माझ्या राणीचा दरबार 5 अंतिम

मराठी कथा जलद कथा

5


एका दिवशी मयंक संध्याकाळी ऑफिसमधून आला. तो थोडा आनंदातच होता. त्याला नक्की काय सांगायचे होते?

"नेहा नेहा, आई नेहा कुठे आहे ग?" मयंक नेहाचा जप करतच घरात आला ते पाहून त्याची आई,

"आता लग्न झाल्यावर तुला आई दिसेनाशी झाली आहे का? बरं ठीक आहे. जा जा ती वर बेडरूममध्ये झोपली आहे." असे म्हणून नाटके करत बोलत होती.

"अगं आई, तसे काही नाही ग. तू तर माझी आई आहेस पण तिच्याकडे काम होते ना म्हणून मी तिचे नाव घेतले. बरं ठीक आहे. तू आता इथेच आहेस तर तुला सांगतो. आई नेहाला आमच्या ऑफिसमध्ये उद्यापासून जॉईन व्हायचे आहे म्हणून तिला सांगणार आहे. घरात बसून तसेही तिला काही काम नाही मग ऑफिसमध्ये आली तर तेवढीच मदत होईल म्हणून तिला ऑफिसमध्ये येण्यास बाबांनी परवानगी दिली आहे म्हणून इतक्या आनंदाने तिला ही गोष्ट सांगायला मी बोलावत होतो." मयंक जवळपास ओरडतच म्हणाला.

"अरे, मला माहित आहे. बाबा माझ्याशी सकाळीच या विषयावर बोलले आहेत पण तरीही मी उगीच तुझी चेष्टा केली. जा अजूनही ती झोपली आहे. संध्याकाळ होत आली आहे तिला उठव जा." असे म्हणून मयंकच्या आईने मयंकला त्याच्या रूममध्ये पाठवले. मयंकदेखील अगदी बरोबर गाणी गुणगुणत त्याच्या रूममध्ये आला तर नेहा बेडवर पडली होती. मयंक तर अवाक् होऊन तिच्याकडे पाहत होता. 'ही अजून इतका वेळ कशी काय झोपली आहे?' असे म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि त्याने पाहिले तर त्याला एकदम शॉक बसला कारण नेहाने औषध घेतले होते. अर्थातच तिने सुसाईड केले होते. त्याला काही कळायला मार्ग नव्हता. इतक्या चांगल्या घरात इतका चांगला मी वागत असताना इतका तिच्यावर प्रेम करत असतानाही तिने असे कसे केले? त्याला समजेना. त्याने लगेच बाबांना फोन लावला तसेच आईला वर बोलावून घेतले. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी नेहा हे जग सोडून गेली होती. त्याचा कोणालाच काहीच अर्थ लावता येईना. दोन दिवसानंतर मयंकने नेहाचा फोन पाहिला आणि फोनमधून त्याला त्याचा उलगडा झाला. यांच्या लग्नाअगोदर नेहाचे एका दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होते. अगदी कॉलेजमधून त्या दोघांची ओळख झाली होती आणि त्या ओळखीचे प्रेमात कधी रूपांतर झाले हे त्यांचे त्यांना कळले नाही. पुढे नोकरी लागल्यानंतर घरच्यांना सांगून लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता तेवढ्यात मयंकचे स्थळ त्यांना आले आणि नेहाचे लग्न मयंकशी अगदी जबरदस्तीने लावण्यात आले. जेव्हा मयंकचे स्थळ आले. तेव्हा नेहाने आढेवेढे घेतले होते पण तिच्या बाबांनी तिचे एकही काही ऐकले नाही. त्यांनी तिचे न ऐकता मयंकशी लग्न लावून दिले. इतके चांगले स्थळ हातचे का सोडायचे असा विचार त्यांनी केला होता. पण या सगळ्याचा असा अनर्थ घडला होता.

हे सगळे जेव्हा मयंकला समजले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. 'आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तू एकदा बोलली असतीस तर मी हसत हसत तुझे लग्न त्याच्याशी लावून दिले असते. प्रेम म्हणजे फक्त मिळवणे नसून समर्पण हे देखील प्रेमच आहे. मला फक्त तुला आनंदात पाहायचे होते पण तू अशी निघून गेलीस. मला तुझ्यासमोर हा दरबार भरवायचा होता पण तो अर्धवट टाकून तू निघून गेलीस.' असे म्हणून त्याचे डोळे भरून आले. शेवटी त्याचे मन म्हणून लागले,"होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार.."
समाप्त.

🎭 Series Post

View all