरून वातावरण टेंस होतच ना. मी आईला सुद्धा काहीच नाही सांगितलं. मला उगीचच तुम्हा लोकांची काळजी नव्हती वाढवायची. मी इथे हजारो मैल दूर... तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही लगेच इथं येऊ शकले नसते अन् मलाही तिकडे येता आलं नसतं. जाऊ दे ना मधु, सोड ते सगळं. मी आता त्या सगळ्यातून बाहेर आलीये." रीमा.

"ठीक आहे, काळजी घे." मधुरा.

 

रीमासोबत बोलल्यावर मधुरानी रुद्रला कॉल केला. कधी नव्हे तर ते दोघे अर्धा तास बोलले. रुद्र खूप मन मोकळं बोलला, बोलताना त्याच्या घरचा विषय निघाला होता, रुद्र सगळ्यांबद्दल भरभरून बोलत होता..फोन झाल्यावर मधुरा रुद्रचा विचार करत झोपून गेली.

मधुरा सकाळी उठल्यावर घरात तिला थोडी शांतता जाणवली. उठून आधी ती स्वयंपाक घरात आली, राधिकाताई तिथे नव्हत्या, मधुकररावही घरात दिसत नव्हते म्हणून मधुरा अंगणात आली. आई झाडांना पाणी देत होती, तर बाबा पेपर वाचत बसलेले होते. मधुराही तिथेच पायरीवर बसली.

"आई, आज काय करायचं दिवसभर?" मधुरा.

 

"आज आमचं महिला मंडळ येणार आहे आपल्या घरी. आम्ही सगळ्या मिळून आज मालत्या, सरोळे, गहुल्या, बोटवे, फेनुल्या, खण-नारळ, वगैरे बनवणार आहोत. रुखवंतात ठेवायला लागेल ना."

"आई हे सगळं विकत पण मिळत असेल ना. कशाला दगदग करतेस." मधुरा.

 

"अगं दगदग कशाची. दहा-बाराजणी आहोत आम्ही सगळ्या. सगळयांनी मिळून केलं की जाणवत पण नाही. कुरडया, पापड्या, पापड, मुगवड्या, शेवया हे तर मागच्याच आठवड्यात बनवलंसुद्धा आम्ही. बायका करतात गं आवडीने. अन् तेवढाच त्यांच्या कला-गुणांना वाव मिळतो. आजचं झालं की वाळवणाचं बनवणं संपेल.  मग उद्यापासून आपण खरेदीला जात जाऊ. तुला काय काय घ्यायचं त्याची यादी बनवून ठेव. कपडे शिवायला पण वेळ लागेल ना. अन् साक्षगंधासारखं नुसते कपडे शिवून घालायचं अस नाही ना, या वेळेस बॅग पण पॅक करावी लागेल." बोलता बोलता  राधिकाताईंचा आवाज कातर झाला होता. मधुकररावांच्या ते लक्षात आलं.

"बरं मी काय म्हणतो, जरा मी बँकेत जाऊन येतो. पेंशन जमा झाल्याचा मेसेज नाही आला. जमा झाली की नाही ते पाहून येतो. येताना त्या पत्रिकेवाल्याकडे जाऊन येतो, काल त्याला फोन केला होता, काही सॅम्पल पत्रिका घेऊन जा म्हणे. मी त्या घरीच आणतो, आपण तिघे मिळून करू मग फायनल." मधुकरराव.

"बाबा कशाला बँकेत जाता तुम्ही, ऑनलाइन कळत ना सगळं." मधुरा.

"हो गं बाई , कळत सगळं ऑनलाइन. पण तरी मी जाऊन येतो." मधुकरराव.

"मग मी पण येते तुमच्यासोबत. तसंही आई ते बोअरिंग वाळवणाचं बनवत बसणार आहे." मधुरा.

 

मधुरा बाबांसोबत तयार होऊन बँकेत जायला निघाली होती. बाबा साईडच्या सीटवर बसले होते, मधुरा कार ड्राईव्ह करत होती. बाबांसोबत तिची मस्त  बडबड सुरू होती.

"बाबा, याच ब्रांच मधून तुम्ही मॅनेजर म्हणून रिटायर झाले अन् मग आता बँकेत जाता तर कसं वाटतं तुम्हाला.?" मधुरा.

 

"खूप आठवण येते त्या काळाची. कधी कधी विश्वासच नाही बसत मी स्वतः हे सगळं सांभाळलं याचा. मस्त दिवस होते, खेळीमेळीचे वातावरण होते बँकेत." बाबांच्या गोष्टी ऐकता ऐकता दोघे बँकेत पोहोचले. मधुरासुद्धा मधुकररावांसोबत आत गेली. बँकेतले बरेच लोक मधूकररावांच्या ओळखीचे होते, सगळे जण मधुकररावांसोबत गप्पा करायला लागले, कोणीतरी कटींग चहाची ऑर्डर दिली, चहा घेताना तर अजून गप्पा, गोष्टी, विनोद सुरु होते. मधुरा दुरून सगळं बघत होती. बाहेर पडताना मधुकररावांच्या ओळखीतली अजून दोन-चार व्यक्ती भेटल्या, त्यांच्यासोबतही दोन-चार मिनिटं बोलणं झालं.

"खरंच, काय गरज आहे सगळं घरी बसून ऑनलाइन जाणून घ्यायची? तेवढंच घराबाहेर निघणं होतं, ओळखीचे लोकं भेटतात, सुख दुःखाच्या गोष्टी शेअर होतात." मधुरा स्वतःशीच पुटपुटली.

सॅम्पल पत्रिका घेऊन दोघे घरी वापस आले. तोपर्यंत राधिकाताईंचंं महिला मंडळ घरी आलं होतं. हॉलमध्ये मोठी सतरंजी टाकून सगळ्या महिला बसलेल्या होत्या. राधिकाताईंनी मधुराला सगळ्यांची ओळख करून दिली. मधुरा तिथेच सोफ्यावर बसून सगळं बघत होती. प्रत्येक जणीचे बोटं नाजूकपणे रव्या-मैद्याच्या उंडयावरून फिरत होते, बारीक एकसारखे, निरनिराळे प्रकार बनत होते. ते सगळं बनवताना महिलांनी लग्नातली गाणी म्हणायला सुरुवात केली. गाणी म्हणताना रुद्र आणि मधुराचे नावही त्या गाण्यात घेत होत्या. चार-पाच गाणी झाली अन् पुन्हा बायकांची बडबड सुरू झाली. मधुरा गायनेकॉलॉजिस्ट आहे म्हटल्यावर तर प्रत्येक जण कोणी स्वतःचा, कोणी मुलीचा, कोणी सुनेचा तर कोणी ओळखीतल्या एखाद्या बाईचा त्रास मधुरा सांगत होत्या. मधुरा सगळ्यांचं अगदी शांतपणे ऐकलं. सगळ्यांना खूप शांतपणे समजावून सांगितलं, "काकु असं याला सांगून, त्याला सांगून होत नसतं. दवाखान्यात जाऊन डॉक्टरला दाखवून नीट ट्रीटमेंट घ्यावी लागते."

    आता मात्र मधुरा वैतागली होती. इतक्यात तिच्या फोनवर रुद्रचा फोन आला. रुद्रचं नाव बघून मधुरा गालातल्या गालात हसली. या बायकांच्या प्रश्न उत्तरांच्या तावडीतून सोडवायला जणू तो एखाद्या देवाप्रमाणेच धावून आला होता. मधुरा तिथून उठून जाऊ लागली तेव्हा कोणीतरी एक बाई  म्हणाली, " जावई बापूंचा फोन आला वाटतं! जा हो! बोलून घे. आताच दिवस असतात बोलायचे! आता नवरे बोलतातही अन् ऐकतातही! नंतर मग बोलतही नाहीत अन् ऐकतही नाही. आमचं ध्यान! नव्यांनव वेळा 'अहो' म्हटलं तर ऐकू जात नाही. शंभराव्या वेळी खेकसून 'अहो' म्हटलं की ऐकू जातं. अन् मग माझ्याकडे बघतं तर असं की जणू त्याची प्रधानमंत्र्याबरोबर मिटिंग होती अन् मी त्याला भर मिटिंग मधून उठवलं.!" सगळ्या बायकात हशा पिकला. मधुराही हसतच तिथून सटकली, तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचा फोन आला होता, लवकरच सजवलेल्या घोड्यावर बसून तो तिला घ्यायला येणार होता.

 

क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


                                   © डॉ किमया मुळावकर

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न