Login

माझ्याशी ही बोला भाग 1

माझ्याशी ही बोला मी पण तुमच्या घरचा एक भाग आहे

माझ्याशी ही बोला भाग 1
मी पण तुमच्या घरचा एक भाग आहे.

©️®️शिल्पा सुतार

ऑफिस मध्ये ऑडिट होतं म्हणून संतोष आज उशिरा घरी येणार होता. तस त्याने आईला फोन करून करून सांगितलं होतं. आईने बाबांना सांगितल. जिला सांगायला हव तिला कोणीच सांगितल नाही. ती म्हणजे संतोषची बायको राखी. घरातल्या कोणाला याची गरज वाटली नाही. समजेल आपोआप. ती किचन मधे कामात होती.

राखी विचार करत होती आज अजून हे आले कसे नाहीत. कोणाला विचारणार? नणंद अभ्यास करत होती. ती कॉलेजला होती. तिची परीक्षा सुरू होती. सासुबाई सासरे टीव्ही बघत होते.

ती जेवणाचे ताटं करत होती. पण तिचं सगळं लक्ष बाहेर होतं. संतोष उशिराने येणार आहे हे तिला माहितीच नव्हतं. सासुबाई, सासरे, नणंद जेवायला बसले.

" राखी तू पण जेवून घे. संतोषला घरी यायला उशीर होणार आहे. ऑफिस मधे काम आहे." सासुबाई बोलल्या.

हो. हे ऐकुन तिला थोडा राग आला. बायकोला कळवायची गरच वाटत नाही का यांना. तरी तिने तिचं ताट केलं नाही. ती त्याच्या साठी जेवायला थांबली होती.

त्यांच्या लग्नाला सहा महिने तर झाले होते. मुळात अबोल होता संतोष. ते दोघे एकमेकांशी विशेष बोलतही नव्हते. अगदी प्रॅक्टीकल आयुष्य होत. ती तिच्या बाजूने बराच पुढाकार घेऊन बघत होती. पण संतोष तर ती दिसल्यावर असा पळत होता जसं काही कोणीतरी दुश्मन आपल्याशी बोलायला येत आहे.

त्या तिघांचे जेवण झालं. राखीने भांडे आवरले. ती आत मध्ये तिच्या खोलीत बसून होती. साडेनऊ झाले. बाहेर मोटरसायकलचा आवाज आला. आले वाटतं हे. तिला खूप आनंद झाला. आता आम्ही दोघं मिळून जेवून. त्या निम्मीत्ताने थोड्या गप्पा तरी मारता येतील. ती थोडी लाजली. चांगली तर दिसते ना मी. तिने उगीच केस नीट केले. आज बाकीच्यांची जेवण झाले होते या गोष्टीचं तिला खूप आनंद वाटत होता.

"राखी.... संतोष आला ग त्याच ताट आण." सासुबाईंनी पाच मिनिटांनी आवाज दिला.

राखी भाजी, भात, पोळी, पाण्याचं भांड घेऊन उभी होती.

"बघत काय बसली आहेस. ठेव ते ताट इथे टेबलवर." सासुबाई बोलल्या.

ती पण जेवायची बाकी होती. हे सासूबाईंना माहिती होतं. तरी त्या काही बोलल्या नाही.

संतोष हात पाय तोड धुवून आला. "तुम्ही लोक जेवले का?" त्याने आई बाबांना विचारल. तिला विचारल नाही. ती हिरमुसली.

तो तिथेच आई वडलांच्या जवळ बसून जेवत होता. राखी बाजूला उभी होती. तिच्याकडे पाहिलं ही नाही.

"तुझं जेवण बाकी आहे ना? जा जेवून घे." सासुबाई बोलल्या.

तिला वाटलं होतं तिचं जेवण बाकी आहे हे ऐकून संतोष म्हणेल. "अरे मला का नाही सांगितलं तुझं जेवण पण बाकी आहे. चल आपण पण आत मध्ये बसून जेवू. "

पण असं काही झालं नाही. त्याच्या चेहऱ्यावरची रेश ही हलली नाही. तो टीव्ही बघत जेवत होता. राखीला खूप वाईट वाटलं. तिने एकदा भाजी आणि पोळी बाहेर नेवून दिली. त्यांना काही नको आहे असं वाटल्यानंतर तिने तिचं ताट केला आणि किचनमध्ये एकटीच बसून जेवुन घेतलं. जेवताना तिच्या डोळ्यात पाणी होतं. "काय करणार पण त्रास करून घेवून. नेहमीच आहे. हे माझ्याशी बोलतच नाही. शांत स्वभाव त्यामुळे काय बोलणार? जे आहे ते ठीक आहे.

मला काही सांगायचं असलं तर आई तर्फे सांगतात. ना कुठे बाहेर जाण ना तिला काही सल्ले विचारणं. पगार पण सगळा आईकडे देतात. तिला काही लागलं तर सासूबाईंकडे मागायचं. दुखलं खुपलं तर त्यांना सांगायचं. जस काही मी सासुबाईं साठी लग्न केल आहे. मोकळ रहात नाही हे. ती चिडली होती.

मी कोण आहे नक्की? या घरात काम करणारी बाई आहे का? की नवऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी एक स्त्री त्याच्या आईने त्याला आणून दिलेली आहे. जिला मन नाही फक्त शरीर आहे. न बोलता तिचा उपभोग घ्यायचा. तेवढ्या अर्धा तासासाठी ती चालते. इतर वेळी तिच्याकडे बघायचं नाही. तिच्याशी बोलायचं नाही. तिला काय हव ते बघायचं नाही. असंच तर सुरू होतं.

तिच्या मनातले विचार आज थांबतच नव्हते कशीबशी अर्धी पोळी खाऊन ती उठली झाक-पाक केली आणि रूममध्ये येऊन पडली.


0

🎭 Series Post

View all